ॐ सर्वे भवन्तु सुखिनः अर्थात दु:ख दूर कसे होईल ?

Submitted by शिष्योत्तम रामभाऊ on 10 August, 2018 - 05:45

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

वाचकगण प्रणाम
आपण वर दिलेला जो श्लोक वाचला आहे त्याचा अर्थ आपणास ठाऊक आहे काय ?
नाही ना ? हरकत नाही. आपल्या सोयीसाठी इंग्रजीतून अर्थ देता येईल.

Om, May All become Happy,
May All be Free from Illness.
May All See what is Auspicious,
May no one Suffer.
Om Piece, Piece, Piece.

अर्थ आपल्याला समजला. आपणास आवडला का ? नक्कीच आवडला. परंतु या श्लोकाचा अर्थ आपल्याला का समजला नाही हे जाणून घेतले पाहीजे. तरच आपल्याला सर्वांचे कल्याण कसे होणार हे समजणार आहे. सर्वांचे दु:ख कसे दूर होणार हे समजणार आहे.
आपल्याला श्लोक समजला नाही कारण आपणास संस्कृत समजत नाही. आपणास मराठी येत नाही. कारण आम्ही इंग्रजी शाळेत शिकतो. घरी इंग्रजी बोलतो आणि बाबांना डॅडा आणि आईला ममी म्हणतो.
अरे पण डॅडा म्हणजे डेड आणि ममी म्हणजे मृतदेह.
अरेरे ! आपल्या आईवडिलांना डेडबॉडी म्हणून अशिर्वाद लाभतात का ? नाही ना ?
आपण आईला आई आणि बाबांना बाबा म्हणायला हवे. हिंदीत माता पिता म्हणायला हवे. प्रत्येक भाषेत अत्यंत सुंदर संबोधनं आहेत. हे सर्व आपण हरवून बसलो. हे बदल न जाणवणारे आहेत. तेच आपल्या दुं:खाचे मूळ आहेत.

का झाले हे बदल ?

अहो सोप्पं आहे. घरात आजोबा आजी नाहीत. मग कोण करणार संस्कार ? संस्कार नाही. कानावर काही पडत नाही. ममा चालली कामाला, डॅडा चालला टूरला . मग घरी कोण संस्कार करणार ?
तर ड्रायव्हर आणि मोलकरीण. ते जे काही बोलतात त्यातून संस्कार होतात. किती वाईट ?
पण त्यांना का दोष द्यावा ? आपण आपल्या हाताने ही अवस्था करून घेतली नाही का ? होय. आपण करून घेतले आपले वाटोळे.
आजच्या मुलींना घरात आईवडील नकोत कि सासू सासरे नकोत. किंवा काही मुलींना फक्त आपली आई पाहीजे . आणि ती आई म्हणवून घेणारी आणि दोन दोन पोतं मेकप फासलेली विशाल महिला घरात डेरेदाखल येते आणि मुलीला बिघडवते. आजच्या आयांनाच काही ठाऊक नाही. आडातच नाही य्तर पोह-या कुठून येणार ? ही मेकपवाली आई जर पुढारी बिढारी असेल तर बघायलाच नको. त्या बिचा-या जावयाचा असा काही छळ मांडते कि ज्याचे नाव ते.
आणि तो तरी काय करणार ? आपल्या आईवडीलांना दु:खात लोटून कालच्या नटव्या मुलीबरोबर संसार थाटून बसला. आता सांगतो कुणाला ?
हीच जर आई जरा जुन्या वळणाची असती तर काय म्हणाली असती ?
"बाई गं, मुलीच्या घरात पाण्याचा थेंब सुद्धा घेऊ नये."
"बाई गं, भरल्या घराची दोन घरं करायचं पाप कधीही करू नकोस"

पण नाही नाही नाही. असे ती कधीही सांगत नाही. आणि यातून दु:खाची सुरूवात होते.
मुलीने मुलांची बरोबरी करण्यासाठी नोकरी करावी आणि नव-याकडून घरकामाची अपेक्षा करावी हे अधोगतीचे कारण आहे. यातून धूसफूस सुरू होते. काय गरज आहे बाहेर पडायची ?

