मा. ल. क. - ५

Submitted by हरिहर. on 25 July, 2018 - 08:12

मा.ल.क. - ४

या म्हातारपणात त्याला काय हवे होते? त्याने आपल्या पूर्वायुष्याकडे पहिले तेंव्हा त्याला अपवाद वगळता सर्व सुखच दिसले. साध्या भोळ्या आई वडिलांच्या पोटी जन्म. योग्य वयात लग्न. मनासारखी, जीव लावणारी बायको. सोन्यासारखी मुलं. रानात मोती उपजणारी पोटापुरती जमीन. गावात, भावकीत मान. मुलांनी मनावर घेऊन हट्टाने घडवलेली तीर्थयात्रा. काही बाकी राहिले नाही. पण या सगळ्याला नजर लागू नये म्हणून की काय, देवाने एक बोच त्याच्या मनाला लावून ठेवली होती. त्याचा धाकटा मुलगा. तसा धाकटा कामाला, व्यवहाराला, माणुसकीला कशा कशाला कमी पडायचा नाही. रानात राबायला लागला तर थोरल्याला इरेसरीने मागे टाकायचा. रानात कधी कोणतं पीक घ्यायचे याचा अंदाज कधी चुकला नाही त्याचा. पण होता एकदम एककल्ली. वडील सांगताहेत किंवा भाऊ सांगतोय म्हणून कधी ऐकणार नाही. त्याला पटले तरच एखाद्या कामाला हात घालणार. वडीलांनी परोपरीने समजावून सांगीतले “बाळा, चारचौघांचे ऐकावे लागते कधी कधी. असं मनासारखं वागून नाही पार लागत जिंदगी.” पण धाकटा ठाम होता विचारांवर. एक दिवस म्हातारा रानातून आला तोच ‘अंगात कणकण’ घेऊन. हात पाय धुवून ओसरीवर बसला. थोरल्याच्या बायकोने दिलेल्या चहाला जेंव्हा तो नको म्हणाला तेंव्हाच तिच्या लक्षात आले की ‘आज मामांचं काहीतरी बिनसलय.’ तिने रात्री गरम गरम माडगं दिले म्हाताऱ्याला प्यायला आणि अंथरुन घालून म्हणाली “मामा, पडा आज लवकर. सकाळपर्यंत बरं वाटेल.” सकाळी म्हाताऱ्याला जाग आली तिच ग्लानीमध्ये. त्याने डोळे किलकीले करुन पाहीले. अंथरुनाभोवती दोन्ही सुना आणि थोरला चिंतातुर होवून बसले होते.
त्याने खुनेनेच विचारले “धाकटा कुठं आहे?”
इतक्यात धाकटाही वैद्याला घेवून आला. वैद्यबुवांनी बराच वेळ तपासले. कसलेसे चाटन दिले आणि सकाळी परत येतो सांगुन गेले. म्हाताऱ्याला जाणवले की आता देवघरातला ‘गंगाजलाचा गडू’ फोडायची वेळ आली आहे. तो क्षिणसा हसला आणि दोन्ही मुलांना जवळ बोलावून घेतले.
खोल पण समाधानी आवाजात तो मुलांना म्हणाला “हे पहा पोरांनो, फार ईच्छा होती की त्याने ‘चालता बोलता’ न्यावे, त्याने तेही ऐकलं. आता काही राहीलं नाही. मी आयुष्यभर जे काही जमवले त्याची वाटणी करतो त्यात समाधान माना म्हणजे मी सुखाने जातो.”
सगळ्यांनी डोळे पुसत माना डोलावल्या. म्हाताऱ्याने घर, जमीन, दागीने इतरही काही गोष्टी यांची मनाप्रमाणे वाटणी केली. मुलांचा अर्थात वाटणीलाच विरोध होता पण वडीलांच्या ईच्छेपुढे त्यांनी सगळ्याला निमुट होकार दिला.
वडील म्हणाले “आता एकच आणि महत्वाचे राहीले. मी वडीलांकडुन चालत आलेलं आपल्या कुलदेवीचे सगळं मनापासुन केले. आज जे काही आहे ही देवीचीच कृपा. आता याची जबाबदारी दोघांपैकी एकाने घ्यावी अशी माझी फार ईच्छा आहे.”
दोघा भावांनी एकमेकांकडे पाहीले. थोरला काही बोलायच्या आत धाकटा म्हणाला “बाबा, तुम्ही जे म्हणाला त्याला आम्ही होकार दिला. फक्त तुमच्या समाधानासाठी. पण हे ‘देवी’चे काही माझ्याच्याने होणार नाही. ते दादाकडे सोपवा. माझी देवी रानातल्या ढेकळात आहे आणि तिची मी मनापासुन सेवा करतो आहे.”
थोरल्याने जरा रागातच धाकट्याकडे पाहून वडीलांचा हात हातात घेतला “बाबा, मी करीन सगळं आपल्या कुलदेवीचे. तुम्ही काळजी करु नका” ते शब्द ऐकतच म्हाताऱ्याने समाधानाने कुडी सोडली.

