राणी एलिझाबेथ, साधी एलिझाबेथ.

Submitted by शिवकन्या शशी on 27 April, 2018 - 07:04

राणी एलिझाबेथ, साधी एलिझाबेथ.
[ही एक रूपककथा. लावू तितके अर्थ. करू तसा विचार.]
एक होती राणी एलिझाबेथ. दुसरी होती साधी एलिझाबेथ.
दोघींचाही आपापल्या मामांवर भारी जीव होता. मामांचाही त्यांच्यावर.
एके दिवशी घरात अचानक गर्दी दिसू लागली. गर्दीतच मामा झोपलेला दिसला. शेलाट्या अंग काठीचा मामा एकदम जाडसर दिसू लागला. त्याच्या अंगा खांद्यावर कसली कसली हारफुलं घातली जाऊ लागली.
साधी एलिझाबेथ मामा जवळ जायचा हट्ट धरते. राणी एलिझाबेथ सगळे प्रोटोकॉल्स सांभाळत, मूक अश्रू गाळीत उभी राहते.
जराशाने आपले कोणच ऐकत नाही म्हटल्यावर, साधी एलिझाबेथ रडून रडून हलकल्लोळ माजवते. तसा, एक दाढीवाला विकट म्हातारा तिच्या अगदी जवळ जाऊन तिला धमकावतो, ‘मामाच्या अंगावर जी फुलं आहेत, त्यात मोठमोठाले काळे पिवळे साप वेटोळे घालून बसलेत. तू जवळ जाशील तर ते साप तुला कचाकचा चावतील. गप्प बैस.’ आला तसा, तो म्हातारा डोळे गरागरा फिरवीत गर्दीत दिसेनासा झाला.
इकडे राणी एलिझाबेथ हमसाहमशी रडून हैराण झाली होती. तिच्या जवळही असाच एक म्हातारा गेला, ‘ मामाच्या अंगावर जी हारफुलं आहेत, त्यात प्रचंड मोठे कारस्थान आहे. जवळ जायचा प्रयत्नही करशील, तर तू होत्याची नव्हती कधी झालीस, ते या राजवाड्याच्या भिंतीनाही कळणार नाही. मुकाट रहा.’
पुढे साध्या एलिझाबेथचे लग्न ठरले. तिने एकच अट घातली, ‘माझ्या लग्नात कोणतीही फुले वापरायची नाहीत.’ तिची अट मान्य झाली. लग्न झाले. आणि..... मग.... हळूहळू..... कुठूनकुठून काळ्या पिवळ्या सापांची पिलावळ तिच्या आयुष्यात शिरू लागली. ‘आपण फुलांना स्पर्शही न करता, सापांच्या राज्यात कशा अडकलो?’ ---- तिला आजही कळत नाही. पण ती सामना करतेय.
इकडे राणी एलिझाबेथच्या राज्यारोहणाचा सोहळा आला. तिनेही एकच अट घातली. ‘या सोहळ्यात कोणतीही फुले वापरायची नाहीत.’ ती तर महाराणीच होणार! तिची अट तत्काळ मान्य झाली. फुलच काय, पण फुलाची पाकळीही न वापरता, जंगी राजेशाही सोहळा पार पडला.
तिने सत्तासूत्रे हाती घेतली. आणि....मग....हळूहळू.... कुठूनकुठून तिला कटकारस्थानांचा वास येऊ लागला. श्वास घेणेही जड वाटावे, इतका कुटीलपणा आजूबाजूला. ‘आपण फुलांना स्पर्शही न करता, या कटकारस्थानाच्या राज्यात कसे आलो,’ तिला आजही ते कळत नाही, पण ती त्यांचा सामना करतेय.

-शिवकन्या शशी.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults