चोरीचा मामला

Submitted by पूनम पाटील on 26 April, 2018 - 23:03

कॉलेज मध्ये असताना yahoo ई-मेल ID च्या पासवर्ड चोरीचा महत्वाचा अपवाद वगळता माझा कधी चोरीशी फारसा संबंध आला नव्हता. नाही म्हणायला लहान असताना, कचरा गोळा करायला येणाऱ्या बायकांनी पळवलेले तारेच्या कंपाउंडवर वळत टाकलेले कपडे , शाळेच्या पोरांनी येता जात लंपास केलेले झाडाचे आंबे असे किरकोळ अनुभव गाठीशी होते.
प्राथमिक शाळेत असताना शेजारच्या एका मैत्रिणीच्या घरी चोरी झाली. घरातले सगळे लग्नाला गेलेत असं पाहून घरफोडी झाली होती. खूप सारे सोनेनाणे, रोख रक्कम आणि बरच काही मिळून लाखभर रुपयांचा माल चोराने लांबवला होता म्हणे आणि त्या (छोट्याश्या?) त्यागाने रातोरात ते कुटुंब स्टार झाले. अख्ख्या कॉलनीत, घरफोडीचा आणि पोलीस घरी येण्याचा मान मिळवणारे ते पहिलेच कुटुंब होते. एरवी पोराबाळांच्या चिंतेने वाकलेले ते काका त्यानंतर पहिल्यांदाच ताठ मानेने चालू लागले, एवढं नुकसान होऊनही आम्हाला काssही फरक पडत नाही असे भाव चेहऱ्यावर आणून....काकू मात्र रोज संध्याकाळी नवी साडी नेसून, शेजार्यांकच्याकडे बसून चार अश्रू ढाळत आणि ते कपात पडणार नाहीत याची दक्षता घेत चहा घोटत. त्यांच्याविषयी मला सहानुभूती असली तरी त्यांच्या मुलीविषयी नक्कीच नव्हती कारण शाळा, ट्युशन, मित्र-मैत्रिणी मध्ये पूर्वी कुणाच्या खिजगणितंही नसलेल्या त्या मैत्रिणीचा भाव नंतर चांगलाच वधारला होता. तिच्या तोंडून तिने न पाहिलेल्या चोरीचे किस्से ऐकताना पोरापोरींना धन्य होत असे आणि आपल्या घरी का नाही झाली चोरी याचे राहून राहून मला वाईट वाटत असे. त्यांच्या या सुखाला माझीच नजर लागली आणि काही दिवसांनी इतरत्र चोरी करताना तो चोर सापडला, मात्र बातमी ऐकून काकांचे तोंड पडले कारण त्यांच्या घरची चोरी लाखांची सोडा पण हजारांचीही नव्हती हे सिद्ध झाले. काहीही झालं तरी त्यांच्या आयुष्यात सन्मानाने जगण्याचे चार दिवस आले ते केवळ त्या चोरामुळेच .

काहीका असेना, पण पुढे कित्येक दिवस आपल्याही घरी चोरी झालीय आपली आई आसवं गाळतेय , बाबा डोक्याला हात लावून बसलेत आणि हा प्रसंग शक्य तितका चेहरा पाडून रंगवून रंगवून आपण सगळ्यांना सांगतो आहे...आपल्याबरोबर मैत्री करण्यासाठी पोरींची रांग लागलीय...नेहमी पाठीवर रट्टे मारणारा शाळेतल्या बाईंचा प्रेमळ हात कधी नव्हे ते आपल्या डोक्यावरून फिरतोय...अशी स्वप्न मला दिवसरात्र पडत. एकदा तर त्यासाठी देवाकडे नवस पण केलं.
पण इथं चोरी करून आपल्याच जातबांधवाची 'खाया पिया कुछ नाही ग्लास तोडा बारा आणा ' अशी झालेली फजिती चोरांना चांगलीच ज्ञात असावी, त्यामुळं अशा कफ्फलक कॉलनीतल्या घरांत चोरी करण्यापेक्षा उपाशी मरू या त्यांच्या ठरावामुळं माझी स्वप्न सत्यात उतरण्याची अशा मावळली.
