तुझा काटा नवा होता

Submitted by रुपेंद्र कदम 'रुपक' on 12 June, 2018 - 13:02

जिवाचा मोगरा केला तुला चाफा हवा होता
जखम तर ही जुनी माझी तुझा काटा नवा होता

सुरांची एकता माझ्या तुझ्या जगण्यात होती का?
तुझी ती भैरवी होती नि माझा मारवा होता

जवळ मी घेतल्या जेव्हा गुलाबी पाकळ्या ताज्या
निखारा आत होता वर फुलांचा ताटवा होता

नको येवूस माघारी पुन्हा तू चांदण्या रात्री
सुखाची लाच देणारा तुझा तो चांदवा होता

विसर नाते तुझे माझे कधी होते जुळालेले
समज आला क्षणासाठी चिमुकला काजवा होता

स्वत:च्या सावलीलाही खरी चाहूल लागेना
सुखाचे ऊन होते का उन्हाचा गारवा होता?

कितीदा वादळासंगे दिलाने झुंजली होडी
किनारी प्राण गेला तो बिचारा नाखवा होता

© रुपेंद्र कदम (रुपक)
पुणे 07 जून 2018 ✍

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडली

खूपच छान. (मायबोलीवर स्वागत. असेच लिहित रहा.)

सर्वांचे आभार.....
तुमच्या प्रतिक्रिया उर्जादायी आहेत