आमच्या पिंट्याचे पाळीव प्राणी प्रेम.

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 April, 2018 - 07:24

नोंद घ्या - लेखातील शब्दन शब्द खरा आहे. कोणत्याही प्राणीप्रेमींची टिंगल उडवायचा वा त्यांच्यावर टिका करायचा हेतू नाही. किंबहुना अश्यांबद्दल आदरच आहे हे लेख पुर्ण वाचल्यावर जाणवेल.

लहान मुलांना बरेचदा प्राणी पकडून आणायचा आणि पाळायचा शौक असतो. पण काहीच जण नशीबवान असतात ज्यांना आईवडिलांकडून ही परवानगी मिळते. मला स्वत:ला प्राणी पाळणे हा प्रकार कधीच आवडला नाही. या बाबतीत माझे आईवडिल नशीबवान ठरले असे म्हणू शकतो. पण आमचा पिंट्या मात्र याबाबतीत लहानपणापासूनच नशीबवान कार्टा म्हणून गणला गेला आहे. त्याने आजवर कित्येक विविध प्राणी पाळले असतील त्याची मोजदाद नसावी. सर्वांना एकाच वेळी जोडले तर राणीबागेच्या शेजारी त्याचे स्वत:चे एखादे पाळीव प्राणी संग्रहालय तयार व्हावे..

असो,
तर माझ्या आठवणींप्रमाणे सांगायचे झाल्यास कुत्रा हा सर्वसाधारणपणे पाळला जाणारा प्राणी त्याने आजवर एकेक करत अर्धा डझन पाळून झालेत. ज्या घरात कुत्रा पाळला जातो तिथे मी पाय दुमडूनच प्रवेश करतो. कधीही पळायची वेळ येईल अश्या आवेशातच तिथे वावरत असतो. अपवाद पिंट्याचे घर. त्याने आजवर पाळलेल्या एकूण एक कुत्र्यांची खासियत अशी होती की ते कधीही प्राणघातक वाटले नाहीत. अगदी त्याचा लेटेस्ट डॉबरमॅन जो दोन पायांवर उभा राहिला तर माझ्या डोक्यात टपली मारून माझा कान चाटून जाईल ईतका ऊंचपुरा असला तरी त्याच्या त्या चाटण्याची कधी भिती वाटली नाही. याचे कारण म्हणजे त्याचे कुत्रे अगदी बाल्यावस्थेपासूनच पाळलेले आणि माणसाळलेले असायचे. त्यांचे सू शी, झोपणे उठणे, खेळणे, मस्ती करणे सारे अंगांखांद्यावरच नाही तर अगदी कुशीत घेऊन केले जायचे. त्यांना लहानपणापासूनच वरणभातावर तुपाची धार सोडून त्याचे खिमाट करून अगदी हाताने भरवले जायचे. टमाटर हे तर त्यांच्या घरच्या कुत्र्यांचे राष्ट्रीय खाद्य असायचे. त्यामुळे एकंदरीत त्या कुत्र्यांचा स्वभावही आंबटगोड अन मवाळ व्हायचा. एखादा कुत्रा गेला की सहा महिने वर्षभराचा दुखवटा पाळला जायचा, आणि त्यानंतर त्याची जागा दुसरे कुत्र्याचे पिल्लू घ्यायचे. सूझी, मिकी, टॉमी, टायगर, मिकी टू अश्या ईंग्लिश नावानंतर त्याने त्याच्या सध्याच्या कुत्र्याचे नाव "साहेबराव" ठेवले आहे. कदाचित कुत्र्याची प्रजाती डॉबर "मॅन" असल्याने माणसातले नाव ठेवले असावे. पण एवढ्या मोठ्या नावाने हाक मारणे अवघड म्हणून त्याला "सॅबी" अशी हाक मारली जाते. कुत्र्यांना असे मोठे नाव आणि त्याचे शॉर्ट टोपणनाव असलेले माझ्या पाहण्यात तरी दुसरे नाही. त्याच्या कुत्र्यांनी घडवलेले कैक रोचक किस्से पुन्हा कधीतरी स्वतंत्र भागात...

