वावटळ भाग -२

Submitted by Vrushali Dehadray on 17 May, 2018 - 01:48

वावटळ भाग -२

ती करिअरिस्ट वगैरे कधीच नव्हती. पण हातात घेतलेले काम प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करायची. एकदा कमिटमेंट केली की काही झाले तरी त्यापासून हटायचे नाही या भावनेने ती नोकरीही करत होती आणि संसारही. नोकरीतल्या कमिटमेंटचे फळ बढतीच्या रूपाने मिळाले तर संसारातल्या कमिटमेंटचे फळ फक्त अंगावर वाढत जाणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कामाच्या सतत वाढत जाणाऱ्या ओझ्याच्या रुपात. पण बंडखोरी हा शब्द तिच्या शब्दकोशातच नव्हता. तिला इतरांनी गृहीत धरणे हे तिने गृहीत धरले होते. पाण्यावरच्या तेलाच्या तवंगासारखे नवऱ्याचे संसारात असूनही नसणे हे एव्हाना तिच्या अंगवळणी पडले होते.

पण का कोण जाणे यावेळी नवऱ्याचा निर्णय निमुटपणे स्वीकारावा असं नाही वाटलं तिला. झोपताना तिने पुन्हा एकदा विषय काढला. “घेऊ दे ना मला हे प्रमोशन. साहेब म्हणत होते की ते अधूनमधून मला कामासाठी म्हणून इथे बोलावतील. शनिवार रविवार मी इथेच असेन. तू कामासाठी मुंबईला येतोसच. सगळ्या कामांना बाई लाऊ. करून तर बघूया न की जमतंय का ते.” शेवटी अनिच्छेने हो म्हणून तो पाठ करून लगेच झोपूनही गेला. त्याच्यापुरता तो विषय संपला होता. आता इथे घरात कशी सोय करावी नी मुंबईला घराची सोय कशी करावे याचे प्लॅनिंग तिच्या डोक्यात सुरु झाले. नेहमीप्रमाणे सगळे काही तिला एकटीलाच करावे लागणार होते.

मुंबईला जायचे ठरल्यावर सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे रहाण्याच्या जागेचा. तिला लोकल ट्रेनने प्रवास करणे अशक्यच होते. त्यामुळे ऑफिसच्या जवळच जागा हवी होती आणि ती काही केल्या मिळत नव्हती. ओळखीतून, घर भाड्याने देणाऱ्या वेबसाईट्सवर शोधाशोध चालू होती. हे चालू असतानाच एक दिवस सोहमचा फोन आला. बदलीच्या धामधुमीत ती सरदेसाई प्रकरण पूर्ण विसरूनच गेली होती.

“मॅडम, उद्या तुम्ही घरी आहात का? बाबांना उद्या डिश्चार्ज मिळणार आहे आणि त्यांना घरी जायच्या आधी तुम्हाला भेटायला यायचे आहे. आम्ही उद्या संध्याकाळी तुमच्या घरी आलो तर चालेल का?”

“हो. नक्की या. मी घरीच आहे.” दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सरदेसाई कुटुंब घरी आले. सरदेसाईंचा एक हात प्लॅस्टरमध्ये होता. छातीला सपोर्ट करणारा पट्टा होता. कपाळावर मोठे बँडेज होते. चालताना थोडे लंगडतही होते.

“तुम्ही आलात हे छानच झाले. पण खरं तर पूर्ण बरे झाल्यावर आला असतात तरी चालले असते.”

“त्यांचा हट्टच होता की ज्या व्यक्तीमुळे मला आजचा दिवस पहायला मिळाला त्या व्यक्तीला भेटल्याशिवाय मी घरी जाणार नाही.” हे ऐकल्यावर तिने पहिल्यांदाच नीट सोहमकडे पाहिले. साधारण पस्तिशीच्या आसपास वय. पावणेसहा फुटाच्या आसपास उंची. नाकी डोळी नीटस. हँडसम म्हणता येईल असा. आणि किंचित घोगरट आवाज. आपण त्याच्याकडे जरा जास्तच निरखून पाहतो आहे हे लक्षात आल्यावर ती शरमली. परत आभारप्रदर्शन सुरू होऊ नये म्हणून ती घाईने म्हणाली “बर झाल आज आलात ते. अजून काही दिवसांनी यायचे ठरवलं असतत तर आपली भेट झालीच नसती.”

