अभिनेत्यांचे फाजील लाड

Submitted by साद on 20 August, 2018 - 03:57

प्रसंग होता एका व्यापारी संकुलाच्या उद्घाटनाचा. उद्घाटक म्हणून एक हिंदी चित्रपटातील अभिनेता येणार होता. मग काय, त्याला ‘बघायला’ मिळणार म्हणून तोबा गर्दी झालेली. कार्यक्रमाआधी खेचाखेची, चेंगराचेंगरी वगैरे चालू. मात्र आयत्या वेळी तो नट येणार नसल्याचे जाहीर झाले. मग त्या गदारोळातच लोक पांगले. मग संकुलाच्या मालकाच्या वडिलांचे हस्ते उद्घाटन झाले.

वरील प्रसंगातून काही प्रश्न मनात आले:
१. चित्रपट क्षेत्राशी संबंधित नसलेल्या कार्यक्रमांचे उद्घाटनासाठी नट-नट्या सोडून अन्य व्यक्तींचा विचार का होत नाही?
२. कार्यक्रमाचे निमंत्रितांना आपण निमंत्रणाचा आदर करण्यासाठी जात आहोत की नटांना बघण्यासाठी, याचे भान असते का?

एकंदरीत समाजात आपण नट-नट्याना अवास्तव महत्व देऊन नको इतके लाडावून ठेवले आहे. अनेक माध्यमांतून त्यांचा उदो उदो होत असतो. त्यांची प्रेम प्रकरणे, विवाह-सोहळे, घटस्फोट आणि विवाहबाह्य संबंध इ. गोष्टी ‘राष्ट्रीय घटना’ असल्यागत सतत प्रसारित होत असतात. ज्या नटांवर फौजदारी गुन्हे दाखल झालेले असतात त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा ही समज तर अजून दूरच आहे. उलट, त्यांच्या चित्रपटांचा गल्ला कितीशे कोटी करण्याचा जणू विडाच जनता उचलते !

काही नटांच्या आयकर थकबाकीबाबत तर काय बोलायचे? त्याच्या बातम्याही ‘टीआरपी’ साठी प्रसिद्ध होतात आणि चवीने पहिल्या जातात. एक दिवसाचीही समाजसेवा न करता ही नटमंडळी जेव्हा थेट लोकसभेच्या निवडणुकीस उभी राहतात तेव्हाही आपण आपली अक्कल गहाण टाकून त्यांना निवडून का देतो?

आपल्या देशात तरी बहुतेक अभिनेत्यांचे पोटपाणी हिंदी अथवा प्रादेशिक भारतीय भाषेवरच अवलंबून आहे. तरीसुद्धा त्यांच्या मुलाखती व जाहीर समारंभात ते सतत त्यांचे इंग्रजी पाजळत असतात. तेव्हातरी “तुमच्या चित्रपटाच्या भाषेतूनच बोला” असे सांगण्याचे धारिष्ट्य ना मुलाखत घेणाऱ्यात असते ना प्रेक्षकांत.
अगदी मोजके अभिनेते मात्र सामाजिक भान ठेऊन वागतात. त्यांच्यात चांगल्या नागरिकाची लक्षणे जरूर असतात. परंतु ते नको त्या मंडळींच्या झगमगाटात झाकोळले जातात खरे.
.....................................................................................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सई स्वप्निल शाहरूख हे चित्रपट कलाकार फार आवडतात.
सचिन धोनी दादा हे क्रिकेटर फार आवडतात.
गायकांमध्ये सोनू आणि आतिफ अस्लमचा मी दिवाणा आहे.
प्रियांका चोप्रा आणि दिपिका पदुकोनकडे बघितले की बघत राहावेसे वाटते.
महिला खेळाडूंमध्ये सानिया मिर्झाचा मी चाहता आहे.

पण यापैकी कोणाला बघण्याची प्रबळ ईच्छा अशी नाही.
किंबहुना प्रत्यक्ष न बघण्यातच मजा आहे.

एकदा कॉलेजजवळ क्रिकेट खेळत असताना तिथे जवळच शूटींगसाठी माधुरी की ऐश्वर्या आली होती. सारी पोरं एकसाथ पळाली. ज्याची बॅटींग चालू होती तो सुद्धा थांबला नाही. मलाही तेव्हा सर्वांची अशीच चीड आली होती. नॉनस्ट्राईकर एण्डला मी एकटाच उभा होतो.