कोकणात आमच्या गावाकडे मांजरी पाळणे काही नवीन नाही. ईथे मुंबईत सुद्धा मांजरे ईथे तिथे फिरताना आणि याच्या त्याच्या भरवश्यावर जगताना बरेच पाहिल्या आहेत. पण पिंट्या त्यातील एका बोक्याला घरी घेऊन आला. विशेष म्हणजे त्याच्या घरच्यांनीही त्याला तसे करू दिले. तेव्हा त्यांच्या घरात टायगरचा वावर असायचा. टायगर म्हणजे त्या नावाचा कुत्रा. मराठीत शेरू. पिंट्याघरचेच माणसाळलेले जनावर ते. त्याच्यापासून बोक्याला कसलाही धोका नव्हता. टायगरच्याच शेजारी बसून त्या बोक्याचे जेवण होऊ लागले. जेव्हा टायगर एका वाडग्यात कुस्करलेले टमाटर खायचा तेव्हा हा पिंकुडा मस्तपैकी चायनीज सूप हादडायचा. येस्स, चिकन मंचॉऊ सूप. आठवड्यातून चारदा त्याला लागायचेच. त्याचे पिंट्याने ठेवलेले नाव सोन्या होते. पण एका रंगपंचमीला पोरांनी त्याला कसलासा गुलाबी रंग लावला तो त्याच्या केसांवरून कित्येक दिवस सुटतच नव्हता. तेव्हापासून त्याला पिंकुडा हे नाव पडले. जे पुढे जाऊन पिंट्यानेही स्विकारले.

आमच्या पिंट्याने कुत्र्यासोबत बोका नांदवला. पण पुढे त्या बोक्यासोबत उंदीरही नांदवले. हो ऊंदीर, पण आपले नेहमीचे काळे नाही तर पांढरे उंदीर. एरवी ऊंदीर म्हटले की त्यांना घरातून हाकलायचे कसे हाच पहिला प्रश्न पडतो. त्याचे सल्ले मागायला मायबोलीवर धागेही निघतात. आणि त्या धाग्यावर शेकडो प्रतिसादही पडतात. पण हे पांढरे उंदीर मात्र पांढर्‍या सश्यासारखे पाळले जातात हे मला पिंट्यामुळे समजले. तसेच जनावरांमध्येही आपण नतद्रष्ट्र माणसे काळा-गोरा वर्णभेद करतो हे देखील उमजले. ऊंदीर पाळण्याचे अतिरीक्त फायदे मोजून दाखवताना उंदरामुळे त्यांच्या घरातील झुरळे नाहीशी झाली असे पिंट्या एकदा मला म्हणाला होता. खरे खोटे पिंट्याच जाणे. पण मी त्याच्या घरी कधीकाळी रात्रीचा टीव्ही बघायला जायचो, तेव्हा लाईट काढल्यावर अंधारात कपाटामागून एकदोन झुरळे येताना पाहिली होती. ती सुद्धा पिंट्यानेच पाळलेली असावी म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्षच केले होते. पण या नवीन आलेल्या उंदरांनी कपाटामागे आपला अड्डा बनवल्यापासून ती झुरळे कधी दिसली नाहीत हे मात्र खरे.

तर या उंदरांमध्ये एक नर आणि मादा होता. त्यांची नावे अनुक्रमे संजू आणि मंजू होती. त्यांच्या कपाटामागील प्रणयक्रिडेतून तीन पांढर्‍या पिल्लांनीही जन्म घेतला होता. अशी मिळून एकूण पाच उंदरे होती. त्या पिल्लांना मात्र नावे न देता वयानुसार एक, दोन, तीन असे नंबर द्यायचा कल्पकपणा पिंट्याने दाखवला होता. आज ती सारी उंदरे मेली आहेत. पण एकेकाळी (पिंट्याच्या भरवश्यावर आणि त्यानेच हट्ट धरल्याने) मी सुद्धा त्यातला एक उंदीर माझ्या हातावर एकदा खेळवला आहे, हे जेव्हा मी माझ्या गर्लफ्रेंडला सांगतो तेव्हा तिचा यावर आजही विश्वास बसत नाही.

अरे हो, प्रत्येक उंदराच्या मरणाचा एक स्वतंत्र किस्सा आहे, पण त्यातील एका उंदीराने मात्र आमच्याच घरात येऊन समाधी घेतली होती. आमच्या टेबलखाली निवांत झोपले होते. आधी मी त्याला पाहून दचकलो होतो, पण ते मात्र ढिम्म हलायला तयार नव्हते. मी भाबडेपणाने पिंट्याला जाऊन सांगितले, "अरे बाबा तुमचा एक उंदीर आमच्या घरी येऊन झोपलाय. त्याला तेवढे घेऊन जा पटकन" .. तसे पिंट्या पटकन आमच्या घरी आला, आणि त्याला बघून लांबूनच हंबरडा फोडला. उंदराचे श्वास, ठोके, नाडी वगैरे चेक न करता लांबूनच पिंट्याला कसे समजले की तो मेला आहे हे मला आजवर समजले नाही. पुढे ती सारी उंदरे एकेक करत मेली आणि आपले घर उंदरांना मानवत नाही असा निष्कर्श काढून त्याने पुन्हा कधी उंदीर पाळले नाहीत. त्या सर्व उंदरांना आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्येच मूठमाती देण्यात आली होती.

कबूतर हा आणखी एक उंदरासारखाच जीव ज्याला लोकं हाकलायला बघत असावेत. पण पिंट्या मात्र तो जीव पाळायचा. ते सुद्धा शांततेचे प्रतीक पांढरे कबूतर नाही तर नेहमीचे करडे कबूतर. रस्त्याकडेचे जखमी झालेले कबूतर तो घरी आणायचा आणि बरे करून सोडायचा. पुढे बिल्डींगमध्ये एक जैन धर्मीय बाई राहायला आली. तिला सुद्धा हाच भूतदयेचा छंद होता. तसेच ती यात एक्सपर्ट होती, जणू कबूतरांची डॉक्टरच. तिच्या घरी एकाच वेळी आठदहा कबूतरे अ‍ॅडमिट असायची. पिंट्याही मग त्यापुढे कुठे जखमी कबूतर दिसल्यास ते आपल्या घरी न आणता तिलाच सुपुर्त करायचा आणि त्याची देखभाल करण्यात तिची मदत करायचा.

मासे हा एक बहुउपयोगी जलचर प्राणी. ते खाताही येतात आणि ते पाळताही येतात. खायचे मासे शक्यतो घरात पाळले जात नाहीत. पण पाळायचे रंगीत मासे मात्र खायला हरकत नसावी. निदान माझा तरी पिंट्याच्या फिशटॅंकवर याच कारणास्तवर नेहमी डोळा असायचा. कधीतरी पिंट्याला वाटेल बस्स झाले मासे पाळणे, आता यांना खाऊन विकून टाकूया हा फिशटॅंक, हा दिवस कधीतरी उजडेल या आशेवर मी होतो. पण आजवर नाही उजाडला. फक्त फिश टॅंकमधील मासे तेवढे बदलत राहतात. त्यांच्याशी खेळणे, गप्पा मारणे, फिशटॅंकमधील पाणी बदलून त्यांना आंघोळ घालणे, त्यांना किडे खाऊ घालणे हि कामे पिंट्या नेहमीच आवडीने करत आलाय. त्या किड्यांवरून आठवले. बाहेरून किडे विकत आणण्यापेक्षा का नाही त्यांची घरातच पैदास करावी हा विचारही पिंट्याच्या मनात एकदा आलेला. पण त्याच्या मातोश्रींनी तो हाणून पाडला. अन्यथा त्याला ते अवघड नव्हते. मध्यंतरी काडेपेटीच्या आकाराएवढ्या मिळणार्‍या बॉक्समधून कसलेसे किडे तो पाळायला आणायचा. पण त्याची ती आवड फुलण्याआधी तिथेही घरून ब्रेक लावण्यात आला.

मत्स्यपालनातून मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जीवावर त्याने एकदा कासव पाळायला आणले होते. त्याचे कवच साधारण सहा ईंची पिझ्झाच्या आकाराचे होते. कासवाचे नाव त्याने "सामी" ठेवले होते. यामागचे कारण म्हणजे तो पाकिस्तानी गायक अदनान सामी, की पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद सामी, या दोघांपैकी कोणाची तरी आठवण त्याला त्या कासवाकडे बघून यायची. ईथे कुठल्याही सामीप्रेमीच्या भावना दुखवायच्या नाहीयेत, पण जे होते ते असे.

बाकी हे कासव पाळणे मला फार भारी वाटले होते. किंबहुना आम्हा सर्वांनाच. पुढचे काही दिवस शाळेतही जिथे तिथे पिंट्याच्या कासवाचीच चर्चा होती. रोज येउन बघावेत असे काही त्या कासवाचे मनोरंजक प्रताप नव्हते. पण एखादा ‘वन टाईम मस्ट वॉच’ सिनेमा असतो ना, तसे ‘एकदातरी बघायलाच हवा’ असा हा प्राणी असल्याने सर्व जण त्याच्या घरी येऊन हजेरी लाऊन जात होते.

एखादा प्राणी पाळला की त्याच्या खाण्यापिण्याची बडदास्त पिंट्या चांगली राखतो, तशी कासवाचीही होतीच. पण प्रॉब्लेम फक्त एकच होता की कासवाच्या आकाराच्या मानाने त्याची तात्पुरती सोय केलेला टॅंक काही तितका मोठा नव्हता. आणि एके दिवशी कासवाने तोच टॅंक फोडून आत्महत्या केली. मृत्युचे नेमके कारण समजले नाही, बस्स फुटलेला टॅंक आणि फ्रिजमागे मिळालेला कासवाचा मृतदेह ईतकेच. आता यावरून कासव कसे मेले असावे हे शोधायला आम्ही सीआयडी बोलावणार नव्हतो. त्यामुळे आम्ही तरी त्याला आत्महत्या घोषित करून मोकळे झालो. पिंट्या मात्र शॉकमध्ये गेला. कारण कासवाचे सरासरी आयुष्य माणसापेक्षाही जास्त म्हणजे दिडशे ते दोनशे वर्षे असते असे त्याने कुठेतरी वाचले होते. एवढे दिर्घायुष्य असलेला जीव असे फटक्यात जायला आपण जबाबदार ठरलो हे त्याला पुढचे कित्येक दिवस खात होते. अर्थात पुन्हा त्याने आयुष्यात कासव पाळायचे नाव घेतले नाही.

