आमच्या पिंट्याचे पाळीव प्राणी प्रेम.

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 April, 2018 - 07:24

नोंद घ्या - लेखातील शब्दन शब्द खरा आहे. कोणत्याही प्राणीप्रेमींची टिंगल उडवायचा वा त्यांच्यावर टिका करायचा हेतू नाही. किंबहुना अश्यांबद्दल आदरच आहे हे लेख पुर्ण वाचल्यावर जाणवेल.

लहान मुलांना बरेचदा प्राणी पकडून आणायचा आणि पाळायचा शौक असतो. पण काहीच जण नशीबवान असतात ज्यांना आईवडिलांकडून ही परवानगी मिळते. मला स्वत:ला प्राणी पाळणे हा प्रकार कधीच आवडला नाही. या बाबतीत माझे आईवडिल नशीबवान ठरले असे म्हणू शकतो. पण आमचा पिंट्या मात्र याबाबतीत लहानपणापासूनच नशीबवान कार्टा म्हणून गणला गेला आहे. त्याने आजवर कित्येक विविध प्राणी पाळले असतील त्याची मोजदाद नसावी. सर्वांना एकाच वेळी जोडले तर राणीबागेच्या शेजारी त्याचे स्वत:चे एखादे पाळीव प्राणी संग्रहालय तयार व्हावे..

असो,
तर माझ्या आठवणींप्रमाणे सांगायचे झाल्यास कुत्रा हा सर्वसाधारणपणे पाळला जाणारा प्राणी त्याने आजवर एकेक करत अर्धा डझन पाळून झालेत. ज्या घरात कुत्रा पाळला जातो तिथे मी पाय दुमडूनच प्रवेश करतो. कधीही पळायची वेळ येईल अश्या आवेशातच तिथे वावरत असतो. अपवाद पिंट्याचे घर. त्याने आजवर पाळलेल्या एकूण एक कुत्र्यांची खासियत अशी होती की ते कधीही प्राणघातक वाटले नाहीत. अगदी त्याचा लेटेस्ट डॉबरमॅन जो दोन पायांवर उभा राहिला तर माझ्या डोक्यात टपली मारून माझा कान चाटून जाईल ईतका ऊंचपुरा असला तरी त्याच्या त्या चाटण्याची कधी भिती वाटली नाही. याचे कारण म्हणजे त्याचे कुत्रे अगदी बाल्यावस्थेपासूनच पाळलेले आणि माणसाळलेले असायचे. त्यांचे सू शी, झोपणे उठणे, खेळणे, मस्ती करणे सारे अंगांखांद्यावरच नाही तर अगदी कुशीत घेऊन केले जायचे. त्यांना लहानपणापासूनच वरणभातावर तुपाची धार सोडून त्याचे खिमाट करून अगदी हाताने भरवले जायचे. टमाटर हे तर त्यांच्या घरच्या कुत्र्यांचे राष्ट्रीय खाद्य असायचे. त्यामुळे एकंदरीत त्या कुत्र्यांचा स्वभावही आंबटगोड अन मवाळ व्हायचा. एखादा कुत्रा गेला की सहा महिने वर्षभराचा दुखवटा पाळला जायचा, आणि त्यानंतर त्याची जागा दुसरे कुत्र्याचे पिल्लू घ्यायचे. सूझी, मिकी, टॉमी, टायगर, मिकी टू अश्या ईंग्लिश नावानंतर त्याने त्याच्या सध्याच्या कुत्र्याचे नाव "साहेबराव" ठेवले आहे. कदाचित कुत्र्याची प्रजाती डॉबर "मॅन" असल्याने माणसातले नाव ठेवले असावे. पण एवढ्या मोठ्या नावाने हाक मारणे अवघड म्हणून त्याला "सॅबी" अशी हाक मारली जाते. कुत्र्यांना असे मोठे नाव आणि त्याचे शॉर्ट टोपणनाव असलेले माझ्या पाहण्यात तरी दुसरे नाही. त्याच्या कुत्र्यांनी घडवलेले कैक रोचक किस्से पुन्हा कधीतरी स्वतंत्र भागात...

