वेल लागली वृक्ष व्हावयाला

Submitted by निशिकांत on 9 July, 2018 - 02:50

आधाराचा पाय लागता डगमगावयाला
थरथरणारी वेल लागली वृक्ष व्हावयाला

जगावयाची जिद्द एवढी जबरदस्त होती
मृत्यू ओशाळून निघाला परत जावयाला

सत्त्य, संपदा यांच्यामध्ये वितुष्ट का असते?
इमानदारी जिथे नांदते, नसे खावयाला

दु:खाचा मी रियाज केला अन् मैफिल सजली
एकटाच जीवना! लागलो गीत गावयाला

एकाकीपण मेल्यावरही सोबतीस उरते
राख स्मशानी माझी गेलो मी भरावयाला

सत्य कधी तर; असत्य असते ओठांची भाषा
नजरेने नजरेचा शिकलो ठाव घ्यावयाला

तुळसीची मी माळ घातली, एवढाच मेकप
विठूसही मी खूप लागलो आवडावयाला

फक्त उपेक्षा जगताना, मग पुण्य करावे का?
किर्तिरुपाने मेल्यानंतरही उरावयाला

द्वंद्वगीत गाण्याचा आता काळ संपलेला
वळून का "निशिकांत" बघावे गलबलावयाला?

निशिकांत देशपांडे.मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधाराचा पाय लागता डगमगावयाला
थरथरणारी वेल लागली वृक्ष व्हावयाला

छान

जगावयाची जिद्द एवढी जबरदस्त होती
मृत्यू ओशाळून निघाला परत जावयाला

हा इतका खास नाही वाटला कारण बहुदा रूपक अनेकदा वापरले गेलेले असावे.