किस्सा ए पारसी

Submitted by अदित्य श्रीपद on 30 April, 2018 - 08:46

किस्सा ए पारसी
पारशी लोक म्हटले कि आपल्याला ही गोष्ट अगदी आवर्जून सांगितली जाते कि ते ८व्या कि ९व्या शतकात इराण मधल्या मुसलमानी आक्रमणामुळे पलायन करून गुजरात मधल्या संजाण नावाच्या गावी आले आणि त्यानी तिथल्या राजाकडे( जाधव राणा किंवा यादव राणा )आश्रय मागितला मग त्याने दुधाने भरलेला वाडगा पाठवला – तुमच्या करता इथे जागा नाही हे सुचवायला, तर त्या पारशी लोकांच्या प्रमुखाने त्यात मूठभर साखर टाकली – ह्या साखरेप्रमाणे आम्ही तुमच्यात मिसळून जाऊ आणि उलट गोडवाच वाढवू असे सुचवण्याकरता. आता ही गोष्ट कितपत खरी आहे ते माहिती नाही. पण खरी नसावी. कारण पारशी लोक संजाण गावी यायच्या आधीपासून भारतात व्यापाराच्या निमित्ताने ये जा करत होते अगदी सिकांदाराच्या स्वारीच्या आधीपासून आपले त्यांचे संबंध होते त्यामुळे ते आपल्या चांगलेच ओळखीचे होते.त्यामुळे शक्यता अशी आहे कि ते जरी असे निर्वासित होऊन आले असले तरी त्याना येऊन आमच्या राज्यात वसू नका असे सांगावे, असे काही त्या राजाला वाटले नसावे आणि ते इथे अगदीच उपरे ही नसावेत. असो पण आता जो किस्सा इथे सांगणार आहे तो थोडा वेगळाच आहे.
झाले असे कि हे पारशी लोक भारतात आल्यानंतर इंग्रजांचे राज्य येई पर्यंत तसे अगदी गुप्तच होते. म्हणजे ते होते त्यांचा धर्म, त्यांच्या चालीरीती, त्यांचा व्यापार सगळे चालू होते पण ते राजकीय पटलावर चमकले नाहीत अगदी गप गुमान राहिले(बादशाहा अकबराने सर्व धर्माची चर्चा करताना त्यांचे काही धर्मगुरू आले होते असा उल्लेख सापडतो आईने अकबरीत) त्यामुळे त्यांचा फारसा उल्लेख सापडत नाही पण इंग्रज आल्यावर मात्र ह्यात फरक पडला. एक तर त्यांची शरीरयष्टी, वर्ण बराचसा युरोपियानान्प्रमाणे असल्याने, त्यानी पटकन इंग्रजी भाषा आत्मसात केल्याने आणि व्यापारउदीमात त्यांचे बस्तान आधेच बसले असल्याने ते लगेचच ह्या नव्या इंग्रजी राज्यात नावारूपाला आले. मुंबई हे इंग्रजांमुळे भरभराटीला आलेले बंदर त्यामुळे ते गुजरातेहून तिथे येऊन स्थायिक झाले. सुरुवातीला मुंबई वसवणारे समाजगट तीनच म्हणजे कोळी आगरी भंडारी पाठारे प्रभू हे मराठी लोक , पारशी आणि गुजराती व्यापारी हे गुजरातहून आलेले लोक आणि अर्थात इंग्रज. तर ह्या पारशी आणि पाठारे प्रभुनी लवकरच मुंबईत बक्कळ पैसा कमावून भरपूर इस्टेटी केल्या, व्यापार उदीम चालू केला. तर ही गोष्ट आहे १८३०-३२ सालच्या सुमाराची. इस्ट इंडिया कंपनीच्या मुंबई ऑफिसात काम करणारा एक अधिकारी होता, फिशर म्हणून, त्याला मुंबईच्या रस्त्यावरच भटकं कुत्रं चावलं.१८३२चा जुना काळ तो, तेव्हा कुत्रा चावल्यावर घ्यायच्या लशी आल्या नव्हत्या (त्या आल्या १८६५ नंतर ) त्यामुळे हा बिचारा रेबीज होऊन मेला. चांगले १५-२० दिवस त्याने हाल सोसले. त्यामुळे मरताना त्याने आपल्या जमा संपत्तीचा बराचसा हिस्सा इस्ट इंडिया कंपनीकडे सोपवला आणि त्याचा उपयोग मुम्बईच्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी करावा अशी अंतिम इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे मग इस्ट इंडिया कंपनीने एक फंड स्थापन करून मुंबईतल्या लोकाना जे भटके कुत्र मारून त्यांचे शव आणून दाखवेल त्याला प्रती कुत्रा आठ आणे द्यायला चालू केले. (हल्ली हल्ली पर्यंत कुत्रे नाहीतरी उंदीर मारायची आणि पैसे कमवायची हि योजना चालू होती.) तर झाले असे कि १८३० च्या सुमारास होता दुष्काळ आणि त्याकाळी