व्हॉटसपशिवाय हजार तास !

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 August, 2018 - 18:35

आज आत्ता तब्बल शंभर तास होत आलेत मला हे आव्हान स्विकारून.

गेल्या चार दिवसात व्हॉटसपबद्दलची वाटणारी ओढ टप्प्याटप्याने कमी होताना अनुभवली आहे.

१) नुकतेच व्हॉटसवपवर स्टेटस शेअर करायची सवय लागलेली. पहिल्या दिवशी सारखं डोक्यात तेच. अरे व्हॉटसप उडवले नसते तर हे शेअर करता आले असते, ते शेअर करता आले असते. दुसर्‍या दिवशी जाणवले की त्यात काय एवढे शेअर करण्यासारखे होते. क्षणिक भावना असते ती, दुसर्‍या दिवशी मलाच ओशाळून आले की आपण एवढी फालतू आणि छोटीशी गोष्ट मित्रांशी शेअर करता आली नाही म्हणून काल हळहळत होतो. आणि कसं असते, एकदा का आपले सो कॉलड स्वयंघोषित मनोरंजक अपडेटस शेअर करायची सवय लागली की जे शेअर करण्याजोगे आहे तेच मनोरंजक वाटू लागते.

२) मला ऑफिसच्या कामादरम्यान व्हॉटसप बघायचे व्यसन नाहीये. कारण माझ्या प्रायोरीटीज नेहमी क्लीअर असतात. माझा व्हॉटसपवर बागडायचा टाईम फिक्स आहे. सकाळी उठल्यावर ब्रश करताना पाच मिनिटे, चहा पिताना पाच मिनिटे, ट्रेनचा प्रवास दहा मिनिटे, ऑफिसमध्ये वॉशरूममध्ये असताना दहा मिनिटे, लंचटाईमला पाच मिनिटे, संध्याकाळचा ट्रेनचा प्रवास दहा मिनिटे, क्रिकेटची लाईव्ह मॅच बघताना रोमांचक क्षणी, आणि रात्री बिछान्यावर पडल्यावर उरलेसुरले. दिवसभरात तुटक तुटक व्हॉटसप बघणे होत असल्याने रात्री झोपायच्या आधी जेव्हा शेवटचे उघडतो तेव्हा बरेचदा बरेचसे मेसेज न वाचलेले असतात. मग ते वाचण्यात वा झरझर नजर फिरवून डिलीट करण्यात झोपायची वेळ आपसूक लांबली जाते. शेवटी हातातूत फोन बाजूला ठेवताना जाणवते, अरे यार काहीच विशेष निष्पण्ण झाले नाही. त्यापेक्षा अर्धा तास लवकर आणि जास्त झोपलो असतो. हे असे जवळपास रोजच होते.

३) ऑफिसच्या ग्रूपवर मी उगाचच भरती होतो. मला तिथे राहायची जराही ईच्छा नव्हती. पण नैतिकतेला अनुसरून राहणे भाग होते. आता व्हॉटसपच उडवल्यावर तिथे राहण्याचा संबंधच नाही. खूप रिलॅक्स वाटत आहे.

४) शाळा कॉलेजचे कधी पुन्हा संपर्कात येतील असे न वाटलेले मित्र या व्हॉटसपग्रूपच्या निमित्ताने जोडले गेले होते. त्यांचा संपर्क तुटणे हे चांगले की वाईट हे समजत नाहीये. सकारात्मक विचार करता कश्याला हवेत जुने मित्र रोजच्या रोज हाय हेल्लो करायला? उलट जुने मित्र नवीन चेहरे घेऊन आलेत असे वाटल्याने जुन्या आठवणी उगाचच तुरट झाल्यासारखे वाटत होते. शाळेतल्या मित्रांसोबत मोदी आणि राजकारण अश्या विषयांवर चर्चा करत वाद घालणे फार क्लेशकारक असते हे अनुभवत होतो. गेले चार दिवस या क्लेशापासून मुक्ती मिळाली आहे.