कोकणात आमच्या गावाकडे मांजरी पाळणे काही नवीन नाही. ईथे मुंबईत सुद्धा मांजरे ईथे तिथे फिरताना आणि याच्या त्याच्या भरवश्यावर जगताना बरेच पाहिल्या आहेत. पण पिंट्या त्यातील एका बोक्याला घरी घेऊन आला. विशेष म्हणजे त्याच्या घरच्यांनीही त्याला तसे करू दिले. तेव्हा त्यांच्या घरात टायगरचा वावर असायचा. टायगर म्हणजे त्या नावाचा कुत्रा. मराठीत शेरू. पिंट्याघरचेच माणसाळलेले जनावर ते. त्याच्यापासून बोक्याला कसलाही धोका नव्हता. टायगरच्याच शेजारी बसून त्या बोक्याचे जेवण होऊ लागले. जेव्हा टायगर एका वाडग्यात कुस्करलेले टमाटर खायचा तेव्हा हा पिंकुडा मस्तपैकी चायनीज सूप हादडायचा. येस्स, चिकन मंचॉऊ सूप. आठवड्यातून चारदा त्याला लागायचेच. त्याचे पिंट्याने ठेवलेले नाव सोन्या होते. पण एका रंगपंचमीला पोरांनी त्याला कसलासा गुलाबी रंग लावला तो त्याच्या केसांवरून कित्येक दिवस सुटतच नव्हता. तेव्हापासून त्याला पिंकुडा हे नाव पडले. जे पुढे जाऊन पिंट्यानेही स्विकारले.

आमच्या पिंट्याने कुत्र्यासोबत बोका नांदवला. पण पुढे त्या बोक्यासोबत उंदीरही नांदवले. हो ऊंदीर, पण आपले नेहमीचे काळे नाही तर पांढरे उंदीर. एरवी ऊंदीर म्हटले की त्यांना घरातून हाकलायचे कसे हाच पहिला प्रश्न पडतो. त्याचे सल्ले मागायला मायबोलीवर धागेही निघतात. आणि त्या धाग्यावर शेकडो प्रतिसादही पडतात. पण हे पांढरे उंदीर मात्र पांढर्‍या सश्यासारखे पाळले जातात हे मला पिंट्यामुळे समजले. तसेच जनावरांमध्येही आपण नतद्रष्ट्र माणसे काळा-गोरा वर्णभेद करतो हे देखील उमजले. ऊंदीर पाळण्याचे अतिरीक्त फायदे मोजून दाखवताना उंदरामुळे त्यांच्या घरातील झुरळे नाहीशी झाली असे पिंट्या एकदा मला म्हणाला होता. खरे खोटे पिंट्याच जाणे. पण मी त्याच्या घरी कधीकाळी रात्रीचा टीव्ही बघायला जायचो, तेव्हा लाईट काढल्यावर अंधारात कपाटामागून एकदोन झुरळे येताना पाहिली होती. ती सुद्धा पिंट्यानेच पाळलेली असावी म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्षच केले होते. पण या नवीन आलेल्या उंदरांनी कपाटामागे आपला अड्डा बनवल्यापासून ती झुरळे कधी दिसली नाहीत हे मात्र खरे.

तर या उंदरांमध्ये एक नर आणि मादा होता. त्यांची नावे अनुक्रमे संजू आणि मंजू होती. त्यांच्या कपाटामागील प्रणयक्रिडेतून तीन पांढर्‍या पिल्लांनीही जन्म घेतला होता. अशी मिळून एकूण पाच उंदरे होती. त्या पिल्लांना मात्र नावे न देता वयानुसार एक, दोन, तीन असे नंबर द्यायचा कल्पकपणा पिंट्याने दाखवला होता. आज ती सारी उंदरे मेली आहेत. पण एकेकाळी (पिंट्याच्या भरवश्यावर आणि त्यानेच हट्ट धरल्याने) मी सुद्धा त्यातला एक उंदीर माझ्या हातावर एकदा खेळवला आहे, हे जेव्हा मी माझ्या गर्लफ्रेंडला सांगतो तेव्हा तिचा यावर आजही विश्वास बसत नाही.