दिवस जात होते. थोरला आणि धाकटा आपापल्या रानात राबत होते. पण थोरल्यावर देवीचीही जबाबदारी होती. तिची व्रत-वैकल्ये, उपास, पुजा, वर्षाचे सण, दोन वेळचा नैवद्य यात त्याचा बराच वेळ जाई. या सगळ्यामध्ये त्याचे शेतीकडे आणि स्वतःच्या तब्बेतीकडेही दुर्लक्ष होई. पण वडीलांना दिलेला शब्द पाळल्याचे समाधानही त्याला होते. दिवस जाता जाता हळूहळू पालटले. ते छोटे घर पुरेसे पडेना म्हणून धाकट्याने शेतातच टुमदार घर बांधले. त्याला आता शेतावर जास्त लक्ष पुरवता यायला लागले. थोरल्यानेही घर मोकळे झाल्याने देवघर व्यवस्थित बांधून घेतले. फुलांसाठी बाग जोपासली. पुजेमधे, व्रत-वैकल्यांमधे त्याचा जास्त वेळ जायला लागला. पण उपवासांमुळे थोरल्याची तब्बेत ठिक राहीनाशी झाली. परिणामी शेतीकडे त्याचे दुर्लक्ष व्हायला लागले. आर्थीक बाजूही घसरली. रोज काही ना काही अडचण ऊभी राहू लागली. या सगळ्याचा संबंध थोरला “आपल्याकडून देवीचे काहीतरी करायचे राहीले” याच्याशी लावू लागला. कधी पुजेला बेल नव्हते म्हणून मुलगी आजारी पडली. तर कधी नैवेद्य दाखवायचा राहून गेला म्हणूनच धान्याला भाव मिळाला नाही. आज काय तर ‘नको’ ते खावून दर्शन घेतले म्हणून पिकावर रोग आला. तिकडे धाकट्याची दिवसेंदिवस प्रगती होत होती. थोरला वैतागला. देवीचे इतके करुनही थोडे काही चुकले तर देवी शिक्षा का करते आपल्याला? आज त्याने देवीकडे याचे गाऱ्हाणे घालायचे ठरवले. सकाळी अंघोळ करुन त्याने देवीची यथासांग पुजा बांधली, स्तुती स्तवने गायली आणि व्याकूळतेने देवीला हाक मारली. आज देवीने त्याच्या हाकेला ओ दिली आणि प्रकट झाली “बोल बाळ, का हाक मारलीस?”
त्याने नतमस्तक होत विचारले “आई, माझे थोडेही चुकले तर तू मला शिक्षा करतेस. आणि धाकट्याला तुझी साधी आठवणही नाही तरी तु काहीच का करत नाहीस?”
देवी मंद हसली आणि म्हणाली
“तो जर मला मानतच नाही तर त्याला कशी शिक्षा करु मी?”

