अधुरी कहाणी

Submitted by VB on 3 July, 2018 - 01:17

आपल्या आयुष्यात बरीच माणसे येतात अन जातात. काही काळाच्या ओघात विसमरणात जातात तर काहींच्या पाऊलखुणा कायम आपल्या सोबत राहतात. काही आठवणी रडवून जातात तर काही अगदी नकळत चेहऱ्यावर हसू आणतात.
अश्याच काही आठवणींत रमली प्रिया. बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडत होता. प्रिया एकटीच होती घरी, बऱ्याच दिवसांनी आज निवांतपणा मिळाला होता तिला.
चहा पीत, पावसाचा देखावा पाहत बाल्कनीत बसली होती ती, अन तिच्याही नकळत ती अमितच्या आठवणीत रमली. अमित, प्रियाचे पाहिले प्रेम, जे पूर्ण होऊ शकले नाही पण सुंदर आठवण बनून सतत राहिले तिच्या सोबत.
अमित, प्रिया अन पाऊस, खुप साऱ्या आठवणी होत्या त्यांच्या. आताही प्रियाला आठवला तो पाऊस जेव्हा अमितने तिला प्रपोझ केले होते. तो दिवस नाही रात्र खरेतर ती कधीच विसरू शकणार नव्हती.
२६ जुलै २००५ सगळी मुंबापुरी पाण्यात बुडाली होती. प्रिया आणि अमित, प्रिया एक मराठमोळी मुलगी तर अमित रांगडा पंजाबी गडी, दोघेही एकाच कंपनीत नोकरी करत होते, खाते वेगवेगळे होते पण एकाच सेक्शनमध्ये बसत, त्यामुळे दुपारचा डब्बा एकत्र खाणे, बरेचदा एकत्र येणे -जाणे होत होते. यासर्वात अमित तिची विशेष काळजी घेई. त्याच्या वागण्या-बोलण्यातून तिला त्याचे तिच्याप्रति असलेले प्रेम जाणवे. प्रियालाही तो आवडायचा पण तिला स्वतःहून आपल्या भावना व्यक्त करायच्या नव्हत्या. असेच सगळे सुरळीत, शांतपणे चालू होते, त्या दिवसापर्यंत.
त्या दिवशी दुपार पर्यंत वातावरण स्वच्छ वाटत होते, पण मग अचानक जोराचा पाऊस अन वारा सुरू झाला. बघता बघता सगळीकडे पाणी साचू लागले तसे सगळ्यांना लवकर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रिया अन अमित ऑफिसच्या पहिल्या मजल्यावर बसत. खाली तळमजल्यावर फॅक्टरी होती. जेव्हा हे दोघे खाली आले तेव्हा फक्त अर्ध्या तासात गुडघाभर पाणी साचले होते. प्रिया घरी जायला निघाली पण अमितने तिला अडविले. त्याच्या एका मित्राकडून त्याला कळले होते की ट्रेनसुद्दा बंद पडतायेत, रस्त्यावर सगळीकडे पाणी साचलेय, वाहने पुढे जाऊ शकत नाहीयेत. तर आपण इकडेच थांबणे योग्य होईल. त्याच्यावर भरोसा ठेवून तीही थांबली. ते दोघे मिळून एकंदरीत दोन-अडीचशे जण तिथेच थांबले होते. मुंबईकर जसे नेहमीच ज्या परोपकारी वृत्तीसाठी ओळखले जातात तसेच आताही एकमेकांना मदत करणे चालूच होते. इतक्या लोकांसाठी पुरुसे अन्नही नव्हते. अन वीज गेल्यामुळे प्यायला पाणी सुद्दा नाही अशी स्थिती. सर्वजण आपापल्या परीने एकमेकांना मदत करत होते, त्यात अमितपण होता. मुख्य म्हणजे हे सर्व करताना तो प्रियाची विशेष काळजी घेत होता, तिला काही हवे-नको ते पाहत होता, कुठल्याही मुलीला आवडेल अगदी असेच तिला वागवत होता. ,साहजिकच ह्या सर्वामुळे प्रिया अजूनच त्याच्या प्रेमात पडली. जसजसा अंधार वाढू लागला तेव्हा सर्वांनाच