५) क्रिकेटचा ग्रूप मात्र फार मिस करत आहे. स्पेशली काही तासांतच भारत ईंग्लंड तिसरा कसोटी सामना सुरू होणार आहे आणि मी त्यावर तावातावाने कुठे चर्चा करणार नाहीये याची खंत वाटतेय. सध्याच्या घडीला हा एक फार मोठा तोटा दिसत आहे.

६) हाय हेल्लो गूडमॉर्निंगमध्ये जो आयुष्यातला वेस्ट ऑफ टाईम होत होता तो मात्र आता सरळसरळ वाचला आहे.

७) वाजपेयी गेले. त्यानंतर व्हॉट्सपवर उधाण आले असेल. या चार दिवसांत त्यापासून वाचलो.

८) गेले दोन दिवस ऑफिसमधील मित्र कुठल्यातरी वायरल विडिओबद्दल चवीचवीने चर्चा करत होते. मला त्यात सहभागी होता आले नाही. नंतर जाणवले की एखाद्या मित्राच्या मोबाईलवर तो विडिओ बघता आला असता. आता वाटतेय की नाही बघितला आणि नाही झालो त्या चर्चेत सहभागी तर आपले काही अडले नाही.

९) नॉनवेज ग्रूप्सवर उगाचच मन चाळवणारे खंडीभर पॉर्न विडिओज पडत राहायचे. त्या मोहमाया आणि सरतेशेवटी मिळणार्‍या क्लेषापासून लांब आहे.

एकूण जमा खर्चाचा विचार करता दूर राहण्याचे फायदे जास्त आणि तोटे कमी दिसत आहेत.
पण व्हॉट्सपचेही फायदे आहेत हे मात्र नक्की.

हजार तासांचे आव्हान पार पडेल की नाही कल्पना नाही, मात्र आता जेव्हा कधी व्हॉटसपवर परत जाईन, तेव्हा काही गोष्टी क्लीअर झाल्या असतील. व्हॉटसपचे नेमके फायदे काय आहेत हे समजले असेल. आणि गाळ बाजूला सारून फक्त त्या फायद्यांसाठीच व्हॉटसपचा वापर कसा मर्यादित करता येईल हे समजले असेल. अजून एक गोष्ट अंगी बाणवली जाईल ती म्हणजे रात्री झोपायच्या आधी अनरीड मेसेज क्लीअर केले नाहीत तर काही आभाळ कोसळत नाही हे समजल्याने त्या ठराविक वेळेला मी जो व्हॉटसपचा गुलाम व्हायचो ते आता आपल्याच आयुष्याचा राजा असल्यासारखे निवांत झोपलो असेन.

यापूर्वी झोपेची वेळ वगळता सलग चार तास व्हॉटसप न चेक करता राहिलो नसेल, पण या चार दिवसांत विचार पार पलटले. यापुढे बिनदिक्कत राहू शकेन.
तुम्हीही जमल्यास किमान शंभर तासांचे व्हॉटसप चॅलेंज घेऊन बघा. व्हॉटसपकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलायला चार दिवस पुरेसे आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडून शिक काही ऋन्मेष.
व्हाट्सऍप ला / मायबोलीला (इतर कुठलेही सोशल मीडिया अनेक वर्षांपासून वापरातच नाही) मी महिनोन्महिने नव्हे तर वर्षभरापेक्षा जास्त कल्टी मारतो, आणि व्हाट्सऍप uninstall केलं अथवा a/c delete केलं त्या क्षणापासून तिकडं काय चाललं असेल याचा विचारही डोक्यात येत नाही. हव्या त्या कामात / छंदात / ऍक्टिव्हिटीत लगेच रमून जातो.

एवढं व्यसन लागुच का द्यायचं पण आधी.
(मनात स्वतःला ' हुं! हे तु सांग आता लोकांना' Lol )
पण मस्तच. असं चॅलेंज घेउन बघायला हरकत नाही मला.
मला तर कॅन्डी क्रशचं पण व्यसन आहे. माबोचं पण.

जितेंद्र चे सिनेमे चालेनासे झाले की तो नायिकाप्रधान सिनेमात काम करी किंवा मग कौटुंबिक किंवा गुलजारचे सिनेमे.
कोतबोतल्या इनिंगला शुभेच्छा !

