वावटळ अंतिम भाग - ५

Submitted by Vrushali Dehadray on 20 May, 2018 - 01:59

वावटळ अंतिम भाग - ५

‘या नेमक्या कशाबद्दल बोलताहेत? पण आमच्यात तर......’ तिथे तिचा विचार खुंटला.

‘काहीच नाही? नीट विचार करून ठरव. मी खरच निसरड्या वाटेवरून चाललीये का ?’

‘नाही चाललीयेस? मग दुसरी जागा का शोधत नाहीयेस? ज्या जागा मिळताहेत त्या फालतू कारण काढून का नाकारतीयेस? का गुंतते आहेस या नको त्या गुंत्यात?

'मी गुंतत नाहीये. फक्त काही क्षण मिळताहेत आनंदाचे, ते मी का नाकारू? सोहमच्या सहवासात मी माझीच मला सापडले.'

‘आता शोधलं आहेस ना स्वत:ला, मग तो आधार आता सोडून दे आणि स्वत:च्या पायावर उभी रहा.’

‘पण हा कृतघ्नपणा नाही का? त्याला माझी गरज असेल तर?’

‘तू नक्की ठरव. कोणाला कोणाची गरज आहे?’

‘रुहीचा काही विचार? हे असा दोन दगडांवर पाय ठेवून आयुष्य जगायला जमणार आहे का? कधी ना कधी तर पुण्याला परत यावेच लागणार. त्यावेळी परत पाहिल्यासारखे आयुष्य जगायला जमणार आहे? त्यापेक्षा फार पुढे गेलो नाहीये तोवरच परत फिरावं. लोकापवादाला तोंड देण्याच धारिष्ट्य आपल्यात नाही. वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी फक्त स्वत:च्या सुखासाठी उंबरठा ओलांडण्याच धाडस आपल्यात नाही. शेवटी सासूबाई म्हणाल्या तेच खर. आवडला नाही तरी रोजचा रस्ता सवयीचा. प्रवास करताना आनंद नाही मिळणार पण त्यावरून चालताना शरम वाटणार नाही, खेद वाटणार नाही, तो रस्ता नेमका कुठे नेतो आहे याची काळजीही वाटणार नाही.’

निर्णय झाला होता. पुढे जाणारे पाउल मागे घ्यायचे. तिने ठरवले की सोहमशी स्पष्ट बोलायचे. दुसऱ्या दिवशी ती नेहमीप्रमाणे ऑफिसला गेली. संध्याकाळी घरी गेल्यावर सोहमशी कसे बोलायचे त्या विचारांची जुळवाजुळव करत राहिली. सोहम आला. तिने त्याला चहा दिला.

“मला बोलायचं आहे तुझ्याशी.”

त्याला बहुतेक थोडाफार अंदाज आलाच होता. तो अस्वस्थपणे कप चाळवत राहिला.

“तुला माहितीये तू तापात काय बडबडत होतास?”

त्याने तिच्याकडे पाहिले.
“माझा हात पकडून म्हणालास की मला सोडून जाऊ नकोस. काय अर्थ होता याचा? मी दुसरे घर बघत होते. जेव्हा नवऱ्याला विचारून सांगते म्हटल्यावर तू अस्वस्थ झालास. का? त्याच दरम्यान तुला ताप आला. का?”

“हे बघ. प्रश्न माझ्याकडे पण आहेत. दर वेळी नवीन घर बघताना काही तरी फालतू कारणाने नाकारत राहिलीस. का ? प्रत्येक छोटी गोष्ट नवऱ्याला सांगणारी तू, पहिल्यांदा रात्री माझे गाणे ऐकलेस ते तुझ्या नवऱ्याला सांगितले नव्हतेस. का? त्याच्याशी नंतर बोलतांना माझ्या ते लक्षात आले. का नाही त्याला सांगितलेस? आपण गाण्याच्या कार्यक्रमांना जायला सुरुवात केली. त्याला हेही खूप दिवस माहित नव्हते. का? माझ्या तापाच्या वेळचे सगळे डीटेल्स त्याला सांगितले नाहीस. हो ना? का? मला वाटत, लेट्स स्टॉप प्रिटेंडींग अँड फेस द फॅक्ट्स. तुलाही माहितीये आणि मलाही माहितीये सत्य काय आहे ते.” तो तिच्याकडे रोखून बघत म्हणाला.

तिने त्याची नजर टाळली. “नको बोलूस. काही गोष्टी अव्यक्त राहिलेल्याच चांगल्या.”

