मैत्र - ३ (शकील)

Submitted by हरिहर. on 2 August, 2018 - 01:52

मैत्र-२ (दत्ता)

संध्याकाळी एक एक करुन सगळे शामच्या ओट्यावर हजेरी लावत. मग ‘भविष्यात काय करायचे?’ हा विषय सोडून सगळ्या विषयांवर गप्पा चालत. दोन एक तास मग आमचा ओटाकट्टा रंगे. विनोदी विषय निघाला की काकूंना फार त्रास व्हायचा आमच्या हसण्याचा आणि गंभीर विषय निघाला की इन्नीला त्रास व्हायचा. कारण मग तिला किमान दोन वेळा तरी चहा करावा लागे. त्यातही आमचे चहा कमी आणि नखरेच जास्त असत. धोंडबाला बशीच हवी असे तर दत्त्याला वाटीत जास्तीची साखर हवी असे. शाम्याला वरुन थोडी दुधाची साय लागे चहात. मग कधी कधी इन्नी वैतागली की आम्ही जमायच्या अगोदर ओट्यावर बादलीभर पाणी ओतून ठेवायची नाहीतर आम्ही मोठमोठ्याने दंगा करायला लागलो की अंगण झाडायला घ्यायची आणि धुरळा करायची सगळा. मग आमचा मोर्चा राममंदिराच्या ओवरीकडे वळायचा. शकीलचा मात्र इन्नीवर फार जीव होता. तो नेहमीच बाजू घ्यायचा तीची. चिडला की मग ओरडायचा “ए कशाला तीला तंग करता रे? नौकर आहे का तुमची ती? दत्त्या, एवढा गोड चहा आवडतो तर घरुन आण तु तुझी साखर पुडीत बांधून. मरशील साखर खाऊन एखाद दिन तेव्हा कळेल.” इन्नी सुध्दा कधी घरात भांडली, रुसली की सरळ शकीलच्या घरी जावून बसे. शामच्या अगदी नाकी नऊ येत तिला परत घरी आणता आणता. शाळेतसुध्दा कोणाशी भांडली की ‘दादाला सांगेन’ असा दम न देता “थांबा आता, भाईलाच सांगते. मग तो तुमची कशी कत्तल करील बघा” म्हणायची. शकीलच्या वडीलांची मटनाची दुकाने होतीना आजुबाजूच्या गावांमध्ये म्हणून असा दम द्यायची ती.

आज मला जरा ऊशीरच झाला होता शामकडे जायला. त्यामुळे मी घाईतच संध्याकाळची अंघोळ उरकली, केस वगैरे निट केले आणि “आई, गेलो गं” म्हणत निघालो. एवढ्यात बाबा आले. चप्पल काढता काढता त्यांनी “अप्पा” म्हणून हाक मारली. मी वैतागलो. म्हणजे आता अजुन दहा मिनिटे तरी नक्की जाणार.
मी “जी” म्हणून थांबलो.
बाबा चप्पल काढता काढता थबकले, म्हणाले “काय झालं आता तुला?”
जरा जरी चिडचिड झाली की ‘ओ’ ऐवजी ‘जी’ म्हणून ऊत्तर द्यायची माझी सवय होती. “काही नाही बाबा. गावात चाललो होतो.”
“अरे तेच तुला सांगतोय. चिंतुकाकांकडे जायच्या आधी गुलशनभाभीकडे जावून ये जरा. मघाशी येताना त्यांनी निरोप दिलाय तुझ्यासाठी.” बाबा म्हणाले. मी ‘हो’ म्हणून निघनार तो आई थांब म्हणाली आणि एका डब्यात थोडा चिवडा आणि दोन लाडू घालून मला देत म्हणाली “हा भाभींचा डबा दे. बरेच दिवस आपल्याकडेच आहे आणि येताना दळण आणायला विसरु नकोस गावातुन.” मी डबा घेतला, बाबा आल्यामुळे स्कुटर होतीच. हळूच चावी घेवून बाहेर पडलो. गाडी बाहेर काढली आणि मग किक मारता मारता बाबांना ओरडून सांगीतले “बाबा स्कुटर नेतोय हो!” बाबांकडे चावी मागीतली असती तर अगोदर “तुम्हा पोरांना चालायला काय होतं रे?” ही चावी मिळाली असती मग स्कुटरची चावी. त्यापेक्षा हे बरं.

