हम नही सुधरेंगे

Submitted by बेफ़िकीर on 29 June, 2018 - 02:44

संपूर्ण दिवसाचे नियोजन करून आपण सकाळी घराबाहेर पडतो तेव्हा आपल्या डोक्यात दिवसभरातील कामांचे व इतर असे असंख्य विचार असतात. परंतु आपण सर्वात प्रथम सामोरे जातो ते वाहतुक समस्येला!

अगदी आपले वाहन सुरू करून रस्त्यावर आणल्याक्षणीच आपल्याला तडजोडी सुरू कराव्या लागतात. कदाचित दिवसभरातील पहिली शिवी तोंडातून त्याच क्षणी बाहेर पडते. त्रागा आपल्या मनाला व्यापू लागतो. आजूबाजूला वाजणार्‍या हॉर्न्समुळे कलकल होऊ लागते. नकळत आपणही हॉर्न वाजवू लागतो. सिग्नल तोडणारे, एकमेकांकडे टर्रेबाजीने बघत जाणारे, दमबाजी करणारे, लेनकटिंग करणारे, मोबाईलवर बोलत चालल्यामुळे हळूहळू जाणारे, सर्व प्रकारची वाहने त्याच रस्त्यावर आणणारे, राँग पार्किंगवाले, चालता चालता कुठल्याही स्पॉटवर रस्ता क्रॉस करणारे, सुसाट जाणारे, साईड न देणारे, उलट दिशेने वेगात येणारे, वाहनांची लांब रांग लागली आहे हे दिसत असूनही रांगेत न थांबता उजवीकडून पार रांगेच्या पुढेपर्यंत जाऊन ती वाहतूक आणखी खोळंबवणारे, भयावह आवाजाचे हॉर्न्स वाजवणारे, समोर रेड सिग्नल आहे हे दिसूनही मागून हॉर्न वाजवून आपल्याला सिग्नल तोडायला सांगू पाहणारे हे सगळेजण आपल्याला एकदम भेटू लागतात. कदाचित ह्यांच्याशी आपला संबंध जेमतेम पाऊण - एक तासच येणार असतो. मात्र तेवढ्या अवधीत हे सगळे रस्तेकरी आपल्या मनःशांतीची आणि उत्साहाची वाट लावतात. कदाचित आपणही अनेकदा त्यांच्यापैकी काहींसारखे वागून जातो.

अवाढव्य लोकसंख्या, अरुंद रस्ते, कायद्याच्या अंमलबजावणीचे थिटेपण, कायद्याची भीती न राहणे, संयमीत वर्तनाने सगळ्यांचाच फायदा होईल हे न समजणे अशा असंख्या कारणांबरोबरच एक महत्वाचे कारण ह्या सगळ्याच्या मुळाशी असावे, ते म्हणजे 'शिस्त गेली जी च्या जी मध्ये'ही मानसिकता!

ह्या तीव्र त्रासदायक स्थितीचा आपल्या विचारांवर काय काय वाईट परिणाम होत असेल कोण जाणे! प्रदुषणाचा त्रास निराळाच, पण चिडचिडे होणे, रक्तदाब वाढणे असेही प्रकार होत असतील.

मुख्य म्हणजे शासकीय बसेस आणि रिक्षा हे सर्वाधिक सिग्नल तोडतात.

मुंबई, बंगळूरू, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये बरेच भाग व्यवस्थित विकसित झाल्यामुळे कदाचित तेथील काही वाहतूक खूपच सुरळीत असेलही. मात्र इतर शहरांमध्ये परिस्थिती भयंकर आहे.

गेल्या दोन, तीन वर्षांत मला एक टूरिस्ट म्हणून चार छोटे छोटे देश बघायला मिळाले. ह्या चारही देशांमधील वाहतुक अत्यंत शिस्तबद्ध होती. नियम पाळण्याची प्रवृत्ती माणसांच्या मनात मुळातच असल्याचे दिसून आले. त्याशिवाय यंत्रणा जबरदस्त होत्याच. प्रत्येक आणि प्रत्येक रस्ता उत्तम दर्जाचा होता. वाहनांचा सरासरी वेगही बराच अधिक असावा.

