सरसो

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चे पोस्टर मला अजुन आठवतेय. शाहरुख आणि काजोल च्या मागे पिवळीजर्द फ़ुले फ़ुललेले, मोहरीचे शेत दाखवलेय. त्या सिनेमाचा आनंदी मूड, त्या दृष्यात छान पकडला होता. रंग दे बसंति सिनेमातदेखील असाच एक झुम इन केलेला छान शॉट होता.

moharee.jpg

हि आहेत सरसो, म्हणजेच मोहरीची फ़ुले. पंजाब आणि एकंदरच उत्तरेकडे मोहरीचे तेल, त्याची पालेभाजी यांचे बरेच प्रस्थ आहे. त्या मानाने आपल्याकडे मोहरीचा वापर मर्यादित आहे. क्वचित लोणच्यासाठी आपण हे तेल वापरतो, मोहरी फ़ोडणीला किंवा मसाल्यात वापरतो तितकीच.
फ़ुलावर आलेले मोहरीचे शेत खुपच सुंदर दिसते. या फ़ुलांचा किंचीत तीव्र असा गंधहि वार्‍यावर झुलत असतो. आपल्याकडे त्यामानाने कमी लागवड होते. शक्यतो घरगुति वापरासाठीच लावतात.
तशी मोहरी सहज रुजते. रेल्वे ट्रॅकच्या बाजुला, गॅलरीत टांगलेल्या कुंडीत मोहरीचे रोपटे आनंदाने वाढते.

तशी मोहरी जगभर लावली जाते. अगदी प्राचीन रोमन आणि ग्रीक संस्कृतीमधीही ती वापरात होती. ( ग्रीक लोक, मोहरीला देवाची देणगी मानत. ) तसेच प्राचीन चीनमधेही तिचा वापर होता. भारतात तर ती होतीच, म्हणुन मोहरीचे उगमस्थान सांगता येत नाही. ( याच Brassica कुळातली इतर मंडळी म्हणजे, कोबी, फ़्लॉवर, मुळा, नवलकोल पण जगभर विखुरलेली आहेतच. )

एरवी टिकणार्‍या पदार्थांचे पाण्याशी वैर असते पण मोहरी आणि पाण्याची खास दोस्ती आहे. मोहरीची पूड जरी केली तरी तिचा स्वाद खुलायला, थंड पाण्यात ती घुसळणे आवश्यक असते. मोहरीतील एक खास एन्झाईम, थंड पाण्याच्या संपर्कात आल्यावर कार्यान्वित होते. तूमच्यापैकी अनेक जणाना, लोणच्यासाठी फ़ेसून चढवलेल्या मोहरीचा झणका आठवला असेलच.

मोहरीच्या तेलातले लोणचे चांगले टिकते. आPअण फ़ोडणीसाठी सर्वात आधी मोहरी टाकतो, त्याचे एक खास कारण आहे. मोहरी म्हणजे तेलाची तापमापी आहे. मोहरी तडतडली म्हणजेच फ़ोडणीचे तेल व्यवस्थित तापले आहे, असे समजले जाते. उत्तरेकडे मोहरीचे तेल केसाना लावण्यासाठी तसेच मॉलिशसाठी पण वापरतात. या तेलाची त्वचेवर तीव्र प्रतिक्रिया होते.

तसे मोहरीचे अनेक प्रकार आहेत. ज़रा सौम्य चवीही पांढरी मोहरी, युरपमधे जास्त लोकप्रिय आहे. इंग्लिश, फ़्रेंच आणि जर्मन तिन्ही देशात मस्टर्ड सॉस, हा जेवणातला आवश्यक घटक आहे.

मोहरीच्या तेलाचा बायो डिझेल, बनवण्यासाठी पण उपयोग होतो.

वरती मी ब्रासिका कुळाचा उल्लेख केलाय. हे साहेब पण याच कुळातले.

kobe.jpg

विषय: 
प्रकार: 

दिनेश, मोहरीचे शेत प्रत्यक्षात मी कधीच पाहिले नाही. आपल्या महाराष्ट्रात मोहरीचे शेत मला कधी दिसलेच नाही. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे केरकचर्‍यात बाहेर गेलेली मोहरी छान हातभर उंचे होते आणि तिला फुलेही धरतात. आता राजधानी ब्रांडचे धानी तेल मिळते सरसोचे.