(मार्मिक लघु कथा)
(कथासुत्र: अज्ञात, शब्दांकन: माझे.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच !! Happy
शीर्षक सुचलंय शालीजी :
श्रमे लक्ष्मी (इथेविसर्ग हवा,संस्कृत टंकल्या जात नाहीये) प्रतिष्ठिता।।
बघा पटतंय का ? Happy

प्रतिसाद आणि शीर्षक दोन्हींसाठी धन्यवाद किल्ली!
श्रमे लक्ष्मी: प्रतिष्ठिता। छान आहे. सर्व कथांना एकदमच शीर्षक देतो. फक्त क्रमांक ठिक नाही वाटत.

“तो जर मला मानतच नाही तर त्याला कशी शिक्षा करु मी?” आणि
"माझी देवी रानातल्या ढेकळात आहे आणि तिची मी मनापासुन सेवा करतो आहे.”
इथे विरोधाभास आहे..
देव अमूर्त आहे त्यामुळेच प्रत्येकाला वेगवेळया गोष्टीत देव दिसतो. त्याने मी देव मानत नाही असे म्हटलेल नाही, फक्त त्याने कर्म हाच देव असल्याचे मान्य केलंय, भावनिक गुंत्ययात न अडकता, एवढच. थोरल्या च वागणं हे अंधश्रद्धकडे जाणार आहे.
माझे वैयक्तिक मत..

Karma hech dev manya kel pan tya goshtila nyay matra dila, bharpur bhaktibhavane kashta kel jyach chij jhala

खुप सुरेख कथा.
हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असं माझी आई नेहमी सांगे. हात फिरे म्हणजे मेहनत हे वेगळ्याने सांगणे न लगे.
शिवाय आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहणे हे पण एक प्रकारे देवपूजनच आहे.
देव तसबिरित, मुर्तीत शोधू नये, तर आपल्यातल्याच एकात शोधावा.

खूप विचार करून आणि मेहनत घेऊन मी मर्म शोधायला गेलो तर मला पुन्हा प्रश्न पडला की, अपरिमित कष्टं घेऊन, ऊपास तापास करून मरणासन्न पित्याची शेवटची ईच्छा पूर्ण करणार्‍या आज्ञाधारक मुलाला देवी शिक्षा देतेच का? मला वाटत होते पूर्वीच्या काळी अज्ञाधारक असणे हे पुण्याचे काम होते.
थोरल्यानेही धाकट्यासारखा स्वार्थी विचार न करता मोठे मन दाखवले, खस्ता खाल्ल्या, प्रयत्न कमी पडले मान्य पण त्याने ईमाने ईतबारे प्रयत्न तरी केले. तरी तोच चुकीचा आणि त्यालाच शिक्षा ? काही कळतच नाही बुवा ह्या कथा आपल्याला.

म्हणजे म्हातारे आईबाप समजा देव समजले तर कारकुनाची नोकरी करून का होईना आईबापाची जबाबदारी ऊचलणार्‍या मुलाला शिक्षा.
आणि जबाबदारी झटकून स्वार्थासाठी कष्ट करत पैसा कमावणारा मुलगा प्रशंसनीय.
अजबच आहे हे मर्म.

शाली चांगली आहे कथा..कर्माचे फळ चांगलेच मिळते
@ हायझेनबर्ग ...यामध्ये शिक्षा मिळते आहे असे फक्त मोठ्या मुलाला वाटत आहे पण त्याला शिक्षा मिळत नसून त्याने जेवढे कर्म केलंय तेवढेच फळ मिळतय.. देवीची पूजा या एकाच कर्तव्या च्या मागे लागून त्याने कर्म करण्याकडे दुर्लक्ष केलेय ... देव पण त्यांनाच पावतो जे कर्मपण श्रध्देने करतात
हा माझा विचार आहे Happy

ओके. कळाले. स्प्ष्टीकरणाबद्दल धन्यवाद ऊमानु.
म्हणजे देवी शिक्षा करत नसते का? पण प्रसन्न तर होते ती.
जाऊदे.. आधीच्यांपेक्षा ही थोडी कळाली असे वाटते आहे.