आठ आणे ही तशीही बऱ्यापैकी मोठी रक्कम होती, त्यामुळे अनेक लोक मग कुत्रा मारून ते पैसे घेत, लवकरच मुंबईतभटके कुत्रे कमी आणि त्याना मारणारे जास्त असे झाले. मग ह्या लोकांनी लोकांच्या घरातले पाळीव कुत्रे पळवून नेऊन मारायला आणि पैसे घ्यायला सुरुवात केली आणि प्रॉब्लेम सुरु झाला. तसेही पारशी भटके कुत्रे मारून टाकायच्या कंपनी सरकारच्या निर्णयाविरुद्ध होते. त्यांच्या धर्माप्रमाणे कुत्रा हा पवित्र प्राणी असून तो मृत्युनंतर आत्म्याला परलोकात मार्गदर्शन करतो तसेच आप्त जणांचे संदेश त्यांच्या पर्यंत पोहोचवतो( आपल्या कडे कावळा किंवा जुन्या इजिप्शियन लोकांमध्ये मांजर हे असे काम करते असे मानले जाते)त्यामुळे कंपनी सरकारला आधीच ते कुत्रे मारणे बरोबर नाही ते थांबवा अशी तक्रार करत होते त्यात अनेक पारशांनी हौसेने, प्रेमाने पाळलेले कुत्रे पळवून नेल्याच्या आणि मारून टाकून पैसे कमावल्याच्या घटना घडल्या आणि पारशी संतापले. ३ जून १८३२ रोजी त्यानी हरताळ केला. इंग्रज सोल्जर आणि तर अधिकाऱ्यासाठी फोर्ट मध्ये पाव घेऊन जात असलेल्या गाड्या अडवून त्यातले पाव आणि मांस रस्त्यावर फेकले, खाताकांच्या दुकानांची मोडतोड केली, अनेक दुकान आणि ऑफिसेस उघडू दिली नाहीत एवढेच नाहीतर मुंबई हायकोर्टाचे (तेव्हाचे बॉम्बे हाय कोर्ट) न्यायाधीश जे होते ते रस्त्याने जात असताना त्यांची बग्गी अडवून त्यात चक्क रस्त्यावरचा कचरा आणि २-५ मेलेल्या घुशी टाकल्या. असा एकंदर दिवसभर बराच धुमाकूळ घातल्यावर मग शेवटी कंपनी सरकारने संध्याकाळी कुलाब्यावरून सोजीर लोकांची पलटण बोलावून गोळीबार केला, धरपकड केली आणि हा दंगा काबूत आणला. (अजून मुंबईत पोलिस खातेसुद्धा निर्माण झाले नव्हते किंवा भारतीय दंडविधान अस्तित्वात आलेले नव्हते.) धुमाकूळ घालणाऱ्या बर्याच पारशाना कैद करून २-२,३-३ वर्षांच्या शिक्षा सुनावल्या. पण कुत्रे मारायचे मात्र लगेच बंद केले. आणि बैलगाड्यावर लोखंडी पिंजरे ठेवून गल्लोगल्लीच्या भटक्या कुत्र्याना पकडणे आणि शहराबाहेर नेऊन सोडणे चालू केले. त्यांच्या करता मग पांजरपोळ ही बांधले.
आणखी एक मागे फ्रांस मध्ये चारली हेब्डो मासिकाने पैगंबरांचे चित्र छापले म्हणून त्यांच्या ऑफिसात जाऊन गोळीबार केला होता तसेच १८५१ साली एका पारशी गृहस्थाने त्याच्या चित्रज्ञानदर्पण मासिकात पैगंबरांचे चित्र छापले त्यावरून काही माथेफिरू मुसलमान लोकांनी त्याच्या ऑफिसात जाऊन तोडफोड केली. पारशी लोकही स्वस्थ बसले नाहीत त्यानी ही मारहाण तोडफोड प्रतिहल्ले केले आणि ही दंगल मग पेटली. लुटालूट एकमेकांची कार्यालये दुकाने आणि डोके फोडणे , हल्ले प्रतिहल्ले हा प्रकार जवळपास महिनाभर सुरु होता शेवटी दोन्ही समाजातल्या मान्यवर लोकांनी एकत्र येऊन सभा घेतली त्यात ह्या पारशाने माफी मागितली आणि मग ते प्रकरण एकदाचे मिटले.
अशाप्रकारे आपल्याला नेहमी शांत सभ्य कायदे पाळणारे म्हणून माहिती असणारे पारशी हे मुंबईतल्या पहिल्या वाहिल्या दंग्याचे जनक ठरले.
संदर्भ
मुंबईचे खरे मालक कोण? -वासंती फडके
https://www.researchgate.net/publication/231894694_Mad_Dogs_and_Parsis_T...
https://scroll.in/article/700501/how-an-accidentally-distorted-drawing-o...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एका चित्रपटात पारशी हिरोईन होती म्हणून पारश्यानी थिएटर पुढे निदर्शने करून खेळ बंद पाडला(त्या काळी चित्रपटात काम करायला वेश्या देखील तयार नसत) असा एक लेख वाचला होता.

