आमच्या आईचा काळा मसाला.

Submitted by vijaykulkarni on 19 May, 2018 - 00:12

परवाच एका घरी काही कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. मिसळ पाव चा बेत होता. मिसळीची उसळ अप्रतीम असल्याने सहाजिकच कुतुहलाने विचारले की कोणता मसाला वापरला? उत्तर आले की "आमच्या आईचा काळा मसाला". चेहेर्‍यावर आईची आठवण आल्याची व्याकूळता, आईच्या सुगरणपणाबद्दल अभिमान, आता हा वाटीभर मसाला मागतो की काय? ही भिती, हे सर्व होते. यजमानीण बाईंचे भाव पहाता त्यांच्या डेबिट कार्ड चा पिन मिळेल पण मसाला मिळणार नाही हे जाणवले. Happy

पण मला मात्र आठवले की आपल्याही घरी हा जादूई मसाला आहे, कोणत्याही बिघडलेल्या पदार्थाला "दुरुस्त" करायची किमया हा करतो. कृष्णाकाठच्या वांग्यांच्या तुलनेत अमेरिकेत मिळणारी वांगी एकदम बोगस. पण तीही हा मसाला लागताच खाणेबल होतात. मला तर वाटते की थर्माकोल चे तुकडेही जर तेलात परतून घेतले व त्यावर आमच्या आईचा काळा मसाला घातला तर खाता येतील. कधी फारच कंटाळा आला तर चुरमुर्‍यांत कच्चे तेल, काळा मसाला, शेंगदाणे व डाळे मिसळले की चिवडा तयार.

माझे मन मात्र एकदम भूतकाळात गेले व आमच्या लहानपणी हा मसाला करायचा प्रसंग आठवला, लाल मिरच्या आणणे, त्यांना ऊन दाखवणे, मग परतणे ( चाळभर त्याचा खाट) , मग बाकिचे जिन्नस परतणे व ते सर्व घरीच कांडणे! ताजा ताजा मसाला, तेल व सकाळी केलेली भाकरी म्हणजे स्वर्गच. कधी कधी मी काळा मसाला व शेंगदाण्याचे कूट भरून भरली वांगी करतो. ते सारण मिसळताना कीबोर्ड शी खेळून सुखासीन झालेली बोटे इतकी भगभगतात की हा मसाला करायला त्या माऊलीला किती कष्ट झाले असतील हे आठवून डोळे पाणावतात. असे म्हणतात की देवाला प्रत्येक घरी जाता येत नव्हते म्हणून त्याने आई पाठवली. मी म्हणेन की आईलाही प्रत्येक मुलाच्या घरी जाता येत नाही म्हणून ती काळा मसाला पाठवते.

कुणाचा काळा मसाला, कुणाचा वर्‍हाडी तर कुणाचा मालवणी व आणखी काही. तुमच्याही आठवणी असतीलच ना आईच्या मसाल्याच्या?

Group content visibility: 
Use group defaults

मिसळीत काळा मसाला वापरायची फॅशन नाही आत्ता तरी. उसळ मिसळ मसाला किंवा कांदा लसूण मसाला वापरतात झणझणीत चवीकरता आणि लालभडक तर्रीकरता.

वांगी एकदम बोगस. पण तीही हा मसाला लागताच खाणेबल होतात.>> अगदी अगदी. कालच वांगी करताना हा मसाला नसता तर वांगी करताच आली नसती हा विचार येऊन गेला. Happy भातावर हा मसाला आणि तेल घालून मस्त लागते.

आम्ही वापरतो मिसळसाठी घरचा मसाला.
आईकडे गेले की वर्षभरासाठी लागणारा मसाला करुन घेते. तिचा पहिला प्रश्न असतो कि कसा मसाला पाहिजे झनझनीत कि कमी तिखट? त्यानुसार ती २-३ प्रकारच्या मिर्च्या निवडते. जास्तीच्या लाल रंगासाठी वेगळी मिर्ची पावडर करुन घेते. तिच्याबरोबर मसाला करायला मजा येते. आम्ही लहान होतो तेव्हा ती आजीकडे जाऊन मसाला/चटणी करुन आणायची. आता आम्ही मुली तिच्याकडून घेऊन येतो Happy

जागू ने इथे त्या मसाल्याची सुंदर छायाचित्रांसहीत पाकृ लिहिली आहे.

मस्तच! आवरते घेतले. अजुन लिहिले असते तरी चालले असते.
‘डेबिटकार्डचा पिन मिळेल पण मसाला नाही’ हाऽहाऽहा!