अरे विधात्याने तुला सुंदर घडवले आहे. एक सुंदर असे कारण दिले आहे. तू का गं बाई त्याच्या विरोधात जातेस ? त्याच्या विरोधात गेलीस तर सुखी कशी होणार ? पावसाचे पाणी नेहमी वरून खाली पडते. झाड नेहमी जमिनीतून वर उगवते. पक्षी आकाशात उडतात. मासे पाण्यात राहतात. हा निसर्ग आहे गं बाई.

पक्षी म्हणाले मी पाण्यात राहणार, मासे म्हणाले मी जमिनीवर येणार , तर काय होईल ?
कपाळमोक्ष !

मग हेच चालू आहे.
बाई घराबाहेर पडते. मग मूलं होत नाहीत. मूल होत नाही म्हणून घाला डॉक्टरच्या डोक्यावर दहा बारा लाख रूपये. करा कर्ज. मग ते फेडायला ओव्हरटाईम करा. मग मूल होतं. मूल झालं नाही कुठं की चालले त्याला सोडून करीयर करीयर खेळायला. त्या बाळाला आई हवी. हे निसर्गाने ठरवले. सर्व पाण्यांमधे आई आणि बाळात नातं असतं. ज्यांचा मेंदू लहान असतो अशा प्राण्यांनाही माया समजते. पिल्लू आईवर अवलंबून असते तेव्हां ती सर्व जगापासून त्याचे रक्षण करते. त्याला दूध पाजते. जवळ घेते. त्यामुळे बाळाची भावनिक गरज पूर्ण होते.

परदेशातलंच आहे म्हणून बरं. एक संशोधन म्हणतेय की जी मुलं लहानपणी आईला चिकटून असतात त्यांच्यात आत्मविश्वास असतो. ज्या मुलांना पूर्ण स्तनपान मिळते ती मुलं सुदृढ असतात. त्यांना ९९९ आजारांशी लढण्याचे औषध आईच्या पोटातून आणि स्तनातून मिळत असते. आणि आम्ही ? घेतलं अमूलचं घी आणि घातलं बाटलीत. मग ते मूल तिकडे रडू दे, पडू दे. आम्हाला काही म्हणजे काही फिकीर नाही.

आम्हाला टेण्शन कसले ? बॉस आपले प्रमोशन शेजारच्या टेबलवरच्या माधवीला देईल का ? नटवीच आहे. बॉसला काही बाही जाऊन सांगते. मग नको गं बाई रजा घ्यायला. काही होत नाही बाळाला नाही घेतलं तर. मग कामवालीला सांगून जायचे. कामवाली कशाला बघतेय ? तिचं लक्ष ड्रायव्हरकडे . मॅडम गेल्या की ड्रायव्हर घरात. इकडे ते मूल रडले तरी कुणाला काही नसते. अहो, मग ते मूल कसे हुषार होणार, ते कसे निरोगी निपजणार. मग अपत्याच्या समस्या सुरू होतात. मग घाला त्याला पैसे. डॉक्टर सांगतात, गॉल ब्लॅडर मधे स्टोन आहे. ऑपरेशन करावे लागेल. काढा पुन्हा पैसे. घाला त्याच्या डोक्यावर. अहो स्टोन होईल नाही तर काय ? त्याची काय काळजी घेतली तुम्ही ? आणि अजून तरी घेताय ? मुलाला खेळू द्या. तो ठणठणीत राहील. त्याचबरोबर त्याला सकस अन्न द्या. त्याच्या आहाराकडे लक्ष द्या.