अरे हो, प्रत्येक उंदराच्या मरणाचा एक स्वतंत्र किस्सा आहे, पण त्यातील एका उंदीराने मात्र आमच्याच घरात येऊन समाधी घेतली होती. आमच्या टेबलखाली निवांत झोपले होते. आधी मी त्याला पाहून दचकलो होतो, पण ते मात्र ढिम्म हलायला तयार नव्हते. मी भाबडेपणाने पिंट्याला जाऊन सांगितले, "अरे बाबा तुमचा एक उंदीर आमच्या घरी येऊन झोपलाय. त्याला तेवढे घेऊन जा पटकन" .. तसे पिंट्या पटकन आमच्या घरी आला, आणि त्याला बघून लांबूनच हंबरडा फोडला. उंदराचे श्वास, ठोके, नाडी वगैरे चेक न करता लांबूनच पिंट्याला कसे समजले की तो मेला आहे हे मला आजवर समजले नाही. पुढे ती सारी उंदरे एकेक करत मेली आणि आपले घर उंदरांना मानवत नाही असा निष्कर्श काढून त्याने पुन्हा कधी उंदीर पाळले नाहीत. त्या सर्व उंदरांना आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्येच मूठमाती देण्यात आली होती.

कबूतर हा आणखी एक उंदरासारखाच जीव ज्याला लोकं हाकलायला बघत असावेत. पण पिंट्या मात्र तो जीव पाळायचा. ते सुद्धा शांततेचे प्रतीक पांढरे कबूतर नाही तर नेहमीचे करडे कबूतर. रस्त्याकडेचे जखमी झालेले कबूतर तो घरी आणायचा आणि बरे करून सोडायचा. पुढे बिल्डींगमध्ये एक जैन धर्मीय बाई राहायला आली. तिला सुद्धा हाच भूतदयेचा छंद होता. तसेच ती यात एक्सपर्ट होती, जणू कबूतरांची डॉक्टरच. तिच्या घरी एकाच वेळी आठदहा कबूतरे अ‍ॅडमिट असायची. पिंट्याही मग त्यापुढे कुठे जखमी कबूतर दिसल्यास ते आपल्या घरी न आणता तिलाच सुपुर्त करायचा आणि त्याची देखभाल करण्यात तिची मदत करायचा.

मासे हा एक बहुउपयोगी जलचर प्राणी. ते खाताही येतात आणि ते पाळताही येतात. खायचे मासे शक्यतो घरात पाळले जात नाहीत. पण पाळायचे रंगीत मासे मात्र खायला हरकत नसावी. निदान माझा तरी पिंट्याच्या फिशटॅंकवर याच कारणास्तवर नेहमी डोळा असायचा. कधीतरी पिंट्याला वाटेल बस्स झाले मासे पाळणे, आता यांना खाऊन विकून टाकूया हा फिशटॅंक, हा दिवस कधीतरी उजडेल या आशेवर मी होतो. पण आजवर नाही उजाडला. फक्त फिश टॅंकमधील मासे तेवढे बदलत राहतात. त्यांच्याशी खेळणे, गप्पा मारणे, फिशटॅंकमधील पाणी बदलून त्यांना आंघोळ घालणे, त्यांना किडे खाऊ घालणे हि कामे पिंट्या नेहमीच आवडीने करत आलाय. त्या किड्यांवरून आठवले. बाहेरून किडे विकत आणण्यापेक्षा का नाही त्यांची घरातच पैदास करावी हा विचारही पिंट्याच्या मनात एकदा आलेला. पण त्याच्या मातोश्रींनी तो हाणून पाडला. अन्यथा त्याला ते अवघड नव्हते. मध्यंतरी काडेपेटीच्या आकाराएवढ्या मिळणार्‍या बॉक्समधून कसलेसे किडे तो पाळायला आणायचा. पण त्याची ती आवड फुलण्याआधी तिथेही घरून ब्रेक लावण्यात आला.

मत्स्यपालनातून मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जीवावर त्याने एकदा कासव पाळायला आणले होते. त्याचे कवच साधारण सहा ईंची पिझ्झाच्या आकाराचे होते. कासवाचे नाव त्याने "सामी" ठेवले होते. यामागचे कारण म्हणजे तो पाकिस्तानी गायक अदनान सामी, की पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद सामी, या दोघांपैकी कोणाची तरी आठवण त्याला त्या कासवाकडे बघून यायची. ईथे कुठल्याही सामीप्रेमीच्या भावना दुखवायच्या नाहीयेत, पण जे होते ते असे.

बाकी हे कासव पाळणे मला फार भारी वाटले होते. किंबहुना आम्हा सर्वांनाच. पुढचे काही दिवस शाळेतही जिथे तिथे पिंट्याच्या कासवाचीच चर्चा होती. रोज येउन बघावेत असे काही त्या कासवाचे मनोरंजक प्रताप नव्हते. पण एखादा ‘वन टाईम मस्ट वॉच’ सिनेमा असतो ना, तसे ‘एकदातरी बघायलाच हवा’ असा हा प्राणी असल्याने सर्व जण त्याच्या घरी येऊन हजेरी लाऊन जात होते.