“का?”

“माझी बदली मुंबईला झाली आहे. सांताक्रूझला ऑफिस आहे माझे.”

“अरे वा, मी पण सांताक्रूझला राहतो. राहणार कुठे तुम्ही?”

“तोच तर प्रॉब्लेम झालाय. हिला ट्रेनची सवय नाही. त्यामुळे ऑफिसच्या जवळच घर बघायला पाहिजे. आणि अजून तर मिळाल नाहीये.” नवरा प्रथमच संभाषणात भाग घेत म्हणाला.”

“सुरुवातीला आठवडाभर ऑफिस सोय करणार आहे. पण नंतर स्वत:चे ठिकाण बघायलाच लागणार.” ती थोड्या चिंतेच्या स्वरात म्हणाली.

“तुम्हाला विचित्र वाटणार नसेल तर मी एक सुचवू का?” सोहम म्हणाला, “मी राहतो ते घर दोन बेडरूमचे आहे. आधी माझा मित्र रहात होता माझ्याबरोबर. आता मी एकटाच राहतो. तुमची दुसरी सोय होईपर्यंत तुम्ही तिथे राहू शकता. मास्टर बेडरूम तुम्ही घ्या.”

या अनपेक्षित प्रस्तावाने ती एकदम गांगरून गेली. “छे, छे. तुम्हाला कशाला उगीच त्रास.”

“अहो, त्रास कसला आलाय त्यात? हा, आता या प्रकारे राहणे आपल्या समाजात जरा विचित्र वाटते. पण आता तुमची आमची ओळख झालीच आहे. तिथे कायमचा रहा असं काही नाही. पण मुंबईला गेल्यावर लगेच काय करायचे हा प्रश्न तर सुटेल. नाही का हो?” मिसेस सरदेसाई नवऱ्याकडे बघत म्हणाल्या.

“चांगला पर्याय सुचवला आहे सोहमने. तुम्हाला संकोच वाटायचे काही कारण नाही.” मिस्टर सरदेसायांनी देखील सोहमच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली. यावर काय बोलावे ते न सुचून तिने नवऱ्याकडे सुटकेच्या आशेने पाहिले. नवरा कधी नव्हे ते मदतीला धावला. “मी पण माझ्या ऑफिसातल्या एक दोघांना सांगून ठेवले आहे. ते काय सांगतात त्याप्रमाणे तुम्हाला कळवतो.” तिने कृतज्ञ नजरेने नवऱ्याकडे पाहिले. थोडावेळ अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारून आणि पुन्हा पुन्हा आभार मानून सरदेसाई कुटुंब गेले. रात्री नेहमीप्रमाणे जेवताना सरदेसाई कुटुंबाच्या प्रस्तावावर काय करावे याची चर्चा सुरु झाली.

“असं परक्या पुरुषाबरोबर एकटीने राहणे मला नाही जमणार. कसं दिसेल ते? आणि याच लग्न पण झालेलं दिसत नाहीये अजून”

“पण आपल्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? आणि एक तर तो तुझ्यापेक्षा कितीतरी लहान आहे. तिथे तू कायमची रहा असं काही मी म्हणत नाहीये. पण तिथे राहून दुसऱ्या ठिकाणी घरे बघणे पण सोयीचे होईल. शिवाय स्वतंत्र खोली, बाथरूम संडास आहे. तू दिवसभर बाहेर असणार. सुट्टीच्या दिवशी तू इथे येशील. तुझा त्याच्याशी फारसा संबंध येतोच आहे कशाला.”

“एका घरात राहून संबंध येणार नाही असं कसं होईल?”

“हे बघ, त्या घरापासून तुझे ऑफिस खूप जवळ आहे. आणि मन निर्मळ ठेवलं ना तर आपल्या बरोबर बाई आहे का बुवा याने काही फरक पडत नाही. तू निश्चिंत मनाने राहा तिथे. डोक्यावर भार घेऊन माणूस सुखाने जगू शकत नाहीत. तो भार हलका करायला तू मदत करायला हवीस.” सासूबाई म्हणाल्या.

