कशाला व्यर्थ घालवलेस तू यौवन तुझे ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 1 August, 2018 - 21:33

नको तेथे निरर्थक खर्चले तू धन तुझे
तुला सांभाळता आलेच नाही मन तुझे

दया केलीस माझ्यावर, निवड नव्हते म्हणे !
बहाणे जीवना जा ऐकले छप्पन तुझे

तुझ्या मुकुटातले दे मोरपिस, दे बासरी
तुझी राधा, सुदामाही तुझा, गोधन तुझे !

प्रतिक्षेने तुझ्या बनले अधिकच कोरडी
क्षितीजापार केलेले रिते तू घन तुझे

किती घालायचे कानात बोळे मी तरी
रियाजावीण ऐकवतेस का गायन तुझे ?

तुझाही जन्म होता उर्मिले दुर्मिळ इथे
कशाला व्यर्थ घालवलेस तू यौवन तुझे ?

पडे दुष्काळ हा, त्यातून पान्हा आटला
कसे करणार हतबल माय संगोपन तुझे ?

भुकेचा फक्त नसतो, इभ्रतीचा प्रश्न हा !
कुणाचे तू, कुणी व्हावे कधी व्यंजन तुझे

जसे गुंडाळलेली स्प्रिंग ऊर्जा राखते
तसे कामास आणूयात हे बंधन तुझे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

" प्रतिक्षेने तुझ्या बनले अधिकच कोरडी
क्षितीजापार केलेले रिते तू घन तुझे "... आह! आशयगर्द ओळी ...