बाप

Submitted by अनाहुत on 1 June, 2018 - 22:26

" अय हिकडं कूट ? तिकडं रस्त्याकडंच कपडे बग तुला परवडायची नाहीत इथली कपडे . " दरवाननं त्याला हटकलं.
" तस नाय दादा . पोरग लय माग लागलं होत म्हणून आलो होतो . आन मी पैशे जमवल्यात त्यासाठी . " त्यानं अजीजीनं सांगितलं .
" बर जा आत "
त्यानं सगळीकडं पाहिलं खुपच भारीभारी कपडे होते तिथं . कुठला निवडावा आणि कुठला नाही असं झालं होत त्याला त्यातल्यात्यात एक मस्त ड्रेस बघून त्यानं किंमत विचारली किंमत ऐकून तो बुचकळ्यात पडला " दादा मोठ्या माणसाचं नाय लहान लेकरासाठीच कपडे पायजे त्याची किंमत सांगा . "
" अरे दादा ही त्याचीच किंमत आहे . " दुकानदार त्याला न्याहाळत म्हणाला .
" बर " असं म्हणत तो निघाला .
बाहेर आल्यावर त्याला दरवान न विचारलं " काय झालं ? "
" नाही जरा महाग हाय. " तो म्हणाला .
" आर मी तुला सांगितलेलं कि महाग आहेत ते, तुला नाही परवडणार . " - दरवान
" ते तस न्हाई अजून वेळ आहे घेईन मी अजून थोडं पैसा जमा झाल्यावर . " त्यानं चिकाटी दाखवली .
बर झालं आपण लवकर चौकशी केली . आता याच्यासाठी काहीतरी करता येईल पुढचा महिना . त्यानं जास्तीच काम करायला सुरुवात केली शरीराला थकायला होत होत पण त्याची तमा न बाळगता त्यानं आपलं काम सुरु ठेवलं शेवटी एकदाची रक्कम गोळा झाली अन त्यानं आपला मोर्चा दुकानाकडे वळवला . वाटेत नाना भेटला , " आप्पा लगबगीनं निघालाय . "
" ती जरा खरेदी करायचीय . " - आप्पा
" वा झाक हाय कि . काय खरीदी हाय " - नाना
" पोराला शर्ट आणि मला एक बन्याल घेणार हाय . "
" घ्या घ्या . "
" बरं " असं म्हणत तो निघाला . तिथं पोहचून पाहिलं तर ड्रेसची किंमत वाढली होती
"दादा मागं बघितला तवा कमी हुती किंमत . "
" दादा आता सिझन आहे त्यामुळं वाढवली आहे . आणि फार नाही वाढवली . " त्यानं हिशोब लावला . त्याचा सगळाच खिसा मोकळा होणार होता . तरीही त्यानं तो ड्रेस घेतला .
त्यानं मोठ्या हुरूपान कपडे पोरासमोर धरले .
" अप्पा तुमलातर कायसुदिक कळत नाय कपड्यातल कसला आणलाय ड्रेस ? "
" आर चांगला हाय कि . घालून तर बग . "
" काही नको मला. " असं म्हणून त्यानं तो शर्ट फेकून दिला . अप्पानं तो उचलून घेतला , नीट घडी घालून त्याला आत ठेवला .
" अप्पा आर दुपारी कापडं घेऊन आलास ना ? "
" हो "
" आन बन्यान पण आणणार होतास ना आर मग बदलायचं न्हवत वय , हे पाक फाटलंय कि "
" असुदे कि वार येतं चांगलं आणि जाईल अजून काही दिवस . "
" अन पोरग जुनीच कापड घालून फिरत होत ते . "
" त्याला नाही आवडला . त्याची समजूत काढीन मग घालल त्यो . पण मलाबी नाय कळत कपड्यातल . फूडच्यावेळी त्यालाच घेऊन जाईन मग होतील त्याला हवी तशी कापड . "
" आर अप्पा उशिरानं झालेलं पोरग हे आई विना लेकरू हाय , तुजी तब्बेत बी काय फार चांगली नसतेय . अन कूट मरमर करत बसतोस . "
" न्हाय पोरासाठी नाय तर कुणासाठी करायचं ? "
" हे बग शरीराला जितकं झेपत तेव्हढच करावं माणसांन . आर त्याच्या कुवतीच्या बाहेर गेलं कि हे आमच्यासारख दारू पिऊन पडाव लागत मग काय दुकतय , काय खुपतंय काय कळत नाय पण असं कुठवर परत दारूचं यसनच लागत मग दारू काय सोडत नाय आपल्याला . मग काम राहत बाजूला आणि दारूचं आठवते . शरीराचं पाक मात्र होत . आमचं काय आता आमची दारू काय सुटायची नाय . तुला अजून काय यसन नाय . तू ह्यात पडू नगो . अन हेच न्हाय तर एखादा आजार जडायचा . तुज्या जीवाचं काय बरंवाईट झालं तर मग त्या पोराचं हाल कुत्र बी नाय खाणार . आर तुज पोरग हुशार हाय . त्याला शिकवं . त्याच्या नशिबानं झालं तर काहीतरी चांगलं होईल . हे आमचं बेनं जितक दिवस शिकायला गेलं तेवडे दिवस मास्तरलाच शाळा शिकवून आलं. त्यामुळं त्याच आता काय वाटत नाय . तो त्याच्या नशिबाचा . पण त्याला यवार कळतो . तो कसाही राहील . तुझ्या पोराचं तस न्हाय . त्याला यवार कळत नाय . त्याला जप . आन पैसा त्याच्या शिक्षणाला घाल . त्यालाबी लै पैका लागतो . "
" नाना तू हाइस म्हणून काय तरी कळतंय बग न्हायतर नुसताच यड्या बगाड्यावानी व्हायचं माझं . तू म्हनतु तसाच करतो बग . "
रात्री झोपलेल्या पोराच्या डोक्यावरन हात फिरवताना त्याला बरीच काळजी पडली होती .
' शेवंता कशी सोडून गेलीस मला . आता दोनीकडचा इचार करावा लागतोय . स्वतःची काळजी घेऊनच कष्ट करायला हवं . पण तू काळजी नगो करू, मी करीन सगळं यवस्तीत . '
===========================================================
" आर आप्पा आपला शिरपती सायब झालाय . त्यानं हिकड कुणाची काही वळकं न्हाय ठिवली त्यामुळं कुणाला दिखील माहित नाही . आज कार्यक्रम आहे त्याचा . आपला ईशनु गेला हुता त्यानं फोटो बघितला आणि वळाकल . "
" बर झालं मला सांगितलं मी जातो आता तिकडं . त्यानं घरातली सांदीकपारी शोदली . हाताला लागलं तेवढ पैस घेतलं . वडाप लागलच होत म्हातारा कोपऱ्यात जाऊन बसला . उतरताना " आबा आर २ रुपये अजून "
" न्हायती माझ्याकडं हूत तिवड दिल . " त्यानं एकवेळ म्हाता-याकडे पाहिलं आणि हातातली चिल्लर त्याला माघारी दिली " असू दे आणि माघारी जाताना ये तुला सोडतो . "