आमच्या घरी जे शेत आहे त्यात आम्ही करडी लावतो. महिनाभरात दाट जांभळे शेत होते करडीचे. खूप सुंदर दिसते.

बी करडईचे मी फक्त सुकलेले शेतच बघितले आहे. बोंडे तोडताना खुप काटे टोचले होते.
अलिकडे बांधावरुन लावतात मोहरी. हा वरचा फोटो, मायबोलीकर बॉम्बे व्हायकिंगच्या शेतातला.

दिनेश, मी फ्रान्सला काही महिने असताना तिथले लावेंडरचे शेत पाहिले. तेही असेच करडईच्या शेतासारखे जाम्भळे दिसते.

इथे हा अर्धचंद्र येत नाहीये. मल L.cvenDar असे लिहायचे होते..

लहान मुलांना थंडी बाधु नये म्हणुन मोहरीच्या तेलाने मालिश करतात. फार effective असते. जम्मुहुन श्रीनगरला जाताना मोहरीचे शेत आणि रोप जवळुन पहायला मिळाले. खुप छान देखावा असतो तो...

सरसोंबद्दल वाचुन बर्‍याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
मी WHO मध्ये काम करत असताना बिहार मध्ये ही सरसोंची शेत पाहीलीत. साधारणतः हिवाळ्यात या झाडांना बहर येतो आणि ही शेते खुSSSपच सुंदर दिसतात....
रस्त्याच्या कडेला, शेतात कित्येक किलोमीटर पसरलेली पिवळ्याधमक रंगाची ही निसर्गाची जादु हिवाळ्याच्या आल्हाददायक दिवसात पहाणे हा अनुभव काय वर्णावा.... आहाSSS!
सरसोंचे तेल त्या भागात सर्रास वापरले जाते... स्वयंपाकासाठी आणि अंगाला लावण्यासाठीही.... खेडेगावात लहान मुलांना हे तेल लावुन तासभर उन्हात उभे केले जाते!
या तेलाचा वास थोडा उग्र असतो... (म्हणजे आपल्यासाठी!).. बिहारी माणुस मक्याच्या चिवड्यात (भुंजा असे नाव आहे तिथे!) हे तेल टाकुन मिटक्या मारत खातो!
Happy
स्वयंपाकातही हे तेल वापरले जाते... काही डिश तर या तेलातच चांगल्या होतात (असे म्हणतात!)
Happy
असो... छान माहीती दिलीत!
प्राची अनुमोदन!
Happy

मी पण वापरून बघितलेय तेल ते. तसा तेलाला उग्र वास येतो पण शिजवल्यावर जातो तो. बंगाली लोक पण कुरमुर्‍यात कच्चे तेल घालुन खातात.
मॉलिशसाठी मात्र जपुन वापरायला हवे कारण काही जणांच्या त्वचेला ते चालत नाही.

सगळ्यात जास्त मोहरीचे उत्पादन कॅनडात होते, त्यामुळे निळे आकाश, पांढरे डोंगर आणि पुढे मोहरीचे फुललेले शेत, असे तिथले कॉमन दृष्य.

मोहरीचे तेल डोक्याला लावणे चांगले काय? माझ्या एका सरदर मैत्रीणेने केस गळतात म्हणून हा उपाय सांगीतला. तो चांगला आहे का?

दुसरे म्हणजे मालीश केले तर काही अलर्जी होते का?

मोहरीच्या तेलाचा नाजूक त्वचेवर खुप परिणाम होतो. आपल्याला त्याची सवय नसल्याने, त्याचा असा थेट त्वचेवर वापर नको. केस गळण्यावर पोटातून घ्यायची औषधे आहेतच. शिवाय माका, आवळा, ब्रम्ही, जास्वंद, कोरफड या वनस्पति योग्य.
श्रीलंकन बायकांचे केस छान मजबूत असतात. त्यासाठी बहुदा त्यांच्या आहारतली ब्रम्ही जबाबदार असावी.