“इतके दिवस तशाच होत्या. पुढेही राहिल्या असत्या. बोलल्याने काय होईल हे मलाही माहित होते. पण तूच सुरुवात केलीस. आता आपल्या दोघांमध्ये काहीच नाहीये असा बहाणा करण्यात काहीच अर्थ नाहीये. थांब, मध्ये बोलू नकोस. मला बोलायचं आहे, मला व्यक्त व्हायचंय . ही घुसमट आता मलाही सहन होत नाहीये. तू आवडतेस मला. नाही हे फारच साधे शब्द झाले. खरं तर तू सतत माझ्या बरोबर हवी आहेस. तुझ्या साक्षीने मला प्रत्येक श्वास घ्यायचा आहे.”

“नको बोलूस असे. मला भीती वाटते. हे योग्य नाही.”

“काय योग्य नाही? तू माझ्यापेक्षा मोठी आहेस ते का तुझे लग्न झाले आहे ते, का तू एका तरुण मुलीची आई आहेस ते? मी ही असली बंधने मानीत नाही. तुला माहितीये ते.”

“पण मी मानते हे तुलाही माहितीये.”

“का मन मारातीयेस स्वत:चे? खर सांग, सुखी होतीस तू तुझ्या संसारात? प्रेम आहे आहे तुझे तुझ्या नवऱ्यावर? माझ्या बरोबर वावरताना तुला आलेली तृप्ती मला जाणवलीये. गेल्या काही विकेंडला इथून बाहेर पडताना होणारी तुझी कासाविशी मी अनुभवलीये. नवऱ्याने ‘इथेच रहा’ म्हणून सांगितल्यावर शांतावलेलं तुझं मन मला दिसलयं. माझ्याकडे बघ आणि सांग की हे खोटं आहे म्हणून.”

“मला मान्य आहे, यातली प्रत्येक गोष्ट खरी आहे. गेल्या काही महिन्यात मी जे तुझ्याबरोबर अनुभवलंय ते विलक्षण आहे. मला आयुष्यात या सुखाची चव पहिल्यांदाच मिळालीये. पण मी वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून कुटुंबाकडे पाठ नाही फिरवू शकत.”

“पण मी कुठे तुझ्याकडे काही मागतोय? मला तुझ्याकडून आणखी काही नकोय. जे मिळतंय तेवढ्यावर मी तृप्त आहे असे नाही म्हणणार मी. फक्त इथेच राहा माझ्या बरोबर. आत्ता आहे तसच आपण चालू ठेवूया.”

“हे तुलाही माहितीये की आता एकमेकांशी इतके स्पष्ट बोलल्यावर आहे तसेच नाही रहाणार. ओला टॉवेल तुझ्या उघड्या अंगावर ठेवताना तुझ्या कुशीत शिरण्याची वाटलेली ओढ मी नेहमी नाही काबूत ठेवू शकणार. तुझ्या जवळ बसल्यावर तुझ्या डोळ्यात जे दिसतं त्यावर तुझा तरी अंकुश रहाणार आहे का? प्रेम आणि शरीर हे तू मानतोस तसे वेगळे कॉंटिन्युअम नाहीयेत हे आता तरी पटल असेल तुला. आणि मी मनाने नवऱ्याशी बेईमानी केली हेच खूप आहे. मी ती बेईमानी शरीराच्या पातळीवर नाही नेऊ शकत.

ऐक तू माझं. या नात्याला भविष्य नाही. शेवट नसलेल्या रस्त्याने चालणे हे कृष्ण विवराच्या दिशेने जाण्यासारखे आहे. एकदा प्रवास सुरु केल्यावर थांबणे आपल्या हातात राहणार नाही. मार्ग बदलणे ही तेव्हा शक्य होणार नाही. आत्ताच थांबूया. तुझ्या सोबतीने मिळालेल्या सुखाच्या क्षणांच्या आठवणीवर पुढचं वाळवंट पार करीन मी. मी पुढच्या आठवड्यापासून महिन्याभराच्या रजेवर जातीये. तसाच पुढे बदलीसाठी अर्ज करणार आहे . बदली झाली नाही तर राजीनामा देईन.” ती एका दमात बोलून गेली.

त्याचा हताश चेहरा, डोळ्यातले व्याकूळ भाव यांकडे जीवाच्या कराराने दुर्लक्ष करत ती उठली. पुढचा आठवडा एकाच घरात राहून दोघे एकमेकांना टाळत होते. रात्री तो उशिरा घरी यायचा आणि सकाळी तो उठण्याआधी ती घराबाहेर पडायची. आवश्यक तेव्हा ते एकमेकांना मेसेज करत होते. ती जायच्या आदल्या दिवशी सोहम लवकर घरी आला. ती सामानाची आवराआवर करत होती. “आटपल सगळ?” नेहमीप्रमाणे कपाळावर बोट घासत तिच्या खोलीच्या दारात उभं राहून त्याने विचारलं?” खूप दिवसांनी तिने त्याच्याकडे नीट पाहिलं. त्याचा उतरलेला चेहरा आणि डोळ्याभोवातालचं काळ पाहून तिच्या पोटात तुटलं.