जरी चोरांनी माझी स्वप्न फारशी मनावर घेतली नाहीत तरी कॉलोनीत राहणाऱ्या एका मदिराप्रेमी आजोबानी मात्र ती फारच मनाला लावून घेतली. मुळात अल्पसंतुष्ट असल्यामुळं फार पुढचा विचार न करता ते आमच्या किंवा कुणाच्याही दारात पडलेले कुदळ, फावडे, पाण्याचा पाईप अशा छोट्या मोठ्या गोष्टी पळवत आणि आला दिवस हातभट्टीवर साजरा करत. त्यांच्या या चौर्यकर्माला आम्हा मुलांचा छुपा पाठिंबा असे कारण रोज संध्याकाळी त्यांच्या विविध गुणदर्शनच्या कार्यक्रमाने आमच्या विराण बालपणात हास्याचे कारंजे फुलत. पण त्यांची हि लोकप्रियता बाकीच्या मोठ्या लोकांना बघवायची नाही. येताजाता लोक त्यांच्याशी भांडण करत, अपशब्द बोलत. पण त्या पुण्यात्म्याने कोणालाही भीक घातली नाही कि आपला मार्ग कधी सोडला नाही, आपले चौर्यकर्म आणि पेयसाधना ते अखेरपर्यंत नेटाने करत राहिले . आपपर भाव त्यांच्या मनाला कधीच शिवला नाही, पण त्यामुळेच पुढे पुढे चोरता येतील अशा गोष्टी आमच्या, त्यांच्या आणि अख्ख्या कॉलनीत सर्वांच्याच घरी दुर्मिळ झाल्यामुळं जड अंतकरणाने आणि लटपटत्या पायांनी खाली मुंडी घालून ते पुढची कॉलनी धुंडाळू लागले.

मोठी झाल्यावर चोरीचे फायदे कमी आणि तोटेच खूप आहेत हे लक्षात आल्यावर तीच आकर्षण कमी झालं. पण लग्न झाल्यावर एकदा, ध्यानीमनी नसताना, एका मोठ्या सुट्टीनंतर जेव्हा बंद घरी परतले तेंव्हा घरात झालेली प्रचंड उलथापालथ बघून आपल्या घरी चोरी झाल्याची धक्कद (आनंद झाल्यास सुखद / वाईट वाटल्यास दुःखद या नियमानुसार धक्का बसल्यावर जी जाणीव होते ती) जाणीव झाली....अशा वेळी काय करायचं असत हे न कळण्याएवढा कुठलाही बॉलीवूडप्रेमी नक्कीच दुधखुळा नसतो/नसते ....तेंव्हा पळत पळत देव्हाराजवळ जाऊन 'हे भगवान, आपने मेरे साथ ऐसा क्यों किया, मैंने किसका क्या बिगाडा था?' असे म्हणत मी देवाच्या पायावर लोळण घेतली...पण देवानेही 'मेरे घर में देर है अंधेरी नही; तूने लहानपणी जो दुवा मांगी थी वही आज रंग लायी है...भोग अब अपने कर्म कि फळे' म्हणत हात वर केले...तेंव्हा नाईलाजाने डोळे पुसून कामवाल्या बाईला घेऊन मी घर आवरायच्या कामाला लागले .शेवटी 'जिसका कोई नाही होता उसकी कामवाली बाई होती है' हेच खर, असो.....बघू तर काय काय गेलय चोरीला म्हणून मी कामाला लागले. चोराने घरातले सगळे कागद, खेळणी, कपडे उलथेपालथे केले होते...'आता हे आवरायला तुझा बाप येणार आहे का?' मी मनात चोरावर चरफडले, 'काय हि तुझी भाषा?' माझ्या मनाने फटकारले , 'असू दे, भावना अनावर झाल्या कि संस्कार गळूनच पडतात, ज्याचं जळत त्यालाच कळत' मी मनाला दटावलं... बर, आपण चोर आहोत तर गप्प चोरी करून तोंड काळ करावं कि नाही त्या चोरट्याने , पण नाही..जाता जाता सोफा फाडला होता महाराजांनी... अरे आपला धंदा काय, आपण करतोय काय याच तरी थोडं भान? कुठून ट्रेनिंग घेतलं होत चोरीच कोण जाणे..असली unprofessional माणसं मला बिलकुल आवडत नाहीत.
