कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ४

Submitted by हायझेनबर्ग on 8 August, 2018 - 22:44

कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ३

दादाजानना जाऊन आता हप्ता होत आला होता. त्यांचा जनाजा निघाला तेव्हा सारा मुहल्ला जनाज्याच्या मागून कब्रस्तानपर्यंत चालत गेला. त्या दुपारी पाहिला तसा आजिबात चहलपहल नसलेला सुनसान मुहल्ला मी कधीच पाहिला नव्हता. लखनौच्या खाला पासून कानपूरच्या अफरोझा फुफीपर्यंत, ईनायत चुडीवाल्यापासून बागवान चाचापर्यंत, कुरेशी मॅडम पासून डॉक्टर गुप्तांपर्यंत आणि ईरफान फुफांपासून झीनतआपाच्या नवीन मियापर्यंत कित्तीतरी लोक येऊन गेले अम्मी अब्बूंना भेटायला. कानपूरला पोचताच दादाजान गेल्याची खबर मिळाल्याने अफरोझा फुफींना पुन्हा लागलीच ऊलट्या पावली निहालगंजकडे फिरावे लागले. त्या प्रवासाचे त्यांना खूपच कष्टं पडले होते म्हणून कधी नव्हे त्या आल्यादिवशी आठाच्या गाडीने माघारी न जाता एक दिवस राहून गेल्या. ईथे असतांनाही त्यांना रडून रडून फार बेकरार वाटत होते म्हणून फातिमाने दोन दिवस माझ्या खोलीत त्यांचा ईंतजाम करून घेतला. मला लोकांची ही गर्दी नको नकोशी होई आणि त्या गर्दीत मला मी सुद्धा एक साठ वर्षांची म्हातारीच झाली आहे असे वाटत राही. म्हणून ऊन्हं चढली की मी दादाजानच्या खोलीत आणि ऊतरली की चबुतर्‍यावर जाऊन बसे, पण कुठेही बसले तरी दादाजानची याद राहून राहून माझा पिछा करीत राही आणि मग मला खूप रडायला येत असे.

दादाजानच्या खोलीत आता ते नसले तरी त्यांचा वजुद, त्यांच्या वस्तुंचा वास मागे भरून राहिला आहे असं मला कायम वाटे. त्यांच्या पलंगाची नक्षी, आरामखुर्चीच्या लयीत डुलण्याचा आवाज, नक्षीदार रेहाल त्यावर ठेवलेले कुराण-ए-शरीफ, आत्ता आत्तापर्यंत जिचे खिसे सुक्यामेव्यांनी भरलेले असत ती त्यांची शेरवानी, मोठ्या ईमाम साहेबांनी काझीचा खिताब देतांना घातलेली टोपी, पांढर्‍या धाग्याने जरीकाम केलेली त्यांची जुती, नक्षीदार मुठीची काठी, मोठ्या नक्षीदार अक्षरात ऊर्दू शब्दं गिरवलेली डायरी आणि मेंदी कालवायची कटोरी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये दादाजान थोडे थोडे लपून बसले आहेत असे माझे मन मला सांगत राही. जणू ह्या सगळ्या गोष्टींचे वास कुल्फीसारखेच माझ्याही रूहला राहून राहून दादाजान अजून ईथेच असल्याची आठवण करून देत होते.

एकदा कुरेशी मॅडम अम्मी-अब्बूंना भेटून झाल्यावर मला शोधत चबुतर्‍यावर आल्या आणि माझ्या बाजूला एकही अल्फाज न बोलता मावळतीच्या सुर्याकडे बघत बसून राहिल्या. मी बांधणीच्या रंग ढवळायच्या काठीने जमिनी वर रेघोट्या मारत बसले होते. जसा आता दादाजान नव्हते तरी त्यांच्या खोलीत फक्त मलाच येणारा त्यांचा वास भरून होता तसाच काठीचा निळा रंग सुकलेला होता तरी माझ्या रेघोट्या फक्तं मलाच दिसणार्‍या जादुई रंगाने ऊमटत होत्या असे मला वाटून गेले. मध्येच त्यांचा ऐनक बाजूला काढून ठेवत मॅडम म्हणाल्या, 'कुछ केहना चाहते हो निलोफर बेटा?'
अफरोझा फुफी दादाजानला भेटून गेल्यापासून माझ्या मनात जे सवालातांचे परिंदे सैरभर ऊडत होते ते अजूनही काही केल्या शांत बसत नव्हते. मी एकदम मला काय विचारायचे आहे तेच मला कळत नव्हते, ईच्छा असूनही काही बोलण्यासाठी अल्फाजही मिळत नव्हते. पण काहीतरी वाटून अल्फाज जुळवत मी मॅडमना विचारले, 'जी माणसं त्यांच्या घरापासून दूर निघून जातात, ती फिरून माघारी कधीच का येत नाहीत? त्यांना लक्षात नसते का घरी सगळे लोक त्यांना याद करत आहेत, त्यांची वाट बघत आहेत. '
माझ्या डोक्यावरून हात फिरवत मुस्कुराहटभर्‍या चेहर्‍याने त्या म्हणाल्या, 'तुझी हसरत मोठी नेक आहे बेटा, पण हा दूरचा सफर एकट्याचाच्च आणि एकतरफा असतो गं. त्या माणसांना फिरून परत आपल्याकडे येता येत नाही म्हणून तर ते आपल्यापाशी त्यांची याद ठेऊन जातात. आपण आपल्या सफरीमध्ये त्यांना याद केले की मग ती माणसं काही लम्ह्यांसाठी पुन्हा भेटून आपल्या सफरीमध्ये आपले हमकदम होऊन जातात. पण त्यासाठी आपण आपली सफर चालू ठेवणं जरूरी आहे'
मला मॅडमचं सगळं बोलणं नीटसं कळालं नाही पण ते ऐकून माझ्या मनाला खूपच छान वाटलं. मी शाळेत जातांना बागवान चाच्यांच्या ठेल्याजवळ किंवा ईनायत चुडीवाल्याच्या दुकानाजवळ दादाजानची आठवण काढली की ते मला पूर्वी शाळेत सोडायला येत तसे पुन्हा शाळेच्या रस्त्यावर हमकदम होतील ह्याचा मला एकदम भरोसा वाटला. अजून थोड्यावेळ ढळणार्‍या सुर्याकडे, तो मशिदीच्या घुमटामागे दिसेनासा होईपर्यंत आम्ही दोघीही बघत बसलो. नंतर कुरेशी मॅडम ऊठत म्हणाल्या, 'तुला जेव्हा शाळेत यावसं वाटेल तेव्हा ये, मी मोहतरमा शेख आणि मोहतरमा बेगना सांगून ठेवेन म्हणजे त्या तुझी राह बघत बसणार नाही.. ठीक आहे.... अपना खयाल रखना!'
त्यांना निघतांना बघून मी नुसतीच मान डोलावली पण आता मला मनातून शाळेच्या रस्त्याची खूपच ओढ लागली होती. कधी एकदा शाळेपर्यंतच्या रोजच्या सफरीवर मी दादाजानला भेटते असे झाले होते. त्या दिवसानंतर जेव्हा जेव्हा मला दादाजानची खूप याद येत असे तेव्हा तेव्हा ते माझ्या आसपासच असून माझे हमकदम आहेत असं मला वाटत राही.

अम्मी-अब्बूंचा दिवसभराचा पूर्ण वेळ आलेल्या लोकांशी बोलण्यात जाई. हप्ताभर मुहल्ल्यातून कोणी ना कोणी दुपारचा आणि रात्रीचा खाना आणूनच देई. कधी कधी तर दोन चार वेगवेगळ्या घरून खाना येत असे. कुरेशी मॅडम किंवा झीनतआपा सारखे कोणी आले तरंच ते माझी चौकशी करीत, मला शोधत येऊन माझी विचारपूस करीत. एवढे सगळे लोक येत जात असूनही घरातला मौहोल कायम मायुसीने भरलेला वाटे. अम्मीच्या आजूबाजूला चार-पाच खवातीन ऊदास चेहर्‍याने कायम बसलेल्या दिसत. रात्री तिच्या बाजूला जाऊन झोपेपर्यंत एकाच घरात राहूनही दिवसभर ती मला भेटतच नसे. फक्त अधून मधून ती स्वतः किंवा कोणाला तरी सांगून 'निलू तू जेवलीस का?' किंवा 'निलू, तुला काही हवं का?' विचारून घेई. अब्बू नेहमी एकट्यानेच बेकरी सांभाळत पण अजून ते रोजच्यासारखी सकाळी बेकरी ऊघडून भट्टी लावत नसल्याने बेकरीही बंदच होती. दुपारच्या आणि रात्रीच्या वेळी भेटणार्‍या लोकांचा जोर ओसरला की बदल म्हणून ते बेकरीत एखादी चक्कर मारून येत तेवढेच. तेवढ्यानेही त्यांचे डोळे भरून आल्यागत वाटे, त्यांच्यासाठी त्यांच्या अब्बूंची शेवटची याद बेकरीतच होती.

हप्ताभर घरी राहिल्यानंतर मी शाळेला जायला तयार होत होते तेव्हा अब्बूही आज पहिल्यांदाच बेकरीत जाण्यासाठी निघत होते. डिसेंबरच्या ठंडीची रजाई ओढलेले निहालगंज अजूनही कपकपी भरून कुडकुडत होते. बर्‍याच दिवसानंतर घरातून बाहेर पडून मोकळ्या हवेत श्वास घेतांना छानच वाटत होते. अंगणातल्या झाडांच्या पानांवर ओसचे मोती लकाकत होते. कुठे घरांच्या छतांवरच्या चिमण्यांमधून धूर बाहेर पडत होता तर कुठे दुकाने आणि ठेल्यांची फळ्याफळ्यांची लाकडी दारे ऊघडत होती. कुठे घरांसमोरच्या अंगणात झाडलोट चालू होती तर कुठे दूधवाले मोठाल्या कनिस्तरातून दूध घेऊन झाडलोटीचा धुराळा चुकवत लगबगीनं जात होते. ज्यांची शेतं होती ते शेताकडे, ज्यांची नोकरी होती ते फॅक्टरीकडे आणि माझ्यासारखी मुले शाळेकडे, जणू सगळ्यांचीच तय्यार होऊन कोणाच्यातरी शादीमध्ये निघालेली आपापली एक बारातच होती. मंदिरातून सकाळी येणारे घंट्यांचे आवाजही सकाळचा हा देखावा अजूनच जिवंत करत होते. बागवानचाचांना फळाचा ठेला लावतांना बघून माझे पाय दोन क्षणांसाठी तिथे घुटमळले तेव्हा ते माझ्याकडे बघून मंद हसले. मग पुन्हा ईनायत चुडीवाल्याच्या दुकानासमोर सुद्धा माझे पाय घुटमळलेच.

शाळेत कुल्फी आणि पापलेटला बघून मला एकदम मस्तच वाटलं. ईतक्या दिवसांनंतर त्यांना बघून मला त्या दोघींना आनंदाने मीठीच मारावीशी वाटत होती. पण मला त्यांच्या चेहर्‍यावर मोठी परेशानी दिसली. मला वाटले त्यांना बहुतेक कळत नसावे, 'आता आपण बिस्किटशी नेमके वागायचे तरी कसे? हसायचे की ऊदास चेहर्‍याने बघायचे?' त्या दोघींना बघून मला एकदम शाळेचा पहिला दिवस आठवला, कुल्फीचे तेच पनीर कोरून बसवलेलं नाक आणि पापलेटचं दोन्ही कानांपर्यंत पसरलेलं हसू. ते आठवताच माझ्या चेहर्‍यावर आलेली मुस्कुराहट बघून दोघींचे ईदच्या चांदसारखे बारीक झालेले चेहरेही क्षणात चौदहवीच्या चांदसारखे फुलले. काय बोलायचे ते आम्हा तिघिंनाही कळत नव्हते पण मला बघून त्या दोघींना झालेला आनंद मला त्यांच्या डोळ्यात साफ साफ दिसत होता. जणू त्यांचे डोळे मला सांगत होते 'खुश आमदीद हमारी प्यारी बिस्किट'. तेवढ्यात मागून वर्गात आलेल्या कुरेशी मॅडमशी मी रूबरू होताच मला ऐनकच्या काचांमागून त्यांचे डोळेही जणू तेच म्हणतांना दिसत होते 'खुश आमदीद मोहतरमा काझी'.
काही तासांतच कुल्फी आणि पापलेटबरोबरचे सगळे जुने दिवस परतून आल्यासारखे वाटत होते. पुन्हा तेच हसणं, खिदळणं आणि एकमेकांची चेष्टा करत खीखी करत दात काढत राहणं. आठवड्याभरापूर्वीच कुल्फीशी झालेल्या अबोल्याचा सुद्धा आता मला विसर पडला होता. असाच कुठूनतरी कसातरी आम्ही घातलेल्या बांधणीच्या घाटाचा विषय निघाला तेव्हा पापलेट म्हणाली, 'कुल्फी तू आम्ही बांधणी केलेले दुपट्टे नाही बघितलेस ना अजून? ए बिस्किट, ऊद्या शाळेत येतांना तुझ्या शबनम मध्ये घालून तू घेऊन ये ना दुपट्टे कुल्फीला दाखवायला.'
'नक्की घेऊ येईन! मी नाही विसरत बरं एकदा 'हो' म्हंटलं की.' असं मिष्किलीनं म्हणत मी कुल्फीकडे बघितलं तर एक क्षण ती नजर चोरत खिडकीतून बाहेर बघायला लागली. मग तो विषय तिथंच सोडून पूर्ण दिवसभर आम्ही तिघी पुन्हा काहीतरी भलतंच मजेमजेचं बोलत राहिलो, खिदळत राहिलो. घरी येतांना पहिल्यासारखेच छान आणि हलके हलके वाटत होते. डोक्यातल्या सवालांचे परिंदे दूर ऊडून सगळीकडे खुषीच्या तितलीयां फडफडल्यासारखे.
सकाळच्या घाईगडबडीत विसरून जाऊन कुल्फीसमोर माझे आधीच ऊंच नसलेले नाक खाली जायला नको म्हणून मी घरी गेल्या गेल्याच दोन्ही दुपट्टे माझ्या शबनम मध्ये ठेऊन दिले.

मी शाळेत पोहोचले तेव्हा कुल्फी आधीच येऊन बसली होती. मी कित्तीही लवकर यायचे ठरवले तरी मला अजूनपर्यंत एक दिवसही कुल्फीच्या आधी वर्गात येणे जमले नव्हते. मी एखादे दिवशी रस्त्यावर दिसणारी हरेक चीज न्याहाळून न बघता अगदी समोर बघून चालत शाळेत लवकर पोहोचले तरी त्यादिवशीही कुल्फी माझ्या आधीच आलेली असे. ही नेमकी कधी आणि किती लवकर येऊन बसते हे मला एकदा बघायचेच होते. पापलेटचं मात्र तंत्रच वेगळं. ती कुरेशी मॅडम वर्गात येण्याआधी फार फारतर अर्धा किंवा एक मिनिट आधी पोचत असे. कुल्फी सारखंच ती, हे असं बरोब्बर अर्धा मिनिट लवकर येणं कसं जमवते ह्याचीही तफ्तीश मला एकदा करायची होती.
मग पापलेट येईपर्यंत मी आणि कुल्फी ईकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलो. कुल्फी सांगत होती, 'ती तिच्या अब्बूंच्या आईस फॅक्टरीमध्ये गेली होती आणि तिथे तिने आमच्या वर्गाच्या चौपट मोठ्ठा कमरा भरून बर्फाचे बाकाएवढे मोठ्ठे ठोकळे एका कतारमध्ये ठेवलेले बघितले. मग त्या ठोकळ्यांची शिमल्याला पडते तशी बर्फाची साखरेसारखा बारीक चुरा बनवणारे यंत्रही बघितले. तिच्या अब्बूंची ईजाजत घेऊन आम्हालाही एकदा फॅक्टरी बघायला घेऊन जाणार आहे....', बर्फ ठेवलेल्या त्या कमर्‍यात जाण्याच्या नुसत्या खयालातनेच मला कपकपी भरून आली आणि गायीच्या पोटाला हात लावल्यावर तिचे अंग थरथरते तसे माझेही अंग एकदम शहारून आले. कुल्फी अजून बोलतंच होती तर तेवढ्यात पापलेट आली. तिचा चेहरा एकाच वेळी रडवेला आणि गुश्श्यात असा दोन्ही वाटत होता. ती येऊन मान खाली घालून रडवेल्या चेहर्‍याने बसून राहिली. कुल्फी आणि मी एकमेकांना 'हिला काय झाले?' अश्या अर्थाचे नुसते डोळ्यातून विचारत राहिलो. मध्येच पापलेट रागात बडबडली 'मी त्या शैतानाच्या अंगावर जिवंत खेकडेच सोडणार आहे आता'. कुल्फी मला कोपर मारत, 'मला वाटतं तिच्या अम्मीने तिचा निकाह ठरवून टाकला आहे आणि ती तिच्या होणार्‍या मियाच्या अंगावर जिवंत खेकडे सोडणार आहे' खुसफुसत म्हणाली आणि भुवया ऊडवत खीखी हसत बसली. कोणाच्या अंगावर खेकडे सोडायच्या कल्पनेनं मलाही खूप हसायला आलं पण मी डोळे मोठ्ठे करत कुल्फीला 'गप्प रहा' म्हणून खुणावले. पापलेट पाठोपाठ अर्ध्या मिनिटात कुरेशी मॅडम त्यांचा ऐनक सांभाळत वर्गात आल्याच. आम्हा सगळ्यांचा कलमा पढणं चालूच होतं की अचानक पापलेट मुसमुसत रडायलाच लागली. कुरेशी मॅडम आमच्या बाकाजवळ आल्या आणि पापलेटच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाल्या, 'मोहतरमा बेग? काय झाले रडायला?' पण पापलेट नुसतीच रडत राहिली तिच्या तोंडून एक शब्दंही निघत नव्हता. कुल्फी आणि मलाही मोठं ताज्जुब वाटत होते हिला नेमके झाले तरी काय? बरं ती एका क्षणाला मुळूमुळू रडत होती आणि दुसर्‍याच क्षणाला गुश्श्यात येऊन धुसफुसत होती. कुरेशी मॅडमने दुसर्‍यांदा विचारले, 'कोणी काही बोललं का तुम्हाला?' तेव्हाही तिने हूं केले नाही चूं. मॅडमची नजर भुवया ताणत आमच्याकडे वळली तेव्हा आम्ही डोळ्यांनीच 'आम्हाला काहीच माहित नाही' म्हणत निरागस चेहरे करून माना हलवल्या. 'तबियत ठीक नाही का तुमची मोहतरमा बेग?', ह्यावेळी मॅडमच्या आवाजात मोठी काळजी वाटत होती. पण पापलेटचे ओठ अजूनही ढिम्मंच, तोंडातून एक नाही की दोन नाही, तिचे नुसतेच रडणे आणि पालथ्या मुठींनी वाहणारे डोळे पुसणे चालू होते. तिच्या चेहर्‍यावरचे ते मोठे हसू जाऊन दोन्ही गाल मेण चोपडलेल्या सेबसारखे गोलमटोल झाले होते. डोळे पुसतांना डोळ्यांतला सूरमा सुद्धा मेणासारख्या मऊ गालांवर पसरला. शेवटी कंटाळून मॅडम म्हणाल्या, 'घरी जायचं का तुम्हाला? घरी जाऊन आराम करा मग बरं वाटेल'. तरीही पापलेट गप्पंच. मग आमच्या पडलेल्या चेहर्‍यांकडे बघून मॅडम म्हणाल्या, 'मोहतरमा काझी, मोहतरमा बेग, तुम्हीही दोघी जा बरं तुमच्या मैत्रिणीबरोबर आणि तिला तिच्या घरी पोहोचवून या. तुमच्यापैकी एकीलाच पाठवले तर दुसरीचे मन लागणार नाही. तेव्हा तुम्ही दोघीही जा आणि मला नंतर येऊन सांगा काय झाले ते'. आम्ही नुसत्याच माना डोलवल्या आणि आमच्या शबनम खांद्याला लाऊन चालू पडलो. मला वाटलं, सगळा वर्ग आमच्या तिघिंकडे 'काय अजीब आहेत ह्या मुली' अश्या विचित्रं नजरेनं बघत होता. मी पापलेटचा हात पकडला आणि कुल्फीने तिची शबनम घेतली आणि आमची बारात वर्गातून बाहेर आली.

शाळेच्या फाटकाच्या बाहेर आलो तरी पापलेटचे रडणे थांबलेच नव्हते. कुल्फी फटकन पापलेटचा खांदा हलवत म्हणाली, 'ए नादान लडकी, काय झाले गं तुला असे सहा माहिन्यांच्या बाळासारखे रडायला? तुझ्यामुळे आपल्याला वर्गातून घालवले आज, कळले ना तुला?. आता तुझा हा रोना एकदम बंद कर आणि चुपचाप सांग काय झालं?'
तसं पापलेट रडता रडताच म्हणाली,' तो शैतान माझे हीरा-पन्ना घेऊन गेला'
आम्हाला काहीच कळेना ती कश्याबद्दल बोलते आहे. गोंधळून जात मी विचारले, 'तुझे गेहने हरवले का? कोणी नेले?'
'गेहने नाही, माझ्या जानच्या हीरा-पन्नाला तो शैतान घेऊन गेला', पापलेट अजूनच रडत म्हणाली.
पापलेटच्या कुठल्याच वाक्याचा मतलब कळत नसल्याने कुल्फीच्या दिमागची भट्टी एकदम तापली, पापलेटचा दंड पकडून ती म्हणाली 'ए लडकी, ईधर देख. आता तू एकही रडका सूर काढलास ना तर तुला ईथेच सोडून आम्ही दोघी अश्याच माघारी शाळेत जाऊ..याद राख' तेव्हा कुठे पापलेट हळूहळू भानावर येऊन हुंदके देत रडायची थांबली.
'आता नीट काय ते सांग', नजर रोखून जालीम आवाजात दुसर्‍यांना हुक्म करण्याचा अवसर सोडेल ती कुल्फी कसली.
'आमच्या घरी आमची जान नावाची पालतू कुतिया आहे ना..... अम्मी-अब्बूंची, माझ्या सगळ्या बहिणींची खूप लाडकी आहे ती....आणि माझी तर जानच आहे....मीच ठेवलं होतं तिचं नाव 'जान' ती लहान असतांना.....एकाही मांजराला माशांच्या पिपांजवळ फिरकू देत नाही आमची जान........ माझ्या हातांनी जेवण दिल्याशिवाय तर ती जेवत सुद्धा नाही.....आमच्या जानला दोन हप्त्यांपूर्वी दोन बच्चे झाले. मी त्यांचं नाव हीरा आणि पन्ना ठेवलं होतं. त्यांनी डोळे ऊघडले की मला तुम्हाला घरी बोलवून त्यांना अचानक भेटवायचं होतं' पापलेटला अजूनही राहून राहून हुंदके येतच होते.
पापलेटकडे जान नावाची कुतिया आहे हे आम्हाला माहित होते अणि पापलेटचा तिच्यावर किती जीव आहे हे सुद्धा. तिला टोकले नाही तर ती पूर्ण दिवसभरसुद्धा जानचीच तारीफ करीत राहील, 'माझी जान अशी आणि माझी जान तशी'. पण हीरा-पन्नाबद्दल आम्हाला काहीच माहित नव्हते.
'आम्हाला जान माहित आहे पापलेट, पण तिच्या बच्चांना कोण घेऊन गेलं आणि कुठे?' कुल्फीने पुन्हा तिचा जालीम आवाज काढला.
'तो आमच्या पडोसी लडका आहे ना, शैतान की औलाद आदिल हुसेन...तो घेऊन गेला....हीरा पन्नानी कालच डोळे ऊघडले होते.....पण ते दिवसभर कुई-कुई करतात आणि त्याला त्यांची नफरत वाटते.... म्हणून तो सकाळीच हीरा-पन्नाला पोत्यात घालून सायकलवरून गावाच्या बाहेर ते खंडहर आहे ना.... त्याच्या मागे शेतात सोडून आला. आता जान सकाळपासून तिच्या बच्चांना शोधते आहे, ईथे तिथे वेड्यासारखी वास घेत फिरते आहे आणि मोठी भेसूर रडते आहे. अब्बू किनार्‍याच्या गावाला गेले आहेत आणि माझ्या बहिणी सकाळीच शाळेत गेल्या. त्या आल्या की त्या पण रडणार त्यांना हीरा-पन्ना दिसले नाहीत तर' पापलेटला पुन्हा एक हुंदका आला.
आत्ता कुठे आम्हाला पापलेटच्या रडण्याचा नीट ऊलगडा झाला होता. बिचार्‍या जानबद्दल ऐकून एकदम कसेसेच झाले आणि ते बिचारे दोन छोटे बच्चे त्यांच्या अम्मी पासून ईतक्या दूर कसे असतील? ह्या विचाराने आता मलाही पापलेट सारखं रडू येतंय की काय असं वाटलं. कुल्फीचा चेहराही मला मोठा दुखी दिसत होता.
तेवढ्यात पापलेट म्हणाली, 'आपण आत्ताच्या आत्ता त्या शेतात जाऊन हीरा-पन्नाला घेऊन येऊ आणि मग त्या शैतान की औलाद आदिलला मी खेकड्यांच्या पिपात टाकणार आहे. पण मला एकटीने तिथे खंडहरकडे जायला भिती वाटते....तुम्हा दोघींनाही माझ्याबरोबर यावंच लागेल'
कुल्फी म्हणाली, 'अगं पण ते खंडहर किती लांब आहे ते तुला माहित आहे का? कसं जाणार आपण तिथे आणि किती वेळ चालावं लागेल?'
पापलेट म्हणाली, 'लांब तर आहे, अर्धा तास तरी चालावं लागणार आपल्याला...पण तुम्ही येणार नसाल तर मी एकटीच जाईन'
मला राहून राहून रडणारी जान डोळ्यांसमोर दिसत होती आणि त्यांच्या अम्मीला शोधणारे तिचे ईवलुसे बच्चे. अचानक मला ग्लानित असतांना मुलांच्या आठवणीने बेकरार होत 'जुम्मन-अफरोझा' पुटपुटणारे माझे दादाजान आठवले आणि डोळ्यातून नकळत दोन आसू माझ्या गालांवर ओघळले. मग मीच कुल्फीला म्हणाले, 'असू दे कितीही लांब... आपण जानच्या बच्चांना शोधूनच काढू आणि घेऊन येऊ त्यांच्या अम्मीकडे.' मी असे म्हंटल्यावर पापलेट मला एकदम मीठीच मारत म्हणाली, 'हमारी बहादूर बिस्किट - लेडी नूर सुलताना'.
मला वाटले माझे डोळे पुसणे कुल्फीच्या नजरेने नक्कीच टिपले होते, तीही मग एकदम राझीच झाली. नेहमीसारख्या भुवया ऊडवत ती म्हणाली, 'म्हणजे आता आपण अजून एका मुहीमेवर जाणार तर.' मग आम्ही तिघीही खीखी करीत हसत राहिलो आणि आमच्या मंदिराच्या मुहीमेच्या आठवणी काढत लगबगीनं गावाबाहेरच्या शेतांकडे निघालो.