पण मला आवडतात पारशी Happy किंचित डोक्याने टर्रर्रर्र असतात, पण आवडतात

ब्रिटिशकालीन मुंबईच्या इतिहासात हा दंगा प्रसिद्ध आहे. मुंबईविषयक इतिहासाच्या कोणत्याही पुस्तकात याचे वर्णन असतेच. मुंबईच्या विकासात पारसी, ज्यू आणि बोहरा या अत्यल्पसंख्य कम्यूनिटीजचा हिस्सा त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने उल्लेखनीय आहे. सूरत, संजाण, बिलिमोरा, उदवाडा येथे पारश्यांचे उद्योगधंदे होते. मुंबईच्या बंदरात उलाढाल वाढली तसे सुरतेचे महत्त्व कमी होऊ लागले. (हे खरे तर उलट आहे. सुरतेची सुरक्षितता कमी झाली तेव्हा इंग्रजांना दुसऱ्या बंदराची आवश्यकता भासू लागली होतीच.) शिवाय ताप्ती नदीच्या ओहोरण्यामुळेही गाळ साचून बंदराची कार्यक्षमता कमी होऊ लागली होती. तेव्हढ्यातच मुंबई पोर्च्युगीझांकडून इंग्रजांच्या ताब्यात आली. अस्सल दर्यावर्दी इंग्रजांना मुंबईची उत्तम नैसर्गिक बंदर म्हणून उपयुक्तता कळली नसती तरच नवल. मुंबई बंदर भरभराटू लागले तसे सूरतेहून अनेक व्यापारी, वखारवाले इथे आले. त्यात वाडिया कुटुंब प्रमुख होते. त्यांनी जहाजबांधणीचा व्यवसाय सुरू करून कलकत्ता, चीन येथे व्यापार सुरू केला.