मी शामच्या घरासमोर स्कुटर थांबवली. सगळे बसले होते ओट्यावर. दत्त्या नेहमीप्रमाणे ऊंबऱ्यावरच बसला होता. ‘ऊंबऱ्यावर’ बसण्यावरुन त्याला काका हजारदा ओरडायचे पण हा तेथेच बसायचा. काका त्याला ‘घेणेकरी’च म्हणायचे पुर्वजन्मीचा.
शकीलला विचारले “अम्मीने बोलावलय. काय विशेष रे?”
तर म्हणाला “मला काही बोलली नाही अम्मी सकाळी. मी आता दुकानावरुन सरळ इकडेच आलोय. घरी गेलो नाही अजुन. असेल काहीतरी. बघ जाउन.”
इतक्यात इन्नीही आली. म्हणाली “मलाही सोड अम्मीकडे.”
तिची गम्मत करायची म्हणून म्हटलं “आज नको इन्ने. अम्मीने आज बोकडाचा मेंदू तळलाय घरी.”
चिंच खाल्ल्यासारखं तोंड करुन इन्नी स्कुटरवर बसली. पुढे अडकवलेली डब्याची पिशवी मी तिच्याकडे दिली आणि “आलो रे पाच मिनिटात” म्हणत स्कुटरला किक मारली.
स्कुटर शकीलच्या घरासमोर ऊभी करुन मी आत गेलो. इन्नी माझ्या अगोदर उड्या मारत आत गेलीही होती. मी सरळ स्वयपाकघरातच गेलो. शकीलच्या घरातला हा भाग मला खुप आवडायचा. ईंग्रजी एल आकाराचे प्रशस्त स्वयपाक घर. एका बाजुला दहा माणसे आरामात जेवतील असे चौरंगासारखे जेमतेम फुट-सव्वा फुट उंच टेबल. तिनही भिंती शिसमच्या लाकडाच्या कपाटांनी झाकलेल्या. त्यात अतिशय नाजुक, सुंदर क्रॉकरी, भांडी मांडून ठेवलेली. खाली जमीनीवर मेहंदी रंगाचे मार्बल. घड्या करुन ठेवलेले दस्तरखान. कपाटांच्या वर तिनेक फुटांची जागा होती तेथे काळ्या कपड्यावर सोनेरी धाग्याने विनलेल्या कुरानातील आयता लिहिलेल्या सोनेरी फ्रेम. छताला मधोमध चार पात्यांचा मोठा पंखा. मी मांडी घालून आरामात बसलो. इन्नीने टेबलवर ठेवलेल्या पिशवीतला डबा मी बाहेर काढून ठेवला. टेबल जेथे ठेवला होता तेथून स्वयपाकाचा ओटा दिसत नसे.
मी हाक मारली “अम्मी, मी किती वेळ बसलोय! आईने डबा दिलाय तुझा.”
एवढ्यात इन्नी ‘खस’चे ग्लास घेऊन आली. मागोमाग अम्मीही आली. तिने हातातल्या डिश टेबलवर ठेवल्या. छान गरगरीत, खरपुस भाजलेले रोट होते. तुपाचा मस्त खमंग वास आला. मी खुष झालो. म्हणजे अम्मीचे रोट भाजून आले होते तर. म्हणूनच अम्मीने बोलावले होते. मी अधाशासारखा रोटचा मोठा तुकडा तोडला.
इन्नी हसली, म्हणाली “इतका कसा रे रोटसाठी वेडा होतो अप्पा? अधाशी कुठला! आणि अम्मीपण तुझेच का लाड करते कोणास ठाऊक?”
तोंडात रोट असल्याने मी इन्नीला बोबड्याने काही तरी बोलत होतो तेवढ्यात अम्मी रोटने भरलेला डबा घेवून आली.
तिने इन्नीला दटावले “बेटा असं बोलू नये. खावूदे त्याला निट. तुही खतम कर बरं तुझा रोट पटकन. तुप घे वरुन थोडं. अप्पा, हे घे तुझे रोट. कसे झालेत?” मी तर्जनी आणि अंगठा एकत्र करुन हलवला. बोलायची सोयच नव्हती. अम्मीच्या हातचे साजुक तुपातले रोट म्हणजे जन्नतच. अम्मीने इन्नीच्या तोंडावरुन हात फिरवत म्हटले “शाम को भेज बेटा रोट खानेको. क्या करु, भटकाकामुळे तुम्हाला रोट नाही पाठवता येत तुमच्या घरी. तु और एक ले इन्ने, सरबत नंतर पी.”
सरबत पिऊन मी इन्नीला निघायची घाई केली. पण अम्मी म्हणाली “बसुदे तिला जरावेळ, तु जा” मग मी डबा घेतला आणि निघालो. इतक्यात अम्मीने हटकले “शामके घरपे दत्ता है क्या अप्पा?” मी हो म्हणालो. ‘ठैर!’ म्हणत अम्मी आत गेली आणि मोठ्या रुमालात काही रोट बांधून माझ्याकडे देत म्हणाली “दत्त्याला दे. आणि त्या खवीसला म्हणावे रुमाल कल के कल आणून दे तुरंत. पेहलेके भी दो ऊसकेच पास है” मी हसत बाहेर पडलो.

