सारखे मन यार हो

Submitted by निशिकांत on 23 August, 2018 - 02:16

( तरही-सानी मिसरा ख्यातनाम गझलकार आदरणीय श्री भूषण कटककर "बेफिकीर" यांचा. )

शांत असतो झेलुनी मी वेदनांचे वार हो
दाखवा ठेवून माझ्यासारखे मन यार हो

चांगला म्हणतील सारे, स्वप्न जे होते उरी
शोकसंदेशातुनी ते जाहले साकार हो

व्यस्त असते आज आई, एवढी फुरसत कुठे?
व्यक्तिमत्वाला मुलांच्या द्यावया आकार हो

वादळाने शांततेशी जर कधी केला सुला
केवढे होईल जगणे आळणी बेकार हो ?

सांजवेळी एकटेपण , ना मुलांना काळजी
कार्ड सरकारीच आता जाहले आधार हो

ताठ मानेच्या जगी या लीनता दिसते क्वचित
घोंगडे जर अडकले तर, वाकुनी जोहार हो

पाहिले होते हजारो सभ्य मी बुरख्यातले
चालतो त्यांच्या मनीही मानसिक व्यभिचार हो

गोष्ट सांगावी कुणाला? एकटा गर्दीत या
आज शिकलो मी स्वतःला द्यावया हुंकार हो

आजही "निशिकांत"च्या ध्यानी न आले एवढे
का जिहाद्यांनी करावा मानवी संहार हो

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users