घळघळलेली

Submitted by निशिकांत on 3 May, 2018 - 01:29

घडी मनाची चुरगळलेली
कपार ओली ओघळलेली

निर्माल्याचे अतीत दावी
फुले कालची दरवळलेली

उमलायाचा काळ असूनी
कळी अशी का मरगळलेली?

ऐक निर्भया असिफाची तू
आर्त कहाणी भळभळलेली

छतास क्षुंबर लखलखणारे
मने अशी का काजळलेली?

परक्या घरची पोर सासरी
दुधात साखर विरघळलेली

स्त्रीभ्रुणास अंधार नसावा
रात्र असावी मावळलेली

रंग उडो वा दिसो जुनेरी
भींत नसे ही डळमळलेली

आठवते "निशिकांत" तुला का?
रात्र तिजसवे वादळलेली

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users