आमच्या आळीत शेवटचे घर आमचे. नंतर मोहल्ला सुरु होई. मोहल्ल्याच्या सुरवातीचे घर शकीलचे. माझ्या आणि शकीलच्या घरात फक्त एक छोटा बोळ होता. त्यामुळे माझे सगळे लहानपण शकीलच्याच घरात गेले म्हणायला हरकत नाही. मी सातवीला असताना आम्ही बाबांनी बांधलेल्या नवीन घरात रहायला गेलो. नविन घर गावापासून दोन किलोमिटर दुर होते. त्यामुळे अम्मीकडे माझे जाने येणे जरा कमी झाले तरी दिवसातून दोनदा चक्कर असायचीच. मित्र म्हणजे काय हे माहीतही नव्हते तेंव्हा शकील माझा मित्र होता. शाळेत जायला लागलो आणि मग शाम, दत्ता, धोंडीबा, राम, अनिल, नारायण वगैरे भेटले. सगळेच जीवलग झाले पण शकीलची जागा कोणी घेऊ शकले नाही. इन्नीही असायची आमच्यात पण सातवीनंतर हळू हळू ती बाजूला होत गेली. शकील नावाप्रमाणेच दिसायला देखना. बारावीला येईपर्यंत चांगला सहा फुट ऊंच झाला होता. तपकीरी डोळे, तसेच केस, बराचसा गोरा, धारदार नाकाचा. जातीने कुरेशी. घरामध्ये परंपरेने चालत आलेला ‘कसाई’ हा व्यवसाय. गावातील सधन कुटूंबांपैकी याचे एक कुटूंब. म्हणजे श्रीमंत म्हणावा असा. गळा अतिशय सुरेल. उत्तम स्वरज्ञान. महत्वाचे म्हणजे मुसलमान त्यात कुरेशी असुन हा मियाँ शुद्ध शाकाहारी. बाकीच्या मित्रांसोबत शाळेत असताना असायचोच, पण शेजारी शेजारी घर असल्यामुळे शकील आणि मी सदैव एकत्रच असायचो. जेवायलाही एक तर शकील माझ्याकडे असायचा किंवा मी त्याच्याकडे. दुसरी तिसरी पर्यंत तर खेळून दमलो की जेवून तिकडेच झोपायचो. कधी कधी बाबा ऊचलून आणायचे नाहीतर मग सकाळी ऊठून अंघोळ, नाष्टा करुन शकीलच्या घरुनच दोघेही शाळेत जायचो. ईदसाठी अम्मी आम्हा दोघांनाही पठाणी सुट शिवायची पांढऱ्या शुभ्र मलमलचे. आम्ही नविन घरात रहायला गेलो तेंव्हा मला सुरवातीला वेळ लागला सवय व्हायला. अम्मीलाही त्रास झाला. सातवीपर्यंत आमचे दिवस फार मजेत गेले. आम्ही सगळे बाबांच्याच वर्गात होतो. जसजसं पास होत गेलो बाबाही वर्ग बदलत आमच्यासोबतच वर्गशिक्षक म्हणून आले. चौथी ते सातवी बाबांनी आमची खुप तयारी करुन घेतली. चौथीला आणि सातवीलाही मला, शकीलला आणि शामला स्कॉलरशीप मिळाली. आमचा मित्रांचा आठ जनांचा जो ग्रुप तयार झाला तो नंतर पुढे कधी वाढला नाही आणि कमीही झाला नाही. सातवीनंतर धोंडबाने शाळेला रामराम ठोकला आणि आम्ही बाकीचे हायस्कुलला गेलो. आठवी ते दहावी अभ्यास आणि खेळणे यातच गेली. दहावीला शकील तालूक्यात पहिला आला. हायस्कुलचीच इमारत वाढवून तेथे कॉलेज सुरु केले होते संस्थेने. आम्ही अकरावीला गेलो आणि खरी धमाल सुरु झाली. आता आम्हाला खऱ्या अर्थाने शिंगे, पंख काय काय म्हणतात ते फुटले. भटकण्याचा, खोड्यांचा, मस्तीचा परीघ वाढला. पुर्वी धोंडबाच्या, दत्त्याच्या शेतात कुळवावर बसायला जायचो आता कुळव हाकायला जायला लागलो. सुट्यांच्या दिवशी ‘कळमजाई’ ‘कान्होबा’ हे डोंगर आम्हाला भटकायला अपुरे पडू लागले. इन्नीचे सगळ्यांवर जरा जास्तच लक्ष रहायला लागले तरी घरच्यांनी जरा जास्त मोकळीक द्यायला सुरवात केली. बाबा अधेमधे पन्नासची नोट न मागताच माझ्या खिशात सरकवायला लागले.

