आषाढस्य प्रथम दिवसे...

Submitted by अतुल ठाकुर on 12 July, 2018 - 21:10

kalidasa2.jpg

कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः
शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तु: |
यक्षचक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु
स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ||१||

कालिदासाचे मेघदूत म्हणजे आम्हा अलङ्कारशास्त्राचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी निरनिराळ्या रत्नांची खाणच. जितके खणाल तितकी मौल्यवान रत्ने मिळत जातात. या काव्याचा अभ्यास फार मोठमोठ्या माणसांनी केला. ज्यांचे नावदेखील मनात आले तरी अतिशय नम्र वाटावे. पण ज्ञानदेवमहाराजांनी आमच्यासारख्या नवख्या, काव्यप्रान्ताशी अपरिचित, अडाणी माणसांची सोय करुन ठेवली आहे. त्यांनी आमच्यासारख्यांना धीर देण्यासाठीच बहुधा म्हटले आहे की "राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?"

वर दिलेला श्लोक हा मेघदूतातील पहिला श्लोक. त्याबद्दल बोलण्याआधी थोडी पार्श्वभूमी ठावूक असणे आवश्यक आहे. कालिदासाचा यक्ष हा कुबेराचा सेवक. कुबेराला पुजेसाठी भल्या पहाटे कमलपुष्पे आणून देण्याच्या कामावर याची नियुक्ती झाली होती. यक्षाला आपल्या पत्नीचा मोह न आवरल्याने त्याने पहाटे उठावे लागु नये म्हणून आदल्या रात्रीच मिटलेली कमळे आणून ठेवली. दुसर्‍या दिवशी ती फुलणारच होती. मात्र कुबेर शंकराची पूजा करीत असताना त्या अर्धस्फुट कमळातून एक भ्रमर बाहेर पडला ज्याने कुबेराच्या बोटाला दंश केला.

एकंदरीत प्रकार कुबेराच्या लक्षात आला. त्याने क्रोधाने यक्षाला वर्षभर पत्नीपासून तुझा वियोग होईल असा शाप दिला. त्या शापामुळे पत्नीपासून वियोग झालेला हा यक्ष रामगिरि पर्वतावर आला. ही मेघदूताची पार्श्वभूमी आहे.

मेघदूतातील वरील श्लोकातला पहिला शब्द "कश्चित" फार महत्त्वाचा आहे. कोणी एक यक्ष. कालिदासाने यक्षाचा नामनिर्देश केलेला नाही. स्वतः कालिदासाबद्दलदेखील ऐतिहासिक तथ्य म्हणता येईल अशी माहिती उपलब्ध नाही. आणि त्यामुळेच कदाचित, कालिदासाची जात, पात, प्रान्त न पाहता त्याच्या निखळ साहित्याचेच परिशीलन झाले. काव्यातले पात्र असे अनामिक ठेवण्यामागे हे महत्त्वाचे कारण असावे.

जर या यक्षाचे नाव गाव माहित झाले असते तर लोकांनी त्यावरून काही आडाखे बांधण्यास सुरुवात केली असती. जरी यक्षकथा बर्‍याच जणांना माहित असली तरी कालिदासाने ती मेघदूतात सांगितली नाही. या पार्श्वभूमिला फारसे महत्त्व न देता सरळ विषयाकडे हे काव्य येते. त्यामुळे रसिकांना इतर ठिकाणी पाहण्यास काही वाव मिळत नाही. हे सर्व एका "कश्चित" शब्दामुळे घडले आहे.

नावगाव माहित झाल्यास, किंवा त्या संदर्भातील कथा सविस्तर दिल्यास मुख्य विषयाच्या रसनिष्पत्तीमध्ये अडथळा येण्याचा संभव महाकवीने ओळखला असावा. कालिदासाच्या एकेका शब्दामागे अशातर्‍हेचा खुपच विचार केलेला आढळतो. आज तरी मला इतकेच जाणवले आहे. अनेकांना याहून खोल काही जाणवेल. सतत जास्तीत जास्त खोलात जाऊन ही रत्ने शोधण्यात मौज आहे.