पिंट्याच्या घरात एक पोपटांचा भलामोठा खानदानी पिंजरा होता. कधीकाळी त्यात दोन पोपट असायचे. आता फारसे आठवत नाही. पण लहानपणी मी आणि पिंट्या त्यांच्यासोबत मिमिक्रीचा खेळ करायचो. दोन्ही पोपट बोलायला अगदी पोपट होते. त्यांच्या पिंजर्‍यात दोनचार पेरू उगाचच ईथे तिथे पडलेले असायचे. मी आणि पिंट्या आम्हा दोघांनाही ते आवडत असल्याने अधूनमधून आम्ही एखादा गट्टम करायचो. पुढे कधीतरी पिंट्याचे आजोबा आणि ते पोपट जरा पुढेमागे असे एकत्र वारल्यापासून पुन्हा त्या घरात पोपट पाळले गेले नाहीत. काही वर्षे तो पिंजरा तिथेच रिकामा लटकून होता. नंतर काढण्यात आला.

गेल्या मे महिन्याच्या सुट्टीत पिंट्याची भाची त्याच्याकडे राहायला आली होती. तिने एकदा हट्ट केला. मामा आपण आऊल पाळूया का?
कुठले कार्टून नेटवर्क पाहून आलेली देवास ठाऊक. पण आपल्याला विचित्र वाटणारा हा पक्षी लहान मुलांना फन्नी वाटू शकतोच. तसेच त्याच्या "आऊल" या नावाचा उच्चारही पुरेसा गंमतीशीर आहे. त्यामुळे केला असावा भाचीने हट्ट. पण तो पाळायची गरज काय होती. कदाचित पिंट्याला ते आव्हान वाटले असावे. किंवा ईतके प्राणी पाळणारा आपला मामा आपल्या आवडीचा एक प्राणी पाळू शकत नाही असे वाटून आपल्या भाचीचा हिरमोड होऊ नये म्हणून त्याने ते धाडस केले असावे. शेवटी यारोंका यार आहे पिंट्या, आपल्या भाचीचाही तितकाच लाडका मामा असणार. ईथे तिथे चौकशी करत तब्बल तीन हजार रुपये मोजत त्याने तो एकाकडून विकत घेतला. शांतपणे एकटक कुठेतरी शून्यात बघत राहायचा. पण भाची त्यावरही खुश होती. चार दिवस झाले, भाचीचे समाधान झाले. पाचव्या दिवशी मात्र घुबड हा अपशकुनी प्राणी असल्याचा शिक्का मारत त्याची रीतसर हकालपट्टी करण्यात आली. सेकंडहॅन्डमध्ये त्याची किंमत दिड हजार रुपयेच मिळाली. ज्याच्याकडून विकत घेतला होता त्यालाच पिंट्याने हाल्फ प्राईजमध्ये परत केला. शकुन अपशकुनावरचा माझा विश्वास त्यादिवशीच उडाला जेव्हा त्याच्या मूळ मालकाला त्या आऊल्याने बसल्या बसल्या दिड हजार रुपये कमावून दिले.

हो, आमच्या पिंट्याने साप देखील पाळायला आणला होता. एक सर्पमित्र त्याचाही मित्र झाल्याने साप हा देखील एक पाळायचा जीव आहे याचा त्याला साक्षात्कार झाला. ट्रायल बेसिस वर त्याच मित्राकडून एका सापाला घेऊन आला. आता साप म्हटले की चटकन आपल्या डोळ्यासमोर जे येते अगदी तितक्या लांबीचे प्रकरण नव्हते. पण गांडूळापेक्षा बरेच मोठे होते. पिंट्या साप पाळायला घेऊन आला आहे ही खबर बघता बघता गावभर पसरली. मी शेजारी राहत असूनही माझ्या कानावर ही बातमी पोहोचेपर्यंत त्या सापाच्या दर्शनाला लागलेली रांग आमच्या घरापर्यंत पोहोचली होती. पिंट्याचे घर हाऊसफुल्ल होते. पण सारे जण पिंट्या आणि सापापासून चार हात दूरच उभे होते. एवढासा तो जीव, विषारी नाही याचीही कल्पना होती, पण तरीही कोणीही फार पुढे पुढे करायला धजावत नव्हते. पिंट्याने त्या सापाला आत्मविश्वासपूर्वक हाताळत काही सापाचे खेळ करून दाखवले आणि लोकांचे मनोरंजन केले. पण हा एकाच दिवसाचा शो ठरला. दुसर्‍याच दिवशी आईने कान पिरगळल्याने पिंट्याला तो साप गंगेला अर्पण करावा लागला. गंगा त्याच्या सर्पमित्राचे नाव.