देव पण त्यांनाच पावतो जे कर्मपण श्रध्देने करतात >> देव पावणे म्हणजे नक्की काय. आर्थिक भरभराट होणे का देवाने प्रसन्न होऊन दर्शन देणे?

शेवटची ओळ काही झेपली नाही. पण कथा म्हणून बोध नक्कीच घेता येतो. थोरल्याला मल्टी टास्किंग माहित नसावं. वडिलांनी काम धाम सोडून देव देव करायला सांगितलं नव्हतं पण ते न लक्षात घेता थोरल्याने तेच केलं आणि परिणामी तब्येत आणि आर्थिक नुकसान झालं.
हाब, तू ही मर्म मर्म करण्यापेक्षा त्यातून असा काही बोध झाला का ते लिहिणार का?

वडिलांनी काम धाम सोडून देव देव करायला सांगितलं नव्हतं पण ते न लक्षात घेता थोरल्याने तेच केलं आणि परिणामी तब्येत आणि आर्थिक नुकसान झालं. >> हो पण त्यात तुम्हाला देव प्रसन्न वगैरे होणार नसून फक्त श्रद्धा/ भक्ती/शांती/मनस्वास्थ्य म्हणून देव करा कामे सोडून नको असे अध्याहृत असते.
ईथे तर देव/देवी प्रसन्न होतो आहे. मग जसे ऋषी मुनी करत तसे देवीची भक्ती/व्रत वैकल्ये करून प्रसन्न करू घ्यायचे आणि वर मागायचा, शेतात काम करायची गरजच पडणार नाही. ज्याअर्थी देवी खरे होती त्या अर्थी थोरल्याची व्रतवैकल्य, शिक्षेची भिती आणि शिक्षाही खरीच झाली ना?

हाबचा देव त्याला सगळी संत्री सोलून देतो वाटतं - हे दिलं नाही त्याअर्थी शाली हाबच्या देवाला मानत नसतील. Proud

मस्त मा.ल.क.. Happy

>>त्यात तुम्हाला देव प्रसन्न वगैरे होणार नसून फक्त श्रद्धा/ भक्ती/शांती/मनस्वास्थ्य म्हणून देव करा कामे सोडून नको असे अध्याहृत असते>> बरोबर. पण थोरल्याला ते कळलं नाही आणि वडिलांनी इतकं संत्र सोलून दिलं नाही. पण वाचकांना कळलं ना? मग पुढे जायला काय प्रॉब्लेम आहे?

>>त्यात तुम्हाला देव प्रसन्न वगैरे होणार नसून फक्त श्रद्धा/ भक्ती/शांती/मनस्वास्थ्य म्हणून देव करा कामे सोडून नको असे अध्याहृत असते>> बरोबर. पण थोरल्याला ते कळलं नाही आणि वडिलांनी इतकं संत्र सोलून दिलं नाही. >> कळलं नाही म्हण्जे? दिले की त्याला देवाने दर्शन.

सकाळी अंघोळ करुन त्याने देवीची यथासांग पुजा बांधली, स्तुती स्तवने गायली आणि व्याकूळतेने देवीला हाक मारली. आज देवीने त्याच्या हाकेला ओ दिली आणि प्रकट झाली. >> म्हणजे पुजा अर्चा करून , सोवळं व्रत वैकल्ये करून देव प्रसन्न होतो आहे तेच तर सांगते आहे ना कथा.
आपण सगळे एकच कथा वाचतो आहे ना? Uhoh

सॉरी हाब, तुला गोष्ट जशी कळली तशी मला कळलेली दिसत नाही. मी तुला उद्देशून लिहिलेल्या पहिल्या प्रतिसादात जे लिहिलं आहे तेच घ्यायचं आहे ह्या गोष्टीतून.

