पायीर घाट, कोकणदांड, बैल घाट आणि फोदोंडीची वाट

Submitted by योगेश आहिरराव on 11 June, 2018 - 03:49

पायीर घाट, कोकणदांड, बैल घाट आणि फोदोंडीची वाट

घाई गडबडीत सायंकाळची ५:४१ ची बदलापूर लोकल हुकली, नंतरच्या कर्जत लोकलमध्ये सॅक पाठीवर घेऊन कसाबसा चढलो. शेलूला उतरलो तेव्हा बाकी मंडळी वाट पहातच होती. यावेळी सोबत होते ‘प्रिती पटेल’, ‘सुहास जोशी’ आणि ‘आदित्य ठोंबरे’.
स्टेशनच्या बाहेर पडलो तेव्हा सूर्यास्त होऊन संधिप्रकाश पसरलेला पण त्यापेक्षाही पूर्वेला क्षितिजावर चंद्राचा मोठा लाल गोळा भलताच भारी दिसत होता. आदित्यच्या गाडीतून बदलापूर कर्जत पाइपलाइन रोड पकडून आंबिवली गावात ‘सावंत’ यांच्या घरी जाई पर्यंत आठ वाजले तिथेच जेवणासाठी सांगून ठेवले होते. पुरणपोळीचे जेवण झाल्यावर धामणी मार्गे मेचकरवाडी गाठले तेव्हा गावात होळीची लगबग सुरु होती. अशोक मामांच्या अंगणात गाडी लावली. प्रितीने आधीच त्यांना कल्पना देऊन ठेवल्याने ते आमची वाटच पहात होते. थोड स्थिरस्थावर होतो तोच प्रत्येक घरातली मंडळी होळीला नैवद्य दाखवायला माळावर हजर.
11.JPG
गावातल्या होळीच्या अनोख्या उत्सवाचे साक्षीदार झालो. हे सर्व झाल्यावर पुन्हा जेवणासाठी आग्रह झाला, त्यांना सांगितलं आम्ही जेवण करून आलो आहोत तरी ऐकायलाच तयार नाही. शेवटी मान राखत पुन्हा पुरणपोळी, कटाची आमटी, गुळवणी, पापड कुरडया असं थोड्या प्रमाणात? खावे लागले. आता एवढं सगळं दुबार जेवण झाल्यावर लगेच थोडी झोपणार मग गावात चक्कर मारायला बाहेर पडलो. मुक्कामी एस टी मारुती मंदिराजवळ उभी होती, मला तर या छोट्या वाडी वस्ती वर येणाऱ्या या मुक्कामी एस टी चे आधीपासून नवल वाटते. रात्री तसेच गाडीत झोपून दुसऱ्या दिवशी पहाटे ठरलेल्या वेळेत निघणे कितीही थंडी असो पाऊस असो कोणत्याही ऋतमध्ये कशाही परिस्थितीत खंड पडू न देता सेवा देण्याचं काम ड्रायव्हर कंडक्टर करत राहतात...
गावाबाहेर पुलावर गप्पा हाणत बसलो विषय फक्त आणि फक्त ट्रेक दुसरे काही नाही. लेखक वरिष्ठ संवाददाता लोकप्रभा सुहास जोशी यांचे फिरस्ती चे किस्से आणि प्रितीच्या मुशाफिरी बद्दल तर सुज्ञास फारसे सांगणे न लगे. तसेच आदित्य उर्फ आदी फिक्सर हा सुद्धा वयाच्या मानाने भरपूर भटकलेला. साहजिकच रात्री उशिरा पर्यंत गप्पा रंगल्या. तसेही दुसऱ्या दिवशी फार मोठा पल्ला नव्हताच मुळी. होता तो नवीन वाटेचा एक निवांत ट्रेक. हल्ली एका दिवसात लो-भी, ना-भी, उजवी नाळ चढाई मग लगेच डावी नाळ उतराई तर महीपत रसाळ सारखे ट्रेक उर फाटे पर्यंत कुत्र्यासारखे पळत करणे हा एक वेगळाच ट्रेण्ड सेट होतोय. खरं तर कुत्रा म्हणणे ही चुकीचे ठरेल कारण कुत्रा तर माणसाचा सच्चा मित्र त्यातही ईमानदार आणि भरवशाचा. तसेही हल्ली माणसातील ईमानदारी लोप पावत चालली आहे, असो तर विषय भरकटतोय...
