वारीत पंढरीच्या

Submitted by निशिकांत on 16 July, 2018 - 03:01

( अवघा महाराष्ट्र विठू भक्तीत रमला आहे. पंढरपूरच्या वारीचे दिवस. एक भक्तिरसयुक्त मुसलसल गझल सादर. )

मी धन्य धन्य झालो वारीत पंढरीच्या
भक्ताळलो नियंत्या! वाटेत पालखीच्या

दिसतोस तूच तू का? चोहीकडे असा हा
माझ्यातही पहातो अंशास मी हरीच्या

रखरख दुपार सरली देवा तुझ्या कृपेने
वणवण फिरू कशाला शोधात सावलीच्या?

मी नाव विठ्ठ्लाचे घेता विचित्र घडले!
चिंता सरून गेल्या संसार सागरीच्या

का चारधाम यात्रा, करण्यास दूर जाऊ?
मेळ्यात वैष्णवांच्या, इच्छा सफल मनीच्या

डोळे मिटून बघतो बा! विठ्ठला तुला मी
दिसतोस गोजिरा तू बाजूस रुख्मिणीच्या

मी तेहतीस कोटी देवास का पुजावे?
सारे मला मिळाले छायेत माउलीच्या

मीपण गळून गेले, पुरता निसंग झालो
ना यावया, निघालो यात्रेत शेवटीच्या

टेकून हात, मस्तक "निशिकांत" लीन होता
दिसला प्रभो किनारा नौकेस वादळीच्या

निशिकांत देशपांडे.मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users