५ जुलै पासून माझं whatsapp बंद आहे आणि त्यामुळे विशेष असा काही फरक पडत नाही. उगाचंच आपले गैरसमज असतात या गोष्टीशिवाय आपण राहू शकत नाही असे.

व्हॉटसॅप म्हणजे सोशल मिडिया
खरोखरच त्याच्या पासून दूर रहाता येते का ते बघायचे असल्यास माबो, व्हॉटसॅप, फेबु, इंस्टा, टिंडर ई. सगळ्याच प्रकारच्या सोशल मिडियापासून दूर रहाता आले पाहिजे.

हे म्हणजे मी रम न पिता शंभर तास राहू शकतो म्हणताना एकीकडे व्हिस्की, बियर, व्होडका पिणे चालूच असे झालेय.

थोडक्यात काय तर शंभर तास फक्त व्हॉटसॅप पासून दूर रहाण्यात फार काही आव्हानात्मक नाही.

सोशल मिडियापासून दूर होण्याची मला काहीच आवश्यकता वाटत नाहीये. आपली सद्विवेकबुद्धी शाबूत ठेऊन सोशल मीडियाचा वापर केल्यास त्यापासून मला फायदाच होताना दिसतोय. सोसल तेव्हढंच सोशल व्हावं. शेवटी तुम्ही त्याच्या किती आहारी जाताय त्यावर अवलंबून आहे. म्हणतात ना! आग अन्नही शिजवू शकते आणि आपले घरही जाळू शकते. आग कशी वापरायची ते आपले आपणच ठरवायचे असते.

थोडक्यात काय तर शंभर तास फक्त व्हॉटसॅप पासून दूर रहाण्यात फार काही आव्हानात्मक नाही.
नवीन Submitted by हर्पेन on 18 August, 2018 - 13:28 +१

खरंच सर्व गोष्टींपासून दूर रहायचं असेल तर इगतपुरीला जाऊन मेडिटेशन करा.

हे म्हणजे मी रम न पिता शंभर तास राहू शकतो म्हणताना एकीकडे व्हिस्की, बियर, व्होडका पिणे चालूच असे झालेय.>>>

नाय त काय! Lol

ऋ भाऊ
मला कालपासून छळणारा एक प्रश्न. तुमच्या एका जुन्या लिखाणात उल्लेख आहे की तुमचे कामाचे ठिकाण बेलापूरला आहे. तुमची तिन्ही घरे दक्षिण मुंबईत मग वर उल्लेखल्या प्रमाणे तुम्ही १० मिनीटात ट्रेनचा प्रवास कसा करता?
तसे नसेल तर घर बदलले की नोकरी?

हाहाहा अनु Happy
कदाचित ग्रुप असेल त्याचा. प्रत्येक जण १० मिनीट बसत असेल.

लोकांना फेसबुक म्हणजे काय हे माहीत नव्हते तेव्हापासून सोशल मिडीया वापरत आहे ,त्याआधी ऑर्कुट वापरुन झाले. सोशल मिडीयावर नाविन्य आहे .माणसाला नॉव्हेल्टी आवड्ते, त्यामुळे मी सोशल मिडीयापासून फार काळ लांब राहू शकत नाही. मी आज दहा दिवस/एक वर्षं सोशल मिडीयापासून लांब राहीलो असे सांगणे हे म्हणजे लॉग इन ची तुंबलेली उबळ रोज थोपवतो असा त्याचा अर्थ असतो. अशा लांब रहाण्याने मानसिक समाधान कमी व डेस्परेशनचा त्रास जास्त होतो. एखादी गोष्ट मनातून मनापासून उतरली की मग असले धागे काढायची ही गरज पडत नाही.

चांगला उपक्रम आहे. पण त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वर मैत्रिणींचे मेसेजेस येत असतील ना काय झाले म्हणून ? त्यांना उत्तर देतोहेस ना वेळच्या वेळी ? उगीच त्यांचा गैस व्हायचा.