हातात घास ठेऊन तिने प्रश्नांकित चेहऱ्याने सासूकडे पाहिलं.

“तू जीव वाचवलास त्या सरदेसायांचा. तुझ्या उपकारच ओझं आहे त्यांच्या डोक्यावर. तुला मदत करण्याची संधी देऊन तो भार हलका करायचा प्रयत्न करताहेत ते. त्यांना त्यासाठी मदत कर. दुसऱ्याला मदत करावी. पण त्या मदतीच्या भाराने ते वाकून जाऊ नयेत म्हणून पण मदत करावी त्यांना. आपल्यावर उपकार करायला जागा देऊन.” एवढ बोलून सासू शांतपणे खाली बघून जेवत राहिली.

हे कारण मात्र तिला मनोमन पटले. तिची सासू सहज जाता जाता काळजाला हात घालणारे तत्वज्ञान सांगून जायची. तिचे हे बोलणे ऐकल्यावर तिचे मन थोडे शांत झाले. शेवटी दुसरी काही व्यवस्था होत नसल्याने तिने सोहमला फोन करून आपला होकार कळवून टाकला.

बघता बघता मुंबईला जाणे दोन तीन दिवसांवर येऊन ठेपले. रविवारी निघायला लागणार होते. सोडायला नवरा आणि मुलगी गाडी घेऊन येणार होती. सोहम बहुतेक सर्व शनिवार रविवारी पुण्याला घरी येत असे आणि सोमवारी सकाळी पुण्यातून निघून परस्पर ऑफिसला जात असे. पण यावेळी तिची सोय लावण्यासाठी त्याने यांच्याबरोबरच कारने जाण्याचे ठरवले. जायचा दिवस जवळ येऊ लागला तस घर सोडण्याच्या भावनेने ती पुन्हा अस्वस्थ होऊ लागली. घरातले सगळेच थोड्या प्रमाणात अस्वस्थ होते. पण तिला वाईट वाटू नये म्हणून आपली अस्वस्थता लपवण्याचा प्रयत्न करत होते.

“तिथे उगाच स्वयंपाक वगैरे करत बसू नकोस. दोन्ही वेळचा डबाच लाव. सोहम तसच करतो. मी बोललो आहे त्याच्याशी. तसा गॅस वगैरे आहे तिथे. थोडी फार भांडीही आहेत असं तो म्हणत होता.” तिने नवऱ्याकडे थोडे विस्मयाने पाहिले. त्याने स्वत:हून सोहमशी बोलून ही चौकशी करावी हे जरा नवीनच होत तिच्यासाठी.

“तशी इथे तुला फारशी विश्रांती मिळतच नाही. या निमित्याने जरा आराम कर.” तो तिची नजर टाळत म्हणाला. त्याचा आवाज भरून आल्यासारखा वाटत होता. डोळ्यात पाणी आल्यामुळे त्याने नजर फिरवली का? आपला नवरा आतापर्यंत कळलाच नाही का आपल्याला?’ तिच्या मनात वेगळ्याच विचारांचे आवर्तन सुरु झाले. शेवटचे दोन दिवस कसे गेले ते कळलेच नाही. शनिवारी रात्री ती नवऱ्याच्या कुशीत शिरून पोटभर रडली. नवरा शांतपणे तिला थोपटत राहिला. ती नि:शब्द जवळीक दोघेही अनुभवत राहिले. पहिल्यांदाच. माणसांना एकमेकांच्या जवळ येण्यासाठी दूर जावे लागते का........

रविवारी ठरल्या वेळेला सोहम त्यांच्या घरी आला. निघताना सासूच्या पाया पडताना घशात आवंढा दाटून आला. मग प्रवासभर ती गप्प गप्पच होती. मात्र तिचा नवरा, मुलगी आणि सोहम निवांत गप्पा मारत होते. त्यांच्या गप्पांकडे तिचे फारसे लक्षच नव्हते. मध्ये कुठेही न थांबते ते थेट सांताक्रूजच्या त्याच्या घरी पोचले. घर चांगले प्रशस्त आणि हवेशीर होते. मुख्य म्हणजे भरपूर उजेड होता.

“ही तुमची खोली. इथेच जोडून बाथरूम पण आहे. आत गिझर पण आहे.”

ती खोली सोहमने व्यवस्थित लावून ठेवली होती. एक सिंगल बेड, कपाट, छोटे टेबल. त्या खोलीत गेल्यावर तिला एकदम प्रसन्न वाटलं. तिचं सामान खोलीत ठेऊन सर्व बाहेर आले.

“इकडे माझी खोली आहे. हे स्वयंपाकघर. मी फारसे काही करत नाही इथे. रात्रीचा डबाच लावलाय. अगदी कंटाळा आला तर खिचडी वगैरे करतो. तशी थोडीफार भांडी आहेत. चहा, साखर, दूधं असतं. छोटा फ्रिजपण आहे. किराणा मात्र लागेल तसा आणतो.” इतके निगुतीने लावलेले स्वयंपाकघर बघून ती चकित झाली. ‘एक पुरुष इतका व्यवस्थित असू शकतो!’

थोड्या वेळाने नवरा आणि मुलगी जायला निघाले. तिचे डोळे परत भरून यायला लागले. त्या कुटुंबाला अशा वेळी एकांताची गरज आहे हे ओळखून सोहम समजूतदारपणे स्वत:च्या खोलीत गेला. तिला खांद्यावर थोपटून नवरा बाहेर पडला. तिने मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला. टाटा करून तीही बाहेर पडली. दार लावून ती आत वळली. काय करावे ते न सुचून ती हॅालमधल्या सोफ्यावर बसली.

“थोडा चहा घेणार का?” तिने चमकून वर पाहिले. सोहम स्वयपाकघराच्या दारात उभा राहून विचारात होता. तिच्या विचारांच्या नादात तो त्याच्या खोलीतून कधी बाहेर आले ते तिला समजलेच नव्हते.

“हो. चालेल. मी करते.”

“नको हो. मी करतो. तसा पिण्यालायक चहा करू शकतो मी.” तो गंभीरपणे म्हणाला. तिच्याही नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. गरमागरम वाफाळता चहाचा कप आणि डिशमध्ये चकल्या घेऊन सोहम हॉलमध्ये आला. कुटुंबापासून दूर रहायचे म्हणून ती जरी उदास होती तरी त्याच्या बरोबर राहायचे या विचाराने आलेली अस्वस्थता थोडी कमी झाली होती.

“उद्या तुम्ही कशा जाणार ऑफिसला?”

“खरच की. हा विचारच केला नाही मी. तस इथून जवळच आहे. रूहीने गुगल मॅप्सवर दाखवलं होतं. पण रस्ता तसा नीट माहिती नाहीये. जरा लवकर निघून चालतच जाईन. अशाने रस्ते पण माहित होतील.”

“असं करू या का? उद्या पहिलाच दिवस आहे, तर मी सोडतो तुम्हाला बाईकवरून. येताना या मग चालत.”

“छे, छे. कशाला उगाच तुम्हाला त्रास!”

“त्रास कसला आलाय. मी त्याच रस्त्यावरून पुढे अंधेरीला जातो.

“बर. ठीक आहे मग.” पुढचे काही क्षण शांततेत गेले. ती कपाच्या कडेवरून बोट फिरवत राहिली.

“चहा ठीक झालाय का?”

“ओह. सॉरी. सांगायचेच राहिले. खरच छान झालाय. आणि आयता मिळाल्याने आणखीनच छान वाटतोय.”
“ठरलं तर मग. रोज सकाळचा चहा मी करत जाईन.”

ही गोष्ट तिच्या आत्तापर्यंत लक्षातच आली नव्हती की इथे काही घरातली कामे असतील. कोणी काय करायचे ते ठरवून घ्यावे लागेल. ती पटकन म्हणाली, “नको. मी करेन.”

“म्हणजे मी केलेला चहा चांगला झाला नव्हता तर.” तिने चमकून त्याच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरचे हसू बघून तिलाही हसू आले.

“ओके. तुम्हीच करा. बर आज रात्रीच्या जेवणाचे काय करुया. घरात सगळे साहित्य असेल तर मी करते. एखादी गोष्ट लागणार असेल तर मी घेऊन येते खालून.”

तो काही क्षण नुसताच बसला, डाव्या हाताचे मधले बोट कपाळावर घासत. त्याची ही सवय एव्हाना तिच्या लक्षात आली होती.

“आज तुमचा इथला पहिलाच दिवस आहे. आज आपण बाहेरच जाऊ या का? मी रात्रीचा डबा लावलाय. सोमवार ते शुक्रवार. आज डबा नसतो. उद्यापासून दोन माणसांचा सांगतो. डबा घरपोच येतो.”

“चालेल. नाश्त्याच काय?” “नाश्ता कधी घरी घेतो तर कधी बाहेर. आम्लेट, धिरड, थालीपीठ असा काहेतारी करतो. आणि एखादे वेळी करायचा खूप कंटाळा आला तर ओट्स, किंवा दूधपोहे. कधीतरी रात्रीचा भात किंवा पोळी शिल्लक असते. ते खातो.”

“तुम्हाला धिरडं आणि थालीपीठ करता येत?” ती विस्मयाने म्हणाली.

“हो. म्हणजे मी लहान असताना सारखा आईच्या मागे मागे असायचो. काही गोष्टी बघून बघून शिकलो. काही आईने मुद्दाम शिकवल्या” तो जरासा लाजत म्हणाला.

नंतरही ते काही वेळ गप्पा मारत राहिले. तिच्या लक्षात येत होत की तो तिचा संकोच दूर करायचा मुद्दामहून प्रयत्न करतोय. नंतर त्याने दोघांचे कप विसळले. हातासरशी चहाच भांड नी गाळणं घासून ठेवलं. एखादा पुरुष असं काम करताना बघायची तिची ही पहिलीच वेळ होती.

रात्री ते जवळच्याच हॉटेलात जेवायला गेले. आता रात्री घरात आपण दोघेच या कल्पनेने ती परत आक्रसायला लागली. त्याने तिच्याशी बोलण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला. पण नंतर तिचा मूड बघून तोही शांतपणे जेऊ लागला. दोघे घरी आले. त्याने टीव्ही लावला. आता काय करावे हे न सुचून तीही टीव्ही बघत बसली.

“तुम्ही झोपलात तरी चालेल. दमला असाल.”

पडत्या फळाची आज्ञा घेऊन ती तिच्या खोलीत गेली. बागेतले सामान कपाटात लावले. दुसऱ्या दिवशीचे कपडे काढून ठेवले. दाराला आतून कडी घातली आणि अंथरुणावर आडवी झाली. परत परत घराचे विचार डोळ्यासमोर येऊ लागले. या कुशीवरून त्या कुशीवर कितीतरी वेळ ती तळमळत राहिली. शेवटी पहाटे पहाटे तिचा डोळा लागला.
दरवाज्यावराची टकटक ऐकून ती जागी झाली. क्षणभर कुठे आहोत ते तिच्या लक्षातच येईना. आपण मुंबईला सोहमच्या घरात आहोत याच भान आल्यावर ती ताडकन उठली. दरवाजावर परत टकटक झाली. तिने पटकन दार उघडले.

“गुड मॅार्निंग!” सोहम समोर हसतमुख चेहऱ्याने उभा होता. “चहा तयार आहे.”

“सॉरी. रात्री उशिरा झोप लागली. त्यामुळे सकाळी जाग नाही आली.”

“नवीन ठिकाणी होत असं. तुम्ही आवरून चहा घ्यायला या.”

दोघे चहा प्यायला बसले. ‘दुसऱ्याने केलेला सकाळचा चहा आपण पितोय. हे किती वर्षांनी घडले असेल बर आपल्या बाबतीत?’ विचार करता करता ती नकळत रीलॅक्स झाली. त्याच वेळेला तिच्या लक्षात आल की आज घरातली काम नाहीत. फक्त स्वत:च आवरून निघायचं. ती अधिकच सुखावली. सोहम तिरप्या नजरेने तिच्या चेहऱ्यावरच्या बदलणाऱ्या रेषा बघत होता.

“मी पोहे भिजवलेत. तुम्हाला आवडतात ना?” तो म्हणाला.