मेचकरवाडीला सह्याद्रीने अगदी कवेत घेतले आहे. साधारणपणे सांगायचे झाले तर उत्तरेला कोथळीगडापासून पूर्वेला माथ्यालगत नाखिंडा ते दक्षिणेकडे कळकराई फेण्यादेवी अलीकडील उंच टेपाड. याच भागातली एक अल्प परिचित ‘कोकण दांड’ ही वाट ‘कौल्याची धार’ आणि ‘बैल घाट’ यांच्या मघोमध घाटावर जाते हे प्रितीला माहित होते.
अगदी आरामशीर नियोजन असल्याने सकाळी आठ वाजता सुरुवात केली, अशोक मामांनी साठीच्या आसपास असलेले ‘नाना दाते’ यांना आमच्या सोबत येण्यास तयार केले. मागे म्हणालो होतो तसे या भागातल्या साधारण अडीच हजार उंचीच्या सह्याद्रीच्या रांगेतलीं चढाई त्यावर निम्या उंचीवर असलेल्या पदरामुळे दोन टप्प्यात होते. पायथ्याच्या वाडीतून पदरात येणारी एक वाट मग पदरातून माथ्यावर जाण्यासाठी दुसरी वाट. मेचकरवाडीतून पेठ कळकराई तसेच या पदरात अनेक वाटांनी जाता येते. त्यानुसार पायीर घाटाने पदरात मग कोकण दांड वाटेने माथा गाठून, बैल घाटाने पदरात उतरून पुढे फोदोंडीच्या वाटेने गावात परत असे नियोजन होते.
गावाबाहेर निघून पूर्वेला चालू पडलो, समोर नाखिंड्या पल्याडहून सुर्य वर येत होता. शेतातून वाट काढत आजुबाजुला पाहिले तर या भागात ही फार्म हाऊस चे जाळे वाढू लागले आहे. डावीकडे कोथळीगडाचे पठार माग पडले तर उजवीकडे कळकराईचे पठार मुख्य रांगेला काटकोनात जोडलेले. पेठच्या खिंडीतून येणारा ओढा पार करुन पुढे निघालो. आता पर्यंत वर डावीकडे दिसणारी कौल्याची धार जसं जसे आत जाऊ लागलो तशी नजरेआड गेली. पळस फारसा नजरेत आला नाही पण काटेसावर चांगलेच बहरलेले.
विरळ झाडीच्या जंगलातून वाट वर चढू लागली. महाशिवरात्री आणि होळी नंतर पानगळ सुरू होऊन वातावरणात थोडा उष्मा जाणवतो, हिवाळ्यातील आल्हाददायक वातावरण संपून ग्रीष्माच्या आगमणाची सुरुवात झालेली असते.
12.JPG
थोडे वर जात बघतो तर आजुबाजुचे पूर्ण गवत पार जाळून टाकलेले. आधीच पानगळ मुळे बोडकी झालेली झाडे आणि खड्या चढाईची वाट. सुरुवातीला चांगलाच दम काढला. वीस एक मिनिटात कातळकड्यापाशी आलो, थोडा दम खातो तोच मागून कुजबुज ऐकू आली पाहिले तर गावातील महिला मंडळ चक्क रानात सुट्टी घालवायला. पिशवित खायचं सामान हातात पाण्याची बाटली घेऊन सरासर कातळकडा चढून पुढे निघूनही गेले. पहिला सोपा टप्पा पार करुन छोटासा ट्रेव्हर्स मारत पुन्हा पुढच्या टप्प्यात आधारासाठी मोळी ठेवलेली जशी छोटी निसण जणू. शेवटचा अंगावर येणारा चढ पार करून वाट डावीकडे वळून ओढ्यातून वर आली. नंतर सौम्य धारेवरची चढाई करत पदरात आलो, इथे सुध्दा ठिकठिकाणी गवत जाळलेल. डावीकडे कोथळीगडाचा माथा डोकावला.
कळकराई ते पेठ ही पदरातली वाट पकडून पेठच्या दिशेने निघालो. नुकत्याच ३१ तारखेला वर्ष अखेर केलेल्या ‘नाळेची वाट’ ‘बैल घाट’ आणि ‘कौल्याची धार’ हा ट्रेक आठवला. https://ahireyogesh.blogspot.com/2018/01/nalechi-vaat-bail-ghat-kaulyach...
