स्वतंत्र्याची पहाट

Submitted by निशिकांत on 15 August, 2018 - 01:07

स्वातंत्र्याची पहाट ( स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने . सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हर्दिक शुभेच्छा)

जोखड सुटले मानेवरचे
नवीन आला काळ असे
स्वातंत्र्याची पहाट झाली
भारत माता मंद हसे

स्वातंत्र्याचे पाईक आम्ही
खूप झगडलो फिरंग्यासवे
संग्रामी स्वतःस झोकले
रक्त सांडले तिरंग्यासवे
खडतर सेवा फळास आली
चोहिकडे आनंद दिसे
स्वातंत्र्याची पहाट झाली
भारत माता मंद हसे

स्वतंत्र क्षितिजा आज पहाण्या
पक्षी उडती स्वैर नभी
स्वप्न पाहिले सदैव जिचे
स्वातंत्र्य देवता मूर्त उभी
गर्वे फुलल्या सागर लहरी
भारतवर्ष बुलंद दिसे
स्वातंत्र्याची पहाट झाली
भारत माता मंद हसे

द्विशतकाची काळी रजनी
लोप पावली, तेज पसरले
ध्वज तिरंगा उंच पाहुनी
आयुष्याचे दु:ख विसरले
गुलाम असता, मनात अमुच्या
धगधगता आक्रंद असे
स्वातंत्र्याची पहाट झाली
भारत माता मंद हसे

स्वातंत्र्याची मशाल देतो
तरुणांनो ती उंच धरा
सुख्दु:खाच्या वेळी अमुच्या
बलिदानाचे स्मरण करा
वरून पाहिन, राष्ट्रभक्तीने
जगता होउन धुंद कसे
स्वातंत्र्याची पहाट झाली
भारत माता मंद हसे

माझ्या या कवितेचा व्हिडिओ करून माझ्या एका मित्राने यूट्यूबवर पोस्ट केला आहे. हा पाहण्यासाठी क्लिक करा ही लिंक. https://youtu.be/ddZR-OTqqO8

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निशिकान्त इतर कवितान्प्रमाणेच ही सुद्धा कविता खूपच सुन्दर आहे!!