‘माथेरान’ व्हाया ‘सनसेट पॉईंट’ आणि ‘हाश्याची पट्टी’

Submitted by योगेश आहिरराव on 21 August, 2018 - 02:48

‘माथेरान’ व्हाया ‘सनसेट पॉईंट’ आणि ‘हाश्याची पट्टी’

निवार रविवार दोन दिवसाचा मेळावा ट्रेक काही कारणास्तव बारगळला. रविवारी सकाळी नऊ वाजता मायबोलीकर ट्रेकर मित्र सतीश कुडतरकर सोबत बोलणे झाले. त्यानुसार तासाभरात भेटून किमान अर्धा दिवसाचा तरी ट्रेक करून येऊ असं ठरले.
जवळपास आणि अर्धा दिवस ! अर्ध्या दिवसात सहज होऊ शकेल असा सोप्पा आणि साधा ट्रेक.. क्षणात माझ्या समोर माथेरान आले. नुकताच पंधरा दिवसांपूर्वी पिसारनाथ शिडीच्या वाटेने जाऊन आलो होतो.
त्यानंतर हाश्याची पट्टी मनात होतीच, त्यासोबत सनसेट पॉईंटची वाट जोडायचे मी ठरवलं. दहा सव्वादहाच्या सुमारास सतीशला डोंबिवलीतून पिक अप करून बुलेट वरुन पनवेल नेरे मार्गे धोदाणीत पोहचेपर्यंत दुपारचे साडेबारा वाजले. धोदाणीतून चार प्रचलित वाटांनी माथेरान गाठता येते.
१. मंकी पॉईंटची वाट.
२. सनसेट पॉईंटची वाट.
३. हाश्याची पट्टी मार्गे लुईझा पॉईंट.
४. उत्तरेला पेब किल्ल्याच्या समोरच्या डोंगराला उजवीकडे ठेवत वळसा घालत विजेच्या उच्च दाबाच्या तारांच्या सोबत खिंडीत जात पुढे पेब किल्ल्यामार्गे माथेरान.
(धोदाणीतील मंडळी नेरळच्या बाजूला जाण्यासाठी अजुनही हाच मार्ग वापरतात.)
यातील मंकी पॉईंट आणि पेब माथेरानची वाट आधी झाली होती. धोदाणेश्वर महादेव मंदिराजवळ ‘जोमा चौधरी’ यांच्या घरासमोर गाडी लावली. वाटेची सद्याची स्थिती इतर गप्पा गोष्टी, मग हेल्मेट त्यांच्या घरात ठेऊन बाटलीत पाणी भरून निघालो.
Sun 1.JPG
डावीकडे माथेरानचा पॅनोरमा पॉईंट पासून मंकी पॉईंट पर्यंतचा भाग. मंदिराच्या मागून टेपाडावर चढलो, समोर आंब्याचे मोठे झाड तिथून थोड्या अंतरावर अगदी तसेच एक मोठे वडाचे झाड. थोडक्यात धोदाणीतून सनसेट पॉईंट व चिंचवाडीकडे जाताना ही खूण म्हणता येईल. पहिल्या दहा मिनिटातच भर दुपारी चांदण्यात चालताना काय वाटले असेल हे सांगायची गरज नाही !
वडाच्या झाडाखाली सावलीत बसलो तेव्हा सनसेट पॉईंट काढून खाली उतरलेल्या डोंगर सोंडेवर थोडा झाडोरा पाहून बरे वाटले. थोडी विश्रांती पाण्याचे घोट घेत पुढे निघालो, उजवीकडे चिंचवाडीची वाट सोडून डावीकडे मुख्य वाटेने चढाईला सुरुवात झाली. जोपर्यंत जंगलात वाट शिरत नाही तोपर्यंत उन्हाचा तडाखा सहन करावाच लागणार, बोडक्या माळरानातून हळूहळू उंची गाठताना हाच विचार येत होता. पण नंतर मनात म्हटलं फार काही फरक पडत नाही, यापूर्वीही शाळा कॉलेजात असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत भर दुपारी क्रिकेट खेळायला जायचो तेव्हा तर शहरातील उन्हाचा तडाखा हा इथल्या वातावरणापेक्षा नक्कीच जास्त असणार. तसेही सह्याद्रीत सर्व ऋतूत भटकणे होतच असते. उलट त्याचं विविध हंगामात वेगवेगळे रूप अनुभवणे त्यानुसार इथल्या निसर्गात घडणारा बदल जसे हवा पाणी झाडी वनस्पती फळं फुले पक्षी प्राणी हे सर्व जाणून घेण्यासाठी ठराविक काळाचे बंधन नसते. योग्य नियोजन, अभ्यास, आत्मविश्वास सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वत:ची शारीरिक व मानसिक क्षमता ओळखून उन्हाळी भटकंती चांगल्याप्रकारे जमू शकते. अर्थात अट्टल कसलेल्या ट्रेकर्सना हे सांगायची गरज नाही. सुरुवातीच्या पानगळीच्या जंगलातून वाट थोड वर जाताच उजवीकडून चिंचवाडीतून येणारी वाट येऊन मिळाली. बरीच गावकरी मंडळी वाटेत भेटली, भर उन्हात निघालोय याचं त्यांनाही नवल वाटले. जिथे जेव्हा सावली मिळेल त्या ठिकाणी थांबून दम खात पुढे निघायचे असाच क्रम होता.
छोटासा ट्रेव्हर्स मारुन ठराविक उंचीवर आलो तेव्हा डावीकडे पेब किल्ला स्पष्ट नजरेत आला, तर पाठीमागे मलंगगड, तावली, म्हैसमाळ व चंदेरी. अरुंद नाकड्यावरचा छोटासा टप्पा पार करुन वाट जंगलात शिरली. आडवं जात मधला एक ओढा पार करुन मंदिरापाशी आलो.
एक किस्सा राहिलाच सांगायचा... झाले असे मंदिराच्या थोडे अलीकडे वाटेत दोघे जण भेटले. अगदी भेदरलेल्या अवस्थेत. आम्हाला पाहताच आमच्याकडे पाणी मागितले. पाणी दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा नूरच पालटला, असं वाटत होते बहुधा यांनी बऱ्याच वेळानंतर माणूस पहिला असावा.
बोलणं झाल्यावर कळाले की, दोघे मुळचे नगर भागातले पनवेल जवळ कुठेतरी कामाला. या वाटेने माथेरानला जायला निघालेले पण सकाळ पासून वाट चुकून भटकत कुठून तरी कसे तरी मूळ वाटेला लागले. सोबत पुरेसे पाणी, खायचे प्यायचे सामान नाही. अर्थातच चुकामूक झाल्याने अतिरिक्त श्रम वाढून त्यांची उन्हात दमछाक झालेली, त्यामुळे वर न जाता अर्ध्यातून बहुतेक मंदिरापासून परतत होते. तसे पाहिले तर ही एकदमच साधी सोपी आणि सरळ वाट एकदा मुख्य वाटेला लागलो तर चुकायची बिलकुल शक्यता नाही. पण ही ठरली नवखी माणसं, पुरेशी माहिती आणि तयारी अभावी अशीच निघालेली. त्यांना दोन चार गोष्टी समजावून सांगून परतीच्या वाटेवर लावून दिले.
मंदिराच्या आवारात मस्त झाडी आणि सपाटी, अगदी वन भोजन करता येईल अशी मोकळी जागा. जुन्या दगडाला शेंदूर फासलेल्या या देवाजवळ गणपती बाप्पा व हनुमान, यांच्या मूर्ती, शिवलिंग तसेच साईबाबाचा फोटो. मूळ मंदिर कुणाचे ते काही कळले नाही असो पण मंदिराची जागा मात्र खूप प्रसन्न. इथुन पुढे मस्त जंगलातून आडवी चाल याला हवे तर छोटा पदर म्हणता येईल. नंतर सौम्य चढाई, वाटेत केळी खजूर सरबत असं एक एक करत पाऊण तासात झाडीच्या टप्प्यातून बाहेर आलो तेव्हा वर सनसेट पॉईंटचे टोक आणि त्यावरील रेलिंग स्पष्ट दिसले.
Sun 5.JPG
पॉईंटच्या कड्या पर्यंत अंदाजे दोन अडीचशे ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌फूट चढाई बाकी होती. कडा डावीकडे आणि उजवीकडे दरी अशी मळलेली वाट. एका वळणावर खाली पदरातले जंगल त्यामागे हाश्याची पट्टी कडून आलेला दांड त्याच्याही मागे निमदा डोंगर पलीकडे म्हातारीची खिंड, हिच खिंड गेल्या पंधरवड्यात पिसारनाथच्या वाटेने चढताना पलीकडच्या बाजूने पाहिली होती.