थोडी जागा मिळाली असती तर सहज पिंट्याने गाय, बकरी, कोंबड्या वगैरे पाळल्या असत्या. पण मुंबईकरांना हे सुख कसले. ईतर लोकं राणीबागेत प्राणी बघायला जातात. हा त्यातील काय घरी नेता येईल हे बघायला जायचा. रंगीबेरंगी चिमण्या हे तिथूनच सुचलेले प्रकरण. या टोकापासून त्या टोकापर्यंत आणि वरपासून खालपर्यंत गॅलरी व्यापून टाकणारा भलामोठा पिंजरा हि वनटाईम इन्वेस्टमेंट करून त्याने हळूहळू विविध रंगाच्या चिमण्या आणून तो पिंजरा भरायला सुरुवात केली. तब्बल सहासात महिने. त्यांच्या प्रजातीची नावे काय काय होती कल्पना नाही, पण मी मात्र सर्वांना रंगीत चिमण्याच म्हणायचो. हळूहळू मलाही त्या चिमण्या, त्यांचे रंग, त्यांचा चिवचिवाट, किलबिलाट आवडू लागला होता. पण ते एवढे अवजड धूड सांभाळणे अवघड झाल्याने एके दिवशी त्या चिमण्यांचे वाटप होऊन ती जागा खाली करण्यात आली. पिंट्याने काहीतरी सही पाळलेले आणि ते गेले, या विरहाचे दुख आयुष्यात मला पहिल्यांदाच झाले.

आणि मग एके दिवशी पिंट्या खार घेऊन आला. कुठून आणली या प्रश्नाला मित्राने दिली म्हणून थातुरमातुर उत्तर दिले. पण कोणता मित्र ते काही सांगितले नाही. मला संशय होता की त्याने ती राणीबागेतून पकडून आणली असावी. आणि आता तिचे घर त्याने एका टीव्हीच्या रिकाम्या खोक्यात बनवले होते. मला खरे तर हे क्रूर वाटले होते. म्हणजे प्राणी पकडा, कापा, शिजवा, आणि त्यांना खाऊन संपवा या मताचा मी. पण त्यांना बंदी बनवून पाळणे मला रुचत नाही. कोंबड्या बकर्‍या, कुत्री मांजरी, चिमणी पोपट हे सर्वसाधारण वर्षानुवर्षे पाळले जाणारे पशूपक्षी. त्यांनाही ती पिढ्यानपिढ्याची पाळले जायची सवय असावी. पण खारीसारखे मुक्त बागडणारे जीव तसेच बागडू द्यावेत.

असो, तर यथावकाश ती खोक्यातून बाहेर येत त्याच्या अंगाखांद्यावर खेळू लागली, त्यांच्या घरात उंदडू लागली, गॅलरीत बागडू लागली. आणि अश्यातच एके दिवशी गॅलरीतून खाली पडली. कितव्या माळ्यावरून ते विचारू नका, उगाच पिंट्याला अटक व्हायची. जर एवढ्या ऊंचावरून हत्ती पडला तर तो सुद्धा फुटून मरून जाईल. ही तर छोटीशी खारुताई, पण निदान तिची बॉडी तरी मिळायला हवी. पिंट्या आणि फॅमिलीने खालच्या दुकानलाईनवरचे छज्जे न छज्जे पिंजून काढले. पण काहीच पत्ता नाही. दोन दिवस त्यांच्या घरचे कोणी धड जेवले नाही. म्हणायला मी सुद्धा पशूपक्षी प्रेमी आहे. पण माझे प्रेम त्यांना खाण्यापुरतेच. त्यांच्या विरहात खाणे सोडावे हे माझ्यासाठी अनाकलनीयच. पण लागतात काही लोकांची मने जनावरांत. मी मात्र अश्यांच्या दुखात सहभागी होऊ शकत नाही. काठावरच राहतो. पण यावेळी मात्र मलाही वाईट वाटले.