मुलाला कामवालीवर सोपवून आणि डॉक्टरांच्या भरवशाने तुम्ही देशाचे नागरीक कसे काय घडवणार आहात हो ?
आमच्याकडे निसर्गाला अनुकूल असे कायदे होते. पण ते सर्व पायदळी तुडवले. देशोदेशीचे संदर्भ घेऊन देशाचे कायदे केले. मग काय होणार ? ते आपल्या संस्कृतीला का पूरक असतील ?
आमचे कायदे म्हणतात. मुलीला शिकू द्या. बाहेर पडू द्या. हो ठीक . लग्न झाल्यावर घटस्फोट घेऊ द्या ? अहो कसे टिकतील संसार ? अशी पळवाटच काढून दिली तर संसार सुखी होत नाहीत. पाहतोय आपण.

घरात पाऊल नाही टाकलं की वेगळं घर पाहीजे नाहीतर द्या घटस्फोट. वर पोटगी द्या. नाहीतर पोलिसात तक्रार करते. या बायांनी घरंच्या घरं दहशतीखाली ठेवलेली आहेत. हे असे कायदे असल्यावर आणखी काय होणार ?
शिकवा की मुलीला. चांगली डबल ग्रॅज्युएट करा. बालीष्टर करा. पण चूल मूल हे तुझं प्राधान्य आहे हे आयांनी सांगायचं त्यांना. त्यात तिचंही भलंच आहे. कशाला नाही ते भरवता मुलीच्या डोक्यात ? लहान मुलांचा मेंदू ही रिकामी पाटी असते. त्यात हे तथाकथित सुधारणावादी विचार लिहून दु:खी करू नका आणि होऊ ही नका.

एक निरीक्षण आहे. या स्त्रीवादी बायका कधीही खूष नसतात. त्या स्वतःही आनंदी नसतात आणि त्यांना कुणी आनंदी राहीलेलं चालत नाही. त्यांचे संसार तर भगवान भरोसे असतातच पण चांगले चालू असलेले संसार यांच्या नुसत्या संसर्गाने धोक्यात येतात. कशाला पाहीजे आपल्याला ते नको ते विकतचे दुखणे ?

पुरूषाने कामाला जावे. बायको, मुलाला सुखी ठेवता येईल एव्हढे कमावणे हाच खरा पुरूषार्थ आहे. कशाला रे बाळा तुला बायकोच्या कमाईची गरज पडते ? तुझ्यात काही कमी आहे का ? मेहनत कर. अक्कलहुषारीने पैसा कमाव. मागच्या पिढ्यांनी नाही मुलं वाढवली ? त्या वेळी होतं का रे राजा दोघांनी बाहेर पडायचं फॅड ?

त्यातून अनेक महान कलाकार निपजले. महान तत्त्वज्ञानी निपजले. महान शासक, विचारवंत, शास्त्रज्ञ, सेनानी, स्वातंत्र्यसैनिक झालेच कि नाही ? कारण या पिढीचे संगोपन शास्त्रीय पद्धतीने झाले.

थोड्या लाभासाठी सोन्यासारख्या क्षणांची माती केल्याने आणखी रे काय होणार ? काहीही नाही. पैशाच्या मागे धावू नका. थोडं पोटापुरतं सर्वांनी कमवावं. अधिक धनाची लालसा असू नये. त्याने दु:ख निर्माण होते. भगवान बुद्ध सुद्धा हेच सांगतात. हेच ऐकून भूतान जगातला सर्वात आनंदी देश झाला. बुद्धाने काही वेगळे सांगितले ? त्याने भारतीय तत्त्वज्ञान बाहेरच्या देशांना सांगितले. ते देश झाले सुखी आणि आपण घे तले बाहेरचे ज्ञान.

