सामाजिक उपक्रम २०१८ - स्वयंसेवक हवेत

Submitted by अतरंगी on 5 February, 2018 - 06:40

नमस्कार,
मायबोलीवरील 'सामाजिक उपक्रम' आता तसा आपल्याला नवा नाही.
ह्या उपक्रमात दरवर्षी अशा गरजु संस्थांना मदत केली जाते ज्यांना सरकारकडुन जास्त मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यकरुन फक्त देणगीदारांवर चालते. देणग्या मार्च-एप्रिल ह्या २ महिन्यात मागवण्यात येतात. देणग्या त्या त्या संस्थांच्या खात्यात जमा करावयाच्या असतात व संस्थेने त्यातून खरेदी केलेल्या वस्तूंची पावती व फोटो देणे त्यांना बंधनकारक असते. त्याची रीतसर नोंद इथे दिली जाते. थोडक्यात सांगायचं, तर हा उपक्रम गरजु संस्था व देणगीदार ह्यांच्यातले एक माध्यम आहे.

उपक्रमाचे हे नववे वर्ष आहे व याकरता स्वयंसेवक हवे आहेत.
उपक्रमातील सर्वच सहभागी स्वयंसेवकांना साधारणपणे पुढील कामे करावी लागतात :
१. आपली ईमेल्स नेहमी पहाणे व उपक्रमासंबधी इथे अथवा ईमेलने आलेल्या सर्व प्रश्नांना वेळेवर उत्तर देणे.
२. देणगीदारांची यादी व देणगीच्या रकमा यांची लगेच योग्य जागी नोंद करणे व इतर स्वयंसेवकांना देखील लगेच ती माहिती पुरवणे.
३. उपक्रमाच्या कामाच्या ठराविक पायर्‍या असतात. ती कामे वेळेवर पार पाडणे.
४. प्रत्येक स्वयंसेवकाला एका संस्थेची जबाबदारी दिली जाते. ती पूर्णपणे सांभाळणे (गरज लागेल तशी मदतीला इतर स्वयंसेवक आहेतच!)
५. सर्वात महत्त्वाचे काम आर्थिक गणिते बरोबर ठेवणे.
ही व अजून काही कामे करावी लागतील.
उदाहरणार्थ,
~ देणगीसाठी नियोजित संस्थांसंबंधी सर्व आवश्यक माहिती संस्था प्रतिनिधींकडून गोळा करणे व गरजेनुसार लोकांना (देणगीदारांना) तशी माहिती पुरविणे.
~ संस्था व देणगीदार यांच्यात समन्वय साधणे.
~ संस्थेने देणगीतून घेतलेल्या वस्तूंची किंवा केलेल्या कामाची शहानिशा करून त्याची योग्य प्रकारे नोंद ठेवणे (जसे की छायाचित्रे, पावत्या, आभारपत्र वगैरे) व देणगीदारांपर्यंत ती माहिती पोचविणे.
~ उपक्रमातील स्वयंसेवकांच्या संपर्कात राहाणे, एकमेकांशी व नियुक्त संस्थांशी संवाद साधत राहाणे व उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहाणे.
यासाठी सुरुवातीला जास्त काम नसेल. परंतु देणग्या येऊ लागल्यानंतर मात्र स्वयंसेवकांनी सतर्क राहाणे अपेक्षित आहे व प्रत्येक टप्पा वेळेवर पार पाडणे अपेक्षित आहे.
तसेच वेळेवर माहितीची देवाणघेवाण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि त्याहून जास्त गरजेचे आहे.
स्वयंसेवकांना ईमेल्स, एक्सेल शीट्स, व्हॉट्सप व स्काईप यांसारख्या सुविधा वापरता येणे हीदेखील या कामातील एक महत्त्वाची गरज आहे.
ज्यांना इच्छा आहे अशा उत्साही व चौकस मंडळींनी १५ फेब्रुवारी पर्यंत नावनोंदणी करावी. जर अशा संस्थांबरोबर जवळून काम करण्याचा अनुभव असेल तर उत्तमच!
सामाजिक उपक्रम टीम चमु- अरुंधती कुलकर्णी, सुनिधी, कविन, अतरंगी, महेन्द्र ढवाण, निशदे, प्राची., वृंदा.

मनापासुन धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिकडे पहावे तिकडे
सुसंस्काराची गरज भासतेय
समाजाला पून्हा एकदा
रामराज्याची उणीव भासतेय.