एखादा प्राणी पाळला की त्याच्या खाण्यापिण्याची बडदास्त पिंट्या चांगली राखतो, तशी कासवाचीही होतीच. पण प्रॉब्लेम फक्त एकच होता की कासवाच्या आकाराच्या मानाने त्याची तात्पुरती सोय केलेला टॅंक काही तितका मोठा नव्हता. आणि एके दिवशी कासवाने तोच टॅंक फोडून आत्महत्या केली. मृत्युचे नेमके कारण समजले नाही, बस्स फुटलेला टॅंक आणि फ्रिजमागे मिळालेला कासवाचा मृतदेह ईतकेच. आता यावरून कासव कसे मेले असावे हे शोधायला आम्ही सीआयडी बोलावणार नव्हतो. त्यामुळे आम्ही तरी त्याला आत्महत्या घोषित करून मोकळे झालो. पिंट्या मात्र शॉकमध्ये गेला. कारण कासवाचे सरासरी आयुष्य माणसापेक्षाही जास्त म्हणजे दिडशे ते दोनशे वर्षे असते असे त्याने कुठेतरी वाचले होते. एवढे दिर्घायुष्य असलेला जीव असे फटक्यात जायला आपण जबाबदार ठरलो हे त्याला पुढचे कित्येक दिवस खात होते. अर्थात पुन्हा त्याने आयुष्यात कासव पाळायचे नाव घेतले नाही.

पिंट्याच्या घरात एक पोपटांचा भलामोठा खानदानी पिंजरा होता. कधीकाळी त्यात दोन पोपट असायचे. आता फारसे आठवत नाही. पण लहानपणी मी आणि पिंट्या त्यांच्यासोबत मिमिक्रीचा खेळ करायचो. दोन्ही पोपट बोलायला अगदी पोपट होते. त्यांच्या पिंजर्‍यात दोनचार पेरू उगाचच ईथे तिथे पडलेले असायचे. मी आणि पिंट्या आम्हा दोघांनाही ते आवडत असल्याने अधूनमधून आम्ही एखादा गट्टम करायचो. पुढे कधीतरी पिंट्याचे आजोबा आणि ते पोपट जरा पुढेमागे असे एकत्र वारल्यापासून पुन्हा त्या घरात पोपट पाळले गेले नाहीत. काही वर्षे तो पिंजरा तिथेच रिकामा लटकून होता. नंतर काढण्यात आला.

गेल्या मे महिन्याच्या सुट्टीत पिंट्याची भाची त्याच्याकडे राहायला आली होती. तिने एकदा हट्ट केला. मामा आपण आऊल पाळूया का?
कुठले कार्टून नेटवर्क पाहून आलेली देवास ठाऊक. पण आपल्याला विचित्र वाटणारा हा पक्षी लहान मुलांना फन्नी वाटू शकतोच. तसेच त्याच्या "आऊल" या नावाचा उच्चारही पुरेसा गंमतीशीर आहे. त्यामुळे केला असावा भाचीने हट्ट. पण तो पाळायची गरज काय होती. कदाचित पिंट्याला ते आव्हान वाटले असावे. किंवा ईतके प्राणी पाळणारा आपला मामा आपल्या आवडीचा एक प्राणी पाळू शकत नाही असे वाटून आपल्या भाचीचा हिरमोड होऊ नये म्हणून त्याने ते धाडस केले असावे. शेवटी यारोंका यार आहे पिंट्या, आपल्या भाचीचाही तितकाच लाडका मामा असणार. ईथे तिथे चौकशी करत तब्बल तीन हजार रुपये मोजत त्याने तो एकाकडून विकत घेतला. शांतपणे एकटक कुठेतरी शून्यात बघत राहायचा. पण भाची त्यावरही खुश होती. चार दिवस झाले, भाचीचे समाधान झाले. पाचव्या दिवशी मात्र घुबड हा अपशकुनी प्राणी असल्याचा शिक्का मारत त्याची रीतसर हकालपट्टी करण्यात आली. सेकंडहॅन्डमध्ये त्याची किंमत दिड हजार रुपयेच मिळाली. ज्याच्याकडून विकत घेतला होता त्यालाच पिंट्याने हाल्फ प्राईजमध्ये परत केला. शकुन अपशकुनावरचा माझा विश्वास त्यादिवशीच उडाला जेव्हा त्याच्या मूळ मालकाला त्या आऊल्याने बसल्या बसल्या दिड हजार रुपये कमावून दिले.