या सर्वांच्या मागे पश्चिमेला दूरवर प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग. पदरातल्या टप्प्यातून निघाल्यावर अवघ्या दहा मिनिटातच रेलिंग जवळ आलो. घड्याळात पाहिलं तर तीन वाजत आले होते. पॉईंटवर कुणीच नव्हते. समोरच स्टॉल मध्ये स्थानिक तरुण त्याच्या कामात व्यस्त होता. सनसेट पॉईंट म्हणजे जास्त गर्दी सायंकाळी होणार तो त्याच तयारीला लागला होता. पॉईंटच्या मोकळ्या मैदानात मोठ्या झाडांखाली बसायला पार. स्टॉलवाल्याकडून पाणी घेऊन सतीश तिथेच थांबला. मी म्हंटलं, आलो आहोत तर टोकावर जाऊन येऊ.
Sun 23.jpg
स्टॉलच्या मागून दोन चार पाय-या उतरून निमुळत्या टोकावर गेलो. याच पॉईंटला पॉर्क्युपाईन पॉईंट असेही म्हणतात. टोकावरून पश्चिमेकडे प्रबळगड कलावंतीण दुर्ग, खाली चिंचवाडी धोदाणी, आम्ही आलो ती वाट, पूर्वेला मंकी पॉईंट हार्ट पॉईंट ते पार ईशान्येला पॅनोरमा पॉईंट पर्यंतचा माथेरानचा झाडीभरला भाग. खरंच संपूर्ण माथा गर्द झाडीने व्यापलेला मागे कुठेतरी वाचलेलं माथेरान मध्ये दर एकरी दोन हजारपेक्षा अधिक झाडे आहेत. त्यात चाळीस पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारांची.
उजव्या बाजूला मंकी पॉईंटच्या मधली दरी त्यात झेपावलेले सरळसोट कडे पावसाळ्यात याच कड्यातून अनेक धबधबे याच दरीत स्वत:ला झोकून देतात तसेच पेबच्या खिंडीतून येणारे ओढे हे सारे धोदाणी गावाच्या दिशेने जात पुढे गाढेश्वर तलावात मुख्य भर घालतात. मंकी पॉईंट पासून पॅनोरमा पॉईंट पर्यंत मघाशी म्हणालो तसे नीट निरखून पाहिलं तर या भागातल्या कड्यात भरपूर प्रमाणात दरडी कोसळल्याचं दिसतं. २००५ साली झालेल्या अतीवृष्टीत माथेरानच्या या भागात पेब किल्ला तसेच सिद्धगड भागात बरीच पडझड झाली होती. २०१२ साली मंकी पॉईंटची वाट केली तेव्हा ही भरपूर ठिकाणी वाट खचलेली. आता त्या पट्ट्यात झाडी गवत नाही जे काय थोडेफार असेल ते उन्हाने आणि वणवा लावून जळून नष्ट झालेले.
सनसेट पॉईंटहून निघून लुईझा पॉईंटच्या दिशेने चालू पडलो. आता उन्हाची फिकीर नव्हती, होती ती मस्त गर्द झाडांच्या सावलीतून वाट.
Sun 8.JPG
मला स्वत:ला माथेरानच्या या लाल चिरांच्या वाटा फार आवडतात. वाटेतल्या कोरोनेशन पॉईंटवर घटकाभर जाऊन आलो. तिथून पुढच्या दहा मिनिटात लुईझा पॉईंटवर आलो. इथं पॉईंटवर परीटघडीच्या पर्यंटकांची तुरळक गर्दी होती. थोडी पेटपुजा म्हणून आम्हीही स्टॉलवर भेळ घेतली. स्टॉलवाले हाश्याच्या पट्टीचे रहाणारे. थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा त्यात त्यांनी लगेच ओळखलं, ‘सनसेट हून आलात ना’ ! म्हणालो, ‘हो आणि आता हाश्याच्या पट्टीतून खाली उतणार’. भेळ संपवुन पॉईंट वर आलो. थोडक्यात माथेरानचा नैऋत्येला असलेला हा एक मोठा प्रसिद्ध पॉईंट, याच्या बरोब्बर खाली तीन एकशे फुटांवर लहान वाडी दिसते तीच हाश्याची पट्टी.
Sun 9.JPG
याआधी बऱ्याच वेळा इथून पाहिलेली आणि आज भेट देण्याचा योग आला होता. उजवीकडे प्रबळगड, कलावंतीण सुळका डावीकडे इको पॉईंट, लॉर्ड्स पॉईंट पासून दूरवर वन ट्री हिल पर्यंतचा भाग, तो पाहून मला परत गेल्या पंधरवड्यात केलेल्या पिसारनाथ आणि वन ट्री हिल ट्रेक आठवला.
Sun 10.JPG