गावाबाहेरच्या शेतांकडे जाणारा हा रस्ता मला नेहमीच खूप आवडे. बैलगाडीच्या चाकांच्या समांतर जाणार्‍या खुणांनीच तर रस्ता बनला होता आणि दोन खुणांच्या मध्ये मशिदीतल्या हिरव्या चादरी सारखी पायांना गुदगुदी करणारी हिरवळ. रस्त्याच्या बाजूला अधून मधून एखादे मोठे झाड येई आणि त्यावर एखादे लंगूर आमच्याकडे बघून त्याचे लाल तोंड वेंगाडत आवाज काढत बसलेले दिसे. निहालगंजमध्ये कायमच लंगूर दिसत, खासकरून मंदिराच्या आजूबाजूला. कधीमधी तर एखाद-दुसरे पिलू रस्ता भटकून आमच्या घराच्या चबुतर्‍यावरही येई. मान गोल गोल फिरवत ईकडे तिकडे बघे आणि नेमकी तेव्हाच मघरिबची अजान सुरू झाली की घाबरून लांबलांब ऊड्या टाकत पळून जाई. मला वाटते ह्या शेतांकडे जाणार्‍या रस्त्यावरच्या मोठ्या झाडांवरच सगळे लंगूर रहात. आता त्यांचे अम्मी-अब्बू मंदिराकडे खाना गोळा करायला गेल्याने झाडांवर सगळे बच्चेच मागे ऊरले असतील आणि दिवसभर काय काय मजेमजेचे खेळत असतील. शाळेत न जाता कुल्फी आणि पापलेट बरोबर खेळायला मिळाले तर मला सुद्धा लंगूर होऊन झाडावर रहायला आवडेल असं मला एकदमच वाटून गेलं. चालता चालताच कुल्फी आणि पापलेटचे लंगूर सारख्या लाल झालेल्या चेहर्‍यांचा खयाल येऊन खुदकन हसायलाच आलं.
थोडे पुढे गेलं की एक मोठा तालाब होता. दरवर्षी कडक ऊन्हाळा पडला की तालाबमधले पाणी आटून जाई, पण शेवटचे बाल्टीभर पानी शिल्लक राहिले की सगळे लोक म्हणत, 'आता पाऊस येणारंच, शंभर वर्षात कधीच आमचा तालाब कोरडा पडला नाही'
आणि मग खरंच पाऊस येत असे. तालाब पूर्ण भरला की एखाद्या संध्याकाळी अब्बू लवकर बेकरी बंद करीत आणि मी अम्मी-अब्बूं बरोबर पानी बघायला जाई, जत्राच भरत असे त्यावेळी तालाबच्या बाजूला. रंगीबेरेंगी बुढ्ढी के बाल पासून गरमागरम मक्याच्या भुट्ट्यांपर्यंत आणि थंडगार आईसकँडी पासून गोड मिट्टं काकवीपर्यंत कित्तीतरी मजेशीर गोष्टी खायला मिळत. पण मला सगळ्यात जास्त मजा वाटत असे ती रात्रीच्या पडद्यावरच्या सिनेमाची. असं वाटे रात्रं कधी संपूच नये आणि रात्रभर हा सिनेमाही असाच चालू रहावा. पण मला नेमकी सिनेमा बघतांनाच हमखास ती कंबख्त झोप लागून जाई आणि मग मी दुसर्‍यादिवशी 'मी झोपल्यावर पुढे काय झाले... सांगना' म्हणत अम्मीच्या मागे ती कामात असतांना भूणभूण लावत राही. नेहमी हव्याहव्याश्या वाटणार्‍या झोपेचा मला तेव्हा अस्सा राग येत असे म्हणून सांगू.
तेवढ्यात पापलेट जोरात ओरडली आणि मी एकदम माझ्या जत्रेच्या ख्वाब मधून जागीच झाले. 'ए कुल्फी ते बघ, विलायती ईमलीचं झाड... किती ईमल्या पडल्या आहेत बघ', पापलेट ऊड्या मारत कुल्फीचा हात धरून तिला खेचत होती आणि कुल्फी 'कुठे कुठे?' म्हणत वेड्यासारखं ईकडे तिकडे बघत होती. मग तिला एकदाचं ते झाड दिसताच त्या दोघीही पळतच झाडाकडे गेल्या आणि खाली पडलेल्या ईमल्या गोळा करू लागल्या. मला ही जायचेच होते ईमल्या गोळा करायला पण मला हीरा-पन्नाची खूप फिक्र पडली होती म्हणून मी रस्त्यावरच त्या दोघींना हाका मारत ऊभी राहिले. तेवढ्यातही त्यांनी दोन्ही हाताच्या मुठी भरून ईमल्या आणल्याच. त्या ठंडभर्‍या ऊन्हात लाललाल खट्ट्या ईमलीचा पहिला तुकडा तोडतांना एकदम बिजलीचा झटका बसून झिंझोडल्या सारखेच वाटले आम्हाला. कुल्फीचा चेहरा तर एवढा विचित्रं झाला की मी आणि पापलेट तिच्या चेहर्‍याकडे बोट दाखवत पोट दाबून हसत राहिलो. पहिला झटका बसून गेल्यावर मग आम्ही कंटाळा येईस्तोवर ईमल्या चोखत चालत राहिलो. आमच्या तिघिंच्या जुबान बनारसी पान खाल्ल्यासारख्या एकदम लालच होऊन गेल्या.
शेवटी एकदाचा आम्हाला खंडहर दिसला. तो एवढा शांत होता की ना तिथे हवा होती ना पक्षांचे आवाज. सगळीकडे एक खामोष मायुसी भरून राहिल्यासारखे वाटत होते. हाच तो 'सुलताना-ए-शामल', 'लेडी टिपू' नूरचा महल होता जो आता खंडहर झाला होता, ज्याच्याबद्दल नफीसा मॅडमने आम्हाला सांगितलं होतं. खंडहरच्या पडक्या फाटकासमोर ऊभं राहून खंडहरकडे एकटक बघत मी मुद्दाम कुल्फी आणि पापलेटला म्हंटलं, 'शाळा सुटली की लेडी नूर सुलतानाचं भूत रात्री झोपायला ह्या खंडहरमध्येच येत असेल नाही? पण आता जर ते शाळेत गष्त घालत असेल, तर आपण आत जाऊन सुलतानाचा महाल बघून येऊ'.
त्या दोघी जागीच पावलं थिजल्यासारखे थांबून मोठ्ठ्या डोळ्यांनी माझ्याकडे असे काही बघत राहिल्या की जणू मीच नूर सुलतानाचे भूत बनून त्यांच्यासमोर ऊभी ठाकली आहे. घाबरलेल्या आवाजात पापलेट म्हणाली, 'ए बिस्किट तू आम्हाला घाबरवू नकोस हां. तुला खंडहर बघायचा असेल तू एकटीच जा आत, काय गं कुल्फी'