हो, आमच्या पिंट्याने साप देखील पाळायला आणला होता. एक सर्पमित्र त्याचाही मित्र झाल्याने साप हा देखील एक पाळायचा जीव आहे याचा त्याला साक्षात्कार झाला. ट्रायल बेसिस वर त्याच मित्राकडून एका सापाला घेऊन आला. आता साप म्हटले की चटकन आपल्या डोळ्यासमोर जे येते अगदी तितक्या लांबीचे प्रकरण नव्हते. पण गांडूळापेक्षा बरेच मोठे होते. पिंट्या साप पाळायला घेऊन आला आहे ही खबर बघता बघता गावभर पसरली. मी शेजारी राहत असूनही माझ्या कानावर ही बातमी पोहोचेपर्यंत त्या सापाच्या दर्शनाला लागलेली रांग आमच्या घरापर्यंत पोहोचली होती. पिंट्याचे घर हाऊसफुल्ल होते. पण सारे जण पिंट्या आणि सापापासून चार हात दूरच उभे होते. एवढासा तो जीव, विषारी नाही याचीही कल्पना होती, पण तरीही कोणीही फार पुढे पुढे करायला धजावत नव्हते. पिंट्याने त्या सापाला आत्मविश्वासपूर्वक हाताळत काही सापाचे खेळ करून दाखवले आणि लोकांचे मनोरंजन केले. पण हा एकाच दिवसाचा शो ठरला. दुसर्‍याच दिवशी आईने कान पिरगळल्याने पिंट्याला तो साप गंगेला अर्पण करावा लागला. गंगा त्याच्या सर्पमित्राचे नाव.

थोडी जागा मिळाली असती तर सहज पिंट्याने गाय, बकरी, कोंबड्या वगैरे पाळल्या असत्या. पण मुंबईकरांना हे सुख कसले. ईतर लोकं राणीबागेत प्राणी बघायला जातात. हा त्यातील काय घरी नेता येईल हे बघायला जायचा. रंगीबेरंगी चिमण्या हे तिथूनच सुचलेले प्रकरण. या टोकापासून त्या टोकापर्यंत आणि वरपासून खालपर्यंत गॅलरी व्यापून टाकणारा भलामोठा पिंजरा हि वनटाईम इन्वेस्टमेंट करून त्याने हळूहळू विविध रंगाच्या चिमण्या आणून तो पिंजरा भरायला सुरुवात केली. तब्बल सहासात महिने. त्यांच्या प्रजातीची नावे काय काय होती कल्पना नाही, पण मी मात्र सर्वांना रंगीत चिमण्याच म्हणायचो. हळूहळू मलाही त्या चिमण्या, त्यांचे रंग, त्यांचा चिवचिवाट, किलबिलाट आवडू लागला होता. पण ते एवढे अवजड धूड सांभाळणे अवघड झाल्याने एके दिवशी त्या चिमण्यांचे वाटप होऊन ती जागा खाली करण्यात आली. पिंट्याने काहीतरी सही पाळलेले आणि ते गेले, या विरहाचे दुख आयुष्यात मला पहिल्यांदाच झाले.

आणि मग एके दिवशी पिंट्या खार घेऊन आला. कुठून आणली या प्रश्नाला मित्राने दिली म्हणून थातुरमातुर उत्तर दिले. पण कोणता मित्र ते काही सांगितले नाही. मला संशय होता की त्याने ती राणीबागेतून पकडून आणली असावी. आणि आता तिचे घर त्याने एका टीव्हीच्या रिकाम्या खोक्यात बनवले होते. मला खरे तर हे क्रूर वाटले होते. म्हणजे प्राणी पकडा, कापा, शिजवा, आणि त्यांना खाऊन संपवा या मताचा मी. पण त्यांना बंदी बनवून पाळणे मला रुचत नाही. कोंबड्या बकर्‍या, कुत्री मांजरी, चिमणी पोपट हे सर्वसाधारण वर्षानुवर्षे पाळले जाणारे पशूपक्षी. त्यांनाही ती पिढ्यानपिढ्याची पाळले जायची सवय असावी. पण खारीसारखे मुक्त बागडणारे जीव तसेच बागडू द्यावेत.

