शरमेने काळा पडलो

Submitted by बेफ़िकीर on 12 June, 2018 - 12:10

गझल - शरमेने काळा पडलो

हे बघण्यासाठी गेलो, की कशाकशाने घडलो
उलगडले स्वतःस जेव्हा, शरमेने काळा पडलो

ह्या पंचमहाभूतांचा कण कण प्रत्येकामध्ये
हा हसला तर मी हसलो, तो रडला तर मी रडलो

दगडाचा देव कशाला, हे म्हणणे मला न शोभे
पण म्हणायला गेलो अन मग दगडामागे दडलो

रस्त्यात घोषणा देण्या, लाखोंनी सोबत केली
पण न्यायालयासमोरी मी एकटाच ओरडलो

मी कोणाला आवडलो अन कोण मला आवडले
ते सोडा, मुद्दा आहे.... मी मला किती आवडलो

शोधा हे म्हणतच नाही, ध्यानात असूद्या केवळ
जाता जाता दिसलो तर, कळवा की मी सापडलो

आरसा पाहुनी सुचले, ते उत्तर दिले जगाला
मी तुला झेपलो नसलो, तर नसो.... मला परवडलो

काहीही दैना करते, 'बेफिकीर' कविता साली
ते बांधावरही वाहत, मी प्रवाहातही अडलो

========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sundar

एकसे एक शेर आहेत.

आरसा पाहुनी सुचले, ते उत्तर दिले जगाला
मी तुला झेपलो नसलो, तर नसो.... मला परवडलो

काहीही दैना करते, 'बेफिकीर' कविता साली
ते बांधावरही वाहत, मी प्रवाहातही अडलो >> हे दोन विशेष आवडले.