पवई गाव विकसित करून तेथे फळबागा आणि ऊस लावणारे फ्रामजी कावसजी बानाजी यांचे चरित्रही विलक्षण आहे. या उदार पारसी गृहस्थांनी तिथे साखर कारखाना काढला होता. त्यांच्या आमरायीतले आंबे इतक्या उत्तम चवीचे असत की ते त्यांनी इंग्लंडात राणीला पाठवले होते.
विकीवर यांच्याविषयी पुष्कळ माहिती आहे.

एकाच लेखात पारशी लोकांबद्दल पुष्कळ वेगवेगळ्या तऱ्हेची माहिती समजली. माझ्या माहितीप्रमाणे पर्शिया देशातुन आले ते पारशी होत. पारशी लोक दंगेखोर होते हे वाचून आश्चर्य वाटले. कदाचित त्याकाळी मुंबईत त्यांची संख्या जास्त होती म्हणून असावे. पारशी लोक खरेच टर्रर्र असतात का? की उगाच आपले काहीही म्हटले जाते.

कुत्र्यांवरून इंग्रजांच्या काळी जो वादंग झाला होता, त्याबद्दल माझ्याही काही वाचनात आलेले आठवले. जरा अवांतर आहे. त्याकाळी मुंबईत कुत्र्यांची संख्या भरमसाठ वाढली होती. म्युनिसिपालिटीने कुत्र्यांना मारणे चालू केले होते. त्यांना मारू नये असे काही मानवतावादी लोकांचे म्हणणे होते. हा वाद गांधीजींपर्यंत पोहोचला होता. गांधीजी तेव्हा मुंबईच्या कुठल्यातरी कमिटीवर होते. आता गांधीजींसमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला. गांधीजींनी भूतदया आचरणाप्रमाणे कुत्र्यांना मारू नका असा निकाल दिला तर जनमत विरुद्ध जाणार होते. आणि कुत्र्यांना मारा असा निकाल दिला तर स्वतःच्या नियमांना पायदळी तुडवल्यासारखे झाले असते. गांधीजी इकडे आड तिकडे विहीर अशा पेचात पडले होते. पुढे काय झाले हे वाचलेले आता आठवत नाही.

हीरजी जीवनजी रेडीमनी या पारसी गृहस्थांनी १७५६ मध्ये चीनपर्यंत धडक मारून तिथे व्यापार सुरू केला. कॅंटन येथे त्यांनी आपली ट्रेडिंग फर्म स्थापन केली. वरच्या प्रतिसादात उल्लेखलेले बानाजी, वाडिया यांच्याबरोबरच कामा, विकाजी, पारेख ही कुटुंबेसुद्धा यात उतरून अत्यंत यशस्वी झाली. १८५६ साली स्थापन झालेल्या हॉंन्गकॉंन्ग ॲन्ड शांघाय बॅंकेचे दोन संस्थापक पालनजी फ्रामजी आणि रुस्तमजी धनजीशॉ हे पारसी होते. यात जमशेदजी जीजीभॉय यांचाही समावेश होऊ शकला असता. पण व्यापारातल्या प्रतिस्पर्धी ब्रिटिश गटाला ते जवळचे आहेत अशा समजामुळे त्यांना घेतले नाही.
या सर्वांचे धाडस आणि दूरदर्शीपणा खरोखर अतुल्य होते. हा इतिहास अतिशय रोचक आहे. वाचताना भान हरपून जाते.