नवीन Submitted by डागदार अड्डावाला on 18 August, 2018 - 15:33
आणि मग गफ्रे शी कसा संपर्कात रहातोस? >>> वहिनींच्या व्हॉट्सअॅप वरून>>> Rofl

अरे मर्त्य आयडीनो, तुमच्या अज्ञानी डोक्यात प्रकाश कसा पडला नाही?
रुन्मेष सर्वव्यापी आहे, त्याचा प्रकाश 'भास्कर'सारखा आहे, त्याच्यावर trp चा रा'ज्याभिषेक' होऊन त्याचेच 'सरकार' आहे.
व्हाटसाप फक्त रुन्मेष ने मारले आहे. अजूनही त्याच्या सहस्त्र रूपांमध्ये ते सुखेनैव चालू आहे.
(आतातरी मार्व्हल आणि डीसी वाल्यांनी मल्टिपल युनिव्हर्स या संकल्पनेचा जन्मदाता रुन्मेष आहे हे मान्य करावे.)

बऱ्याचश्या लोकांना जीमेल वै वापरता येत नाही. एखादा फोटो पाठवायचा असेल तर व्हीट्सॅप वरुन पाठवतात. काही वर्षापुर्वी असे व्होट्सप् वर आलेले फोटो प्रिंट काढुन देऊन खुप पैसे कमवलेत.
आता वेळ मिळाला तरच पाहतो.

हे म्हणजे मी रम न पिता शंभर तास राहू शकतो म्हणताना एकीकडे व्हिस्की, बियर, व्होडका पिणे चालूच असे झालेय.

>>>>>>

हे उदाहरण १८० अंशात चुकलेले आहे.
कदाचित दारूबाबत रम व्हिस्की बीअर व्होडका सर्वांची चवढव साधारण एकसारखीच असेल, त्यामुळे एकदा तल्लफ लागली की पिणार्‍याला जे मिळेल ते चालत असेल.
पण व्हॉटसप, फेसबूक, मायबोली या तीन सोशलसाईट एकसारख्या नाहीत, ना एकसारखी आपली गरज भागवतात.
जसे की फेसबूकवर मी फक्त फोटो आणि पर्सनल अपडेट्स शेअर करणे आणि मित्रांचे बघणे एवढेच करतो. ते करायचे नसल्यास फेसबूकवर दिवसोंदिवस गेलो नाही तरी काही अडत नाही.
मायबोली हे पब्लिक फोरम आहे, ईथे मी माझे लेख कथा प्रकाशित करतो, चर्चा वाचतो, घडवतो आणि आवडीनुसार त्यात भाग घेतो. याआधी ऑर्कुटसमूह माझी ही गरज भागवायचे. मायबोलीचे मला व्यसन नाहीये. त्यापासून दूर राहणे सहज शक्य आहे. किंबहुना शेड्यूल बिजी झाले की आपसूक ईथला वावर कमी होतो. एकदा तुम्ही कुठल्या ज्वलंत चर्चेत भाग घ्यायचे टाळले की पुन्हा आपल्यामागे तिथे काय झाले हे बघायची गरज भासत नाही.

व्हॉटसप हे मात्र वेगळे प्रकरण आहे. हे पब्लिक फोरम नाही. ईथे तुमच्या मित्रांचेच ग्रूप असतात. पर्सनल गप्पा असतात. तुम्ही बिजी असला तरी दोन मिनिटात चेक करता येते. त्यामुळे चेक करायची वारंवारता वाढते. जसे मायबोलीवर आपण मोठाल्या पोस्ट लिहितो, त्याआधी ईतरांच्या वाचतो, तशी ईथे गरज नसते. टक टक टक बोटे चालली मोबाईलच्या कीबोर्डवर की पोस्ट ढकलली. पण त्याचवेळी ईथे वर्गीकरण नसते. एखाद्या ग्रूपवर शंभर पोस्टी पडल्या असतील, आपल्या ईंटरेस्टच्या चारच असतील तरी त्या ढिगारयातून उपसाव्या लागतात. माबोवर जरा अवांतर चर्चा म्हटले की ओरडा सुरू होतो. तिथे अवांतराला झक मारत स्विकारावे लागते.