आपले मनोरंजन करणारे कलाकार आवडण्यात काही गैर नाही पण आपल्या आयुष्यात त्यांना किती स्थान द्यावे हे ज्याचे त्याला समजायला हवे.

बाकी काही लोकांना नुसते मिरवायचे असते. कलाकार आवडीचा आहे म्हणून नाही तर सेलिब्रेटी दिसला तर त्यासोबत सेल्फी काढून एफबीवर टाकायचा असतो.

आपले मनोरंजन करणारे कलाकार आवडण्यात काही गैर नाही पण आपल्या आयुष्यात त्यांना किती स्थान द्यावे हे ज्याचे त्याला समजायला हवे.>>>>. + ११

सर्व विचार पटले.

आणि तसंही लेखक/कवीला पुस्तकात जाणावा. खेळाडूला मैदानावर आणि अभिनेता/अभिनेत्रींना पडद्यावर पहावे. त्यांना प्रत्यक्ष भेटले तर आपला अपेक्षाभंग होण्याचीच शक्यता जास्तं असते.

>>आपले मनोरंजन करणारे कलाकार आवडण्यात काही गैर नाही पण आपल्या आयुष्यात त्यांना किती स्थान द्यावे हे ज्याचे त्याला समजायला हवे<<
बरं झालं तूच बोललास हे... Lol

पुस्तकात जाणावा. खेळाडूला मैदानावर आणि अभिनेता/अभिनेत्रींना पडद्यावर पहावे. त्यांना प्रत्यक्ष भेटले तर आपला अपेक्षाभंग होण्याचीच शक्यता
>>+१११

आणि एक शानपणा शिकवणारा लेख.

ज्या नटांवर नेत्यावर फौजदारी गुन्हे दाखल झालेले असतात त्यांच्या चित्रपटांवर निवडणुकांमध्ये बहिष्कार घालावा ही समज तर अजून दूरच आहे. उलट, त्यांच्या चित्रपटांचा गल्ला बेहिशोबी मालमत्ता कितीशे कोटी करण्याचा जणू विडाच जनता उचलते !

लोकं देवाची पूजा करताना तरी कुठे त्यांना बघितले आणि त्यांचा अनुभव घेतला असतो.
जसे देवावरची श्रद्धा तसेच सेलिब्रेटींचे चाहते. तात्विकदृष्ग्ट्या फरक असा नाहीच.

बरं झालं तूच बोललास हे... Lol
>>>>

मीच बोल्लो तर लोकांना छान पटेल.
उद्या मी छान पावसाळी सकाळी गाढ झोपेत असेन आणि कोणीतरी येऊन मला गद्दागद्दा हलवले आणि म्हटले, उठ रुनम्या शेजारच्या मोहल्य्यामध्ये शाहरूख बकरी कापायला आलाय तर मी मटण शिजल्यावर मला खायला बोलाव म्हणत पुन्हा चादर अंगावर ओढून झोपून जाईन, पण झोपमोड करून त्याला बघायला जाणार नाही.

बरोबर आहे ... वेडेपणा वाटतो ... तरी मी अशी कुणाला पाहायला जाईन का असाही विचार आला मनात .. अशा गर्दीत वगैरे अज्जिबातच नाही पण सहज शक्य असेल तर अमिताभ बच्चन यांना मात्र एकदा 4 हात अंतरावरून पाहायला आवडेल असं उत्तर मनाने दिलं ... पाहायला मिळावंच अशी काही तीव्र इच्छा नाही पण पाहून थोडंसं बरं वाटेल असं वाटतं ... इमॅच्युरिटीही असेल ही ...

पटते!!!
>>>>>>> आपल्या देशात तरी बहुतेक अभिनेत्यांचे पोटपाणी हिंदी अथवा प्रादेशिक भारतीय भाषेवरच अवलंबून आहे. तरीसुद्धा त्यांच्या मुलाखती व जाहीर समारंभात ते सतत त्यांचे इंग्रजी पाजळत असतात. तेव्हातरी “तुमच्या चित्रपटाच्या भाषेतूनच बोला” असे सांगण्याचे धारिष्ट्य ना मुलाखत घेणाऱ्यात असते ना प्रेक्षकांत.>>>>>>>>>> अगदी!!

रॉजर फेडरर ला भेटायला आणि हात मिळवायला दोन तास रांगेत उभा होतो .. फॅन म्हणजे फॅन ...
उद्या जान्हवी कपूर किंवा सारा अली ला भेटण्यासाठी साठी 10 तास रांगेत उभे राहायला ही हरकत नसेल माझी.