आपल्याकडे मात्र दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच बिघडत आहे. वाहनांच्या उत्पादनावर नियंत्रण आणणे बहुधा अशक्यच असावे. रस्तारुंदी, रस्तेनिर्मीती, उड्डाणपूल निर्मीती ह्या प्रक्रिया महाक्लिष्ट झालेल्या असाव्यात. पोलिसांची संख्या तोकडीच होत चालली असावी. आधी जिथे जायला पंधरा मिनिटे पुरेशी असत तिथे जायला आता पाऊण तास लागतो हे स्वतःला पटवून व तेवढा वेळ हाताशी ठेवून माणसे घराबाहेर पडतात. पण परिस्थितीच बदलावी ह्यासाठी गंभीर प्रयत्न होतात की नाही असाच प्रश्न पडतो. क्रॉसरोड नसलेले रस्ते अधिकाधिक असण्याची मोठी गरज आहे. पोलिसांना पर्याय म्हणून काही संघटनांना अधिकार दिले जावेत व त्यांनी नियमभंग करणार्‍यांवर त्वरीत व कडक कारवाई करावी हीसुद्धा एक मोठी गरज आहे. नेत्यांचे फ्लेक्स आणि इतर जाहिरातींना जागा देण्याऐवजी वाहतुकीच्या नियमांबाबत प्रबोधन करणारे फलक लावायला हवे आहेत. भर वाहतुकीत घालवलेला एक तास आपल्या मानसिक व शारीरिक प्रकृतीला किती त्रासदायक ठरू शकतो ह्याचे प्रबोधन मोठ्या प्रमाणावर व्हायला हवे आहे.

लेकिन हम नही सुधरेंगे!

========

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम तो बाबा आदम के जमानेंसे नही सुधरे है, तो अब क्या सुधरेंगे? ( शोलेमधला संवाद आठवला. हमारी इतनी बदलीयोंके बावजूद हम नही बदले/ अरे जब हम नही सुधरे तो तुम क्या सुधरोंगे? हाहा ! )

वाहनांची संख्या, रस्ते, पोलिस या अडचणी बाजूला ठेवल्या तर मला यावर सध्यातरी एकच उपाय दिसतो आहे तो म्हणजे 'स्वयंशिस्त'
वाहतुक समस्येमधे बेशिस्तीचाच वाटा मोठा आहे. पण आज अशी अवस्था आहे की, कोणी नियम पाळून वाहन चालवले तर त्याच्यामुळेच आहे ते ट्रॅफीक थांबून जाम होईल. Happy

नियम पाळणार्‍यांकडे कुत्सितपणे पाहीले जाते.
नियम पाळणाराच ओशाळून जातो

प्रत्येक शहराची एक वाहतूक संस्कृती असते. शिस्तीत तर सारेच शिस्तीत, बेशिस्त तर सारेच बेशिस्तीत. पर्याय नसतो. जोपर्यंत कायद्याने बांबू लागत नाही..

उद्या दारू पिऊन स्वताच्या जबाबदारीवर गाडी चालवले तर चालेल असा नियम करून बघा.
सारेच बिनधास्त पिऊन चालवतील मला चढली नाही हे दाखवायला.
समाज फक्त कायद्याने बदलता येतो.

आपल्या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे हे लक्षात येत नाही. त्यांना कुठलाही कायदा पाळायला नको.

आता बँकेतून थेट पैसे जायला कधी सुरवात होईल ते पाहायचे. इथे सर्वत्र कॅमेरे आहेत, इ चलन सुरू झाले आहे, एकदा का थेट पैसे जायला लागले की परिस्थिती बदलेल अशी आशा आहे.