विजय कुलकर्णी
तुमच्या आईचा जो काळा मसाला आहे तोच बहुदा माझ्या सासूबाईन्चा काळा मसाला आहे. बाजारात बेडेकर किन्वा इतरान्चा जो गोडा मसाला मिळतो तो हा नव्हे . हा मसाला बाजारात कुठेही मिळत नाही.
माझे सासर नागपूरचे आहे आणि माझ्या सासूबाई ज्या मूळ कोकणातल्या; हा मसाला तिथे शिकल्या.
काळा मसाला बनवण्यासाठी मसाल्याचे जवळजवळ सर्व जिन्नस वापरले जातात, म्हणजे धणे जास्त प्रमाणात ; सुक्या मिरच्या,जिरे, लवन्ग, मिरी दालचिनी, नागकेसर, दगडफूल, वेलची, जायफळ, तमालपत्र, खसखस आणि सुके खोबरे .एखादा जिन्नस विसरला असण्याची शक्यता आहे पण खरोखरच कुणाला हवे असेल तर माझ्याकडे सर्व जिन्नस आणि प्रमाण लिहिलेले आहे .
हे सर्व जिन्नस तेलात तळून घ्यावे लागतात .त्याआधी निवडणे आलेच .कडकडीत उन्हात दोन दिवस वाळवले तर तळणे जरा सोपे जाते. तेल भरपूर असल्यामुळे दळून द्यायला गिरणीवाला कटकट करतो . सुके खोबरे भाजून घरीच बारीक करायचे आणि मसाला दळून आणल्यावर ते त्यात हाताने व्यवस्थित मिसळून द्यायचे. काळा मसाला म्हटला तरी रन्ग काळा नसतो .तो अगदी किन्चित काळसर नारिन्गी दिसतो आणि ताज्या मसाल्याचा वास तर अगदी दरवळतो.
या मसाल्याने आमच्या घरात तयार होणारे पदार्थ म्हणजे फोडणीचे वरण (या बरोबर असतात बटाट्याच्या किन्वा कच्च्या केळ्याच्या कचर्‍या किन्वा कापे जी गोव्याची स्पेशालिटी आहे आणि हे जेवण म्हणजे नागपूर आणि गोवा या दोन परस्पर विरुद्ध खाद्यसन्स्कृतिचा रुचकर मिलाफ असतो); वान्गी-बटाटा ; नुसता बटाटा ; तोण्डली घेवडा आणि ढेमशान्ची भाजी; मसाले भात (ज्याला नागपूरला खारा भात म्हणतात) आणि राधिका प्रसिद्ध पुडाची वडी.
आमचा घरी हा मसाला सतत लागतो आणि बनवायला जरा किचकट त्यामुळे आम्ही सर्व जावा एकत्र जमून कुणा एका घरी हा बनवतो . मग हे सगळे जिन्नस आणणे,निवडणे , वाळवणे, तळणे , दळून आणणे ,त्यात खोबरे मिसळणे आणि वाटे करणे हे सगळे अगदी मजेमजेत हसत खेळत गप्पा मारत होते .दोन तीन दिवस तर लागतातच याला ; तेवढे दिवस सगळे एका घरी असतात आणि इतकी मजा येते की आम्ही याला मसाल्याचा उत्सव म्हणतो.

भारी विकु!
आमच्या घरात मागचे ४५ वर्ष तरी एकच काळा मसाला वापरात आहे. तो साधरण सगळ्याच मसालेदार रस्सा भाजी आणि काही ठराविक कोरड्या भाज्यांकरता वापरला जातो.
आजीच्या तिन्ही मुलांच्या घरात आणि आता सगळ्या नातवंडांच्या घरात हा मसाला वापरला जातो. तुम्ही वर सांगितलत तसच अगदी आजी दर वर्षी हा मसाला कांडून घ्यायची आणि मग तो सगळ्या घरी पार्सल केला जाई.
आता २ वर्षांपुर्वी आजी गेली आणि आता मसाल्याचे काम मामीनी हाती घेतलय. Happy
हा मसाला वापरुन केलेलं मटण, अंडा करी, वांग्याची भाजी म्हणजे नुसती फोडणी दिली की अख्ख्या घराची भूक चाळवली जायची.

छान लेख!
अनुराधारेगे, प्लीज नवा धागा काढून तुमची काळा मसाल्याची कृती लिहाल का? शक्य झाल्यास इथे थोड्या प्रमाणात करुन बघेन.