आणि मग तिसर्‍या दिवशी ती पुन्हा आली. कशी आली, कुठून आली, काहीच अंदाज नाही. एखादी खार ईतके माळे चढून जिन्याने वर येऊ शकते का, ईतकी तिला उपजत बुद्धी असते का याची कल्पना नाही. पण अचानक पिंट्याच्या घरचे वातावरण बदलले. त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहिला आणि मलाही बरे वाटले..

त्यानंतर साधारण आठवड्याभराने तो स्वत:हून तिला राणीबागेत सोडून आला. हे कळल्यावर मला समाधानही वाटले. आजही राणीबागेत एखादी खार बघताना ती पिंट्याची खार तर नाही ना असेच वाटते. असाच एक पिंट्याची खार तर नाही ना म्हणत राणीबागेतील एका खारीचा काढलेला फोटो टाकून हे पिंट्या पाळीव प्राणी प्रकरण ईथेच संपवतो Happy

khar.JPG

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी देखिल एकदा एक पांढरा आणि काळा उंदिर पाळले होते. त्यांची नावे अनुक्रमे स्वजो आणि शाखा.
पण माझ्या सई नावाच्या मांजरीने त्यांना खाऊन टाकले. Sad

मस्त लिहिलंय.
दोन्ही पोपट बोलायला अगदी पोपट होते.>>> वा वा!
मी कधीही प्राणी पाळु शकत नाही. पण आता घरच्या मेंब्रांना अक्कल येउ लागलीये तशी मम्मा एक डॉगी आणुया का? असा प्रश्न येतो अधीमधी.
तो मी तुम्हाला सांभाळता नाकीनौ येतात आणि त्यात भर नको. असं म्हणुन निकालात काढते.
बर ते डझनभर कुत्रे जाण्याचं कारण काय? कुस्करलेले टमाटर?

मी कधीही प्राणी पाळु शकत नाही. पण आता घरच्या मेंब्रांना अक्कल येउ लागलीये तशी मम्मा एक डॉगी आणुया का? असा प्रश्न येतो अधीमधी. >>> सेमं .
पण आमच्याकडे मेम्ब्राच्या आजीनेच , "मग तुझ्यापेक्शा जास्त मी त्याचेच लाड करेन " अशी लाडिक धमकी दिल्यावर विचार मागे पडला .
अजूनही , एन्टरटेनमेन्ट बघून मध्ये मध्ये हुक्की येते .
आम्हाला , कुत्रा , मांजर ...गेला बाजार एखादा हत्ती तरी पाळायचा होता .
पण हत्ती लिफ्ट मधून आठव्या मजल्यावर कसा येणार ?? असा मूलभूत प्रश्न उपस्थित झाल्यामुळे .. हत्ती कॅन्सलं.

हत्ती>> Lol
आजींची आयडीया भारी आहे.
आम्हाला अजुनतरी छोटासा क्युट डॉगीच हवा आहे.

बर ते डझनभर कुत्रे जाण्याचं कारण काय? कुस्करलेले टमाटर?
>>>>>

डझनभर नाही, अर्धा डझन. ते सुद्धा गेल्या सतरा अठरा वर्षांच्या काळात. म्हणजे पहिले दोनेक कुत्रे पिंट्याला स्वत:ची अक्कल यायच्या आधीपासूनचे होते. सध्याचा डॉबरमॅन जिवंत आहे. एकाला त्याचा मोठा भाऊ त्यांच्या पुण्याच्या घरी घेऊन गेला. तिथे आहे तो बहुधा अजून जिवंत. म्हणजे मेलेले असे चारच. त्यातील एकाला गाडीने उडवला. आमच्या समोर नवीन रोडचे काम चालू होते. त्या सहा आठ महिन्यांचा काळात त्या रोडने तीन माणसांचे आणि यांच्या एका कुत्र्याचा बळी घेतला. लोकांनी त्यांची समजूत काढली की नशीबवान आहात, रस्त्याला तुमच्यातील एकाचा बळी घ्यायचा होता, पण कुत्र्याने तुमचा मृत्यु स्वत:वर घेतला. कुत्र्यांची वफादार वगैरे इमेज असल्याने त्यांना ते पटलेही. त्या उपकाराची जाण म्हणा, त्या कुत्र्याचा आजही त्यांच्या घरात फोटो लागतो. येनीवेज, तर बाकी तीन आजारामुळे वा म्हातारपणामुळे गेले असतील. असे काही विशेष नाही

हत्ती Happy
हल्ली तर ते राणीबागेलाही पाळणे परवडत नाहीये. एकेकाळी हत्तीवर बसून राणीबागेच्या फेर्‍या मारता यायचे म्हणा. आमच्या नशीबात जवळून बघणे तरी होते. पण सध्या तर दूर कुठेतरी साखळदंडाने बांधून ठेवलेले असतात. लांबूनच बघता येतात. फोटो सापडला तर टाकेन ईथे.