>>म्हणजे पुजा अर्चा करून , सोवळं व्रत वैकल्ये करून देव प्रसन्न होतो आहे तेच तर सांगते आहे ना कथा. आपण सगळे एकच कथा वाचतो आहे ना?<<
नाहि. कथेचं सार/मर्म/भावार्थ "कठोर परिश्रमाला पर्याय नाहि" हा आहे, पण तुम्ही टेल चेझिंग मोड मध्ये अस्ल्याने चूकिचा अर्थ घेतलात.

उपासमार, नाजुक तब्येत इ. कारणांमुळे मोठ्याला हलुसिनेटिंग मुळे देवी कदाचित दिसली हि असेल; शेवटी मनी असे ते स्वप्नी दिसे. छोट्याच्या मनात देवी हि संकल्पनाच नाहि, म्हणुन त्याला देवीने शिक्षा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाहि...

सॉरी हाब, तुला गोष्ट जशी कळली तशी मला कळलेली दिसत नाही. मी तुला उद्देशून लिहिलेल्या पहिल्या प्रतिसादात जे लिहिलं आहे तेच घ्यायचं आहे ह्या गोष्टीतून. >> मला अजूनही कळली नाहीये.. पण पुन्हा वाचून तुम्ही लिहिले तशी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.

नाहि. कथेचं सार/मर्म/भावार्थ "कठोर परिश्रमाला पर्याय नाहि" हा आहे, पण तुम्ही टेल चेझिंग मोड मध्ये अस्ल्याने चूकिचा अर्थ घेतलात. >> खरच टेल चेझिंग मोड वगैरे काही नाही हो. जेन्यूईन प्रश्न पडले ते विचारले ईतकच. स्वाती म्हणतात मर्म/सार्/भावार्थ वगैरे काही शोधायचा नाहीये कथेत, पण तुम्ही सांगितले ते मर्म कदाचित बरोबर असावे असे आता मलाही वाटते आहे.

हाब, तुझी आर्ग्युमेन्ट्स वाचून मला या कवितेची आठवण झाली >> Lol हो हो. कविताराक्षस तर आम्ही जन्माच्या आधीपासूनच आहोत, मार्मिककथाराक्षस असल्याचा साक्षात्कारही झाला आता. Proud ही कविता मात्र अगदी १००% मार्मिक आहे हे नक्की Wink

>>मला अजूनही कळली नाहीये.. पण पुन्हा वाचून तुम्ही लिहिले तशी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.>> कळायला अजिबातच कठीण नाही पण खरंच नसेल कळत तर ही गोष्ट (आणि इतरही मा.ल.क गोष्टी) आपल्याकरता नाही(त) असं म्हणून सोडून देणं इतकं कठीण आहे का? खनपटीला बसायची काय गरज?

काही समजून घेण्यासाठी लेखकाला प्रश्न विचारणे, चर्चा करणे म्हणजे खनपटीला बसणे कसे झाले बुवा?
पण असो! आता थांबतो.

शाली,
तुम्ही कथा टाकत रहा. आता मला कथेचे मर्म कळेल तेव्हाच मी विचारीन, 'हे असे कळाले ते बरोबर आहे का'. नाही कळाले तर मग सायो म्हणाल्या तसं खनपटीला न बसता ती कथा आपल्याकरता नाही असे म्हणून पुढची कथा आली की पुन्हा प्रयत्न करेन.

सॉरी हाब, पण तुझा उद्देश कथा समजून घ्यायचा खरंच वाटत नाही. खनपटीला बसून ताणतो आहेस असंच वाटलं सुरुवातीपासून.

Pages