तर दक्षिणेकडे मोरबे धरण, इर्शाळगड. लॉर्डस पॉईंट, इको पॉईंटचा कडा. याच इको पॉईंटच्या घळीतून दोन तीनशे फूट खाली उतरून कड्यातून आडवे चालत सतीश आणि त्याच्या ‘गिरीविराज’ हायकर्सच्या टिमने हनीमून पॉईंट आणि लँडस्केप पॉईंटची प्रस्तर भिंतीची चढाई केली होती. तसेच लुईझा पॉईंटला चिकटून असणारा सुळका. त्या मोहिमेतल्या बऱ्याच आठवणी सतीश ने सांगितल्या. नाही म्हणता बराच वेळ तिथे रेंगाळलो घड्याळात पाहिले साडेचार वाजत आले होते. लुईझा पॉईंट, गेल्या वेळी लॉर्ड्स पॉईंट हून काढलेला फोटो.
लुईझा पॉईंटच्या थोडं अलीकडे एक घर लागते त्याच्या अलीकडे कमानीतून पायऱ्या उतरत थेट हाश्याच्या पट्टीत उतरता येते. सुरुवातीला बांधलेल्या पायऱ्या पुढे मोठी प्रशस्त वाट नागमोडी वळणं घेत बरोब्बर मारुती मंदिरा समोर येते. बाजूलाच झेड पी च्या शाळेचे स्वच्छ आवार.
आपल्या सारख्या डोंगर भटक्यांची मुक्कामाची छान सोय. वाटेत अल्केम कंपनीने सी एस आर उपक्रम अंतर्गत बसविलेल्या पाण्याच्या टाक्या, खरेच एरवी पावसाळ्यात भरपूर पाणी असले तरी उन्हाळ्यात अश्या दुर्गम वाडी वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई जाणवते त्यांच्या या कामाचे कौतुक करावे तेवढे कमीच.
Sun 13.JPG
चाळीस पन्नास घरांच्या या हाश्याच्या पट्टीत इयत्ता चौथी पर्यंत शाळा पुढचं शिक्षण माथेरान पण मुलांच्या बाबतीत पावसाळ्यात येणं जाणं अवघड काम नाहीतर खाली गावातल्या आश्रम शाळेतला पर्याय. अगदीच थोडी पावसाळी शेती सोडली तर एरवी माथेरान मध्ये छोटी मोठी कामे किंवा खालच्या आंबेवाडी चौक धोदाणी वगैरे गावात जाऊन बिगारी मोलमजुरी करणं. वाण सामान खरेदीसाठी सुध्दा हाच मार्ग. एका घराच्या अंगणात थांबलो. इथं सर्वांची आडनांव एकच 'पारधी'. गार पाणी पिऊन सोबतच्या बाटलीत थोडं पाणी भरून वाटेची चौकशी करून निघालो. हाश्याच्या पट्टीतून मुख्य दोन वाटा निघतात एक धोदाणीत तर दुसरी दक्षिणेकडे लुईझाला डाव्या हाताला ठेवत वळसा घालत हुंबर्णेत जाते. तिथून पुढे चालत आंबेवाडी कमीत कमी तासभर, त्यामानाने धोदाणीची वाट कमीत कमी वेळात थेट गावात जाते आणि आंबेवाडीच्या तुलनेत धोदाणीत एस टी च्या फेर्या जास्त. थोडक्यात सांगायचं झालं तर कर्जत भागात जाण्यासाठी हुंबर्णे तर नेरे पनवेलसाठी धोदाणी असे सोपे गणित. आम्ही ज्या घरात थांबलो होतो, तिथल्या मावशीचे माहेर आंबेवाडी पण ते हुंबर्णेची वाट टाळून वर माथेरान चढून वन ट्री हिल च्या वाटेने थेट आंबेवाडीत जातात. कारण या वाटेच्या तुलनेत ती वाट अधिक वापराची आणि एकट्या दुकट्याला सोयीची. साधारणपणे मावळतीच्या दिशेला मळलेल्या वाटेने निघालो समोर प्रबळगडामागे सूर्य देव निघाले होते. वाडी बाहेरचा हा मैदानी भाग फारच आवडून गेला, मागे पूर्ण माथेरानची भिंत डावीकडील कोरोनेशन पॉईंट पासून लुईझा पर्यंत, समोर प्रबळगड तर दक्षिणेकडे मोरबे धरणाचा परिसर आणि उजवीकडे आम्ही उतरणार होतो तो चिंचवाडी धोदाणीचा भाग. या मैदानातून प्रबळच्या दिशेने एक दांड उतरत होता. त्यावरची मळलेली पायवाट भलतीच उठून दिसत होती. दोन्ही बाजूला दरी असलेली ही वाट .. आधी लुईझा वरून पहाताना आम्हाला हिच वाट धोदाणीत जाते की काय असे वाटले होते पण हि वाट पलीकडे रानात जाऊन निमदा डोंगराच्या खिंडीत जाते क्वचित कुणी गुराखी अथवा शिकारीसाठी या वाटेने जातात.
