रणमर्द बाजीप्रभू देशपांडे

Submitted by shantanu paranjpe on 17 May, 2018 - 05:52

अनेक वेळा बाजीप्रभू कोण होते आणि त्यांचे कार्य काय असे अनेक प्रश्न 'इतिहासाचे पुनर्लेखन’ करणारी अनेक मंडळी करत असतात. अर्थात हे सर्व प्रश्न निराधार आहेत हे उपलब्ध पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेच परंतु ही समाजकंटक मंडळीं या पुर्याव्याना जुमानत नाहीत! असो काही का असेना परंतु बाजीप्रभू हे नाव इतिहासात मात्र प्रचंड गाजले आणि एखाद्या नरव्याघ्र्याप्रमाणे या मावळ्याने पराक्रम करून आपला देह ठेवला! याच शूर सेनानीला नमन करण्यासाठी हा लेखप्रपंच!!

बाजीप्रभू देशपांडे या व्यक्तिमत्वाबद्दल फारसे पुरावे उपलब्ध नसले तरी ‘प्रभूरत्नमाला’ या ग्रंथात त्यांचा थोडाफार इतिहास दिला आहे तो असा, “बाजीप्रभूंचा जन्म हा भार्गव गोत्रात झाला. ते भोर पासून ३ मैलांवर असलेल्या सिंध गावी जन्मले. त्यांचे आडनाव प्रधान असे होते. तेराव्या शतकात मुसलमान लोकांनी मांडवगडचे हिंदू साम्राज्य खालसा केल्यामुळे जी काही प्रभू घराणी दक्षिणेत उतरली त्यात ‘रघुनाथ देवराव प्रधान’ हे होते. पुढे दक्षिणेतील राजांकडून व बहामनी राजांकडून जी वतने व अधिकार मिळाले त्या हुद्द्यावरून मिळालेली प्रधान, देशपांडे, चिटणवीस, गडकरी, कुलकर्णी अशी उपनावे प्रचारात आहेत.”

"भोर तालुक्यातील रोहिडा किल्ल्यावर विजापूरचे सरदार असलेले कृष्णाजी बांदल देशमुख हे किल्लेदार होते. बाजीप्रभूंचे आजे ‘पिलाजी’ व वडील ‘कृष्णाजी’ हे बांदलांकडे दिवाण म्हणून काम करत असत. बाजीप्रभूंच्या वडीलानी मोठा पराक्रम केल्याने त्यांना ५२ गावचा देशपांडेपणाचा व कुलकर्णीपणाचा हक्क मिळाला होता. अशा या थोर परंपरेत जन्मलेले बाजीप्रभू हे स्वतःच्या कर्तबगारीतून पुढे आलेले सेनानी होते.”

बांदलांचे दिवाण सोडून इतर कोणती कामे केली असा प्रश्न कुणी विचारला तर त्याला हे अस्सल पत्र दाखवा!! पत्रातील मजकूर असा,

“मशहुरुल अनाम बाजप्रभू प्रति शिवाजी राजे. कासलोलगड हिरडस मावळमध्ये आहे. तो गड उस पडला. याचे नाव मोहनगड ठेवून किल्ला वासवावा ऐसा तह. तरी तुम्ही मोहनगड गडावरी अळंगा मजबूत करून, किला मजबूत करून मग तुम्ही किल्ल्याखाली उतरणे मोर्तबसुद”

पत्राचा साधारण अर्थ – हिरडस मावळत एक ओस पडलेला किल्ला आहे. त्याचे नाव मोहनगड ठेवून, किल्ल्याची डागडुजी करून किल्ला उतरून खाली येणे असा हुकुम शिवाजी राजांनी बाजीप्रभू यांना दिलेला दिसून येतो.
बाजीप्रभूंचा पन्हाळा वेढ्यातील पराक्रम हा सर्व श्रुतच आहे. त्यामुळे त्याबद्दल काही सांगत नाही बसत. पावनखिंडीच्या पराक्रमाचे वर्णन बाबासाहेब पुरंदरे यथार्थ करतात. ते म्हणतात,

”काय माणसे ही! ही माणसे महाराष्ट्राचा संसार थाटण्यासाठी जन्माला आली. स्वताच्या जीवाची यांना पर्वा काय. यांच्या एका हातावर तुळशीपत्रे उमलत होती अन दुसऱ्या हातात निखारा फुलत होता आणि महाराजांना ती आपल्या निशःब्द प्रेमाने विचारत होती, ‘महाराज! सांगा यातले संसारावर, घरदारावर काय ठेवू!!? धन्य धन्य महाराष्ट्र! धन्य महाराष्ट्राची जातकुळी!!”

चिटणीस बखरीत स्वारीनंतरचा उल्लेख आढळून येतो तो असा, “बाजी देशपांडे स्वामीकार्याकरता खर्च झाले. शिपाईगिरीची शर्त झाली., त्यांचे लेक बाळाजी बाजी यांसी आणून नावाजून त्यांची ‘सरदारी’ त्यांस दिली. त्याचे सात भाऊ होते. त्यांस आणून पालख्या व तैनात करून दिल्या. मावळे लोकांची सबनिशी सांगितली. बक्षीस दिले”. बाजीप्रभू यांच्या मुलाचे नाव बाळाजी होते का बाबाजी होते याचा खुलासा नाही झाला कारण कुलकर्णी यांनी लिहिलेल्या बाजी प्रभू यांच्यावरील पुस्तकात ही सरदारी बाबाजी प्रभू यांना दिली आहे असा उल्लेख आढळतो. तसेच १६७८ मध्ये झालेल्या सावनूर येथील लढाईत हंबीरराव मोहिते यांच्यासोबत बाबाजी प्रभू हा सुद्धा होता असा उल्लेख आढळतो.

अनेकजणाच्या मते ही लढाई गजापुरच्या खिंडीत न होता विशालगडाच्या इथे झाली पण त्याने बाजीप्रभूंच्या पराक्रमावर काहीच कमीपणा येत नाही!! त्या लढाईत बाजीप्रभू यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले आणि अमर झाले हेच इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे असे वाटते.

संदर्भ पुस्तके-
१. प्रभूरत्नमाला
२. पावनखिंडीचा रणझुंझार- माधव दवारकानाथ कारखानीस

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख.. तानाजी मालुसरे, मुरारबाजी, कोंडाजी फर्जंद, हंबीरराव मोहिते यांच्याविषयी देखील वाचायला आवडेल. वेळ असल्यास जरूर लिहा.

छातीचा कोट करून पावनखिंड लढवणाऱ्या बाजीप्रभूंना मुजरा!

लेख आवडत आहेत तुमचे. त्यात एक अभिनिवेशरहित निरागस थेटपणा आहे.

यांच्याविषयी देखील वाचायला आवडेल<<<< तसेच, अष्टप्रधान मंडळातील मान्यवरांवरचे लेखनही वाचायला आवडेल.

छान लेख. अजुन एक बाजीही होते ना जे शिवाजीराजांच्या विरोधी होते. बाजी घोरपडे का?>> हो, मुधोळचे बाजी घोरपडे.

चांगला लेख.. तानाजी मालुसरे, मुरारबाजी, कोंडाजी फर्जंद, हंबीरराव मोहिते यांच्याविषयी देखील वाचायला आवडेल. वेळ असल्यास जरूर लिहा.>>> जरूर जरूर. कोंडाजी फर्जंद बद्दल लिहायला तर आवडेल. त्याच्या इतका पराक्रमी माणूस मिळणे म्हणजे नशिबाची गोष्ट. राजांना अशी जीव लावणारी माणसे मिळाली हे केवढ भाग्य आहे त्याचं..

लेख आवडत आहेत तुमचे. त्यात एक अभिनिवेशरहित निरागस थेटपणा आहे.

यांच्याविषयी देखील वाचायला आवडेल<<<< तसेच, अष्टप्रधान मंडळातील मान्यवरांवरचे लेखनही वाचायला आवडेल.>>

नक्की प्रयत्न करतो. वेळ मिळेल तसा इथे लिहित जाईन.