असो, सांगायचा मुद्दा हा की व्हॉटसप फेसबूक माबो यांना एका तागडीत बसवू नका. ते एकमेकाला पर्याय नाहीयेत. की एक बंद झाले तरी त्याची जागा दुसरे घेईल असे नसते. त्यामुळे व्हॉटसप बंद केले म्हणून काय झाले, एफबी आणि माबो तर चालू आहेत ना असे म्हणू शकत नाही.

तुमचे कामाचे ठिकाण बेलापूरला आहे. तुमची तिन्ही घरे दक्षिण मुंबईत मग वर उल्लेखल्या प्रमाणे तुम्ही १० मिनीटात ट्रेनचा प्रवास कसा करता?
>>>>>>>>
ट्रेन आपला पुर्ण गरजेचा वेळ घेते. मी त्यातले दहा मिनिटे व्हॉटसप चेक करतो. रात्री ३-३ वाजेपर्यंत जागतो हे सर्वांना माहीत आहेच ईथे. त्यामुळे ट्रेनमध्ये झोप ही प्रायोरीटी असते. व्हॉटसप उडवल्याने ती ट्रेनची झोपायची दहा मिनिटे वाढली. अर्थात पहिल्या दिवशी सवयीने दहा मिनिटे झोप आलीच नाही Happy

वर काही लोकांनी म्हटले आहे की आम्ही व्हॉटसप कधीच उडवलेय. वा फार वापरतच नाही, मोजकेच वापरतो. वगैरे वगैरे. तर ते चांगले आहे. पण यात काही विशेष नाही. जर तुम्हाला ती आवड, तो छंद वा सवयच नसेल तर त्यापासून दूर राहण्यात काही विशेष नाही.
उदाहरणार्थ, मी दारूची चव घेतली. मला ती आवडलीच नाही. त्यामुळे मी दारू पित नाही. त्यामुळे मी दारूचा मोह टाळला वगैरे मी बोलू शकत नाही. जर मला चव आवडली असती, पण तरीही दारू हे वाह्यात पेय आहे याचे भान ठेऊन मी कंट्रोल केले असते तर ती विशेष गोष्ट झाली असती.
अर्थात तसे केलेही असते, पण ते जर तर च्या गोष्टी झाल्या...

मुळात हे करायचा माझा हेतू लक्षात घ्या. मला व्हॉटसप सन्यास घ्यायचा नाहीये. मला त्याचे फायदे हवेच आहे, पण त्याची चटक लागल्याने सोबत जे तोटे येत आहेत ते नको आहेत. सध्याच्या स्टेजला मला ते टाळणे जमत नाहीयेत. त्यामुळे हा ब्रेक कदाचित मला सांगून जाईल की मला व्हॉटसपवर नेमकी कश्याची गरज आहे आणि काय अनावश्यक आहे ज्यामुळे माझे काही अडत नाही. जेणेकरून मी आपसूकच व्हॉटसपवर क्वालिटी टाईमच स्पेंड करेन.

माझ्याकडून शिक काही ऋन्मेष.
व्हाट्सऍप ला / मायबोलीला (इतर कुठलेही सोशल मीडिया अनेक वर्षांपासून वापरातच नाही) मी महिनोन्महिने नव्हे तर वर्षभरापेक्षा जास्त कल्टी मारतो
>>>>>

असे आपण करता हे माहीत आहे. पुन्हा कधी व्हॉटसप जॉईन करायचा विचार आहे ते कळवा. लोकं तुमची तिथे आठवण काढत आहेत. त्यांना मी सांगितले तुम्ही माबोवर सक्रिय आहात तर ईथे यायला काय झाले म्हणून तुम्हाला शिव्याही घालतात.

असो,
पण आपण जेव्हा व्हॉटसपवर सक्रिय असता तेव्हा बराच काळ असता.
मला हे नकोय, म्हणजे असायचे तेव्हा पडीकच असायचे, नसायचे तेव्हा काहीच नाही.
मला व्हॉटसपवर कायम राहायचेच आहे, पण वावर मोजकाच गरजेपुरता कसा राहील हे बघायचे आहे.
वापरावर कंट्रोल नाही म्हणून पुर्णच बंद करून ईतर फायद्यांवर आणि माफक मनोरंजनावर पाणी सोडायचे नाहीये.

Pages