याच वाटेवर थोड खाली उतरून एक उंबराचे झाड त्याच्या जवळ एक बाकडा आहे. त्या समोरून खाली व्यवस्थित रुळलेली वाट धोदाणीच्या दिशेने उतरते. बाकड्यावर बसून शांत पणे वाऱ्याची झुळूक अनुभवली. नंतर वेळ पाहून उतरायला सुरुवात केली. वळणावळणाची वाट टप्पा टप्प्यात उतरते.
खालून गावकरी तांदळाचे पोते खांद्यावर डोक्यावर घेऊन येत होते, चौकशी केली असता समजले रॅशन चे तांदूळ हि मंडळी धोदाणीतून घेऊन येत होती. पुढे छोटा ओढा पार करून वाट डावीकडे वळाली. थोडाफार झाडोरा या वाटेवर नक्कीच आहे. आणखी खाली उतरत वरुन निघालेल्या त्या दांडाला डावीकडे ठेवत जंगलातून मळलेल्या वाटेने निघालो. आता एकदम सौम्य उतरणं घेत वाट हाश्याच्या पट्टीतून आलेल्या ओढ्यात उतरली. तसेच दिशेप्रमाणे जात राहिलो पलीकडे वाट दिसत नव्हती. मनात विचार आला ओढ्यातून एवढे अंतर चाल ? ही मंडळी तर एवढा बोजा घेऊन तिन्ही ऋतूत जातात तर पावसाळ्यात ओढ्यातून एवढे चालूच शकत नाही. तसेच थोड अंतर गेल्यावर डावीकडून आणखी एक वाट बाहेर येऊन ओढा पार करून उजवीकडे गेली. थोडक्यात आम्ही या वाटेने न येता आधीच ओढ्यात उतरलो. साधारण चढ उतार पार करत रानाच्या बाहेर आलो उजवीकडे आम्ही दुपारी चढलो ती सनसेट पॉईंटची वाट थोडे डोळे बारीक करून पाहिलं तर सनसेट पहायला रेलिंगवर ठिपक्यांसारखी जमा झालेली माणसं दिसत होती. पावसाळी शेती केलेल्या बांधावरून मळलेली वाट. त्याच ठिकाणी गावातली पोरं क्रिकेट खेळत होती.
एका मोठ्या चिंचेच्या झाडाजवळ येताच डावीकडे खालच्या बाजूला उतरत चिंचवाडीची वाट गेली, आम्ही तसेच पुढे निघत बरोब्बर दुपारी जिथे थांबलो होतो त्या वडाच्या झाडाखाली आलो. मागे वळून पाहिले तर आमचा एका बाजूचा प्रदक्षिणा मार्ग. धोदाणीत शेवटचा टप्पा उतरत असताना समोर, दुपारच्या उन्हात करपून निघालेले म्हैसमाळ चंदेरी, नाखिंडा, पेब मावळत्या प्रकाशात खुलून दिसत होते.
Sun 21.JPG
सहा वाजता दोधाणीत परतलो. तो छोटेखानी हाफ डे ट्रेक व्यवस्थित पूर्ण करून. परतीच्या प्रवासात नेरे पनवेल कळंबोली अशी ट्रॅफिक सहन करत नऊच्या सुमारास सतीशला डोंबिवलीत सोडून घरी यायला साडेनऊ वाजले.

अधिक फोटो साठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2018/05/matheran-sunset-hashyachi-patti...

योगेश चंद्रकांत आहिरे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच रे !

माझा बरेचदा तुपाशी नाहीतर उपाशी करताना उपासच घडतो. त्यापेक्षा आता अर्धा दिवस तर अर्धा दिवस, पण कुठलातरी ट्रेक करावाच म्हणतो.

हा मस्त ट्रेक आहे. वाघाच्या वाडीत उतरलोय. नेरळकडून वर येऊन इकडून खाली. >>> छान.... वाघाची वाडी ती चिंचवाडीच्या पलिकडे.

भारीच एकदम!
वाटतं एकदा यावं तुमच्या सोबत ट्रेकला.

अधुन मधून काही नाही तर नुसते फोटो पाहून जातो तुमच्या विविध ट्रेकच्या लेखांमधले... एकदम ताजे तवाने झल्यासारखे होते...