असो, तर यथावकाश ती खोक्यातून बाहेर येत त्याच्या अंगाखांद्यावर खेळू लागली, त्यांच्या घरात उंदडू लागली, गॅलरीत बागडू लागली. आणि अश्यातच एके दिवशी गॅलरीतून खाली पडली. कितव्या माळ्यावरून ते विचारू नका, उगाच पिंट्याला अटक व्हायची. जर एवढ्या ऊंचावरून हत्ती पडला तर तो सुद्धा फुटून मरून जाईल. ही तर छोटीशी खारुताई, पण निदान तिची बॉडी तरी मिळायला हवी. पिंट्या आणि फॅमिलीने खालच्या दुकानलाईनवरचे छज्जे न छज्जे पिंजून काढले. पण काहीच पत्ता नाही. दोन दिवस त्यांच्या घरचे कोणी धड जेवले नाही. म्हणायला मी सुद्धा पशूपक्षी प्रेमी आहे. पण माझे प्रेम त्यांना खाण्यापुरतेच. त्यांच्या विरहात खाणे सोडावे हे माझ्यासाठी अनाकलनीयच. पण लागतात काही लोकांची मने जनावरांत. मी मात्र अश्यांच्या दुखात सहभागी होऊ शकत नाही. काठावरच राहतो. पण यावेळी मात्र मलाही वाईट वाटले.

आणि मग तिसर्‍या दिवशी ती पुन्हा आली. कशी आली, कुठून आली, काहीच अंदाज नाही. एखादी खार ईतके माळे चढून जिन्याने वर येऊ शकते का, ईतकी तिला उपजत बुद्धी असते का याची कल्पना नाही. पण अचानक पिंट्याच्या घरचे वातावरण बदलले. त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहिला आणि मलाही बरे वाटले..

त्यानंतर साधारण आठवड्याभराने तो स्वत:हून तिला राणीबागेत सोडून आला. हे कळल्यावर मला समाधानही वाटले. आजही राणीबागेत एखादी खार बघताना ती पिंट्याची खार तर नाही ना असेच वाटते. असाच एक पिंट्याची खार तर नाही ना म्हणत राणीबागेतील एका खारीचा काढलेला फोटो टाकून हे पिंट्या पाळीव प्राणी प्रकरण ईथेच संपवतो Happy

khar.JPG

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिंट्याघरचा पोपट त्याच्या जन्माआधीपासून म्हणजे साधारण 12-14 वर्षे तरी त्यांच्या घरात होता..
पण खरेच 34 आकडा मलाही मोठाच वाटला .. कदाचित माणसे म्हटले की शाळा कॉलेज लग्न मुले नातवण्डे असा सगळा गोतावळा आणि आयुष्याचा कालखंड असल्याने पोपट या एवढ्या आयुष्यात काय करत असतील हा प्रश्न पडायचा.. पण निधी यांची पोस्ट वाचून तो प्रश्न मिटला.. कारण या आधी मी बहुतांश पोपट पिण्जरयातच जास्त पाहिले आहेत. एवढे गमतीशीर प्रकरण पहिल्यांदा ऐकले.
पण सिरीअसली, कोणी एवढे वर्षे पोपटाला पिंजरा एके पिंजरयातच ठेवत असतील तर.. काय लाईफ असेल त्याचे

सस्मित, ऋ.. सगळेच पोपट इतकी वर्षे जगतात का नाही माहित पण आमचा जगला. त्याचं वय ऐकून अनेकांचा विश्वासच बसायचा नाही.

सिरीअसली, कोणी एवढे वर्षे पोपटाला पिंजरा एके पिंजरयातच ठेवत असतील तर.. काय लाईफ असेल त्याचे>> हो ना. बिचारे पक्षी. अगदी एखादा महिना जरी त्यांना फक्त पिंजऱ्यातच ठेवलं तरी किती यातना होत असतील त्यांना. Sad

छान आहेत सर्व किस्से. Happy
पक्षी / पोपट ३४ वर्ष जगतात हे मला आजच कळलं. >> आमच्याकडे २६ वर्ष पोपट होता. तो भारतीय छोट्या आकाराचा होता. निधी यांच्याकडेच पोपट जर मोठा पहाडी पोपट असेल तर नक्कीच ३६ वर्षे वय असेल त्याचे.
कोणी एवढे वर्षे पोपटाला पिंजरा एके पिंजरयातच ठेवत असतील तर.. काय लाईफ असेल त्याचे >> पु.ल. नी म्हटल्याप्रमाणे ब्रह्मचर्य हेच जीवन असे म्हणत जीवन जगत असतात बिचारे Sad