ओके. पण तरी कुस्करलेले टमाटर कुत्र्याला म्हणजे माझ्याच पचनी पडत नाहीये. कुत्र्याच्या पडत असतील Lol
राणी बाग हत्ती बद्दल +१
बघवत नाही त्या दुर साखळदंडानी बांधुन ठेवलेल्या हत्तीकडे.

छान लेख आहे. पण आज लेखाच्या शेवटी तुझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे 'ऋन्मेऽऽष' असे नाव न लिहिता 'ऋन्मेष' असे लिहिले आहेस. काही खास कारण???

झाली अवांतराला सुरुवात.

माझीही भर. Happy
हल्ली ऋन्मेष प्रतिसाद लिहिताना सुरुवातीला ऋन्मेष असं लिहुन खाली प्रतिसाद लिहितोय ही गोष्ट मी नोंदली एका धाग्यावरच्या त्याच्या प्रतिसादात.
हे बाकी बरं झालं. म्हणजे ऋन्मेषचे प्रतिसाद ज्यांच्या डोक्यात जातात, आणि चिडचिड होते त्याच्या साठी बरंय हे. सुरुवातीलाच समजेल की हा प्रतिसाद आपल्याला वाचायला नको बाबा आणि स्किप करतील. Happy

सस्मित योग्य निरीक्षण. मोठ्या प्रतिसादांआधी दोनतीन ठिकाणी असे केलेय मी. आणि तुम्ही नमूद केलेलेच कारण Happy

@ विक्षिप्त मुलगा,
आपलेही निरीक्षण अचूक..
आधी माझी गर्लफ्रेण्ड मला ऋन्मेऽऽष अशी हाक मारायची. हल्ली नुसतेच ऋन्मेष अशी हाक मारते. नात्यातला लाडिकपणा कमी होण्याचे काय कारण असावे यावर स्वतण्त्र धागा काढायला हवा खरे तर..

आजकाल नवनवीन विषय हाताळतो आहे तसे हे पण असेल. हाकानाका.
>>>>
हे अगदी शाहरूखला हल्ली फॅन, रईस, डिअर जिंदगी सारखे वेगवेगळ्या विषयांवरचे पिक्चर करत आहेस म्हटल्यासारखा फील आला Happy

पाफा, सारखं त्याच झाडावर काय

सस्मित योग्य निरीक्षण. मोठ्या प्रतिसादांआधी दोनतीन ठिकाणी असे केलेय मी. आणि तुम्ही नमूद केलेलेच कारण>>>>>>>> वाटलच मला Happy

पाफा, सारखं त्याच झाडावर काय
>>>
मला "अशी ही बनवाबनवी" मधला लक्ष्यावरील स्त्रीवेशातील अतिप्रसंगाचा सीन आठवला.

ऋ.. छान लिहिलंयस. Happy

आमच्याकडे पण लहानपणापासून खूप प्राणी पाळून झालेयत.(सगळ्यांनी मिळून, पण बरेचसे आज्जीनेच पाळलेले.) माझ्या लहानपणी आमच्याकडे खूप बकऱ्या नि बोकड होते, कुत्रे तर एकामागोमाग एक असे सात आठ तरी झाले असतील आतापर्यंत. दोन पांढरे उंदीर पण होते. एक घोरपड होती. ती बाथरूममध्ये एक मोठं घंगाळ होतं त्याच्या मागे राहायची. आत्तेने एक चानी (खार) पाळली होती. तिच्या अंगावर माड पडून ती गेली. तिची शेपटी आत्येने सांभाळून ठेवलेली होती.
मी आणि भावाने मिळून दोन ससे आणले होते. त्यातला एक करड्या रंगाचा नि एक पांढराशुभ्र. महिनाभर मस्त घरभर बागडत मजेत राहात होते. मग आईला कोणीतरी सांगितलं की सशांच्या मलमूत्रामुळे न्यूमोनिया होतो. लगेचच आईने मला नि भावाला ससे राहतील नाहीतर मी राहीन अशी धमकी देऊन ससेच पोचते करायला लावले होते.
नदीतली कासवंही भेट म्हणून मिळालेली. त्यातली दोन मी पाळली नि बाकीची कोणाकोणाला देऊन टाकली. दोन्ही कासवं सहा वर्षे एकत्र एका फिशटँकमध्ये गुण्यागोविंदाने राहात होती. नंतर काय झाले माहीत नाही. गणेश चतुर्थीला एका कासवाने दुसऱ्याची मान चावून खून केला नि मग अनंत चतुर्दशीला ते पण मेले.
पप्पांना एका माणसाने चक्क रानटी डुक्कराचे छोटे पिल्लू भेट दिलेले. एकदम छोटे होते. शिकाऱ्यांनी बहुतेक त्याच्या आईची शिकार केली असणार नि ते एकटेच भटकत असताना रानात या माणसाला सापडलेले. पप्पा नि आजी दोघांनी ते पाळायचे ठरवलेले. पण एकदा आमच्याच कुत्र्याने त्याला चावा घेतला नि नंतर काही दिवसांनी ते मेले.
मांजर पण पाळलेली. (मी सोडून घरातल्या इतर मेंब्रांनी) पण मांजरांच नि माझं अजिबातच जमत नाही. त्यामुळे बहुतेक ती घर सोडून जातात. Wink
बाकी कोंबड्या अजूनही आहेत घरी. फिशटँकची मलाच आवड आहे त्यामुळे आताही माझ्या घरी तीन मोठ्ठे अरवाना आहेत.