कॉलेजला गेलो पण ते फक्त नावाला. कॉलेजला युनिफॉर्म घालायची सक्ती नव्हती एवढेच बाकी सगळी शिस्त हायस्कूलचीच होती. अभ्यासक्रम बदलला पण अभ्यासाची सक्ती पहिल्यापेक्षा वाढली. त्यातल्या त्यात आम्ही सर्वांनी सायन्सला प्रवेश घेतल्यामुळे प्रॅक्टीकलचा थोडाफार विरंगुळा होता पण मॅथ आणि फिजिक्स जरा जास्तच त्रास द्यायला लागले. पण शकीलमुळे माझी अकरावी आणि बारावी ही दोन वर्षे फार आनंदाची, मजेची गेली. शकीलनेच गालिब, दाग, जौक, अल्लामा यांची ओळख करुन दिली. लहान असताना मी त्याच्याबरोबर दोन वर्ष मदरशात गेलो होतो. तेथे शिललेल्या उर्दू-अरबीची एक वेगळीच दुनीया शकीलने मला दाखवली. त्याच्या एक एक ओळीच्या शेरने मला रोजच्याच गोष्टींमधले सौदर्य पहायला शिकवले. त्याने कधी स्वतः शायरी केली नाही पण हव्या त्या प्रसंगाला साजेशी दिग्गज शायरांची शायरी त्याच्या जीभेवर चटकन नाचून जायची. एकदा संध्याकाळी फिरायला जाताना मगरिबची अजान झाली. फरिदचाचा अजान द्यायचे. अगदी व्याकूळ स्वरात. ऐकत रहावी अशी. सवयी प्रमाणे आम्ही दोघेही अजान होईतोवर गप्प झालो. चाल हळू केली. अजान संपल्यावर शकील ईतक्या सुरेख आवाजात गुणगुणला “अजाँ समझे हो तुम जिसको, वो किसी बेकस के नाले है।” मला त्या दिवशी अजानचा खरा अर्थ समजला. त्याची दुसरी सवय म्हणजे एक शेर गुणगुणला की त्यातीलच एखादा शब्द उचलून दुसरा शेर गायचा. अजानचा शेर ऐकून मी “वाह!” म्हणतोय तोवर याचे “आसमा चिर गया नाला-ए-बेबाक मेरा।” यायचे. त्या शेरला “क्या बात है!” म्हणेतोवर “फिर ना कहना ये क्या नालोसे परेशानी हुई।” धडकायचे. (नाला-वेदनेमुळे दिलेला हुंकार, हाक, किंकाळी) मग हा सिलसिला दहा बारा मिनिटे चालायचा. बर आवाज इतका गोड की शायरीला दाद देवू की त्याच्या आवाजाला असं होई. विनोद करायलाही त्याला शायरीच लागे. टोमनेही शायरीतच मारी. इन्नीच्या हातचे आंबट वरण आणि भात त्याला खुप आवडे. पण चिंतूकाकांच्या स्वयंपाकघरात त्याला प्रवेश नव्हता. त्यामुळे इन्नी त्याचा डबा अम्मीकडे पोहचवी. एकदा अशीच इन्नी वरण-भाताचा डबा घेवून आली. मी, शकील आणि अम्मी टेबलवरच बसलो होतो काही तरी बोलत. इन्नी आत गेली, डिशमध्ये वरण भात कालवून घेवून आली आणि शकीलपुढे ठेवून गप्पात सहभागी झाली. शकील भात खात असताना त्याला केस लागला. अम्मीच्या लक्षात आले. तिने त्याला डोळ्यांनीच दटावले आणि हँगरवरचा मोठा चमचा त्याच्याकडे सरकवला. शकीलने घास चमच्यात ठेवून टेबलखाली सरकवला आणि मिश्किल हसत म्हणाला