मस्त वर्णन जमलंय पिंट्याच्या पाळीवप्राणी प्रेमाचं. बर्याच दिवसांनी पिंट्याला पाहून बरं वाटलं. पोस्टत जा तुम्ही अधूनमधून. तुमची लेखनशैली आवडते. Happy

मला प्राणी पाळायला आवडत नाही. फक्त लांबून बघायला आवडतात. पण कोकणातल्या माझ्या आज्जीच्या घरी मात्र तीने बरेच प्राणी सांभाळलेत. आमचा बंगला हायवेच्या थोडा आतल्या साईडला आहे. बर्याचदा तिथे रात्रीच्या वेळी गाडीखाली येऊन प्राणी मरतात. एकदा एक कुत्री अशीच रस्त्यवर मेली. तेव्हा तिची तीनही पिल्लं आजी घरी घेऊन आली आणि आता सांभाळते. दोन वर्षापूर्वी एक मांजर पिल्लांना जन्म देऊन गेली. तीची चारही पिल्लं आमच्या घरी आहेत. त्यातलं एक मांजरीचं पिल्लू मला फार आवडायचं स्नो बेल सारखं दिसायचं म्हणून....ते ही लांबनंच बघायचे मी...पण नेमकं तेच हल्ली माझी आत्या तिच्याघरी घेऊन गेली...उरलेली सहा जणं गुण्यागोविंदाने रहातात...आमच्या घरी कोणी नाॅनव्हेज खात नाही...पण आजोबा आठवड्यातनं तीन दिवस त्याच्यासाठी मासे आणतात...दूध वगैरे पण त्यांच्यासाठी रोज एक्स्ट्रा घेतलं जातं....आजीचं खूप प्रेम आहे त्यांच्यावर....मी आणि माझी आई सोडल्यास सगळ्या घरातल्यांना प्राणी आवडतात...

@ Nidhii >>>> घोरपड ?? तुम्ही तानाजीचे वशंज का?

द्वादशांगुला, मेल उद्याच बघून रिप्लाय देईन. आता दक्षिण मुंबईत रात्रीचे सव्वातीन उलटून गेलेत .. Happy

उज्वला, धन्यवाद Happy

मस्त लेख आहे.. आमच्याकडे पाळीव प्राणी म्हणाल तर गायी वासरं बैल अगदी खंडीभर आहेत. त्यांचे अनुभव लिहायायचे म्हणजे एक धागाही पुरवायचा नाही.

हो खरंय सर. प्राण्यांचे अनुभव लिहायला घेतले तर पुस्तके बनतील. माणसांपेक्षा जास्त अनुभव देतात ते. पण खरे तर हा लेख अनुभवांचा नाही. तर माझ्यासारखा ज्याने आजवर कधीच काही पाळले नाही त्याच्या शेजारच्या मित्राने आजवर मुंबईसारख्या जागेतही शक्य ते बरेच काही पाळले आहे याच्या अप्रूपाबद्दल लेख आहे.

अप्रूपाबद्दल लेख आहे.<<
>> आपल्या लेखाचा आशय लक्षात आलाय..किंबहुना, लक्षात आणून दिल्याबद्दल मनस्वी आभार. आपण आपल्या शेजारच्या मित्राचं प्राणी प्रेम वर्णन करताना अनेक प्रसंगांना अनुभवाची हलकीशी झालर असल्याचे जाणवले. त्यामुळे कदाचित गैर समज झाला असावा.

लिंक ओपन नाही केली.
पण ते शाहरूख मेरे पाव चाट रहा था ते आहे का?
आमीर खान त्याबद्दल शरमिंदा आहे.
त्या आधी शाहरूखची मुले आमीर फॅन होती. त्यानंतर राहिली नाहीत.
चांगला माणूस आहे आमीर. पण शेवटी चुकतो तोच माणूस. मग गरीब असो या आमीर

मस्त... आम्हीही डझनावारी मांजरी पाळल्यात.. आता आहे ती /तो (बोका) कितवा
आहे माहित नाही

Pages