कळले होते की रात्र इकडे काढण्याशिवाय गत्यंतर नाही. सगळेजण ऑफिसच्या पहिल्या मजल्यावर जमले , गप्पा सुरु झाल्या,ग्रुप बनले, . गाण्याच्या भेंड्या झाल्या. हळूहळू काही लोक जिथे जागा असेल तिथे झोपू लागले. पण प्रिया अन अमित अजूनही गप्पात रमले होते. ही अशी आणीबाणीची वेळही एन्जॉय करत होते. अन मग अचानक अमितने प्रियाचा हात हातात घेतला, त्याच्या ह्या कृतीने पूर्ण शहारून गेली प्रिया, तो स्पर्श, किती आश्वासक स्पर्श होता तो. अगदी निर्मळ, कसल्याही वासनेचा लवलेश नसलेला, काहीही होवो मी तुझ्यासोबत असेन हे सांगणारा. कधीही विसरू शकणार नाही असा. क्षणभराने प्रिया सचेत झाली जेव्हा अमितने त्याच्या प्रेमाची कबुली दिली. प्रिया भारावून गेली, तिला काहीच कळेना की काय करावे. तीचेसुद्धा अमितवर खूप प्रेम होते. पण तो परप्रांतीय होता, वेगळ्या जातीचा होता. तिच्या घरून विरोध होणार हे निश्चित होते. तिचा बावरलेला चेहरा पाहून अमितच बोलला की तुझ्या होकाराची इतक्यात अपेक्षा नाहीये मला, पण आज तुझ्यासमोर प्रेम कबूल मात्र करायचे होते. त्याचा तो समंजसपणा पाहून प्रियाचीही खात्री पटली की तिची निवड योग्य आहे. मग दोघेही खूपवेळ गप्पा मारत होते. पहाटे पहाटे थोडावेळ जाऊन झोपले.
दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर बऱ्यापैकी ओसरला होता, पण रिमझिम सरी पडत होत्याच. त्यावेळी आजच्यासारखे सगळ्यांकडे मोबाईल नव्हते की इंटरनेट इतके प्रगत नव्हते, त्यामुळे आपल्या आप्तांशी लगेच संपर्क साधणे शक्य नव्हते. विज अजूनही आली नव्हती. ट्रेन, बस , ऑटो वगैरे अद्याप बंदच होते. त्यांचे ऑफिस अंधेरीत होते, प्रिया ठाण्यात अन अमित कल्याणला राहत होता. प्रियाला आता घरी जायची ओढ लागली होती. खरेतर दोघेही काल दुपारनंतर उपाशीच होते. तरी अन्नापेक्षा घरी लवकरात लवकर कसे पोहचणार हीच चिंता होती. अमितला कल्पना होती की आता जरी घरी जायचे म्हटल्यावर एकवेळ प्रिया घरी पोचेल पण तो कल्याणला पोहचणे केवळ अशक्य. कारण ट्रेन, बस , रिक्षा कुठलाच पर्याय उपलब्ध नव्हता. पण फक्त तिची घालमेल सहन न झाल्यामुळे तो स्वतःच तयार झाला. दोघांनीही बाकीच्यांचा निरोप घेतला अन चालू लागले. पाऊस अजूनही पडत होता. प्रिया अन अमित काही पहिल्यांदाच असे पावसातून भिजत जात नव्हते, तरीही आजचा पाऊस थोडा वेगळाच भासला तिला. अमितला खरेतर पावसाळा बिलकुल आवडायचा नाही, पण प्रियाचे पाऊसप्रेम पाहता तो दरवेळी तिच्या सोबत जायचा. पण आजचा पाऊस त्यालाही आवडला. कदाचित आदल्या रात्री त्याने तिच्याजवळ दिलेल्या प्रेमाच्या कबुलीमुळे असेन, पण त्यालाही खूप प्रसन्न वाटत होते. दोघेही जणू आपल्याच विश्वात रमले होते, आजूबाजूचे भानच उरले नव्हते. थोडावेळ चालल्यावर एक ठिकाणी चहाचा स्टॉल दिसला. दोघांनीही तिथे चहा-बिस्कीटचा नाश्ता केला अन परत चालू लागले. साधारण अर्धा तास दोघे हातात हात घेऊन मूकपणे चालत होते. म्हणतात न की एकदा मने जुळली तर शब्दांची गरजच शिल्लक राहत नाही.