मानवाला आवश्यक विद्या परमेश्वराने प्रत्येकास दिल्या. त्याप्रमाणे त्याची विभागणी केली. एकाने विद्या कमवावी. ती सर्वांना द्यावी. त्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालावे आणि सर्व समा़जाचे कल्याण कशात आहे याची चिंता वहावी. कुणी तरी गावाच्या पोटाचा प्रश्न सोडवावा. त्यासाठी अन्न पिकवावे. प्रत्येकाला द्यावे. त्या बदल्यात त्याला त्याची कामे करून द्यावीत. कुणी तरी शेतीची अवजारे बनवावी. त्याच्या पादत्राणाचा प्रश्न कुणीतरी सोडवावा. कुणी गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वतःहून घ्यावी. ज्याला जे काम येते त्याने ते करावे. असे सामंजस्य असल्याने दु:ख मानवी समूहाच्या आसपास फिरकत नाही.

ही ग्रामसंस्कृती ही आपली परंपरा. ती बदनाम केली गेली. चुकीचा इतिहास शिकवला आणि आदर्श समाजव्यवस्था उद्ध्वस्त झाली. परिणाम ?
पाहतोच आहोत आपण, आहे का कुणी सुखी ?

प्रत्येक जण आऱक्षणासाठी रस्त्यावर येतो. आरक्षणाने जात बळकट होते. मग हल्ले होतात. मग कडक कायदे होतात. त्याने गाव भयभीत होते. कोण सुखी आहे यात ?
शेवटी आपणास आपल्या परंपरा याच सुखी करू शकतात.
त्यासाठी त्याचे अध्ययन गरजेचे आहे. अध्ययन करून ते पाच जणांना सांगायचे. त्या पाच जणांनी पंचवीस जणांना सांगायचे आहे. अशा पद्धतीने हा विचार सर्वत्र जायला हवा.

आणि का न जावा ?
दु:खी रहायचेय की काय कुणाला ? नाही ना ?
मग लागा पाहू कामाला.
चला तर मग सत्याच्या शोधात. सुखाच्या शोधात.

ॐ असतो मा सद्गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मा अमृतं गमय ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

( हा लेख शेअर करायला परवानगी आहे. नावाचा आग्रह नाही. वृत्तपत्रातून छापून आणला तरी चालेल. )

कळावे आपला नम्र

शिष्योत्तम रामभाऊ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> . प्रातःस्मरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल नितांत आदर आहे. पण देशोदेशीच्या घटना कॉपी करून या देशाचे कायदे केले. मग काय होणार ? ते आपल्या संस्कृतीला का पूरक असतील ?>>
प्रजासत्ताक भारताच्या संविधानाबद्दल आणि डॉ. आंबेडकरांबद्दल असे विधान? जाहीर निषेध!

अ‍ॅडमिन, प्लीज धागा उडवा.

कुठल्या संस्कृतीबद्दल आणि सामजस्याबद्दल बोलताय? जातीच्या नावाखाली माणसाला हीन वागणूक देणे, गावकुसाबाहेर रहायला भाग पाडणे, विधवेला आनंदाने जगायचा अधिकार नाकारणे यात संस्कृती आणि सामजस्य दिसते? कठीण आहे.

लेखातला अवास्तव आग्रह आणि मते वगळल्यास काही मुद्दे खरच विचारकरण्या जोगे आहेत, प्रतिसाद पाहता मायबोलीचे मानसिक वय दिवसेंदिवस खाली येत चालले आहे असे वाटते, दुर्लक्ष करता आले असते

( पु लं ना स्मरून) आज सकाळीच सकाळी काय हो?
असो. साधारण वरील अ . आणि अ. लेखासारखाच विचार करणारे काही नग आसपास पहिले आहेत . आधी चीड यायची, आता स्वतः:च्या डोक्याला शॉट ना लावता सोडून देते. लोकशाही आहे, काय करणार ?

प्रजासत्ताक भारताच्या संविधानाबद्दल आणि डॉ. आंबेडकरांबद्दल असे विधान? जाहीर निषेध!
अ‍ॅडमिन, प्लीज धागा उडवा >>>>> +

लेखातला अवास्तव आग्रह आणि मते वगळल्यास काही मुद्दे खरच विचारकरण्या जोगे आहेत, >> असा एखादा प्रतिसाद येईल असे वाटलेले.
करा विचार गुडलक Happy

एक निरीक्षण आहे. या स्त्रीवादी बायका कधीही खूष नसतात. त्या स्वतःही आनंदी नसतात आणि त्यांना कुणी आनंदी राहीलेलं चालत नाही. त्यांचे संसार तर भगवान भरोसे असतातच पण चांगले चालू असलेले संसार यांच्या नुसत्या संसर्गाने धोक्यात येतात.
>>> लोल.

खूप दिवसांनी असा लेख वाचला. आधुनिकता की उथळपणा ची आठवण झाली. परत सुरू का !

मला आवडला Happy का ते विचार करते आहे! 'Welcome' movie बघायला कशी मजा आली होती, तसं काहीतरी. ह्या लेखाचा दुसरा भाग कधी येणार!

आरारारारारा,
तिकडे तो मराठी चित्रपटांचा लेख वाचायच्या नादात या धाग्याकडे दुर्लक्ष करण्याचे महापातक घडले माझ्याकडून...धाग्याचा सुरवातीचा पॅरा वाचूनच धाग्याकर्त्याचे आभार मानायचा मोह आवरता आला नाही..आता संपूर्ण धागा वाचून काढतो..प.पू. रामतीर्थंकर बाईंची आठवण आली...काय उच्च विचार! Wink

"काय उच्च विचार!" - ह्या लेखात विचार दिसल्याचा आरोप केल्याबद्दल 'अजब' ह्या आय-डी वर अब्रू-नुकसानीचा दावा का ठोठावू नये? Wink ह्या न्यायानं, उद्या उदय चोप्रा च्या सिनेमात वावरण्यात अभिनय शोधाल. हार्दिक पंड्या च्या बॅटींग मधे टेक्निक शोधाल, डेव्हिड धवन च्या सिनेमात लॉजिक शोधाल. Happy

हुश्श्श्स....आत्ता पूर्ण लेख वाचून झाला...एक एक ओळ वाचताना भारावून जायला झाले. आपण इतके दिवस किती अज्ञानात होतो याच्या जाणीवेने न्यूनगंड निर्माण झाला... Uhoh
@फे, Biggrin

>>जंतरमंतर वर संविधान जाळले आज,
जस्ट फॉर इंफॉर्मेशन>> का? सविस्तर बातमीचा दुवा द्याल का प्लीज?

संविधानावरुन आठवले. भारताची घटना कशी बनली त्याची कहाणी सांगणारी संविधान नावाची दहा भागांची सिरीज युटुबवर उपलब्ध आहे. बेनेगल यांचे दिग्दर्शन आहे.

काल रात्री सदर लेख वाचनाचा लाभ घेतला आणि झोपलो. आज सकाळी उठून मायबोली उघडली तर लॉग आऊट झालेले दिसले. लॉगईन केल्यावर अनुक्रमणिका पाहिली असता पहिलाच धागा माझ्या आवडत्या लेखकाचा दिसला. म्हणून नीट पाहिले असता सदर लेखक श्री. शिष्योत्तम रामभाऊ माझ्या आवडत्या लेखकांच्या यादीमध्ये अंतर्भूत झालेले होते. हे कसे झाले हे मला माहित नाही. आता मी त्यांना माझे आवडते यादीमधून काढून टाकलेय.

सदर लेखक आणि इतर वाचकांचा गैरसमज होऊ नये म्हणून हा प्रपंच.

प्रतिसादांत निश्चित एक क्रम आहे. शिस्त आहे.
सुरूवातीला शिशूवर्गाचे प्रतिसाद येऊन गेले. मग वरच्या वर्गातले आले काही. माध्यमिक आले. आता महाविद्यालय आणि उच्च महाविद्यालय चालू आहे.
पदव्युत्तर आणि पीएचडी या पातळीचे पण लवकरच येतील याची अपेक्षा आहे. त्यानंतर मग नंद्या ४३ यांचे येतील.
मग आम्ही देखील लिहूच .
त्यानंतर स्वतः शिष्योत्तमांचे गुरोत्तम आणि शेवटी महागुरू असे सगळे झाले की गंगेत घोडं न्हालं.

काल काही असामाजिक तत्त्वांकडून सोशल मीडीयावर जंतरमंतर येथे कागद जाळणा-या काही देशभक्तांची बदनामी झाली तर संस्कारी देशभक्तांना काल नालासोपारा आणि पुणे येथून अटक झाली. भीमा कोरेगाव येथील नक्षली कनेक्शन शोधणा-या देशभक्तांच्या अथक कामात यामुळे अडथळा येण्याची शक्यता आहे. अशा कटकारस्थानांमुळे दु:ख वाढीस लागेल यात शंका नाही.

वाचकहो प्रणाम
- आपल्या प्रतिक्रियांमुळे दु:ख झाले नाही. माझे प्रयत्न कमी पडले असे म्हणेन. तो सर्वांना क्षमा करण्यासाठी तत्पर आहे.

- स्वाती २ - आपल्याला काय खटकले ? मला खरोखर आदर आहे आणि तोच व्यक्त केला आहे. मात्र कायदे सर्वांना आवडावेत अशी सक्ती नाही ना ? लोकशाही नाही का ? आपले पूर्वीचे कायदे काही लोकांना आवडले नाहीत म्हणून ते सरसकट रद्द केले गेले. तरीही तुम्ही दु:खी झाला असाल तर मी आपली माफी मागतो आणि ते उल्लेख बदलण्याचा प्रयत्न करीन. तुम्हाल दु:खी करून मी स्वतःही दु:खीच होणार आहे, विश्वास ठेवा.

- हिंसक घटनांचा इथे कृपया संबंध जोडू नये.

- आदरणिय रामतीर्थकर माईंचा इथे उल्लेख झाला आहे. त्यांचे कार्य महान आहे. त्यांची भाषणे जालावर उपलब्ध करून दिलेली आहेत. एकदा ऐका. त्यांचे काम जाणून घ्या. किती दु:ख आहे समाजात हे समजते. माईंचे कार्य थक्क करणारे आहे.

- दीड तास झाला आयडीला हे समजले नाही. अहो, खूप वर्षांपूर्वी मायबोलीच्या देवनागरी सुविधेची लिंक वापरून पुष्कळ लिखाण केलेले आहे पत्रिकेसाठी. मध्यंतरी मराठी एडिटर ची सोय झाली. आता पुन्हा मायबोलीची देवनागरी सुविधा वापरावी या उद्देशाने पाहीले तर सदस्यत्व घेतल्याशिवाय देवनागरी लिखाण अशक्य आहे असं लक्षात आलं. आता सदस्यत्व घेतलेच आहे तर लिखाण असू द्यावे म्हणून खटाटोप केल्यानंतर प्रसिद्ध केले.

- ज्यांना लिखाण आवडले त्यांचे मनापासून आभार. हाच उद्देश असतो. दहा हजारात एकास जरी पटले तरी चालते. हा मार्ग कष्टमय खराच.

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः

Too much. इतकी बोलणी खाऊन, चेष्टा सहन करुन तोल न ढळू देणारा अगदी एखादाच मायबोलीवर! आता पुढची पायरी मायबोली आनंदाचं गावं अशी दिसते. Keep it up.

ते वेगळ्या स्तरावर पोहोचलेले असतात अहो. आपण सर्व अज्ञानी पामर.. कोपिष्ट, तापिष्ट, टोमणिष्ट .. षडरिपुंनी युक्त (पुण्यात सप्त)

Too much. इतकी बोलणी खाऊन, चेष्टा सहन करुन तोल न ढळू देणारा अगदी एखादाच मायबोलीवर!
>>
पैचान कौन!