चौकशी करत करत म्हातारा त्या इमारतीपाशी पोहोचला पण त्याला बाहेरच अडवलं
" म्हातारबाबा हिकडं कूट देवाळ हाय का हे ? कार्यक्रम आहे मोठा . "
" आर म्हायती हाय मला . तुमचा सायब आमच्या गावचा हाय . एक टाइम बघतो अन मग जातो . "
" व्हय का बर जा आन बाजूला उभा राहा लय पुढं जाऊ नको . " म्हातारा सगळीकडे कौतुकाने बघत निघाला होता . मोठा हॉल होता . बरीच गर्दी होती . म्हातारा एका बाजूने हळूहळू पुढं जात सगळ्यांच्या पुढं जाऊन पोहोचला . समोर श्रीपती बोलत होता .

" मी स्वतःच्या हिमतीवर इथपर्यंत आलो आहे . कोणाचीही काहीही मदत नाही घेतली . " - श्रीपती

म्हाताऱ्याच्या डोक्यात भूतकाळ रुंजी घालत होता .

" आप्पा मला दप्तर पायजेल ती पिशवी नगो पोर हसत्यात . "
" आर कशाला ती दप्तर आन काय ही पिशवी हाय कि भारी "
" नाय मला दप्तर पायजेच नायतर मी जात नाय साळला . "
" बर आणू आपण "

" मुकादम ते जरा पैस पायजे होत . " - आप्पा
" अर मग घे कि जाताना पगार " - मुकादम
" ते न्हाय वायच अंगावर पायजे हूत "
" आप्पा सारक सारक हुतंय बग तुज . आन तुला दिल्यावर बाकीचीबी मागणार कि "
" ह्या टायमाला द्या वायच नड हाय "
" बर घे . पण आता परत नाही . "
" जी जी "

" मला डिसेकशन बॉक्स घ्यायचाय "
" ते काय असत ते लागत त्याशिवाय बसू देत नाहीत "

" आर पोराला आन कि कामाला कशाला शिकायची नाटक करताय कूट मोठा सायब होणारे ? तुला झेपत नाही आता , सारख्या सुट्या होताहेत . "
" नाय मला काय बी नाय झाल , मला सुट्टी नको मी यतो कामाला . "

" आप्पा सारक सारक पैस द्यायला काय झाड लागलाय का ? "
" मी देतो कि सायब तुमचं सगळं पैस "

" मला क्लाससाठी पैसे हवे आहेत . "
" न्हायत माझ्याकडं . " आप्पा पहिल्यांदाच तोडून बोलला .
" मग मी जातो घर सोडून . "
" कधी जाणार ? "
" आत्ता जातो "
" जा मग "
त्यानं तणतणत सामान भरलं आणि तो निघाला . तो दृष्टीआड होईपर्यंत आप्पा त्याच्याकडं बगत बसला .
' बर झालं चांगल्या टायमाला गेलास '

रात्र डोळ्यातच गेली , सकाळी कधीतरी त्याला डोळा लागला असेल तेव्हड्यात कुणीतरी दार वाजवलं . त्यानं दार उघडलं . दारात रंगा उभा होता .
" ए आप्प्या चल पैशे टाक माझं " असं म्हणून गचांडी धरली त्याची आणि दोन तीन ठेऊन दिल्या . म्हातार तडपडल .
" आर म्हाताऱ्याला कूट मारतो " - रावजी म्हणाला .
पण रंगा ऐकण्याच्या मनस्थितीत न्हवता . " जीव घेईन त्याचा माझं पैसे पायजेल मला आत्ताच्या आत्ता . " .
" आर त्याचा जीव घेऊन मिळनारेत का तुला पैशे ? कायतरी कामाचं बघ . " - रावजी त्याला समजावत म्हणाला .
" हे घर कर माझ्या नावावर . चल हो भायेर . "
रंगा काही ऐकेल असं वाटत न्हवत पण रावजी मध्ये पडला म्हणून ते तेव्हढ्यावर भागात पण त्याला घर सोडणं भागच होत . तसल्या थंडीत मार खाऊन म्हातार बाहेर पडलं त्या धक्क्यानं त्याची तब्बेत खालावली ती काय परत सुधारली नाही पोराला त्यानं हुडकून काडलं . त्याच्या पत्त्यावर मनी ऑर्डर करू लागला . पोरग भेटलं तर नाय पण मनी ऑर्डर तरी घेत होत . फार काही देता येत न्हवत पण जमल तस देत होता तो . सगळा भूतकाळ फेर धरून त्याच्यासमोर नाचत होता .

" स्वतःच्या जीवावर शिकलोय आणि इथवर पोहोचलोय मी " टाळ्यांचा कडकडाट होत होता .

"आप्पा हुईल सगळं पण अपेक्षा ठेवू नको काही . " नानाच शब्द त्याच्या कानात परत ऐकू आले . म्हातारा समाधानानं बाहेर पडला . ऊन फारच झालं होत थोडीशी चक्कर आल्यासारखं वाटत होत म्हणून थोडासा टेकला .
" ए म्हाताऱ्या ऊठ इथून . " त्याला तिथंही हटकलं .
" आर जरा भोवळ आल्यासारखं वाटलं म्हणून टेकलो होतो . "
" आर आमचं काय नाय पण मालकाला नाय आवडत डायरेक नोकरीची धमकी देतात . पोरंबाळं हायेत म्हणून म्हणालो . "
" न्हाय न्हाय मला काय झालय मी उठतो कि तू काळजी नगो करू " उठताना म्हातारा थोडा तडपडला तस त्यानं हात दिला .
म्हातारा उभा राहिला . " हे घे " म्हणत त्यानं खिशातली चिल्लर काढून त्याला दिली . " पोरास्नी चाकलेट घे "
" अहो कशाला ? "
" असू दे असू दे " म्हणत म्हातारा निघाला . थोडं अंतर पुढं गेला आणि चक्कर येऊन पडला . जाणारे येणारे पाहत होते, कुणी थांबत होत, बराच वेळाने कुणीतरी जवळ जाऊन पाहिलं " गेलं म्हातार " म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान होत पण डोळ्यात कुणाचीतरी प्रतीक्षा मात्र दिसत होती .

Group content visibility: 
Public - accessible to all site users