पण चोर जरी unprofessional असला तरी फारसा techsavy नसावा कारण लॅपटॉप मात्र आपल्या जागेवरच पडून होता, त्या बिचाऱ्या चोराबद्दल माझ्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला ...स्वयंपाक घरात पाय ठेवताच खोलीभर पसरलेल्या शेंगांची टरफल पाहून चोर किती भुकेला होता याची कल्पना येत होती आणि आपण घरातून निघताना साधं दूध बिस्कीट पण माग ठेवलं नाही, काय इज्जत राहिली आपली चोरासमोर? माझ्याच मनाने पुन्हा माझा धिक्कार केला आणि इथून पुढे बाहेर पडताना ठेवत जाईन मी ओट्यावर नक्की काहीतरी खाऊ, मी मनाला समजावलं....इतक्यात टन् टन् आवाज करत दोन चार स्टीलचे डब्बे जमिनीवर आले आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचा कर्ताकरविता नायक क्षणभरच माझ्यासमोर प्रकट होऊन दुसऱ्याच क्षणी फ्रिज खाली दिसेनासा झाला...अच्छाsssss म्हणजे घरभर गोंधळ घालणारा चोर हा होता तर ,किंचाळत असतानाच मनाला साक्षात्कार झाला. त्यानंतर बराच वेळ एकमेकांना घाबरून आम्ही नुसतेच या खोलीतून त्या खोलीत पसऱ्यातून वाट काढत, पळत राहिलो...शेवटी या बाईचं किंचाळणं ऐकण्यापेक्षा जीव दिलेला काय वाईट असा विचार करून त्या मुक्या जिवाने पाचव्या मजल्यावरच्या माझ्या बेडरूमच्या खिडकीतून खाली उडी मारून जीव दिला.आपल्या चार शेंगांच्या क्षुल्लक चोरीसाठी एखाद्याचा जीव जावा हे माझ्या हळव्या मनाला रुचेना तेंव्हा त्या जिवाच्या अंतिम दर्शनासाठी आम्ही खिडकीकडे धावलो....आता आपल्याला कोणता हृदयद्रावक प्रसंग बघायला मिळेल या विवंचनेत आम्ही खाली नजर टाकली असता, गजाननाचा वरदहस्त लाभलेला तो जीव, एवढ्या उंचावरून पडूनही, वेलकम मधल्या RDX सारखा 'अभि हम जिंदा है' स्टाईलमध्ये आमच्यादेखत अंग झटकून उभा राहिला आणि क्षणार्धात नवीन घरात अंतर्धान पावला.

चोरीच खरं थ्रिल अनुभवायला मिळालं ते काही वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही टेक्सास मध्ये राह्यला आलो तेंव्हा. अर्ध्याहून अधिक भारतीय कुटुंब असणाऱ्या आमच्या सोसायटीमध्ये मराठी लोक पण बरेच होते. त्यामुळं इतर सोसायटींच्या मानाने इथे बरीच चहल पहल असायची. अतिकडक उन्हाळ्यामुळं दिवसभर बाहेर पडणं शक्य नसलं तरीही सकाळ संध्याकाळ पार्कमध्ये हमखास भेटणं व्हायचं. एकंदर छान चाललं होत आणि अशातच ते कुटुंब आलं.
अति धिप्पाड असणारे २-३ पाश्च्यात्त गोरे पुरुष , जिचा चेहरा कधीच पाहू शकले नाही अशी एक बुरखेधारी बाई आणि २ कृष्णवर्णीय लहान मुलं. यातील कोण कुणाचे काय लागत होत हे देव जाणे. आल्या आल्या या कुटुंबाने आपले रंग दाखवायला चालू केले, म्हणजे तसं त्यांना कुणी चोरी करताना पाहिलं नव्हतं पण ते आले आणि काही दिवसात घराबाहेर लावलेल्या सायकली, ग्यालरीत ठेवलेले स्ट्रॉलर्स, एवढेच नवे तर फुलांच्या कुंड्या पण चोरी होऊ लागल्या. सोसायटी ऑफिस मध्ये complaint केली पण चोऱ्या अगदीच फुटकळ असल्यामुळं, पुढे काही कारवाई झाली नाही. आणि पुरावा नसल्यामुळं त्यांच्यावर आम्ही कुणी डायरेक्ट आरोप केला नाही.
( त्यांच्यातल्या एकाएकाने ५-६ जणांना आरामात लोळवल असत त्यामुळं खरतर अंगात दम नसल्यामुळं हे जास्त खर आहे, पण उगीच चार चौघात कशाला स्वतःचीच इज्जत काढा ... )
मग एकदा चोरांनी एका साऊथ इंडियन फॅमिलीच घर फोडलं आणि सोन्याचे दागिने, लॅपटॉप etc पळवले. तेव्हा मात्र रीतसर पोलीस complaint केली, पण अशा क्षुल्लक चोरीसाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता तेंव्हा 'keep doors locked ,don't open doors to strangers, be safe ' म्हणत सर्वांच्या तोंडाला पानेच पुसली आणि तिथून काढता पाय घेतला. सोसायटी ऑफिस ने केवळ एक circular काढून काय काय precautions घ्यायच्या ते जाहीर केले. त्यामुळं नाही म्हटलं तरी वातावरण थोडं टेन्सच होत.