सचिन काळे, १८३२च्या दंग्याच्या वेळी गांधीजी जन्मलेही नव्हते. आपण कुठल्यातरी अन्य प्रसंगाविषयी सांगत असाल. पारसी हे आपण बरे आणि आपला धंदा बरा अश्या वृत्तीचे होते. अतिशय समाजाभिमुख, दानशूर असाच त्यांचा इतिहास आहे. आजवरच्या त्यांच्या भारतातल्या वास्तव्यात ज्नात असा हा एकच छोटासा दंगा आहे. त्यांना दंगेखोर म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल. उलट ' पारसी लोकांचा दुर्मीळ दंगा' अशा दृष्टीकोणातून या दंग्याकडे कुतूहलाने पाहिले जाते.
पारसी लोकांनी आपल्या ज्नातीतल्या थोर माणसांचे आणि त्यांच्या कार्याचे तपशीलवार डॉक्युमेंटेशन केलेले आहे आणि विकीवरही टाकले आहे हे आपले सुदैव. मुंबईच्या इतिहासाचे आकलन या माहितीविना अपुरे राहील.

छान लेख!
हीरा , छान माहितीपूर्ण प्रतिसाद!

छान माहिती..
हिरा सेम..
आमच्याकडे द. मुंबईत आहेत बरेच पारशी. त्यांचे बेकरी प्रॉडक्ट छान असतात.
कुत्र्यांचा दंगल किस्सा मागे व्हॉटसपवर वाचलेला.
बाकी पारशी म्हटले की आपल्याच कम्युनिटी आणि जवळच्या रक्ताच्या नात्यात लग्न केल्याने होणारे जेनेटीक प्रॉब्लेम हेच पहिले आठवते. ईथे बरीच माहिती मिळाली.

<<< ईथे बरीच माहिती मिळाली. >>>
मला वाटलं की शाहरुख खान पण पारसी आहे, अशी काही माहिती मिळतेय की काय? Light 1
(अवांतरः Queen या पसिद्ध म्युझिक ग्रुपचा फ्रेडी मर्क्युरी हा पारसी होता.)

ही लिंक पाहा.

त्या काळात पवई तलाव नव्हता. साकी, तिरंदाज, पसपवली, कोपर किंवा कोंपरी, पोवैं, तुंगवे, चांदिवली ही सात गावे फ्रामजी कॉवसजी यांनी सुरुवातीला भाड्याने घेतली आणि विकसित केली. पुढे मुंबईत चरणी आणि कामतीपुरा या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली तेव्हा दुष्काळी भागात तीन टांक्या बांधल्या. मुगभाटवाडी हा जमिनीचा तुकडा विकत घेऊन त्यात फ्रामजींनी विहिरी खोदल्या. वाफेची इंजिने आणि बैलगाड्या लावून ते पाणी ओढून पाइप्सद्वारे या टॅंक्समध्ये ओतण्याची कायमस्वरूपी यंत्रणा उभारली. आजही सी. पी. टॅंक (म्हणजे cawadji patel tank) हे नाव कावसजी पटेल यांची स्मृति जागृत ठेवून आहे. या समाजोपयोगी कामाचा सुरुवातीचा खर्च पोवैं एस्टेटच्या उत्पन्नातून झाला आणि तो तसाच कायम चालू राहावा अशी तजवीज त्यांनी करून ठेवली. ह्या कामाचे महत्त्व आणि त्या मागचा सद्हेतू शिवाय त्यासाठी भविष्यात होणार असलेला खर्च लक्ष्यात घेऊन सरकारने वरील सात गावे (प्रथम पाच आणि मग त्यात दोन गावांची भर) सवलतीच्या दराने विकत द्यावी असा अर्ज त्यांनी कंपनी सरकारकडे केला आणि इस्ट इंडिया कंपनीने काही कडक अटींसह तो मान्य केला. अशा प्रकारे आजच्या पवई, हिरानंदानी, चांदिवली, तुंगवे, कोंपरें (घाट कोपर) या भागाची मालकी फ्रामजी कावसजी पटेल यांच्याकडे आली. त्यांनी या शेतकी आणि भरड तसेच काही ठिकाणी पडीक जागेत शेतीसंबंधी अनेक प्रयोग केले. फळबागा, धान्ये, ऊस अशी पिके घेतली. यातूनच बॉंबे हॉर्टिकल्चरल सोसायटीची स्थापना झाली. संस्थापक अर्थातच ते स्वत: होते. आपली ही एस्टेट त्यांनी पूर्वेच्या बाजूने तेव्हाच्या मुंबई- ठाणे रस्त्याला जोडली. भांडूपच्या डोंगरातला एके काळचा हा कच्चा रस्ता आज आज कसा झगमगीत झाला आहे ते आपण पाहातोच आहोत.
हे सर्व मुळातून वाचण्याजोगे आहे. विशेषत: कंपनी सरकारने जमिनीच्या योग्य वापरासाठी पावणेदोनशे वर्षापूर्वी घातलेल्या अटी आजही मार्गदर्शक आहेत. अर्थात मार्गदर्शनासाठी इतिहास कोण खणून काढतंय म्हणा. सध्याच्या परिस्थितीत अशा कडक अटी विस्मृतीतच गेलेल्या बऱ्या म्हणजे सोयीच्या , नाही का?