"कश्चित" शब्दाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल ते कथनशास्त्राच्या (Narratology) संदर्भात. या शास्त्रानूसार "अनामिकता" हा एक महत्त्वाचा भाग कथनात असु शकतो. कालिदासाने यक्षाबद्दल काहीही सांगितले नाही. मेघदूतात तो अनामिक आहे. त्यामुळे तो विश्वव्यापक देखील आहे. ही विश्वव्यापकता या "कश्चित" मुळे साधते. दुसरे म्हणजे सार्वकालिकता सुद्धा कश्चितमुळे निर्माण होते.

नाव गाव माहित नसलेल्या या यक्षाचे सुख, दु:ख, वेदना, हुरहुर, पश्चात्ताप, आठवणी, व्याकुळता या सार्‍या जगाच्या कानाकोपर्‍यातील कुठल्याही वाचकाच्या होऊन जातात. या अनामिकतेमुळे "मेघदूत" हे देश, कालाची बंधने ओलांडून पलिकडे निघून जाते. कुठल्याही देशातील, कुठल्याही कालातील, आपल्या आवडत्या स्त्रीपासून वियोग झालेल्या पुरुषाला मेघदूतातील यक्षाची व्याकुळता ही स्वतःचीच वाटू शकते.

ही देश, काल, धर्म, जाती, वर्ग या पलिकडे काव्याला नेण्याची किमया महाकवि कालिदासाने फक्त एका "कश्चित" शब्दाने साधली आहे.

...सर्व संस्कृतप्रेमीजनांना महाकवी कालिदास दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मस्तच! पहिला श्लोक वाचताच 'अस्ति कश्चित् वाग्विशेषः' हे आठवलं. कश्चित बद्दल तुमचं म्हणणं पटण्यासारखं आहे. कारण अस्त्युत्तरस्याम् दिशि देवतात्मा..' - मध्ये कालिदासाने प्रॉपर इन्ट्रोडक्षन लिहिली आहे परंतु इथे मात्र 'यक्षाची ष्टोरी पब्लिकला ठाऊक हाये' हे धरून लिहिल्यासारखे वाटते.

मस्स्त माहिती ! आणखी वाचायला आवडेल
पहिला श्लोक वाचताच 'अस्ति कश्चित् वाग्विशेषः' हे आठवलं>>+१ मला पण .. तेच ना? बायको विचारते " वाङ्मयाचं काही विशेष ज्ञान आहे का ?"आणि मग कालिदासाला तो अपमान वाटतो आणि तो निघून जातो जंगलात .. तिथे काली देवीची तपश्चर्या करून तो "अस्ति " "कश्चित्" आणि "वाग " (ग चा पाय मोडलेला काढता येत नैये ) पासून सुरु होणाऱ्या रचना लिहिल्या? (कुमारसंभव मेघदूत आणि रघुवंश )

तेच ना? बायको विचारते > संस्कृत मधे धडा होता एक मला. त्यात होतं हे. त्यात कालीदासाची बायको " कपाटं आवृत्त्य " म्हणजे दार लावून अशा अर्थाने होत. तेव्हा कपाट हे आधी मला मराठीतल कपाट वाटल होत!

<पहिला श्लोक वाचताच 'अस्ति कश्चित् वाग्विशेषः' हे आठवलं>>+१ मला पण .. तेच ना? बायको विचारते " वाङ्मयाचं काही विशेष ज्ञान आहे का ?"आणि मग कालिदासाला तो अपमान वाटतो आणि तो निघून जातो जंगलात .. तिथे काली देवीची तपश्चर्या करून तो "अस्ति " "कश्चित्" आणि "वाग " (ग चा पाय मोडलेला काढता येत नैये ) पासून सुरु होणाऱ्या रचना लिहिल्या? (कुमारसंभव मेघदूत आणि रघुवंश )>> +१