आता सकाळचे दहा वाजले, गेले दोन तास ते दोघे चालत होते. एव्हाना तुरळक वाहतूक सुरू झाली होती. या दोघांसारखे बरीच माणसे घरी जायला निघाली होती, त्यामुळे बस गर्दीने खचाखच भरून जात होत्या. एखादी रिक्षा दिसली की लोक अक्षरशः रिक्षावाला जितके मागेल तितके पैसे देऊन जायला सुद्दा अगदी तुटून पडत होते. अश्यावेळी जर अमित एकटाच असता तर काही प्रॉब्लेम नव्हता, पण प्रियाला घेऊन गर्दीच्या बसमध्ये चढणे खूप कठीण झाले होते, तीच गत रिक्षाची. चार-पाच वेळा प्रयत्न केल्यावर, दोघांनीही तो नाद सोडून दिला अन मस्त गप्पा मारत चालायला लागले.
दोघेही कसेबसे मुलुंड चेकनाक्याला पोहोचले, तिथे रिक्षांची रांग लागली होती. नडलेल्या प्रवाशांचा जितका गैरफायदा करून घेता येईल तितका घेणे हा प्रकार इथेही चालू होता. इतका वेळ दोघे एकत्र होते पण आता दोघांचीही वाट बदलणार होती. प्रियाचे घर तिथून जवळ होते. पण अमित समोर पुढे काय हा प्रश्न होता. घरचे काय म्हणतील हा विचारही न करता प्रियाने अमितला आपल्या घरी येण्याची खूप विंनती केली, पण अमितला ते रुचले नाही. कसेही करून तो नीट घरी पोहचेल, अन लगेच प्रियाला कळवेल असे वचन त्याने तिला दिले. तेव्हांकुठे ती पुढे आपल्या घरी जायला तयार झाली. अमितने तिला एका रिक्षात बसविले, रिक्षावाल्याला आगाऊ भाडे सुद्दा दिले अन प्रियाचा निरोप घेतला. त्याक्षणी दोघेही खूप भावुक झाले होते. अमितलाही प्रियाचा हात सोडवणे जीवावर आले होते, तरी कसाबसा तिचा हात सोडवून त्याने तिला बाय केले.
नेहमीप्रमाणे हा प्रसंग आठवून प्रियाच्या डोळ्यात पाणी आले. त्या दिवशी जेव्हा तिने अमितचा निरोप घेतला तो शेवटचा. तेव्हा तिला पुसटशी देखील कल्पना नव्हती की ती त्याला शेवटची पाहतेय. जर तिला थोडीजरी कल्पना असती तर तिने त्याला कुठेही जाऊ दिले नसते. त्या दिवशी अमित जो गेला तो गेला, त्याचे काय झाले कुणालाच कळले नाही, अगदी त्याच्या घरच्यांनाही नाही. त्यादिवशी निसर्गाच्या कोपमुळे जे हजारो बळी गेले, त्यात एक तिचा अमितही होता. नाही म्हणायला काही दिवस पोलिसांनी तपास केला पण नंतर त्यांनीही फाईल बंद केली. अमितचे असे गुढपणे गायब होणे प्रियाला मनाने उध्वस्त करून गेले, कायमचे. तेव्हापासून ती अशीच नेहमी पावसाच्या प्रत्येक थेंबात ती तिच्या अमितला आठवत राहते. अन त्या आठवणीत चिंब भिजते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार सर्वांचे☺️

पहिलीच कथा , त्यामुळे थोडी धाकधूक होती. पण तुम्हा सर्वांचे अभिप्राय वाचून बरे वाटले☺️

छान लिहिलंय! Happy

शेवट वाचून वाईट वाटले. +1111 Sad

Chan lihilay. Shewat dukhaun Gela pan goshta aawadli. Happy ending chi Katha lawkar yeil hich apeksha !

सत्यकथा वाटते आहे

२६ जुलै २००५ काळरात्र त्यावरून सत्यकथा असू शकेल असे वाटते आहे

छान लिहिलंय.

सत्यकथा असू शकेल असे वाटते आहे
>> +१