चाळीतील गमती-जमती

Submitted by राजेश्री on 5 May, 2018 - 13:33

चाळीतल्या गमती-जमती

कुठेही जाऊ नका.आम्ही थोड्याच वेळात परत येतोय.प्रायोजक अमुक अमुक म्हणत जाहिरात लागली की टीव्ही बघताना जरा पाय मोकळे करून यायची आमची सवय.पश्या मात्र याला अपवाद असायचा.त्याचा टीव्ही वर लयच विश्वास.एकवेळ आई सांगेल ते ऐकणार नाही पण टीव्ही मध्ये अगदी कुणी काही अगदी मालिकेत जरी काही सांगितलं तर तो तसाच वागायचा. म्हणजे कुठेही जाऊ नका.पहात रहा म्हंटल की हा आपली मान नाही जाणार कुठे अशी हलवायचा .पहात रहा म्हंटल की हा शहाणा,यालाच सांगत असल्यासारखे पाहतो.म्हणून आहे त्या पेक्षा आणखी टीव्ही पुढे सरकून बसायचा.
सिंदबाद ही पश्याची आवडती मालिका,म्हणजे अगदी जीव की प्राण.आणि त्याची सुलेमानी नाव असणारी तलवार म्हणजे पश्याची प्राणांहूनही प्रिय वस्तू.ती मालिका बघता बघता सिंदबादच्या हातात तलवार असेल तर हा पट्ट्या म्हणायचा. आज काय हुनार नाय बघ सिंदबाद ला त्याच्या हातात तलवार हाय. जरा कुठे सुलेमानी सिंदबाद ने बाजूला केली की पश्या घाईला यायचा.स्वतःच ओरडायचा सिंदबाद इकडे तिकडं सुलेमानी टाकू नको,आधी ती हातात घे.
एकदा सिंदबाद वर मोठं संकट यायला आणि त्याची सुलेमानी तलवार उडून लांब पडायला एकच गाठ पडली.इकडे पश्या इतका हवालदिल झाला की तो सुसू करायला उठला होता,पण सिंदबाद ला सुलेमानी सापडल्यावर जाऊ म्हणून तो बेत रहित करून तो आपल्या जाग्यावर बसला.जणू काही सिंदबाद ला सुलेमानी परत मिळवून द्यायला त्याची भूमिका महत्वपूर्ण असेल असं त्याला वाटलं असावं.खूप संकटे आली सिंदबाद वर सुलेमानी लांब लांब जाऊ लागली.पश्या हैराण झाला. पण असा काही जोराचा वारा सुटला सुलेमानी सिंदबाद चक्कर येऊन पडला तिथे पडली आता केवळ तलवारीला सिंदबाद चा हात लागायचा अवकाश होता. पश्या काकुळतीला येऊन सिंदबाद ला डोळे उघडण्यासाठी आर्जव करीत राहिला.खूप डोक्यावरून पाणी गेल्यावर इकडे सिंदबाद च्या हातात सुलेमानी पडली.इकडे पश्याने सुटकेचा निश्वास सोडला.त्याच्या मांडी खालून कसल पाणी आलं बघितलं तर त्याने सोडलेल्या सुटकेच्या निश्वासाची ती किमया होती.इकडे राणीची आई की ज्यांच्यात आम्ही टीव्ही पाहायला जायचो.त्या पश्या पश्या काय केलंस हे ,...आईला पाठव तुझ्या पुसायला म्हणून त्याला रागवत होत्या. आणि आम्ही हासून हासून जमिनीवर खाली गडबडा लोळत होतो.पश्या च्या त्या जागेला आम्ही त्या दिवसापासून पश्याचे तळे हे नाव दिले होते.....(क्रमश:...)

राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
०१/०४/२०१८

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पश्या च्या त्या जागेला आम्ही त्या दिवसापासून पश्याचे तळे हे नाव दिले होते..... >>> Rofl छान लिहिलंय. आता पुढचा भाग वाचतो.

आईग्ग, कसलं भारी आहे हे. सगळे भाग वाचून काढले आज.
एकसे बढकर एक आहेत, लय भारी. लिहीण्याची स्टाइल पण सहज, खुसखुशीत आहे. मला तर अव्याचा भाग भारीच आवडलाच.