उधर वोह जुल्फ सुलझाते है, उनका खम निकलता है, (खम-केसातला गुंता)
इधर दालसे बाल खिंच खिंचके हमारा दम निकलता है।
अम्मीने इतके हसु दाबायचा प्रयत्न करुनही तिला ते जमले नाही. मग मी आणि अम्मी इतके खो खो हसलो की विचारू नका. इन्नीचे उर्दू म्हणजे बोंबच. ती म्हणाली “काय झालं भाई? माझ्या डोक्यावरुन गेलं”
हे ऐकल्यावर अम्मी म्हणाली “हो बाई, तुझ्याच डोक्यावरुन गेलय” मग मात्र शकील वरण भात खाताच येइना इतका जोरात कोसळला. त्यानंतर कित्येकांच्या तोंडून हा शेर ऐकला मी. पण मला नेहमी ‘इधर रग रग से खिंच खिंच के’ ऐवजी ‘दालसे बाल खिंच खिंच के’ असंच ऐकू येते. त्याला कधी शेर आठवावे लागले नाही. आम्हाला हिंदी शिकवायला संभुसमॅडम होत्या. नेहमी पांढरी साडी, अर्धे पिकलेल्या केसांचा अंबाडा, दोन चार मोगऱ्याची फुले माळलेली, सोनेरी फ्रेमचा नाजूक चष्मा. छान शिकवायच्या. त्यांचा मुलगा परदेशी होता. त्याने वाढदिवसाला मॅडमना सुरेख साडी पाठवली होती. त्या दिवशी मॅडम ती मोरपंखी साडी नेसुन आल्या कॉलेजला. खरच सुरेख दिसत होत्या. मी आणि शकील व्हरांड्यातुन चाललो होतो. समोरुन मॅडम आल्या. शकील छान हसत गुणगुणला “सब सखीया मोहे चल चल कहे, मै तो मुड मुड देखू तोहे।” मॅडम थांबल्या. त्यांनी गोड हसुन शकीलला जवळ घेतलं आणि म्हणाल्या “थँक्यू शकीलमीयाँ. संध्याकाळी यारे सगळे खिर खायला.” ती संध्याकाळ आम्ही मॅडमचा वाढदिवस साजरा करण्यात घालवली. असा हा शकील कॉलेजमधल्या सगळ्या मुलींचा फार आवडता होता. म्हणजे तशा अर्थाने नाही म्हणत. याला राखी बांधायला मुलींमध्ये अहमिका लागायची रक्षाबंधनच्या दिवशी. पण शकीलमियाँ त्यादिवशी गायब असायचे. इन्नीही कुणाला राखी बांधू देत नसे त्याच्या हातावर. शकीलही वैतागायचा, म्हणायचा “राखी बांधली की जबाबदारी पडते रे खामखा. तो काय साधा दोरा आहे का गंडा आहे पिरबाबाचा?”

