तसा मी स्वत:च्या घरी राहतो

Submitted by रसप on 12 March, 2018 - 01:13

तसा मी स्वत:च्या घरी राहतो
तरी मी मला पाहुणा समजतो

उश्याशी कधी रात्र माझी निजव
तुझी शाल ओढून मी जागतो

बहरणार होतीच माझी जखम
तिचा घाव आहे, तिचा शोभतो

नको फोन लावूस आता मला
जुना रिंगटोनच पुन्हा वाजतो

नवा एकही शब्द नाही सुचत
जगाला तरी मी नवा वाटतो

मला हाक देतेस तू, मुंबई
तुझाही अश्याने लळा लागतो

तुला अन् मला सोबतीने बघुुन
म्हणू दे जगाला 'पहा.. हाच तो !'

तुझा जन्म झालाय माझ्यामुळे
तुझ्यातून मी कैकदा जन्मतो

पुन्हा एक गाडी निघाली भरुन
पुन्हा रूळ रूळास न्याहाळतो

तिच्या एक नजरेस व्याकूळ तो
तिच्या एक नजरेत व्याकूळतो

....रसप....
९ मार्च २०१८
http://www.ranjeetparadkar.com/2018/03/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वाह, छानच !
तुम्ही गझला पण करता हे प्रथमच कळाले.
व्याकूळतो खासच Happy