या सदस्याबद्दल वेगळ्या प्रतिसादात लिहितेय कारण तो खास होता. Happy
आमच्याकडे एक पोपट पण होता. राजू नाव त्याचं. माझ्या मोठ्या बहिणीच्या बारशादिवशी मामाने आणून आईला दिला. अगदी छोटं पिल्लू होतं.. पिसं पण नव्हती अंगावर त्याच्या. त्याला आईने पाळला. (आईने आणि बहिणीने पाळलेला हा एकमेव पक्षी.) नंतर उडायला लागल्यावर पिंजऱ्यात कमी नि बाहेरच जास्त. मोठ्या काकांच्या खांद्यावर बसून बाजारपेठ फिरून यायचा. हा एकमेव असा होता की घरातल्या सगळ्यांचं त्याच्यावर जीवापाड प्रेम. काहीही खायला प्यायला असेल तर पहिला वाटा राजूचा. वालीच्या शेंगा, ओले काजूगर, भिजवलेले हरभरे हे अत्यंत आवडीचे त्याच्या. जेवताना चपातीचा तुकडा हवाच नाहीतर आरडाओरडा करून घर डोक्यावर घ्यायचा. कधी कधी आई मुद्दामच आधी चपाती द्यायची नाही मग हा फुरंगटून बसायचा. Lol नंतर भरवायला गेली की उगाचच रागावून दुसरीकडे जाऊन बसायचा. आणि कोणाचं लक्ष नाही असं समजून बघून गुपचूप चपाती घेऊन पिंजऱ्यात जाऊन खायचा. तिच कथा आईसक्रीमची. आईसक्रीम आणलेलं कळलं की हा आई नाहीतर आजीच्या खांद्यावर नाहीतर डोक्यावरच बसून राहायचा. जेव्हा आईसक्रीम मिळायचं तेव्हाच खाली उतरायचा.
मी अभ्यासाला बसले की हमखास येऊन माझ्या खांद्यावर बसायचा. मग लक्ष नाही दिलं की दप्तरावर मग तिथून पुस्तक मग वहीवर तरीही लक्ष नाही दिलं तर मग सरळ चोचीने हातातलं पेन ओढत बसणार मग जरा त्याच्या पाठीवरून हात फिरवला की साहेब खूष. मग माझा अभ्यास होईपर्यंत माझ्याबाजूला शांतपणे बसून राहायचा.
त्याच्या आंघोळीचा रोजचा सोहळा. रोजच्यारोज आंघोळ हवीच. आंघोळ करताना आपण पाणी ओतत बसायचं नि हा पंख पसरून नि एकदा डाव्या खांद्यावर नि एकदा उजव्या खांद्यावर असं पाणी घेत आंघोळ करणार. मनसोक्त आंघोळ झाली की मगच साहेब अंग झटकून घरात येणार.
34 वर्षे होता तो आमच्याकडे. एके दिवशी अचानकच जग सोडून गेला. घरं एकदम सुनं सुनं झालं तो गेल्यानंतर. आजही माहेरच्या आठवणींमध्ये पहिली आठवण त्याचीच असते... मन आणि डोळे दोन्ही भरून आणणारी.

हो घोरपड माझ्या आजोबांनी पाळली होती. ते गेल्यावर आजी तिची देखभाल करायची. घोरपड चांगली दोन फुटापेक्षा जास्त मोठी होती. मला फार भीती वाटायची तिची. भिंतीवर वगैरे दिसली की मी घराबाहेरच धूम ठोकायचे. नंतर तीचं काय झालं आठवत नाही.

34 वर्षे होता तो आमच्याकडे >>>> बापरे.. एवढा ईण्टरेस्टींग सदस्य ईतके वर्षे. खरंच घर सुनंसुनं झाले असेल अचानक..

Pages