त्या वेळी याच पदरातून जात बैल घाटाची चढाई केली होती आणि आता आम्ही त्याच बैल घाटाने उतरणार होतो. बरोब्बर दहा मिनिटात नानांनी मुख्य वाट सोडून उजवीकडे वळत घेतलं. थोडं अंतर आत जात पाणवठ्यावर नाश्ता करायला थांबलो. मागोमाग गावातील रानात भटकायला निघालेली इतर मंडळी पाणी घेण्यासाठी आली ते सर्व या पाणवठ्याला ‘कोसमीचे पाणी’ असं म्हणतात. बाकी गर्दी पांगल्यावर आरामात नाश्ता करून निघालो. पदरातल्या जंगलात वाट शिरली. अस्पष्ट अशी वाट, त्यात पायाखाली नुसता सुकलेल्या पानांचा सडा. सोबत असलेल्या नानांनी वाट अचूक शोधली अन्यथा या पानगळच्या हंगामात या वाटा सहजपणे शोधता येण तसे मुश्किल. आंबा, हिरडा, बेहडा मोठ्या झाडांची दाटी त्यात जोडीला राक्षसी वेली. करवंदाला फुलांचा मोहोर येण्याची सुरुवात तर, बांबू आणि काय तो वेताचा प्रकार ही या ठिकाणी भरपूर.
जरी सह्याद्रीत हे कमी अधिक प्रमाणात सारखं असलं तरी भीमाशंकर भागातील घाटवाटे मधील हा पदरातला निमहरित जंगल टप्पा माझा खास आवडीचा. इथे येईपर्यंत अंदाजे निम्मी चढाई उतराई झालेली असते, दम खात, आरामात रेंगाळत पक्ष्यांची किलबिल ऐकत बसून रहावे असे. वाट मुख्य कड्याला डावीकडे ठेवून साधारणपणे दक्षिणेला तिरक्या रेषेत वर चढू लागली. वाटेतले हे मोठ्ठे दोन धोंडे हवं तर वाट ओळखायची खूण म्हणून लक्षात ठेवता येईल. चढ जरी उभा असला तरी जंगलात झाडांच्या सावलीत त्याचं काही वाटत नव्हते. जसे वर जाऊ लागलो तसा झाडीचा हा टप्पा संपून वाट बाहेर आली. मागे दूरवर कळकराई पठार आणि त्या अलीकडुन खालच्या टप्प्यात उतरणारी आमची परतीची फोदोंडीची वाट. तसं पाहिलं तर फार मोठा वेढा नव्हता आणि या भागात गेल्या काही महिन्यांपासून भरपूर वेळा येणं झालं होतं तरी पण अगदी कमी लेखून गाफिल राहु नये हा महत्वाचा नियम डोक्यात फिट्ट होताच. साठ सत्तर अंशाच्या काळ्या ठिक्कर दांडा वरून अगदीच निमुळती वाट. नंतर डावीकडे कडा, वाटेवर घसारा, खाली थेट एक टप्पा आऊट मामला अशी दीड दोनशे मीटरची एक्सपोज ट्रेव्हर्सी मारून छोट्या झाडीच्या टप्प्यात आले तेव्हा जरा बरे वाटले. सरबत आणि काकडी घेत इथेच विसावलो. माथ्या पर्यंतची अंदाजे अडीच तीनशे फूट सरळ सोट चढाई शिल्लक होती. काट्या कुट्यातून, गवताळ तसेच मुरमाड घसरड्या वाटेने उभी चढण पार करून माथा गाठला. समोरच्या घळी पल्याड बैल घाट तसेच त्यापुढे बैल दारा उर्फ पायरी घाट ते कळकराई पठार, कुठून कसं आलो तसेच पहात राहिलो. मस्तपैकी झाडाच्या सावलीत निवांत विश्रांती घेतली. भानावर येत घड्याळ पाहिलं तर बारा वाजून गेले होते. दरी उजव्या हाताला ठेवत नानांच्या मागे चालू पडलो.थोडं अंतर जात खाली दरीत मामांनी घुरळाचे पाणी दाखवले. बारामाही पाण्याची जागा, या ठिकाणी गावकरी एक विशिष्ट पाण्या सारखा घोघोऽऽ घोघोऽऽ आवाज करतात जेणे करुन आजू बाजूच्या बिळातून खेकडे बाहेर येऊन ते पकडता येतील.