विकु,

आपल्या सोलपूरसाईडला जो काळा मसाला करतात, त्यात लाल मिरच्यांचं प्रमाण जास्त असतं. संकेश्वरी किंवा कुठल्याही लांब तिखट मिरच्या तेलात (तेलावर नाही) खरपूस तळून घेतात. बाकी जिन्नसही तळलेलेच असतात. शिवाय हा मसाला घरी उखळ असेल तर उखळात कांडला जातो. उखळ नसेल तर खलबत्त्यामधे कुटला जातो. कांडल्यानं अथवा कुटल्यानं त्याच्या खमंगपणात भर पडते. मात्र हा मसाला झणझणीत असतो. मुबलक प्रमाणात मिरच्या आणि बाकी मसाल्यांचे जिन्नस, तळणे वगैरे प्रकार असल्यानं नंतर छातीत जळजळ होणे वगैरे प्रकार होऊ शकतात. पण या मसाल्यानं वांग्याला जशी चव येते तशी बाकी कुठल्याही मसाल्यानं येत नाही. सोलापुरकडं सगळ्या भाज्यांमधे, वरणफळं, मुगाच्या डाळीची खिचडी, पंचामृत, कटाची आमटी, कांद्याचं वरण, कांदा बटाटा भाजी, शेंगदाण्याची आमटी वगैरे प्रकारात हाच बहुगुणी मसाला वापरतात. बरोबर भाकरी, घरचं दही-दूध, आणि शेंगदाण्याची उखळात कांडलेली चटणी. पूर्णान्न.

वर वैद्यबुवा म्हणतात तसं आमची आज्जी असा मसाला करून घ्यायची. फार मोठं बारदाना असल्यानं तीन-चार दिवस काम चालयचं. नंतर मोठ्या काकू करायच्या. आता धाकटी काकू संभाळते. नविन सुनांना मसाल्यातली गंमत न कळल्यानं नविन पिढी मसाल्याच्या वाटे जात नाही. पण आम्ही माहेरवाशिणी आवर्जून मसाला आणि दाण्याची चटणी गावातल्या घरात कांडून घेऊन करून आणतो. मसाला खरंच प्रेशिअस असतो, कुणी मागितला तर द्यावं तरी पंचाईत न द्यावं तरी पंचाईत यातून मीही गेले आहे. त्यावर उपाय म्हणजे पाव किलो मसाला जादाचा आणून कुणी मागितला त्यातला वाटी अर्धी वाटी द्यायचा. उरला तर आपल्याला बोनस!

मसाल्याबरोबरच आमच्याकडं मागणी असते ती शेंगदाण्याची ताजी चटणी, कुरडया, बाजरीचे सांडगे आणि ज्वारीच्या पापड्या यांची. हे वाळवणाचे, साठवणुकीचे पदार्थ करणं म्हणजे वेळखाऊ आणि कष्टाचं काम आहे. आजकाल घरी कुणी करत नाही, पण सोलापूर साईडला घरचे गहू, बाजरी, ज्वारी नेऊन दिली की करून देणारे आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी करून घेतो. दाण्याची चटणी मात्र जेवढी आणता येईल तेवढी आणायची, फ्रीजमधे ठेऊन पुरवून खायची. कुणी मागितली तर ऐकून न ऐकल्यासारखं करायचं Wink . मात्र ही चटणी घरच्या उखळातलीच हवी. पूर्वी दाणेही घरच्या शेतातलेच असायचे. मागे एकदा माझ्याकडे वासंतिक कल्लोळ झाला होता तेव्हा योगायोगानं चटणी/मसाला होता. कल्लोळाला आलेल्या कुणाकुणाला दिल्याचं आठवतंय.

सध्या ज्येष्ठ नागरीकांच्या वयानुसार झालेल्या तब्येतींंमुळे काळा मसाला खाण्याचं प्रमाण कमी झालं आहे. 'आजकाल सोसत नाही' म्हणतात. पण चमचमती, मसालेदार खाण्याची आवड तर आहे. मग यावर उपाय म्हणून कोल्हापुरी कांदा लसूण चटणी/मसाला वापरता काळ्या मसाल्याऐवजी. मिरच्या घेताना किंवा तिखट घेताना ब्याडगी मिरच्यांच घ्यायचं. म्हणजे तिखट होत नाही पण रंग छान येतो. ब्याडगी मिरची किंचीतसा गोडवा असतो म्हणे. त्यामुळे मसाल्याचा स्वाद खुलतो. काही जण अर्ध्या ब्याडगी अर्ध्या संकेश्वरी घेतात. सणावाराला नैवेद्यापुरता काळामसाला करून तो वापरतात. तो मसालाही इकडं हिट ठरला आहे. सध्या अनारशाचं पीठ, चकलीची भाजणी इत्यादींची मागणीही वाढली आहे Happy .

वेळ झाला की दोन्ही मसाल्यांची कृती लिहीते.