सध्या छत्रपती संभाजी ह्या झी वरील मालिकेत अष्टप्रधान मंडळातील अनाजी सुरनिस आणि मोरोपंत पिंगळे हे संभाजी विरोधात कटकारस्थान करताना दाखवले आहेत. ते खरे मानावे का?

अनाजी सुरनिस आणि मोरोपंत पिंगळे हे संभाजी विरोधात कटकारस्थान करताना दाखवले आहेत. ते खरे मानावे का?>>>> ह्यांनी तसे उद्योग केले होते असे कुठेतरी वाचले होते. आणी संभांजी राजेंनी त्या दोघांना हत्तीच्या पायी दिले असेही वाचले होते.

>>आणी संभांजी राजेंनी त्या दोघांना हत्तीच्या पायी दिले असेही वाचले होते.<<

थांबा, पिंगळ्यांना हत्तीच्या पायी देउ नका. तुमच्याकडे सबळ पुरावा असल्याशिवाय... Proud

सुंदर माहिती आणि अभिमानास्पद इतिहास. आपण खास वेगवेगळी पुस्तके शोधून त्यातून असे अस्सल रत्न हुडकून ओघवत्या शैलीत आमच्यापुढ्यात मांडता हे काम इथे दिसते तेवढे सोपे नाही. आजपर्यंत ही माहिती वाचली नव्हती. बाजीप्रभूंचे नाव घेतले की फक्त घोडखिंड आठवते पण त्यांचा स्वतःचा इतिहास असा फारसा पुढे आणला जात नाही. तुमच्या लिखाणातून आणखी अशा नररत्नांची ओळख करुन घेण्यास उत्सूक आहे.

हे असे काही तरी वाचायला मिळाले की दिवस सार्थकी लागतो नाहीतर काय त्या पाणचट गझला आणि जांभई आणणारे स्फुट जे लिहायला काही लागत नाही आणि वाचायलाही काही मजा नाही. तुमच्यासारखे वाचन, चिंतन संशोधन करुन ऐतिहासिक माहिती रंजकपणे मांडणारे लेखक माबोवर फार कमीच पाहिलेत.

नवीन चांगली माहिती मिळते तुमच्या लेखांमधनं... इतिहास कळतो... पुढच्या लेखांच्या प्रतिक्षेत... इतकी पुस्तकं वाचून माहिती अभ्यासपूर्ण रितीने लोकांसमोर मांडण सोपं काम नव्हे... सोप्या शब्दात समजावण्याची शैली छान आहे...नविन शिकायला मिळेल.. Happy

आणि परांजपे, कोंडदेव ह्यांच्याबद्दलसुद्धा लिहा

तेही एक कोणी होते म्हणे

सुंदर माहिती आणि अभिमानास्पद इतिहास. आपण खास वेगवेगळी पुस्तके शोधून त्यातून असे अस्सल रत्न हुडकून ओघवत्या शैलीत आमच्यापुढ्यात मांडता हे काम इथे दिसते तेवढे सोपे नाही. आजपर्यंत ही माहिती वाचली नव्हती. बाजीप्रभूंचे नाव घेतले की फक्त घोडखिंड आठवते पण त्यांचा स्वतःचा इतिहास असा फारसा पुढे आणला जात नाही. तुमच्या लिखाणातून आणखी अशा नररत्नांची ओळख करुन घेण्यास उत्सूक आहे.>> +12345...

<< आणी संभांजी राजेंनी त्या दोघांना हत्तीच्या पायी दिले असेही वाचले होते.<<

थांबा, पिंगळ्यांना हत्तीच्या पायी देउ नका. तुमच्याकडे सबळ पुरावा असल्याशिवाय... >>

---------- अनाजी यान्च्याबाबत वाचले आहे, मोरोपन्त पिगळे कारस्थानात होते पण त्यान्ना मारल्याचे आठवत नाही. तत्कालीन सरसेनापती हम्बिरराव मोहिते (सोयराबाएन्चे बन्धू) यान्नी त्यान्चे सर्व वजन सम्भाजीराजे यान्च्यासाठी वापरले आणि पारडे फिरले.