नाखिंड्याच्या डोंगरावर पवनचक्क्या एकदम सुस्त निद्रिस्त अवस्थेत कारण हवा वाऱ्याचा पत्ता नाही. घाटमाथ्यावर असूनही अगदी फार कडक नाही पण उष्मा जाणवत होता अर्थातच पुढे वैशाखात याची खरी दाहकता जाणवणार. नाखिंड्याला डावीकडे ठेवत लोणावळा भिमाशंकर हायवे वर आलो. याच मार्गावर मागच्या काही ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या.
13.JPG
मधला छानसा झाडीच्या टप्प्यातून वाट मोकळवनात आली. मागं बैल घाटाने चढाई केली होती तेव्हा वांद्रे तळपेवाडीच्या वाटेवरची पाच टाकी नव्हती बघितली. या वेळी ती टाकी पहाण्याचे ठरले. मुख्य लोभी हायवे सोडून डावीकडे फारश्या न मळलेल्या वाटेने वांद्रे खिंडीच्या दिशेने निघालो.
जंगलातला चढ उतार संपवुन वाट बाहेर आली, पुढे ठिकठिकाणी दगडांवर बाणाच्या खुणा. खिंडी अलीकडे कातळात खोदलेल्या पाच टाक्या, त्यात दोन ठिकाणी पिण्यायोग्य पाणी तर बाकी पुर्ण बुजलेल्या अवस्थेत. माणशी किमान ४ लिटर पाणी प्रत्येकाकडे, त्यात जवळपास अर्धा कोटा संपलेला. दुपारचे जेवण बाकी होते टाक्या जवळ सावली नसल्याने तिथे थांबून जेवण करणे शक्य नव्हते. साहजिकच टाकीतील पाणी भरून घेत खिंड उतरायला सुरुवात केली. दाट कारवीच्या रानातून वाट बाहेर येत लहान ओढ्याजवळ उतरली. या भागात ही जंगल चांगलेच पण एक गोष्ट मात्र खटकली ती म्हणजे काही ठिकाणी चूल पेटवल्याच्या खुणा आणि जोडीला दारुच्या बाटल्या काय बोलावे आता ! ओढ्यापलीकडे छोटे टेपाड चढून मुख्य धारेवर आलो. लोभी हायवे लगत एका झाडाखाली जेवणाची पंगत मांडली. घरातून आणलेले मेथीचे पराठे, दही तसेच सुहास सरांनी आणलेल्या तांदळाच्या आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आणि लोणचं. एवढं भरपोट जेवण झाल्यावर मस्त ताणून दिली. साडेतीनच्या सुमारास जाग आली. पिट्टू पाठीवर चढवून अवघ्या पाच मिनिटांत बैल घाटाची सुरुवात झाली. अगदी रचाई करून बांधून काढलेली प्रशस्त वाट. तीन ते चार फूट रुंदीची वाट पध्दतशीर पणे सौम्य उतरणं घेत पुढे सरकत होती.
खरंतर हि सुरुवात पाहूनच मी थोडा चक्रावलो कारण अवघ्या दोन माहिनांपुर्वी मी याच बैल घाटाने चढाई केली होती, तेव्हा वरच्या या टप्प्यात अशी वाट नव्हतीच मुळी. प्रिती सोबत या वर चर्चा केली, ती पण विचारात पडली. म्हंटले बघू पुढे जाऊन काय ते येईल लक्षात. अर्थात तसेच झाले लहानशा ओढ्याजवळ वाट आली तेव्हा डावीकडे एक बारीक वाट वर गेलेली नजरेस पडली. मग खरा उलगडा झाला, थोडक्यात आम्ही मागच्या वेळी बैल घाटाने वर येताना याच ओढ्याजवळून मुख्य वाटेने वर न येता, डावीकडे कडा आणि उजवीकडे दरी अशा या बारीक वाटेने माथा गाठला होता तर. आता पुढची वाट डोक्यात फिट्ट बसलेली. झाडीच्या टप्प्यातून बाहेर येत कोरडा ओढा पार करुन पदराच्या वरच्या टप्प्यात आलो.
खाली दरीत कोथळीगड डोकावला तर उजवीकडे आम्ही आलो ती कोकणदांडाची वाट तिथला काळा ठिक्कर पडलेला तो कडा पाहून विश्र्वासच बसत नव्हता की कसं इथून वर आलो. सपाटीवर येताच उजवीकडे चार पावलांवर पुरातन दगडी देव. इथून डावीकडे वळून मळलेल्या पायवाटेने निघालो, आता पुढचा टप्पा होता ती पदरातली जुनी बांधीव बारव. पायाखाली पानगळ मुळे पानांचा सडा पडलेला त्याचा करकर आवाज.
एके ठिकाणी मोठे वारूळ नजरेत आले. पंधरा वीस मिनिटांच्या चालीनंतर जुन्या विहिरी (बारव) जवळ आलो. मागे दोनदा येऊन गेलो तेव्हा बऱ्यापैकी झाडीने झाकलेली या वेळी मात्र व्यवस्थित पहाता आली. विहिरीचे दगड मात्र येत्या काही दिवसांत कधीही ढासळू शकतात, काही ठिकाणी पडझड तर काही ठिकाणी झाडांची मुळे खोलवर रुजलेली. येवढ्या आत दाट रानात ही विहीर या वरून पूर्वी इथे किती राबता असेल याची कल्पना येते. खुद्द मेचकर वाडीतले अशोक मामांनी त्यांच्या आजोबांच्या काळी इथे बाजार भरायचा अशी माहिती दिली. विहीरीपाशी बराच वेळ रेंगाळलो इथे विविध पक्ष्यांचे आवाज त्यात प्रितीने बरेच फोटो घेतले. खरंच वसंत ग्रीष्म ऋतूची सुरवात थोडक्यात मार्च महिना हा कालावधी पक्षी निरीक्षण करीता अनुकूल असतो असं कुठंतरी वाचलेले आठवलं. घड्याळात पाहिलं तर पाच वाजलेले, दिवसभरात अगदी निवांतपणा अनुभवत इथं पर्यंत मजल मारता आली. आता फक्त पदरातून फोदोंडीच्या वाटेने अंदाजे हजार बाराशे फुटांची उतराई बाकी होती.
दहा मिनिटात नानांनी कळकराई ची मुख्य वाट सोडून उजवीकडील पायवाट अचूक धरली. सुरुवातीच्या झाडीतून वाट उतरत बाहेर आली तेव्हा दरी पलीकडे पुन्हा कोथळीगड त्याला जोडणारी कौल्याची धार तर त्याच्या उजवीकडे सकाळची पायीर घाट आणि कोकणदांडाची वाट. वातावरण स्वच्छ नसले तरी दूरवर खेतोबा पासून पदरगड, भीमाशंकर ते तुंगी सर्वांनी धूसर का असेना पण दर्शन दिले. तीव्र उतार संपवुन मधल्या टप्प्यात चक्क कातळकोरीव पायऱ्या. वाट पुरातन काळापासून वापरात असल्याची खूण. अर्थात आजही गावकरी याच वाटेचा जास्त करून घाटावर आणि कळकराईत जाण्यासाठी वापर करतात. शेवटची गवताळ सोंडेची घसरगुंडी संपवुन खाली आल्यावर कोरडी नदी ओलांडून गावात आलो. नाना दाते व अशोक मामांचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो.
14.JPG
एकवार मागं मान फिरवून पाहिले तर दिवसभराचा आमचा प्रदक्षिणा घातलेला मार्ग. खरंच सह्याद्रीतील घाटवाटांचे हे असले मार्ग हा एक वेगळाच मोह आहे. त्यापायी आमची पावलं पुन्हा पुन्हा इथे ओढली जातात यात शंकाच नाही.

अधिक फोटो सा ठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2018/03/kokandand.html

योगेश चंद्रकांत आहीरे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख रे योगेश. पूर्वी तुझे लेख वाचून पाय सळसळायचे, आता पाय सळसळायला लागल्यावर तुझे लेख वाचतो. Happy

मस्त लेख रे योगेश. पूर्वी तुझे लेख वाचून पाय सळसळायचे, आता पाय सळसळायला लागल्यावर तुझे लेख वाचतो. >>> हाहाहा.. थोडक्यात दुधाची तहान ताकावर भागवताय.