लेख आवडला.
हिरा यांच्या प्रतिक्रिया पण फार माहितीपूर्ण..
यावर तुम्ही लिहिलेला/संकलन केलेला लेख वाचायला आवडेल.+१

मस्त माहिती आहे.आधी वाचली नव्हती.
बाय द वे मला कोणी दुधाचा वाडगा पाठवला तर "आम्ही येतोय, चहा टाका, दूध संपलं वगैरे सबबी सांगू नका" हा एकच अर्थ मी वाचू शकेन Happy
हे 'आमच्या प्रांतात तुमच्यासाठी जागा नाही' असे इंटर्प्रिट कसे करावे बुवा? चुकून कोणी 'दुधाप्रमाणे शुभ्र मनाने या प्रांतात तुमचे स्वागत' असा अर्थ काढला असता तर? (खरंच प्रश्न पडलाय.)

मी अजून एक कथा वाचली होती.पारशांच्या वकिलाने जेव्हा आश्रय मागितला,तेव्हा गुजरातच्या राजाच्या वकिलाने तेलाने भरलेला रांजण दाखवला.म्हणजे राज्य अगदी भरलेले आहे.त्यात आता जागा नाही.त्याबरोबर पारशी वकिलाने थोड्या सुया रांजणात टाकल्या.तेल काही बाहेर आले नाही.म्हणजे हे राजा! तुझ्या एवढ्या भरलेल्या राज्यात आम्ही सुईइतके नगण्य आहोत.राजाने त्यावर खूश होऊन त्यांना आश्रय दिला.अग्यारीसाठी जागा दिली.त्याचबरोबर धर्मप्रसार करणार नाही हे वचनही घेतले.

मुळात इतके क्रिप्टिक आणि अँबिग्युअस संदेश का पाठवावे?
स्पष्टात भेटून बोलावे ना जे काही आहे ते >> Lol खरे आहे.

@ हीरा, सचिन काळे, १८३२च्या दंग्याच्या वेळी गांधीजी जन्मलेही नव्हते. आपण कुठल्यातरी अन्य प्रसंगाविषयी सांगत असाल.  >>> होय, ही १९२६ सालची घटना आहे. गांधीजींनी आपल्या 'यंग इंडिया' ह्या वृत्तपत्रात भटक्या कुत्र्यांविषयी आपले मत मांडले होते, ज्यावर प्रचंड गदारोळ उठला होता. गुगळुन पाहिल्यावर मला माहिती मिळाली त्याची लिंक खाली देत आहे.

http://www.business-standard.com/article/pti-stories/culling-of-stray-do...

http://www.karmayog.com/dogs/gandhijiletter.htm