आणि तशातच तो दिवस उजाडला. त्या दिवशी दुपारी मी आणि समोरच राहणारी माझी मैत्रीण दीप्ती , माझ्या घरी बसून गप्पा मारत होतो. नेह्मीमच्याच गप्पा, हसणं चालू होत. अचानक दारावर धाड धाड करत मोठी थाप पडली, eye hole मधून पाहिलं तर कुणीच नाही. घडलेल्या प्रकारामुळे दार उघडायचं धाडस झालं नाही, पण पळत जाऊन गॅलरीतून पाहिलं तर मागच्या रस्त्यावर कुणी दिसलं नाही. आतल्या बाजूला राहणाऱ्या मैत्रिणीला फोने केला पण आतल्या रोडवर पण तिला कुणी दिसलं नाही. भर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं तसही दुपारी रस्त्यावर कुणी चिटपाखरू नसायचं. कोण असेल बरं आणि आता काय करावं हा विचार करत आम्ही तशाच बसून राहिलो. नवऱ्याला फोन केला तर, कुणीतरी मजा केलीअसेल, दार वाजवून कुणी चोरी नाही करत, घाबरू नका म्हणत त्यान फोन ठेवून दिला.
दहाच मिनिटांनी परत दार वाजलं. यावेळी दीप्तीने अति चपळाई दाखवत eye hole गाठले, बघतेय तर बाहेर कुणीच नाही पण समोरच असणाऱ्या तिच्या घराचं दार मात्र सताड उघड! असं कसं शक्य आहे? घर तर लॉक केलं होत बाहेर पडताना... किल्ली पण हातातच होती तिच्या, याचा अर्थ कुणीतरी बिना किल्लीचा दरवाजा उघडलाय...मग आम्हाला कसं ऐकायला नाही आलं...आम्ही तर इथेच हॉल मध्ये बसून होतो आणि दार तर इथून अवघ्या काही फुटांवर ... याचा अर्थ ती घरात नाही असं बघून घरामध्ये हळूच कोणीतरी शिरलंय... बाप रे म्हणजे चोरी होतीय तिच्या घरी ...'आता काय करायचं?' दीप्ती किंचाळली... पोटामध्ये गोळाच आला आमच्या.... तिथे चोरी करतायत? मग हे दार का वाजवलं त्यांनी .......का इथेही कुणी आहे का नाही चेक करायचं असेल त्यांना ?... . पुढचा मागचा विचार ना करता, आवेशात येऊन दिप्तीने माझ्या दाराची कडी आतून काढली आणि ती दार थोडं उघडतेय तोच...खा ssड....मी ते आतून परत बंद केलं...' अग वेडी आहेस का? ऐक वेळ चोरी झाली तरी चालेल पण आपल्या जीवाचं काय?माहिती आहे ना इथं लोक गन शिवाय फिरत नाहीत? ' मी परत लॉक केलं ...'अग पण माझं घर?' दीप्तीने गळा काढला....काय करावं ..काय करावं... भीतीने गाळण उडालेली...सुचत तर काही नव्हतं.
'मला वाटत आपण सोसायटी ऑफिसला कॉल करू, इन्स्टंट हेल्प त्यांच्याकडूनच मिळेल' मी म्हणले .
'नाही ९११ ला कॉल करू' इति दीप्ती
'तू लँडलाईन वरून ९११ ला कर, मी मोबाइलवरून ऑफिसला करते..चल पटकन.....be quick...'
आम्ही फोन हातात घेतोय तोच माझं दार परत जोरात कोणीतरी ठोकलं ...धाड धाड धाड धाड.... 'आssss इकडे आले वाटत ते, आता काय करायचं ?'...फोन हातातून गळून पडले आमच्या...एकमेकींना मिठी मारून आम्ही किंचाळू लागलो...हातापायांना घाम सुटला ....आता तर दार वाजवण्याबरोबर बाहेरून ऐक माणूस ओरडू पण लागला.....'दार उघडा दार'...संपलं...त्यांना कळलं बहुतेक आपण ९११ ला कॉल करतोय, आता आपलं काही खर नाही...वाचवा कुणीतरी आम्हाला... देवा वाचव रे आम्हाला प्लिज, अरे नकळत्या वयात केलेल्या नवसाला किती वेळा पावशील? आणि तसही फक्त चोरीच नवस केला होता रे मी, जीव जाण्याचा नाही...चोरी झाली तर होऊ दे पण आम्हाला तरी वाचव.... आम्ही सगळे उपासतापास खरोखर उपाशी राहून करू, मैत्रिणींची पाठ फिरताच त्यांना नाव ठेवणार नाही, आमच्यामागे आमच्या लहान लहान मुलांचं काय होईल याचा तरी विचार कर, आम्हीच नाही राहिलो तर आमच्या नवऱ्यांना कोण वठणीवर आणेल? ...कृपा कर आमच्यावर ....