स्वाती २ - आपल्याला काय खटकले ?
>>
संविधान ही काही एका रात्रीत 'आली लहर..' म्हणून आलेली गोष्ट नव्हे. बाबासाहेब शिल्पकार असले तरी तो काही एकखांबी तंबू नव्हता, वेगवेगळ्या लोकांनी नोंदवलेली मते लक्षात घेवून, बरेच विचार मंथन होवून , मसूदा तयार झाला, कॉपी-पेस्ट करुन नव्हे. ब्रिटिश इंडीया अस्तित्वात येण्याआधी भारताल्या वेगवेगवेगळ्या राज्यकर्त्यांचे, संस्थानिकांचे आपापल्या मर्जीने केलेले वेगवेगळे कायदे होते, ते त्यांच्या सत्तेच्या वर्तुळापुरते होते. बिटिशांच्या राज्यात त्यांनी केलेले कायदे होते. बिटिश इंडीयाचे कायदे विसर्जित करुन स्वतंत्र भारतीय प्रजासत्ताकासाठी नवी कायद्याची चौकट आली. सशक्त संविधान, लोकशाही मूल्ये या जोरावर इतकी प्रगती शक्य झाली.
कुणी गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वतःहून घ्यावी. >> मैला डोक्यावर वाहून नेण्याची सक्ती होती याचा सोईस्कर विसर पडला? गावगाड्यात पादत्राणांची जबाबदारी म्हणजे काय बाटा कंपनी नव्हती. कै च्या कै!

मला दु:ख वगैरे झाले नाही. ४ दिवसांनी भारत ७१ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करेल अशावेळी हा जो शांतीपाठाच्या आडून प्रतिगामी विचारांचा प्रचारकी लेख आला तो आवडला नाही. दुर्लक्ष केले असते पण संविधानाचा उल्लेख आला म्हणून विरोध नोंदवला. विरोध नोंदवला नसता तर मात्र टोचणी लागली असती.

त्यांचे कार्य महान आहे. त्यांची भाषणे जालावर उपलब्ध करून दिलेली आहेत. एकदा ऐका. त्यांचे काम जाणून घ्या. किती दु:ख आहे समाजात हे समजते. माईंचे कार्य थक्क करणारे आहे.
>>> एक दोन भाषणे पाहिली. खूप न्यारो माईंडेड बाई आहे.
मुलींनी चूल आणि मूल पाहिले पाहिजे, नवऱ्याला उलट उत्तर देऊ नका, कितीहि राग करू शकतो नवरा पण आपल्याला सांभाळून घ्यावेच लागते, सुनांनी सासूचे कसे ऐकले पाहिजे. आजकालच्या सुनांना कसा इगो आहे, आम्हाला कसा नव्हता, वगैरे वगैरे.. अर्थात काही मुद्दे चांगले पण मांडले पण मेजोरीटी पटले नाहीत.

बादवे - हिची सून कोण होणार ☺️ शुभेच्छा त्या बिचारीला.

च्रप्स --- प्लस वन... मला ही त्यांच्या होणाऱ्या / झालेल्या सुनेची दया येतेय...
आणि या लेखकांच्या मुलींची/ सुनांची जे कोण असतील त्यांची...अगदी बायको ची ही...

मला हा लेख येथे टाकण्यामागे खोडसाळपणा वाटतो. लेखाच्या शेवटी लिहिलेल्या कंसातील तळटिपेवरनं लक्षात येईल.

Om Piece, Piece, Piece >>>
माझं इंग्रजी कच्चं आहे. हे भाषांतर बरोबर आहे का ?
उत्तर माहीत असूनही न सांगणा-यांच्या डोक्याची शकले होऊन त्यांच्याच पायावर लोळू लागतील.

Pages