“आज जेवायला बाहेर जाऊया? शेवटचं?” तिने मान हलवली.

हॉटेलमध्ये दोघे नि:शब्द बसले होते. ती मुंबईत आल्यावर पहिल्या दिवशी हॉटेलात बसले होते तसेच. दोघेही नुसतेच अन्न चिवडत बसले. शेवटी ते देखील अशक्य झाल्यावर सोहम उठला. त्याच्यामागोमाग तीही बाहेर पडली. तसेच अबोलपणे ते घरी पोचले. आपापल्या खोल्यांमध्ये गेले. ती कितीतरी वेळ ती तळमळत होती. शेवटी उठून बाहेर आली. सोहमच्या खोलीचे दार बंद होते. तिने कुमारचा फोल्डर सुरू केला. ‘कुदरत की गती न्यारी’ गाण्याबरोबर तिचे डोळे अविरतपणे पाझरत होते. कपाळावर पडलेल्या गरम थेंबाचा स्पर्श झाल्यावर तिने डोळे उघडले. सोहमचे अश्रू तिच्या कपाळावर पडत होते. आतामात्र ती स्वत:ला रोखू शकली नाही. ती त्याच्या मिठीत कोसळली आणि स्फुंदून रडू लागली. तो शांतपणे तिला थोपटत राहिला.

“उठ, झोपायला जा. कितीची गाडी आहे?” त्याने मोठ्या कष्टाने तिला स्वत:पासून वेगळे करत तिला विचारले.

तिने नुसतीच मान हलवली पण ती हलली नाहे. “तू गा ना.”

“जमत नाहीये.” तो घोगऱ्या आवाजात म्हणाला. पहाट होईपर्यंत त्याने तिला तसेच धरून ठेवले. शेवटी तो कॉफी करायला उठला.

“मला विसर .” ती म्हणाली. त्याने समजूतदारपणे तिच्या हातावर थोपटले.

कॉफी पिउन झाल्यावर तो उठला. “जाताना मला हाक मारू नकोस.” तो तिच्याकडे न पाहता म्हणाला आणि स्वत:च्या खोलीत गेला.
घरी येऊन तिला दोन तीन दिवस झाले होते. ती यांत्रिकपणे घरातली कामे उरकीत असायची पण कशातच तिचा जीव नसायचा. सासूबाई त्यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या. मुलगी आणि नवरा त्यांच्या रुरुटीनमध्ये. आल्यापासून सोहमचा फोन किंवा मेसेज काहीच नव्हते. तिनेही ते कटाक्षाने टाळले.

“आई, तू का आलीयेस?” त्या दिवशी लवकर आलेल्या मुलीने विचारले.

“म्हणजे?” तिने मुलीची नजर टाळत विचारले.

“तुला कळलय मी काय विचारते आहे ते.”

“अग खूप कंटाळा आला होता. आजीपण इथे नाहीये. तुमची पण पंचाईत होत होती. म्हणून आले.”

मुलीने तिच्या हाताले भांडे काढून घेतले. “चल बाहेर. मला तुझ्याशी बोलायचे आहे.”

दोघी डायनिंग टेबलाच्या खुर्च्यांवर समोरासमोर बसल्या. ती अस्वस्थपणे हाताली बांगडी चाळवत राहिली.

“आई, खर सांग मला. तू का आली आहेस? एक मैत्रीण समजून सांग. तू सांगते आहेस हे कारण खरे नाहीये हे मला कळतंय. एकदा मला सांगून तर बघ. बर वाटेल तुला. तू इथे आल्यापासून किती अस्वस्थ आहेस ते दिसतंय मला.”

तरीही ती काहीच बोलली नाही.

“सोहमशी रिलेटेड आहे ना हे मॅटर? प्लीज आई, बोल. घुसमटते आहेस तू.”

एवढे ऐकल्यावर मात्र तिचा बांध फुटला. कोंडली वाफ बाहेर पडावी तसे ती लेकीला सगळे सांगत राहिली. कोणताही आडपडदा न ठेवता. एकीकडे तिला रडायला येत होत. पण तरीही ती नेटाने सांगत राहिली. मुलगी शांतपणे सगळे ऐकत राहिली.