.पण हे काय ....हि माणसं मराठीत ओरडतायत? त्या माणसांनां मराठी येत? ऐकावं ते नवलच.. माणसं नाहीत एकच माणूस आहे वाटत, हो एकाचाच आवाज येतोय.... मराठीतच ओरडतोय तो...दार उघडा म्हणून....कसं शक्य आहे ? बहुतेक ओळखीचा वाटतोय हा आवाज...बहुतेक नाही नक्कीच... कोण आहे बरं? रोहित? दिप्तीचा नवरा?...हो तोच वाटतोय...बघू तर परत एकदा eye hole मधून ...अरे खरंच तोच आहे...काय चाललंय काय.... आम्ही दार उघडलं तर समोर रोहित हातात बॉक्स घेऊन उभा
"काय झालं दोघीना तुम्हाला? का एवढ्या घाबरलाय आणि ओरडताय का ?", रोहित
"तू? तू कधी आलास? आपलं दार तू उघडलंस का ? आणि मगाशी दार पण तूच वाजवलास का ? मग दिसला का नाहीस आम्हाला", दीप्ती
"हो, तुला surprize द्यायचं म्हणून लवकर आलो आज, तुझं चप्पल यांच्या दारात दिसलं, तू इथे असशील म्हणून म्हणून आधी आपलं दार उघडलं, माझी बॅग आत ठेवून तुमचं दार वाजवलं आणि हे कुरिअर इथेच पडलेलं दिसलं दाराच्या बाजूला, तेच उचलत होतो खाली वाकून म्हणून दिसलो नसेन, पण झालं काय ? तुम्ही का ओरडत होतात?..मी बाहेरून ओरडतोय तर तुमचं लक्षच नाही...दार पण उघडायला तयार नाही तुम्ही..."
"काहीतरी खूपच confusion झालं आमचं" श्वासावर कंट्रोल ठेवत दीप्ती म्हणाली
"कसलं confusion ? तुमचं ओरडणं ऐकून घाबरलो ना मी इथं बाहेर"
"Ohhh ..दीप्ती, अग म्हणजे पहिल्यांदा दार वाजवलं तो कुरिअर वाला होता...दार वाजवून कुरिअर ठेवून निघून गेला त्यामुळं तो दिसला नाही." मी
" पण आपण गॅलरीतून पाहिलं तेंव्हा तर दिसायला हवा होता ना?"
" May be तेंव्हा तो दुसऱ्या एखाद्या घरी गेला असेल, आपण अजून थोडा वेळ गॅलरीत असतो तर कदाचित दिसला असता "
"आणि नंतर रोहित न दार वाजवलं , फक्त तो खाली वाक्ल्यामुळं आपल्याला दिसलं नाही....O गॉड, आणि आपल्याला वाटतं होत चोरी होतेय "
आमच्या घाबरटपणाचा किस्सा आजही लोकांच्या हसण्याचा विषय असला तरी, नुसत्या चोरीच्या कल्पनेनंच आपली ततपप झाली , खरे चोर आले तर काय होईल याची कल्पना आजही आम्हाला करवत नाही .माझ्या नवसाला पाऊ नको रेss बाबा अशी कळकळीची विनंती मी देवाला करत असतेच, पण एकदा बोललेला नवस परत घेण्यासाठी काही उपाय तुम्हाला माहित असला तर सुचवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाल लिहीलं आहे Happy
मदिराप्रेमी आजोबा, दूध बिस्किटं न खाता पाचव्या मजल्यावरुन जीव दिलेला चोर :):)

मस्त लिहिले आहे
कुठून ट्रेनिंग घेतलं होत चोरीच कोण जाणे..असली unprofessional माणसं मला बिलकुल आवडत नाहीत. Lol

प्रतिसादकर्त्यांचे मनापासून धन्यवाद! तुमच्या प्रतिसादांमुळे आत्मविश्वास वाढतोय माझा!
नवीन Submitted by ज्वाला on 27 April, 2018 - 22:48
>>>>
आणि लेखन चाहते पण.:स्मित: