वेस्टर्नपटांची ओळख - परिचय - भाग १

Submitted by अतुल ठाकुर on 5 May, 2018 - 01:02

the-man-with-no-name-collection-53db3768a6f86.jpg

पूर्वीसारखे वेस्टर्नपट आता हॉलिवूडमध्ये निघत नसले तरी चित्रपटाचा हा प्रकार पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. आणि होणारही नाही. दर काही वर्षांनी एखादा वेस्टर्नपट येतच असतो. येणार्‍या चित्रपटांपैकी सर्वच दर्जेदार असतात असेही नाही. मला स्वतःला उत्तम वेस्टर्नपट पाहिला की कुणीतरी शिवधनुष्य पेलल्याची भावना होते. कारण चित्रपटाच्या या प्रकारात फार सूक्ष्म कंगोरे आहेत. साधारणपणे १८५० ते १९३० पर्यंतच्या काळातले वातावरण उभे करावे लागते. विसाव्या शतकात माणसे असली तर जुन्या गाड्या दिसतात. त्याच्या थोडे आधी गेले की रेल्वे येऊ घातलेली असते आणि घोडेही असतात. त्याच्या आधी बहुतकरून घोडेस्वारीच. आणि त्यावरच्या स्वारांच्या बुटांना असलेले ते अणकुचीदार स्पर्स. या काळानुरुपच वेशभुषा असते. अलिकडला काळ असेल तर कोट आणि हॅट, पलिकडला काळ असेल तर जॅकिट आणि हॅट. त्याबरोबर घरे, टाउन्स, सलून्स यांचे नेपथ्य पुन्हा तो काळ उभा करेल असे असावे लागते अन्यथा तो फिल येत नाही. जुन्या "जँगो" सारख्या चित्रपटात तर रस्ता असा दिसलाच नव्हता सर्वत्र माती किंवा पायवाटा. मोठमोठाली ड्राय गुड्सची दुकाने. घोडे किंवा घोडागाडी सांभाळण्यासाठीच्या जागा. हे त्याकाळचे पार्किंग असणार.

एकंदरीत काहीवेळा रुक्ष भासणारे, खडखडीत, रोखठोक वातावरण. निसर्गही तसाच रोखठोक. बहुतेक वेस्टर्नपटात एकतर उन्हाळा किंवा हिवाळा दाखवला असेल. त्यातही थंडीच. पण बर्फाळ जागा फारच कमी दिसल्या. घोड्यांचा कळपाची राखणदारी असेल तर हिरवाई दिसते. कथावस्तु साधारणपणे घडते ती टेक्सास आणि मॅक्सिकोच्या आसपास. बहुतेकदा कडक उन्हाळ्याचे दिवस, त्यात फारशी झुडपे नसलेल्या मोठमोठाल्या डोंगरावरच्या घोड्यांच्या टापानींच मळलेल्या वाटेवरून भरधाव वेगाने चाललेले ते घोडेस्वार. कमरेला लटकलेले पिस्तुल. मध्येच थांबून कातडी गोल बॅगमधून ते पाणी पितात. त्यावेळी त्यांचे उन्हाने रापलेले चेहरे दिसतात. ही मंडळी टाऊन्समध्ये आली कि आपल्याला नागरी वस्ती दिसते. मग त्या विशिष्ट टोप्या घातलेल्या स्त्रिया. त्या समोर आल्या की आदबीने हॅट काढणारे, निदान हॅटला हात लावून ती अदब दाखवणारे हे घोडेस्वार अत्यंत मानी असतात. ही माणसे प्रथम जाणार ती न्हाव्याकडे. हजामत उरकली की जाणार अंघोळीला. फुल टब बाथ आणि मग "स्टेक" असलेलं व्हिस्किसोबतचं जेवण. तेव्हाच यांना "ऑलमोस्ट फिलिंग लाईक अ ह्युमन" अशी भावना होते.

चित्रपटात ही अक्कडबाज मंडळी सलून्समध्ये गेली की बहुधा पहिली मारामारी होते. कुणीतरी तेथे कुरापत काढणारा भेटतो. मग गनफाईटचे आव्हान दिले जाते. त्यात अर्थातच आपला हिरो जिंकतो. काहीवेळा पिस्तुलाशिवायच मारामारी होते. त्यात बहुतेकदा ठोसेबाजी. तेथे कुणी मारामारी थांबवायला मध्ये पडत नाही. उलट प्रोत्साहनच दिले जाते. जो शेवटपर्यंत उभा राहिल तो जिंकतो. अर्थात आपला इरो जिंकतो आणि बाकिचे त्याच्याकडे आदराने पाहु लागतात. जो विद्युतवेगाने गन काढून अचूक नेम साधतो त्याला या चित्रपटात मान असतो. वेस्टर्नपटाचे बहुतेक नायक हे "फास्टेस्ट गन इन द टेरीटरी" असतात. यांच्या बाहुबलही असतं शिवाय ही मंडळी अतिशय चाणाक्ष आणि सावध असतात. वेस्टर्नपटाची भाषा हा एक आणखी मजेदार प्रकार आहे. ती तशी नसल्यास आपल्याला वेस्टर्नपटाचा फिल येऊ शकणार नाही. येथे माणसे "आय एम नॉट " न म्हणता "आय एंट" असे म्हणतात. "थॅक्यु" हा शब्द फार कमी वेळा तुम्हाला ऐकायला मिळेल. त्या ऐवजी "मच ओब्लाईज" असे शब्द ऐकु येतील.

सलून्समध्ये चाललेल्या जुगाराचे दृश्य नसेल तर वेस्टर्नपट पूर्ण होणारच नाहीत. खेळ एकच आणि तो म्हणजे "पोकर". "लेट्स प्ले सम पोकर" हे वाक्य अनेक ठिकाणी तुम्हाला ऐकु येईल. या दृश्यांमध्ये बरेचदा ज्याला टाईट क्लोजप्स म्हणतात तसे घेतलेले असतात. काहीवेळा खेळणार्‍यांचे फक्त डोळे दिसतात. फक्त चेहरे दिसतात. अतिशय उत्सुकता ताणून धरणारी ही दृश्ये असतात. त्यात हार जीत होते. त्यात लबाडी करणारे असतात. त्यामुळे पुन्हा गनफाईटची आव्हाने दिली जातात. त्यात माणसे मरतात देखिल. कार्ड चिटर हा गुन्हेगार मानला जातो. एखाद्याचा घोडा चोरणे हा देखिल गंभीर गुन्हा मानला जातो. या चित्रपटात न्यायालये असतात. मात्र वेळ दवडणे नसते. फटाफट निकाल लागतो. आणि गुन्हेगाराला फासावर चढवले जाते. हे फासावर चढवणे आम जनतेसमोर असते. सर्व माणसे हा सोहळा पाहण्यासाठी जमतात. वेस्टर्नपटात काही ठरलेल्या व्यक्तीरेखा असतात. त्या नसल्यास वेस्टर्नपट हे वेस्टर्नपट वाटणारच नाहीत. शेरीफ ही सर्वात महत्त्वाची व्यक्तीरेखा.

शेरीफचा तोरा काही वेगळाच असतो. काहीवेळा आपला नायकच शेरीफ असतो. अतिशय प्रामाणिक, धाडसी आणि अर्थातच फास्टेस्ट गन. त्याच्या छातीवर डावीकडे लावलेला स्टार हा त्याचा मानबिंदू. त्याच्या कर्तव्याची सतत जाणीव देणारा. त्याच्या बरोबर त्याचे डेप्युटी. शेरीफ अथवा डेप्युटी म्हणून होणार्‍या नेमणूकाही फटाफट. आपण उजवा हात वर करायचा. "मी आपले कर्तव्य बजावेन" अशा अर्थाची शपथ कुणीतरी दिली कि तुम्ही शेरीफ किंवा डेप्युटी झालात. छातीवर स्टार, हातात बंदूक, कमरेला पिस्तुल, मांडीखाली घोडा लगेच येतो. पगार मात्र फारसा नसतो. आठवड्याचे काही डॉलर्सच. मग काही भ्रष्ट शेरीफ असतात, काही धनदांडग्यांना विकले गेलेले असतात. त्यांच्याशी आपला नायक टक्कर देतो. काही गुन्हे या शेरीफच्या अखत्यारीबाहेर गेले की मग यु एस मार्शलना बोलावले जाते. हा आणखी वरचा हुद्दा असावा. मात्र बहुतेक प्रकरणं ही शेरीफच हाताळतो.

शेरीफ गनफाईटचे आव्हान देऊ शकत नाही. जर द्यायचे असेल तर मात्र त्याला आपला बॅच उतरवून ठेवावा लागतो. सलूनमधला बारटेंडर ही वेस्टर्नपटात आणखी एक नेहेमी दिसणारी व्यक्तीरेखा. काहीवेळा महत्त्वाची भूमिका बजावणारी. मात्र भूमिका महत्त्वाची नसली तरी तो असायलाच हवा. अनेकदा त्याला ड्रिंक देणे आणि ग्लास पुसत राहणे इतकीच कामे असतात. तरीही तो असला म्हणजे विशिष्ट "फिल" येतो. वेस्टर्नपटात होणारी गनफाईट हा त्या चित्रपटातील सर्वोच्च क्षण. काहीवेळा संपूर्ण चित्रपट त्याभोवती फिरत राहतो आणि हा क्षण अगदी शेवटी येतो. या गनफाईटसाठी काही धनदांडगे खलनायक कुशल गनफायटर्सना बाहेरून बोलावतात. अर्थात आपला नायक त्याला पुरून उरतो. ही फाईट पाहणे चित्तथरारक असते. विस्तीर्ण भूमी, त्यावरील डोंगरांच्या रांगा, काहीवेळा सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य, काहीवेळा दौडत जाणारा घोड्यांचा कळप, आजुबाजुचे डोळे निववणारे हिरवेगार कुरण, चॉकलेटी रंगाच्या निरनिराळ्या शेडसचे वेश परिधान केलेले ते गनफायटर्स, कळपाची राखण करणारे, कठोर, अत्यंत मानी. या सार्‍यांचा संगम असणार्‍या काही महत्त्वाच्या वेस्टर्नपटाची सफर या लेखमालेद्वारे आपल्याला करायची आहे. वाचकांना ती निश्चितच आवडेल अशी अपेक्षा आहे.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद जाई.
जुन्या चित्रपटांपासून सुरुवात करायची आहे. त्यात गॅरी कूपरचे हाय नून. वेरा क्रूझ सारखे चित्रपट, जॉन वेनचे रियो लोबो, रियो ब्रावो, ट्रू ग्रीट सारखे चित्रपट, सर्जियो लियॉनिची क्लासिक गणली गेलेली डॉलर सिरिज, अ‍ॅलन लॅडचा "शेन" वायट अर्पच्या आयुष्यावर निघालेले काही चित्रपट, लि व्हान किफचे काही वेस्टर्नस, जँगो सारखे क्लासिक्स, क्लिंट इस्टवूडचे "अनफरगीव्हन", "पेल रायडर" सारखे चित्रपट यांसारख्या चित्रपटापासून ते अगदी शेरॉन स्टोन आणि जीन हॅकमनच्या "द क्विक अँड द डेड" आणि अलिकडे आलेल्या एड हॅरिसच्या "अपालूसा" पर्यंत अनेक चित्रपट समोर आहेत.
वेळ मिळेल तसं लिहित जाईन.

मस्त सुरुवात, पुढची भाग वाचायला मज्जा येणार..
जर ह्या प्रकारातला एखादा पिक्चर टीव्हीवर लागलेला असेल तर तो नक्कीच बघितला जातो.. फार म्हणजे फार डिटेलिंग केलेलं आढळतं ह्या पिक्चर्स मधे...

छान मालि का होईल. संगीत पण मस्त. माझा वर्ल्ड बेस्ट मॅकेनाज गोल्ड. नटराज सिनेमात पाहिलेला पहिला इंग्लिश सिनेमा!!!! रूढ अर्थाने वेस्टर्न नाही पण ह्योच माझा लाडका. तदनंतर क्विक गन मुरुगन. ऐसी मुव्ही फिर कभी बनेगी नही. वेस्टर्न पटांचे तमीळ इंटर प्रिटेशन म्हणावे लागेल.

एकदम भारी कल्पना सुचलेली आहे तुम्हाला. सुरुवातही झकास केलीत.
लूकिंग फॉरवर्ड Happy
ही मालिका लेकालाही वाचायला द्यावी लागेल. लेखानुसार ती ती फिल्म बघणं आणि ज्या आधीच पाहिल्यात त्यावरचे लेख वाचणं तो एन्जॉय करेल. त्या अर्थी हे एक बेस्ट वर्कशॉपच घेताय तुम्ही. सुट्टीचा असाही एक सदुपयोग होईल Happy मनापासून धन्यवाद.

मस्त! नवर्‍यामुळे या जगताची ओळख झाली. जॉन व्हेन आणी क्लिंट इस्टवुड हे आघाडीचे. यांचे बरेच सिनेमे पाहीलेत. पण जॉन वेन चा रिओ ब्राव्हो छान होता. आणी क्लिंट चा गुड, बॅड अँड अग्ली . आणी तुम्ही वर लिहीलेले पेल रायडर आणी अनफरगिव्हन दोन्ही बघीतलेत.

बाकी येऊ दे अजून माहिती.

एकूण लेख मालिका "अ‍ॅक्शनपॅक्ड" असणार आहे तर Happy

मी इंग्रजी सिनेमे पहात नाही, अ‍ॅक्शनपट तर नाहिच नाही. तुमचे लेखन वाचून एखादा पहावा वाटला तर बघू Happy

दक्षिणा, जॉन वेन चा रिओ ब्राव्हो जरुर बघ. अगदी सोपा आहे, उगाच डोकेफोड नाही की अनावश्यक हाणामारी नाही. टिपीकल वेस्टर्न पार्श्वभूमी, जॉन वेन, डीन मार्टीन ( प्रख्यात गायक ) आणी बाकी कलाकारांचा सहज सुंदर नैसर्गीक अभिनय याने हा चित्रपट नटलाय.

हे गाणे बघ. मला जाम आवडते
https://www.youtube.com/watch?v=v2ssbgThljU

मस्त धागा विषय...

यात काही नाव अजून...सर जेम्स स्टुअर्ट चा दि मैन फ्राम लारमी, ब्रोकन एरो, हाऊ द वेस्ट वाज वन, तसंच जीन हैकमैन चा बाइट द बुलेट, राबर्ट मिच्यूमचा द रिवर ऑफ नो रिटर्न सामील आहेत....

अरे वा! मस्त विषय Happy
अवांतरः सध्या चालू असलेल्या 'वेस्टवर्ल्ड' सिरीज मध्ये सुद्धा असा भाग आहे Happy

एकूण लेख मालिका "अ‍ॅक्शनपॅक्ड" असणार आहे तर

यस ऑफकोर्स Happy हा प्रतिसाद खुप आवडला.

ही मालिका लेकालाही वाचायला द्यावी लागेल. लेखानुसार ती ती फिल्म बघणं आणि ज्या आधीच पाहिल्यात त्यावरचे लेख वाचणं तो एन्जॉय करेल. त्या अर्थी हे एक बेस्ट वर्कशॉपच घेताय तुम्ही. सुट्टीचा असाही एक सदुपयोग होईल
हे लक्षात नव्हतं आलं. मी जरूर प्रयत्न करेन की ज्यामुळे ही मालिक मनोरंजक होईल.

सर्वांचे मनःपूर्वक आभार Happy

रश्मे नक्की Happy
कुणी रेकमेंड केले तर पाहते असे, पण आपण होऊन इंग्रजी चित्रपटाच्या वाट्याला नाही जात.
एक तर ते उच्चार समजून घेण्यात वेळ जातो, सब टायटल्स असतील तर ती वाचण्यात.

<<मी इंग्रजी सिनेमे पहात नाही, अ‍ॅक्शनपट तर नाहिच नाही.>> मला वाटतं आतांचे इंग्रजी अ‍ॅक्शनपट व पूर्वीचे वेस्टर्नपट यांत खूप फरक आहे; खुला निसर्ग, रांगडी, झुंजार जीवनशैली, रोमांचक कथानक व कांहीं अविस्मरणीय पात्रं [ व त्या साकारणारे दिग्गज कलाकार] हें वेस्टर्नचं वैशिष्ठ्य अभावानेच आतांच्या अ‍ॅक्शनपटांत पहायला मिळतं. वर उल्लेखिलेल्या अनेक चित्रपटांप्रमाणे ' Fastest Gun Alive' , 'Last Train from the Gunhill' अशा अनेक वेस्टर्नसमधे ग्लेन फोर्ड, गेरि कूपर, कर्क डग्लस, अ‍ॅन्थोनी क्वीन इ. अनेक मातब्बर अभिनेत्यानी वठवलेल्या भूमिका व ते चित्रपटही कायमचे आनंदायी ठरतात.
ही लेखमालीका माझ्यासाठी पुनःप्रत्ययाचा ठेवाच ठरणार आहे !

ओ ठाकूरसाहेब,
याचे पुढचे भाग कधी लिहिणार?

मी परवाच द गुड, द बॅड अँड द अग्ली बघितला. मझा आला. काय ते संगीत, काय ते संवाद, काय तो अग्ली अन काय तो uh नावाचा व्यक्ती Lol

छान ओळख!
<<,कुणी रेकमेंड केले तर पाहते असे, पण आपण होऊन इंग्रजी चित्रपटाच्या वाट्याला नाही जात.
एक तर ते उच्चार समजून घेण्यात वेळ जातो, सब टायटल्स असतील तर ती वाचण्यात.<<<+१००००००
अगदी मनातले बोललीस. सबटायटल्स वाचण्यात चित्रपटाचा आनन्द घेण्याचे राहुन जाते.

पण या धाग्याने उत्सुकता वाढलिये. इथे रिकमेन्ड केलेले नक्कि बघेन.

एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मिसलात - वेस्टर्न पटांचे म्युजिक! एनिओ मॉरिकोन नावाच्या भीष्माचार्यांचे स्मरण केल्याशिवाय वेस्टर्न पटावरील कुठलाही लेख अपूर्ण आहे.

२०१६ चा द मॅग्निफिशन्ट सेव्हन प्राईमवर रेंट करायचा विचार करतोय.. हा IMAX ला पहिला होता आला तेव्हा.. पण पुन्हा बघावासा वाटतोय. नवीन आलेले वेस्टर्न आहेत का अजून कोणते?

Django unchained
The ballad of buster scruggs
The power of dog
The hateful eight

खेरीज, once upon a time in hollywood हा सिनेमा वेस्टर्न नसला तरी वेस्टर्न मध्ये काम करणाऱ्या कलाकारांवर आहे. ह्यात एक मोठा सीन आहे ज्यात वेस्टर्न मधल्या सीनचे शूटिंग दाखवले आहे. लिओनार्दोने खूप भारी ॲक्टिंग केलीये त्या सीन मध्ये.

'रिव्हर ऑफ नो रिटर्न'
अभिनेत्री मर्लिन मन्रो
सर्व गाण्यांची गायिका - मर्निन मन्रो!!! काय सुंदर गायलीये.

नव्या प्रतिसादांमुळं हा थ्रेड आचानक जागा झालाय!
विषय अर्थातच माझ्या जिव्हाळ्याचा. मग याच लेखाचे पुढचे भाग आहेत का याचा धुंडाळा धेतला. नाही सापडले. द गुड, बॅड, अग्लीवर काही लिखाण दिसलं. आणि गेली काही वर्षं लेखक मायबोलीवर सुप्तावस्थेत आहे असं जाणवलं. चूभूद्याघ्या.

मधल्या काळात यलोस्टोन या मालिकेची फार हवा झाली होती. न्यू एज वेस्टर्न... ही मालिका चांगली आहे यात शंकाच नाही.
पण याच कथेचा एक प्रिक्वेल म्हणून 1883 ही एक सीझन चाललेली मालिका होती. मला ती जास्त भावली.

कारण सांगतो.
पायोनिअर्स म्हणजे नवीन भूभाग पादाक्रांत करायला निघालेले, पूर्वीच्या सीमा उल्लंघून नव्या जगात संचार आणि वसती करायला निघालेला आघाडीचा चमू. बिनीचे शिलेदार, एका अर्थी घुसखोर.
पायोनियरपट हा वेस्टर्नपटांचं सब-जॉनर सिनेप्रकार माझ्या सगळ्यात आवडीचा आहे. वेस्टर्नपटांमध्ये मारधाड, लूटमार, अनाचार, अत्याचार हे नित्याचे आहे. ती एक जीवनशैली आहे. या जीवनविचाराचं मूळ आपल्याला पायोनिअरपटांमध्ये सापडतं.

वेस्टर्नपटांत कायम एक अराजकाची छाया असते. अघटित घडणार, आक्रित होणार अशी शंका असते. आणि ही छाया जर कुठे सर्वात गडद असेल तर ती पायोनिअर चित्रपटांमध्ये.
रेड इंडीयन्स बरोबर दोन हात, लहरी निसर्गाशी संघर्ष, अनोळखी भूप्रदेश, शस्त्र-अस्त्र-साधनसामुग्री यांची कमतरता, एक ना दोन.
मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे, वेगवेगळ्या स्वभावविशेषांची मंडळी एकत्र आल्यावरचा अपरिहार्य संघर्ष, वय-रंग-पंथ-धर्म यांच्या फरकामुळे घडणारे कलह...
हे सगळं घडत असतं ते जीवाच्या आकांताने चाललेल्या पायपिटीच्या पार्श्वभूमीवर, जगण्यापेक्षा मरण्याचीच शक्यता अधिक असताना... रात्रंदिन आम्हा युद्घाचा प्रसंग हेच खरं.
एकाच वेळी हंटर मनोवृत्ती आणि गॅदरर प्रवृत्ती यांचा अनोखा मिलाफ या पायोनिअर्समध्ये जाणवतो. डर के आगे जीत है, हे जर कुठे अनुभवायचे असेल तर पायोनिअरपट हे जरूर बघावेत.

Pages