“मी करते पोहे.”

“अहो नको. मी करतो.”

“मी एवढे पण वाईट करत नाही.”

तो मोकळेपणाने हसला. “बर. मी कांदे चिरून देतो.” ती विरोधाकरता बोलण्याच्या बेतात असतानाच तो म्हणाला, “मी चांगला बारीक कांदा चिरतो.” ती हसली. दोघांचे कप घेऊन आत गेली. ती कप, चहाचे भांडे विसळत असतानाच तो बाजूला उभे राहून पोह्यांची तयारी करू लागला. त्या एवढ्याश्या स्वयपाकघरात तो आजूबाजूला वावरू लागल्यावर ती अवघडून गेली. चहा पिताना आलेले मोकळेपण परत झाकोळले. ढगांनी भरून आलेले आभाळ वाऱ्याने जरा मोकळ होतंय तोवर परत ढग जमावेत तसे. सोहमचे बोलणे एकीकडे सुरूच होते. पण ती परत एकाक्षरी उत्तरांवर आल्याचे त्याला जाणवल्यावर तोही बोलायचा थांबला. त्या अवघडलेपणातच त्यांचे पोहे खाऊनही झाले. दोघे ऑफिसला जायला तयार झाले. आज तिला वेळाही होता आणि शिवाय नवीन ऑफिसचा पहिला दिवस म्हणून ती जरा निगुतीनेच तयार झाली. दोघे खाली उतरले. त्याला स्पर्श होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत ती त्याच्या मागे बाईकवर बसली. त्याने तिला ऑफिसजवळ सोडले.

“येताना जमेल ना एकटीला यायला? नाहीतर मला फोन करा. मी रात्रीचा दोघांचा डबा सांगितला आहे.” मान हलवत तिने त्याला हात केला.

ऑफिसातले वातावरण तिला फारसे नवीन नव्हते. पूर्वीही ती कामाच्या निमित्ताने इथे बरेचदा आली होती. तिची बॅास म्हणजे तिच्यापेक्षा वयाने थोडी मोठी असणारी एक हसतमुख बाई होती. तिच्याकडून तिने काम समजून घेतले. दुपारी कँटिनमध्ये जाऊन जेवली. संध्याकाळी रमत गमत रस्त्यावरच्या पाट्या बघत घरी पोचली. कुठे काय मिळते, आजूबाजूचे गल्ल्याबोळ, रस्त्यात खेळणारी मुले, फेरीवाल्यांचा आरोळ्या एक ना दोन. आज घरी पोचायची घाई नव्हती. पुण्यात एवढे निवांतपण कुठले. अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळा दिसायचा तस घर आणि घराची कामे एवढे एकच ध्येय ध्यानीमनी ठेऊन गर्दीतून वाट मिळेल तशी दुचाकी काढत, वाटेत काम करत लवकरात लवकर घरी पोचायची ओढ असायची.

घराची आठवण येऊन ‘एकाच तारा समोर आणिक पायतळी अंगार’ या ओळी मनात आल्यावर तिला हसूच आले. ‘अरे वा! आज आपल्याला चक्क कवितेची ओळ आठवतेय.’ रमतगमत ती घरी पोचली. मुंबईचा चिकचिकाट कधी एकदा अंगावरून धुवून टाकतोय असं मात्र झाल होतं. घरी पोचली तर दाराला बाहेरून कडी नव्हती. परत एकदा ती अनाम अस्वस्थता मनाच्या दारात उभी राहिली. अभ्रं परत एकदा जमायला लागली. बेल वाजवावी की सरळ आपल्याकडच्या किल्लीने दार उघडावे या संभ्रमात ती काही क्षण दारात तशीच उभी राहिली. जिन्यावरून उतरणारी मुलगी आपल्याकडे बघतेय हे लक्षात आल्यावर तिने घाईने बेलही वाजवली आणि स्वत:च्या किल्लीने दार उघडले. समोर सोहम दार उघडण्याच्या तयारीने उठत होता. अभ्र आणखीन दाट व्हायला लागली.

“कसा गेला पहिला दिवस?

“छान” ती चप्पल काढत म्हणाली. ती त्याच्यासमोर बसली. त्याने पाण्याची बाटली पुढे केली. दोन घोट पाणी पिऊन ती उठली.

“फ्रेश होऊन येते.” जरा वेळाने ती बाहेर आली तर सोहम एकीकडे टीव्हीवरच्या बातम्या बघत पेपर वाचण्यात गर्क होता. काय करावे हे न सुचून ती आत बाहेर जरा घोटाळली. एवढे रिकामपण ती आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होती. त्यामुळे या वेळेचे काय करावे हे तिला सुचेना. शेवटी तिने घरी फोन करून तिथली खबरबात घेतली. तिथल्या आघाडीवर सगळे आलबेल आहे हे सासूबाईंकडून समजल्यावर ती जरा शांतावली.

“तुम्हाला वाचायला एखादे पुस्तक हवे आहे का? माझ्या खोलीत बघा.”

ती त्याच्या खोलीत गेली. त्याचा व्यवस्थितपणा तिला पुन्हा एकदा जाणवला. त्या खोलीत एक पुरुषी गंध जाणवत होता. टेबलावर मराठी, इंग्रजी पुस्तके, त्यात कादंबऱ्या होत्या तशीच वैचारीक पुस्तकेही होती. तिला आठवले की सुरुवातीला अशी पुस्तकेही आपण आवडीने वाचायचो. आता कित्येक वर्षांत अशी पुस्तके नजरेसमोरही आली नव्हती. सगळी पुस्तके बघून शेवटी तिने एक हलके फुलके पुस्तक निवडले. ती ते घेऊन बाहेर आली तर सोहम लॅपटॉपवर काम करण्यात गढून गेला होता. तेव्हा तिला जाणवले की आपण याच्या खोलीत बराच वेळ होतो. त्याला काय वाटले असेल या विचाराने ती बावरली. तिने पुस्तक उघडले. डोळे मजकुरावरून फिरत होते पण डोक्यात मात्र काही शिरत नव्हते. परत घर, मुलगी, नवरा, या विचारांच्या साखळीत ती अडकली. आत्ता ते काय करत असतील? रात्रीच्या जेवणाची तयारी चालली असेल. आपण मात्र इथे निवांत बसलोय या विचारांनी तिला अपराधी वाटायला लागल. एका पेशी पासून विभाजनाने अनेक पेशी तयार व्हाव्यात तशा एका विचारातून अनेक विचार तयार व्हायला लागले. बेल वाजली. या वेळी कोण अशा प्रश्नार्थक नजरेने तिने त्याच्याकडे पाहिले.

“डबा” त्याने दार उघडून डबा घेतला. “किती वाजता जेवूया?”

“तसे आम्ही रोज नऊ वाजता जेवतो. पण आज मला भूक लागली आहे. तुम्हाला चालणार असेल तर लगेच बसलो तरी चालेल.”

“गुड.”

यात गुड काय आहे ते तिला कळेना.

“इथे आल्यापासून पहिल्यांदाच तुम्ही मनातले स्पष्ट बोललात.”

“पोटातली भूक खरं बोलायला भाग पडते.” ती हसत म्हणाली. झाकोळलेपण जरा कमी झाले. दोघांनी मिळून जेवणाची तयारी केली.

असेच थोडे बोलण्यात आणि जास्त संकोचात पुढचे काही दिवस गेले. एके दिवशी असेच दोघेजण जेवण झाल्यावर मागची आवराआवर, भांडी घासणे वगैरे करत होते.

“तुम्हाला एक सांगायच होत. तुम्ही इथे आल्यापासून मी बघतोय, तुम्ही फार अवघडून वागताय. मी तुम्हाला मोकळं करायचा प्रयत्न केला की तुम्ही आणखीनच कोशात जाताय. मी जवळ उभा असलो की तुम्ही जाणवेल असे आक्रसता जणू काही कोणी तुमच्याबरोबर जबरदस्तीने जवळीक करणार आहे. अशा वेळी काय कराव हे मलाही कळत नाहीये, तुम्ही इथे किती दिवस असाल मला माहिती नाही. पण हा संकोच, अवघडलेपण सोडलत तर दोघांनाही सोयीच जाईल. तुम्ही मोकळेपणान सांगितलत की मी माझ्यात काही बदल करायला हवा आहे का तर मलाही नेमक कस वागायचं हे कळेल.” उत्तराच्या अपेक्षेने तो तिच्याकडे पहात होता.

त्याला काय उत्तर द्यावे हे तिला सुचेना. त्याच्याकडे बघण्याचा धीरही तिला होईना. ती तशीच ताटात घसणी फिरवत राहिली. आता पुढे काय बोलावे हे त्यालाही समजेना. ही कोंडी फोडल्याशिवाय पाणी वाहते होणार नाही हे तिलाही कळत होत. पण बांधावर घाव घालायचा धीर होत नव्हता. शेवटी काहीएक निश्चय करून तिने त्याच्याकडे पाहिले.
“आम्ही दोघी बहिणीच. मला दोन आत्या. त्यांनाही मुलीच. मामाला मुलगा होता. पण आमचा त्याच्याशी फार कधी संबंधच आला नाही. पुढे मुलींच्या शाळेत आणि मुलींच्याच कॉलेजात शिकले. नोकरीच्या ठिकाणी पुरुष आहेत. पण त्यांच्याशी फार जवळून कधी संबंधच आला नाही. लग्न झाल्यावर नवऱ्याला एक लग्न झालेली बहिण. त्यामुळे वडील आणि नवरा सोडून दुसरा पुरुष आजूबाजूला इतक्या जवळून वावरतोय अशी सवयच नाही.”

“ अच्छा म्हणजे म्हणजे माझे पुरुष असणे तुम्हाला खटकतंय तर.”

“हो. तोच खरं प्रॉब्लेम आहे.” ती अभावितपणे म्हणून गेली.” आणि नंतर आपण काय हे मुर्खासारख बोललो हे लक्षात येऊन खजील आली.”

सोहमला हसणे आवरेना. “मी पुरुष असण्याचा कोणाला एवढा प्रॉब्लेम होईल हे मला आयुष्यात कधी वाटले नव्हते. पण सॉरी. मी तुम्हाला म्हटले होते की तुमच्या संकोचाचे कारण कळले तर मी माझ्यात बदल करेन. पण मी पुरुष असणे काही मला बदलता येणार नाही. त्यामुळे हे तुम्हाला आहे तसे स्वीकारावे लागेल. सॉरी.” तो गंभीर होण्याचं नाटक करत म्हणाला.

आता मात्र तिलाही हसू आवरेना. आपल्या अस्वस्थतेचे नेमके कारण शब्दातून व्यक्त झाल्याने ती मोकळी झाली.
“हा म्हणजे तसे हल्ली शस्त्रक्रिया वगैरे करून ते बदलता येईल. पण खरच सॉरी. नाही जमणार ते मला.”

“ओ, काहीही काय बोलताय? मला इतका अनोळखी पुरुष एवढा आजूबाजूला वावरतोय ही कल्पनाच अस्वस्थ करतेय. नाही, तुम्ही जरा स्वत:ला माझ्या ठिकाणी ठेऊन बघा. इतकी कमी ओळख असणाऱ्या पुरुषाबरोबर असं राहायच हे अस्वस्थ होण्यासारखे नाही का?”

“नाही बुवा. मी जर तुमच्या ठिकाणी असतो तर मला वाटलं असतं की चला जास्तीची कोणतीही जवाबदारी न घेता दुसऱ्या पुरुषाबरोबर राहण्याचा अनुभव मिळतोय. मस्त एन्जॉय करुया.”

आत्ता तो तिची थट्टा करतोय हे लक्षात आल्यावर ती मोकळेपणी हसली. भरलेलं आभाळ जोरदार सर पडून गेल्यावर मोकळे व्हावे असे तिला झाले. गेल्या कित्येक दिवसांची बेचैनी, अस्वस्थता, संकोच दूर झाला.

“हे बघा जितके दिवस तुम्ही इथे आहात तितके दिवस आपली दिल दोस्ती दुनियादारी. डन?

दिल दोस्ती म्हणजे ती टीव्हीवरची सिरीयल ये लक्षात यायला तिला जरा वेळच लागला. “डन”
(क्रमश:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users