'हो हो! जा तू एकटीच जा. आम्ही ईथेच तुझी वाट बघतो. मला भूत बघण्यापेक्षाही त्याचा वास येण्याचीच जास्तं भिती वाटते.' कुल्फीही घाबरत म्हणाली. मी खरं तर मजाकमध्ये म्हंटलं होतं 'आपण आत जाऊ या' म्हणून, पण आता मला एकटीलाच जायला सांगून त्या दोघींनी माझी मोठी पंचाईतच करून टाकली. मलाही आत जायला भिती वाटत होतीच पण न जावे तर मग पापलेट म्हणणार 'हं! ही कसली बहादूर लेडी नूर सुलताना!'. 'आता काय करावं?' असा मोठाच प्रश्न मला पडला होता तेवढ्यात, 'कौनsss आयाsss हैsss यहांsss' असा आवाज खंडहर मध्ये घुमला आणि पाठोपाठ काळ्या चेहर्‍याचा, लालबुंद डोळ्यांचा एक हिरवा साया खंडहरच्या वरच्या छज्ज्यातून बाहेर आला. तो बघून पापलेट 'भूsssतsss' असे छज्ज्याकडे बोट दाखवत जोरात किंचाळली आणि तिचा चेहरा भितीने पांढराफटक पडला. भितीने तिला असे काही कापरे भरले की काहीही विचार न करता पुढच्याच क्षणी ती किंचाळत शेताच्या दिशेने जीव खात पळत सुटली. मग मीही किंचाळत पुढे आणि कुल्फी माझ्यामागे असे पापलेटच्या मागे जीव खात पळत राहिलो. खूप वेळ पळून आणि किंचाळून आम्हाला एवढा दम लागला होता की शेवटी एका झाडाखाली आमच्या शबनम फेकून आम्ही मटकन बसूनच घेतले. पापलेट तर डोळे मिटून जमिनीवर आडवीच झाली. मला धड श्वासही घेता येत नव्हता की बोलताही येत नव्हते. कुल्फीही झाडाला डोकं टेकवून तोंडाने श्वास घ्यायची कोशिश करत गप्पगार पडून होती. माझा ताळ्यावर नसलेला दिमाग अजूनही त्या सायाच्या भयानक नजार्‍याने भरून गेला होता. असेच दोन-चार मिनिट खामोषीत गेले, फुललेला श्वास जरा कह्यात आला तेव्हा कुल्फी म्हणाली, 'पापलेट, कमदिमाग डरपोक लडकी तुला किंचाळायला काय झाले होते गं?'
पापलेट ऊठून बसत कुल्फीकडे ताज्जूबभर्‍या नजरेनं बघत मला म्हणाली, 'ही मुलगी काय आंधळी आहे का गं? मी ओरडले नसते आणि आपण पळालो नसतो तर भुताने आत्तापर्यंत जहान्नूममध्ये नेले असते आणि बोटी बोटी केली असती आपली. मी होते म्हणून आपण सहीसलामत ईथवर आलो तरी'
कुल्फी मोठ्या परेशानीने डोक्यावर हात मारत म्हणाली, 'अरे नादान लडकी, ते भूत नव्हतं, कोणी मौलाना फकीरबाबा होते. त्यांचे हिरवे कपडे दिसले नाहीत का तुला? मजमुआचा वासही नसेलच आला मग तुला?
हे ऐकून पापलेटचा चेहरा खर्रकन ऊतरूनच गेला आणि ती नुसतीच वेड्यासारखी आळीपाळीने आमच्या दोघींकडे बघत बसली. मग कुल्फी म्हणाली, 'तुझा माझ्यावर भरोसा नाही ना? तू बिस्किटला विचार छज्ज्यावर कोणाचे भूत होते?'
मग मी ऊगीचच मोठ्या दिलेरीचा आव आणत म्हणाले, 'हो पापलेट, ते कोणी फकीरबाबाच होते. तू ऊगीचच घाबरली'
'पण मग तुम्ही का पळालात?' पापलेटच्या हा प्रश्नाचे काय ऊत्तर द्यावे मला सुचतच नव्हते. तेवढ्यात पुन्हा कुल्फीच म्हणाली, 'आम्हाला वाटले तुला काहितरी झाले, म्हणून तुझ्या फिक्रमध्ये तुला आवाज देत आम्ही तुझ्या मागे पळालो'
मग मी ही म्हणाले, 'हो पापलेट, आम्ही तुझ्या फिक्रमध्ये तुझ्या मागे पळालो'
आता मात्रं पापलेटचा चेहरा कसानुसा होऊन पुन्हा रडकुंडीला आला तसे कुल्फीला एकदम 'भूsssतsss' म्हणत किंचाळली आणि पापलेटच्या पुन्हा गोर्‍यामोर्‍या झालेल्या चेहर्‍याकडे बघून खिदळत हसायला लागली. मला आणि पापलेटलाही मग हसीची ऊबळ आलीच आणि आम्ही तिघीही एवढ्या हसलो की आम्हाला वाटले आता आमच्या पाया आणि पोटाबरोबर आमचे दात आणि नखंही हसून हसून दुखणार.
आम्ही हसतंच होतो तेवढ्या कुल्फी दबक्या आवाजात म्हणाली 'ए... श्शूsss...श्शूsss.... खामोष... आवाज करू नका दोघीही'
पापलेट आणि मी एकदमच हसायच्या थांबलो. पापलेट मला दबक्या आवाजात म्हणाली, 'हिला परत काहीतरी खुफिया वास आला वाटतं'.
तर कुल्फी लगेच म्हणाली, 'वास नाही पागल...आवाज आला आवाज.. ऊठा... चला' आणि ती ऊठून मागे वळाली सुद्धा. आम्ही दोघीही तिच्या मागोमाग आमच्या शबनम सांभाळत दोनच पावलं चाललो असू तर ती एकदम थांबलीच. झाडामागेच एक छोटी नहर खोदलेली होती, तिच्या काठावर ऊभी राहून खाली बोट दाखवत ती आनंदाने ओरडलीच, 'पापलेट, बिस्किट ते बघा'
आम्ही दोघीही धावत जाऊन खाली बघितले तर नहरच्या घोटाभर पाण्यात हीरा-पन्ना कुई-कुई आवाज करत खेळत होते. एवढे गोड होते ना दोघेही म्हणून सांगू, हीरा एकदम सफेद पोश आणि पन्ना सुरमई रंगाचा. मला धावत जाऊन त्यांना गोदीमध्ये ऊचलून घ्यावेसे वाटत होते. पापलेट तर खुषीत 'जान चे हीरा-पन्ना, माझे हीरा-पन्ना' म्हणत टाळ्याच पिटायला लागली. ती खुष झाली की मला तिचे मोठ्ठे डोळे फार बघत रहावेसे वाटत, हीरा-पन्नाच्या डोळ्यांसारखेच निरागस दिसत ते अगदी. आम्हाला बघून ते दोघेही मान वर करत ऊड्या मारून जास्तीच कुई कुई करायला लागले.
पण हीरा-पन्नाला पाहून खुषीने फुललेले आमचे चेहरे लगेचच पडले. नहरला एवढा मोठा ऊतार होता की आम्हाला त्या बच्च्यांपर्यंत पोचताच येत नव्हते. खाली ऊतरायचा प्रयत्न करतांना वाटत होते आपण धाप्पदिशी नहर मध्ये पडून जाऊ आणि आपले पुढचे दात बाहेर येतील. पुन्हा वर येण्याचीही पंचाईत झाली असती ती वेगळी. आम्ही तिघिंनीही बराच वेळ एकेकट्यानी कोशिश करून बघितली पण काहीच जमले नाही. तिघिंनी एकमेकांचे हात पकडूनही थोडे पुढे ऊतरून बघितले पण तरीही आम्हाला हीरा-पन्ना जवळ पोचताच येत नव्हते. आधी फर्लांगभर पळून आणि आता ही कसरत करून आम्ही थकूनच गेलो. अंगातला सगळा जोष, सगळी ताकत संपून गेल्यासारखे वाटत होते. आम्ही पुन्हा झाडाखाली येऊन बसलो. काही वेळापूर्वीच खुषीने भरून गेलेले पापलेटचे डोळे पुन्हा मायुसीने भरून गेले. ती रडवेल्या सुरात म्हणाली, 'मी नाही जाणार ईथून हीरा-पन्नाला घेतल्याशिवाय, जान घरी त्यांची वाट बघत असेल'.
कुल्फी म्हणाली,'आपण आधी थोडा खाना खाऊ मग जरा जोष आला की पुन्हा नव्याने प्रयत्न करून बघू.' आम्ही दोघींनीही त्याला माना डोलावल्या. आधी चालून मग पळून आणि आता ही कवायत करून भूक तर खूपच लागली होती. खान्याचा डबा काढावा म्हणून मी माझ्या शबनम मध्ये हात घातला तर माझ्या हाताला जे लागले ते पाहून माझे डोळे लकाकलेच. मी खुषीने, 'पापलेट, कुल्फी हे बघा मला काय मिळाले.' ओरडतच माझे बांधणीचे दोन दुपट्टे त्यांच्यासमोर धरले. ते पाहून पापलेट अजून मायुस होत म्हणाली, 'तू पण ना बिस्किट! कुल्फीला बांधणीची नक्षी दाखवण्याची ही काय वेळ आहे का? माझे हीरा-पन्ना तिथे..' पापलेटचे वाक्य बोलून संपलेही नव्हते की कुल्फी तिच्या डोक्यात टपली मारत म्हणाली, 'तू भी ना पापलेट, एकदम पापलेटच आहेस'. मग मी आणि कुल्फीने दोन्ही दुपट्टे गाठ मारून एकमेकांना घट्टं बांधले. एका दुपट्ट्याचे एक टोक झाडाच्या बुंध्याला आणि दुसर्‍याचे पापलेटच्या कमरेला बांधून टाकले. तेव्हा कुठे पापलेटला कळाले तिला काय करायचे आहे.
दुपट्टा कमरेला बांधून ती हळूहळू सरकत नहरमध्ये ऊतरली आणि तिने हीरा-पन्नाला तिच्या गोदीमध्ये ऊचलून घेतले. मग कुल्फीने आणि मी जोर लाऊन दुपट्टा खेचत पापलेटला वर ओढून घेतले. ऊनच्या दोन गोळ्यांसारख्या दिसणार्‍या हीरा-पन्नाला बघून आम्हाला एवढा आनंद झाला ना. त्यांना गोदीमध्ये खेळतांना पाहून पापलेटचे डोळे पुन्हा भरून आले तेव्हा कुल्फीमधला जालीम जिन्नं पुन्हा जागा झाला आणि म्हणाला, 'आता जर तू परत रडायला चालू केलेस तर आम्ही दोघी तुलाच ईथे नहरमध्ये सोडून हीरा-पन्नाला घेऊन घरी जाऊ'.
तशी पापलेट खुद्कन हसलीच आणि मग तिचा रडतांनाच हसणारा चेहरा बघून आम्ही दोघीही जोरजोरात हसायला लागलो. हसी आवरत मी म्हणाले, 'तू रड नाही तर हस नहरमध्ये तर तुला पुन्हा ऊतरावंच लागणार आहे.' हे ऐकून तिच्या आणि कुल्फीच्या चेहर्‍यावर मला मोठे सवालिया निशाणच ऊमटल्यासारखे दिसले. पापलेट पटकन म्हणाली, 'का पण?'
मला अजूनही राहून राहून फुटणारं हसू आवरत मी म्हणाले, 'हीरा पन्ना बघ किती चिखलाने माखले आहेत. असे तर त्यांची अम्मी त्यांना ओळखणारही नाही. तू डबा घेऊन पुन्हा नहरमध्ये ऊतर आणि पानी घेऊन ये मग आपण त्यांना एकदम साफ-सुथरे करूनच त्यांच्या अम्मीकडे घेऊन जाऊ.'
माझी तरकीब ऐकून दोघीही एकदम खूषच झाल्या. मग पापलेट एकदा नाही तर दोनदा नहरमध्ये पानी आणायला ऊतरली. हीरा पन्नाला साफ करून, त्यांच्याशी थोड्यावेळ खेळून आणि शेवटी झाडाखाली आमचा खाना खाऊन आम्ही माघारी घराकडे वळालो.
पापलेट दोन्ही बच्च्यांना गोदीमध्ये घेऊन पुढे चालत होती. चालतांना ती त्यांच्याशी जणू ते तिचेच बच्चे असल्यासारखं, 'आता आपण अम्मीकडे जायचं...खूप खूप खायचं आणि खेळायचं.....आणि तुम्हाला परेशान केलं ना त्या शैतानाला सुद्धा सजा द्यायची बरं का' बोबडं बोलत राहिली.
तिला पाहून मला अचानक माझे दादाजान छोट्या जुम्मन चाचा आणि अफरोझा फुफीला गोदीमध्ये घेऊन चालत आहेत असंच वाटलं आणि पटकन डोळे भरून आले.
माझ्या खांद्यावर आलेल्या कुल्फीच्या हाताने मी भानावर आले. ती दबक्या आवाजात तिच्या भुवया नेहमीसारख्या ऊडवत म्हणाली, 'छज्ज्यावर फकीरबाबांना भूत समजून तू ही घाबरली होतीस ना?' मी काहीच न बोलता डोळे मिचकावत नुसतीच मान वरखाली हलवली. तोवर आम्ही चालत खंडहर समोर आलो सुद्धा. पायरीवर फकीरबाबा शांत बसले होते. त्यांना पाहून कुल्फी दबक्या आवाजात पापलेटला चिडवत म्हणाली, 'भूssतss', तसे पापलेटने मागे वळून कुल्फीकडे बघत नाक फेंदारलं आणि ती पुन्हा पुढे बघून चालू लागली.
मी फकीरबाबांना आदाब केला, ते बसल्याजागीच हात वर करून म्हणाले, 'खुष रहो बेटा, आबाद रहो. पाक-परवर्दिगार हमेशा तुम्हारा हमकदम बना रहे'. मला वाटलं ह्या हीरा-पन्नाला शोधण्याच्या सफरीवर दादाजान खरंच माझे हमकदम झाले आहेत.
माझ्या बाजुला चालणार्‍या कुल्फीकडे बघत मी म्हणाले 'कशी वाटली तुला दुपट्ट्यावरची बांधणी? तो निळा दुपट्टा आहे ना, त्यात चंद्राभोवती जे तीन तारे आहेत, ते तारे म्हणजे आपण तिघी....तू त्यादिवशी माझ्या घरी आली असतीस तर...' माझं बोलणं अजून संपलंही नव्हतं तर कुल्फी नजर चोरत म्हणाली, ' मी पुढे जाऊन हीरा-पन्नाला घेते पापलेटचे हात दुखायला आले असतील'. माझ्या जवाबाची वाट न बघता ती पुढे निघून गेली सुद्धा.
पूर्ण रस्ताभर माझं मन कुल्फीचं माझ्या घरी न येणं, वर्गात त्यादिवशी अचानक तुटक तुटक बोलणं आणि आत्ता नजर चोरून पुढे निघून जाणं ह्या विचित्रं आणि खुफिया वागण्यातला राझ शोधत राहिलं.