अशा या कविमनाच्या, संवेदनाशील मनाच्या माझ्या मित्राचे हराम-हलालचे नियम मात्र फार कडक होते. खान्यापिन्याच्या किंवा वस्तुंच्या बाबतीत फारसे नाही पण वागणे, स्वभाव, वृत्ती याबाबतीत मात्र त्याचे हराम-हलाल फार स्पष्ट होते. तमीज, तेहजीब, स्रीयांचा, आई-वडीलांचा आदर वगैरे गोष्टी त्याला फार महत्वाच्या वाटत. बारावीला असताना आम्हाला गुरव नावाचे सर होते बायालॉजीला. त्या वर्षीच रुजू झाले होते. पुण्यातील एका नामवंत कॉलेजमधून यांना ‘मुलींना त्रास’ दिल्याच्या कारणावरुन काढून टाकले होते अशी कुणकूण होती. वर्गात आम्ही सगळे तिसऱ्या रांगेत बसायचो तर मुलींच्या बाजुला इन्नी पहिल्या बाकावर बसे. तर या सरांनी एके दिवशी इन्नीच्या ओढणी घेण्याच्या पध्दतीवरुन वर्गातच अश्लील भाषेत गलीच्छ कॉमेंट केली. तशी इन्नी अगदी बिनधास्त मुलगी होती पण हे ऐकून लाजेने तिला रडूच फुटले. सरांचे ते बोलणे ऐकून मुलींनीच काय पण मुलांनीही माना खाली घातल्या. दत्त्या खाऊ का गीळू नजरेने सरांकडे पहात होता. माझ्या आणि शामच्याही तळपायाची आग मस्तकात गेली होती. पण आम्ही बाकावर बसुनच चुळबूळ करत होतो. इतक्यात “खवीस की औलाद! अब तुझे दिखाता हुँ कुरेशी हड्डीयोंसे गोश्त कैसे नोंचते है।” म्हणत शकील बाकावरुन उठुन धावला. मीही “थांब शकील” म्हणत त्याच्या मागे धावलो. इन्नीही घाबरुन “नको भाई” असं काहीसे ओरडली. पण तोवर शकील सरांपर्यंत पोहचलाही होता. “नाली की पैदाईश!” म्हणत त्याची भक्कम थप्पड सरांच्या गालावर सणसणीतपणे आदळली. सर टेबलला धरत, चाचपडत, तोल सावरत खालीच बसले एकदम. बहुतेक अंधारी आली असावी त्यांच्या डोळ्यांपुढे. मी धावलो होतो शकीलला सावरायला, पण सरांना सावरायची वेळ आली माझ्यावर. मी कसं बसं सरांना धरले. ऊठवायचा प्रयत्न केला. इतक्यात सर एकदम दरवाजाकडे ओढले गेले. मला वाटले, इतके सगळे झाल्यावर शकीलचा राग शांत झाला असेल. पण त्याला जणू रागाचा दौराच पडला होता. साडेपाच फुटाच्या आसपास उंची असलेल्या सरांची कॉलर पकडून एखाद्या खेळण्यासारखे ओढत त्याने कॉलेजच्या ऑफीसच्या दिशेने फरपटत न्यायला सुरवात केली. प्राचार्यांच्या समोरच्या खुर्चीवर गुरवसरांना फेकत शकील ओरडला “नापाक नस्लकी पैदाईश, ऐसोंको मरतेवक्त कलमा नसीब ना हो।” गुरवसर आता जरा भानावर आले होते. भितीने थरथर कापत होते. प्राचार्यांनी शकीलला शांत करत खुर्चीवर बसवले. आम्हीही मागे मागे धावत ऑफीसमध्ये पोहचलो होतो. सरांनी आम्हाला बाहेर जायला सांगीतले.
“काय झालं शकील? अरे शिक्षक आहेत ते तुझे. जरा सांगशील का सविस्तर काही?” सरांनी शकीलला विचारले.
“सर, काय झालं ते मी माझ्या तोंडाने नाही सांगणार. तुम्हीही इतर विद्यार्थांना याबाबत विचारलेले मला नाही आवडणार. जे काही आहे ते या कमजर्फच्या तोंडूनच ऐका. मला मात्र हा माणूस दोन दिवसात कॉलेजमधून जायला हवा. गावातही मी याला राहू देणार नाही.” म्हणत शकीलही आमच्या मागोमागच ऑफीसच्या बाहेर आला आणि इन्नीला घेऊन घरी गेला. दुसऱ्या दिवशी रामच्या वखारीच्या ऑफीसमध्ये प्राचार्य, शकीलचे वडील, संस्थेचे चेअरमन वगैरे महत्वाच्या लोकांची मिटींग झाली. दोन दिवसांची मुदत असुनही गुरवसरांनी त्याच दिवशी संध्याकाळी गाव सोडला. दोन दिवस इन्नी कॉलेजला आली नाही.