“....म्हणून मी इथे यायचा निर्णय घेतला. तुला राग येत असेल ना माझा? ज्या वयात मुलीकरता जोडीदार शोधायला सुरुवात करायची असते त्यावेळी तिची आई ---.” तिला परत हुंदका आला. “मी एक नालायक आई, नालायक बायको आहे. कसा माझा मनावरचा ताबा गेला?”

“आई, रडू नकोस.” मुलगी हातावर थोपटत म्हणाली. “मला लहानपणापासून जाणवायच की तू आणि बाबा यांच्यात काहीतरी वेगळं आहे. पण नेमक काय ते तेव्हा कधी समजलं नाही. पण कॉलेजात गेल्यावर ते जाणवायला लागलं. बाबांची प्रत्येक गोष्टीतून अंग झटकण्याची वृत्ती, प्रत्येक काम व्यवस्थितपणे होण्याकरता झटत राहणारी तू, तुझ्या आनंदाकडे आम्ही केलेलं दुर्लक्ष, असं बरच काही. खर सांगू, तू मुंबईला जायचं ठरवलस तेव्हा मी तुला जा म्हटलं तरी मला ते फारस आवडल नव्हतं. तू मुंबईला गेल्यावर तुझ्यात होणारे छोटे छोटे बदल मी टिपत गेले. तुला आठवतंय मी माझ्या प्रोजेक्टच्या कामाला मुंबईला आले होते. तेव्हाच मला तुमच्यात काहीतरी घडतंय हे जाणवलं होतं. मला सुरुवातीला रागच आला होता तुझा.. पण आयुष्यात पहिल्यांदा तुला इतक्या आनंदात बघितलं. तुमच्या दोघांच्या आवडीनिवडी जुळणाऱ्या होत्या. तेव्हा पहिल्यांदा तुझा विचार मी मुलगी म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून केला. माझ्यातल्या स्त्रीला जाणवलं इतकी वर्ष जी स्त्री आनंदापासून पारखी झालेली असते तेव्हा तिच्या वाट्याला काही आनंदी क्षण आले असतील तर ते क्षण आणि ते क्षण देणारा माणूस नाकारणे हे अन्यायकारक आहे.”

“हे गुंतणे चांगलं नाही गं. माझ्या आनंदाकरता मी कुटुंब नाही पणाला लावू शकत. आणि जननिंदेला तोंड देण्याचे धाडस माझ्यात नाही. उद्या काही वर्षांनी तुझ्या लग्नाचा प्रश्न येईल तेव्हा मी किती पुढे गेले असेन कोण जाणे. स्वत:पेक्षा वयाने लहान असणाऱ्या पुरुषाशी अनाम नाते असणारी आई हे लग्नाळू मुलीसाठी काही चांगले क़्वालिफ़िकेशन असू शकत नाही.” शेवटचे वाक्य बोलताना तिचे तिलाच हसू आले.

“चील. पुढचे पुढे. भविष्यातले कोणी बघितले आहे. माझ्या लग्नाची काळजी करून तू स्वत:ची घुसमट करून घेउ नकोस.”

“पण हे आता आहे तसे कायम नाही चालू शकणार. दोन दगडावर पाय ठेउन मी नाही जगू शकत.”

“मग निर्णय घे. ज्यामुळे तुझी घुसमट थांबेल. मी तुझ्या पाठीशी आहे. बाबांशी स्पष्ट बोल. जगाची काळजी करू नकोस. आजीला मी समजावेन. मला खात्री आहे. तिला त्रास होईल पण ती तुला नक्की समजून घेईल. राहता राहिला प्रश्न बाबांचा. मला वाटत ही गोष्ट सुद्धा ते नेहमीच्या अलिप्ततेने स्वीकारतील. लोक चार दिवस बोलतील आणि गप्प बसतील.

“हे एवढा सोप नाहीये ग.”

“मला माहितीये ते. पण आपण दोघी मिळून तोंड देऊ जे होईल त्याला. बदलीचा अर्जही देऊ नकोस आणि राजीनामाही देऊ नकोस. हा फोन घे आणि सोहमला कळव तू उद्या मुंबईला येते आहेस म्हणून ” ती ठामपणे म्हणाली. मुलीमधल्या त्या आत्मनिर्भर स्त्रीचे दर्शन बघून ती दिपून गेली.
तिने सोहमला मेसेज केला आणि मुलीने दिलेला चहाचा कप घेउन ती गॅलरीमधे उभी होती. समोर धुळीची वावटळ उठली होती आणि मनात विचारांची. त्या वावटळीमध्ये वर खाली होणाऱ्या पानाकडे बघत होती, भयशंकीत होऊन – या पानाचे भविष्य काय आणि आता माझेही?

समाप्त

Group content visibility: 
Use group defaults

Pages