<<<<<<वाहनांची संख्या, रस्ते, पोलिस या अडचणी बाजूला ठेवल्या तर मला यावर सध्यातरी एकच उपाय दिसतो आहे तो म्हणजे 'स्वयंशिस्त'>>>>>>>१+++++++

स्वयंशिस्त हा आणि हाच एकमेव उपाय आहे यावर आणि तो सध्यातरी अशक्य दिसतोय. सध्यातरी म्हणजे याजन्मी

नाही साधना, यातही लोक हुशारी दाखवून त्या पर्टिक्युलर खात्यात पैसेच ठेवणार नाहीत. पळवाटच शोधायची म्हटली तर काहीही करून शोधता येतेच.

ही सारी घाणेड्डी माणसे कुठेतरी दूर सिरियात पाठवून नवीन छान छान शिस्तबद्ध नागरिक इम्पोर्ट करायला हवेत..

आजचाच ऑफिसातला किस्सा. मीटींग रूम मध्ये शिरलो आणि लाईट्स ऑन झाले (ऑटो असल्यानी मूव्हमेंट्स डिटेक्ट झाल्या की लागतात) टेबलवर वेफर्स, खारे दाणे इ. चे रिकामे पाकिटं. यावर काय रिअ‍ॅक्ट व्हायचं कळेनाच मला... हायली एज्युकेटेड आणि एटिकेट्स असणारी लोकं हे असं करतात?
त्याच रूम मध्ये एका कोपर्‍यात डस्ट्बीन आहे, तिथे टाकायला काय हरकत होती? पण नाही...
माझा नेहेमीप्रमाणे त्रागाच.

हाऊसकिपिंगवालेही माणसंच आहेत ना? ते त्यांचे कामं फारच व्यवस्थितपणे करतात इथे... पण ही अशी रूम सोडून जाणे काहीतरीच :रागः

एका लहान मुलाला विचारले कि या सिग्नलच्या रंगांचा अर्थ सांग बरं.
तो म्हणाला , ताम्बडा दिवा म्हणजे "थांबा"
हिरवा म्हणजे "जा "

आणि पिवळा म्हणजे " जोरात जा" .....

माझ्या एका मित्राने काही वर्षांपूर्वी मला म्हंटले होते , कि भारतीयांमधे नियम तोडण्याची मानसिकता कोठून आली माहितिये ?
ती आली स्वातंत्र्यपूर्व सामाजिक शिकवणूकीतून. " असहकार" चळवळ .. इन्ग्रजांनी केलेले कायदे तोडा अशा त्यावेळी प्रसार झालेल्या घोषणांमधून . कायदा तोडणे हे स्वातंत्र्यलढ्याचे मोठे शस्त्र होते. तसे करणारे मानास पत्र ठरत... हिरो ठरत... त्या मानसिकतेला एक वलयच प्राप्त झाले..... इतके कि ते भारतीयांच्या रक्तात आणि गुणसूत्रातच मुरले.
पण ते फक्त त्या काळातच आवश्यक होते ... ते तिथेच विसरायला हवे हे कळण्या इतकी प्रगल्भता आपल्यात नव्हतीच... आणि ती येण्यासाठी कोणत्याच नेत्रुत्वाने (शिक्षण , समाजधारक संस्था , राजकारण ) डोळस प्रयत्न केले गेले नाहीत.
आता खूप प्रयत्नपूर्वक हे शिकवले पाहिजे. शाळेत मुलांना , आणि घरात मुलांनी पालकांना !!!!!
शिक्षकांनी मात्र हे स्वतःच अंगीकारले पाहिजे...

पशुपत - असे मत असलेले अनेक लोक, त्यातले अर्धे आता मेले, माझ्या ओळखीचे आहेत नि होते.
मला आता भारतीय जनतेच्या दोषांबद्दल काहीहि वाटत नाही - कमी अधिक प्रमाणात जगात सर्वत्र असेच होऊ लागले आहे.