रविवारची सकाळ. मी, शकील, इन्नी, अम्मी, दत्ता शकीलकडे बसलो होतो. विषय तोच होता. शकील दत्त्यावर, माझ्यावर चिडला होता.
“दत्त्या, अप्पाचे सोड, तुला काय धाड भरली होती? सांडासारखा वाढलाय आणि बाकावरुन हलला देखील नाही? जा घरी आणि तुझ्या गोठ्यातल्या म्हशीची माफी माग. म्हणावं बाई तुझं दुध पितो रोज मी पण त्याचं चिज काय झालं नाही. आणि जमलं तर थोडं शेणही खा तिचं” हे ऐकून इन्नीला हसुच आवरेना. दत्ता गोरामोरा झालेलं पाहून ती म्हणाली “तू नको ऐकू रे दत्तूदादा त्याचं काही. त्याला इतक्या दिवसांनी चिडायची संधी मिळालीय म्हणून चाललय त्याचं हे.”
चाचाही माडीवरुन खाली आले. अब्बांना पाहून शकील चुप झाला.
चाचा म्हणाले “शकील, कुछ सवाबका काम नही किया तुने. जसा वागलास ते मला नाही आवडले. ठिके, इरादा नेक होता तुझा पण तरीका गलत होता बेटा. ऊद्या प्राचार्यांची माफी माग कॉलेजला गेल्यावर.”
“जी अब्बू” म्हणत शकील गप्प झाला.
चाचा गेल्यावर अम्मी शकीलला म्हणाली “रात्री किती ऐकून घ्यावं लागलं मला तुझ्यामुळे. पण जे केलस ते चांगलच केलस बेटा.” इतक्यात चिंतूकाकांची हाक ऐकू आली बाहेरुन “शकील, आहेस का रे बाळ घरात?” अम्मीने घाईने पदर डोक्यावरुन घेतला. शकीलमागे मीही बाहेर आलो.
“अंदर या ना काका.”
“ठिके बाळ, अरे शाम काहीतरी सांगत होता. तुला विचारीन म्हणतोय दोन दिवस पण तुम्ही कुणीच फिरकले नाही घराकडे. म्हणून आलो होतो. अरे शकील असं वागू नये बाळ. शिक्षक म्हणजे गुरु असतात आपले. असुदे. परत असं काही व्हायला नको हो.” म्हणत चिंतुकाका चालूही लागले. चिंतुकाकांची जीभ वेगळच बोलत होती आणि डोळे वेगळच सांगत होते हे सहज लक्षात येत होतं. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता दिसत होती. त्यादिवशी शकील उठून धावला नसता तर इन्नीचं दुखावलेलं मन लवकर सावरलं नसतं हे काका ओळखून होते. थोडक्यात काका शकीलला “धन्यवाद!” म्हणून गेले होते.
शकीलला स्वयंपाकघरात प्रवेश न देणाऱ्या चिंतुकाकांचे आणि शकीलचे नाते मोठे अजब होते. एक सच्छील ब्राम्हण आणि एक कुरेशी मुसलमान. या दोघांच्या प्रेमाविषयी परत कधीतरी…

मैत्र-४ (इर्जीक-एक खादाडी)

क्रमश:

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप टचिंग...
आवडला शकील... त्याने योग्यच केल सरांच्याबाबतीत

किती नशिबवान आहात तुम्ही अशी माणसं तुमच्या आयुष्यात आहेत.
तुमचं लिखाण वाचताना चित्रपट बघतोय असं वाटतं. असेच छान लिहीत राहा.

सुंदर.. खुपच छान! बर्‍याच दिवसांनी एवढं छान काहीतरी वाचायला मिळालं. मस्तच लिहिताय. शुभेच्छा..

वत्सला, तुम्ही सुचवलेला बदल केला आहे. माझ्या ते चटकन लक्षात नाही आले, पण परत वाचताना तुम्ही म्हटल्याप्रमाणे खटकले.
सुचनेबद्दल खुप आभारी आहे!

आज वाचला हा भाग.
छान लिहिले आहे.

> शकील नावाप्रमाणेच दिसायला देखना. बारावीला येईपर्यंत चांगला सहा फुट ऊंच झाला होता. तपकीरी डोळे, तसेच केस, बराचसा गोरा, धारदार नाकाचा.> अर्थ काये शकील शब्दाचा?

Pages