-- क्रमशः

कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ५ (अंतिम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी भागांपेक्षा हा भाग मला जरा जास्त ताणलेला वाटल्याने बोअरही झाला वाचायला. तसंही ह्या भागातलं उर्दूही जरा ‘टू मच‘ वाटलं, एस्पेशली लहान मुलींच्या तोंडी.

हा भाग ही मस्त.
एक दु:खद प्रसंग लहानगीच्या नजरेतून फार संयतपणे दाखवला आहे.
खंडहरकडे प्रवास, भूत दिसणे, पिल्लांच्या सुटकेचे वर्णन मुलींच्या बालीशपणाला साजेसे.
ओढण्यांचा सही ऊपयोग करून घेतला मुलींनी.

हमकदम.. अहाहा काय मस्त शब्द आहे. एकाच शब्दात कोणीतरी आपल्याबरोबर चालतय अस वाटत.

पुढच्या भागाची ऊत्सुकता लागली आहे,

एखादी मोठी सभा असेल किंवा काही कारणाने लोक एकत्र जमले असतील तर त्यांना चक्क "सभ्य स्त्री - पुरुषहो" असं संबोधलेलं ऐकलं आहे Proud
पण आजकाल जेन्डर इक्वॅलिटी असते. संगीत मैफिल / नाटक/ तत्सम सांस्कृतिक ठिकाणी तर रसिकहो/ श्रोतेहो असं सरसकट सर्वांना कव्हर करणारा शब्द योजतात. इतर ठिकाणी, 'उपस्थितांचे स्वागत' असं म्हणून विषय पुढे नेतात.

ण आजकाल जेन्डर इक्वॅलिटी असते. संगीत मैफिल / नाटक/ तत्सम सांस्कृतिक ठिकाणी तर रसिकहो/ श्रोतेहो असं सरसकट सर्वांना कव्हर करणारा शब्द योजतात. इतर ठिकाणी, 'उपस्थितांचे स्वागत' असं म्हणून विषय पुढे नेतात.>> +१ मला हेच शब्द आठवत होते.

धन्यवाद पूनम, मॅगी. कदाचित नसावेच असे थेट संबोधन मराठीत.
प्रतिसाद देणार्‍या सर्वांचेच धन्यवाद.

हमकदम आणि कथेत आलेले बरचसे ऊर्दू शब्दं 'जिंदगी गुलझार है' ही पाकिस्तानी वेब सिरीज बघतांना ऐकल्या गेले. असे काही गोड, मजेदार, वजनदार शब्दं डोक्यात घर करून राहिले, जे काही खूप आवडले होते ते टाईमपास म्हणून नोंद करून घेतले थोडा रिसर्च करून त्यांचे अर्थ समजून घेतले. ईथे लहान मुलीच्या कथेच्या कंटेक्स्ट मध्ये फिट बसतील असे वाटल्यास थोड्या सढळ हातांनी वापरले, पण वापरायचेच असा अट्टंहास नव्हता.

फिलॉसॉफिकल अर्थ असलेले शब्दं टाळायचा प्रयत्न होताच पण काही सोपे शब्दंही पहिल्यांदाच ऐकले असतील तर वाचायला कंटाळवाणे नक्कीच वाटू शकतात.

वाह! क्या खुब! भारीच हो हाब! आवडले.

काही काही उर्दु शब्द मराठी वाक्यात ईतके चपखल बसलेत की अगदी हवा तो परिणाम साधून जातात. पण काही उर्दु शब्द अनावश्यक ठिकाणी येवून रसभंगही करतात.

वाह !!.. खूपच उत्कृष्ट वर्णनं .. छान लिहिलंय ... पटकन येऊ द्या पुढचा भाग..

उर्दूचा ओव्हरडोस झालाय. उर्दूप्रचूर असायला हरकत नाही पण हे उर्दू शब्द फ्लोमध्ये येत नाहीयेत. मुद्दाम वापरायचे म्हणून वापरल्यासारखे वाटत आहेत. भातामध्ये खडे लागावेत तसे मध्ये मध्ये लागताहेत. तुम्ही चांगलं लिहीता. एव्हढा उर्दूचा सोस सोडला तर कथेची रंगत अजून खुलेल. आधीचे भाग बर्‍यापैकी जमलेत.

अरे व्वा! मजा आली हा भाग वाचतानाही......
मला तर उर्दू शब्द शिर्‍यातल्या बेदाण्यांसारखे लागताहेत. Happy

पुढील भागाची कधीपासून वाट पाहतोय.

Pages