येड

Submitted by Pradipbhau on 24 March, 2018 - 03:33

येड
गण्याला त्याच्या गावचा लई अभिमान. गावाबद्दल कुणी काय येड वाकड बोलल की गण्याची सटकायची. लहान हुत तवापासन त्याला गावचं नाव घ्यायला लई आवडायचं. त्याच कारण म्हंजी दोन अक्षरी नाव अन उच्चार करायला बी लई सोपं. त्याला कुणी इचारल काय गण्या कुठल्या गावचा? गण्या लगीच म्हणायच, येड्याचा. समधी माणस त्याच्या उत्तरानं हसायची पण गण्याला त्याची काय बी फिकीर न्हवती.
एकदा गण्या तालुक्याला गेलं. एस.टी. ने गावाकडं यायचं म्हणून बसची वाट बघत बसलं. तेवढ्यात दोन चार म्हातारी आली गण्याकड बघून म्हणाली,” ये पोरा येड्याची गाडी गेली का? “ गण्या म्हणाला, “नाय अजून”. तेवढ्यात ती म्हातारी म्हणाली, “आयला या येड्याच्या, कधी गाडी येळेत येईल तर शपथ. “ गावाला शिवी हासडली म्हणून गण्याला मायंदाळ राग आला पण करतंय काय? त्याच्याच गल्लीतील माणसं. गप गुमान बसून राहील.
तेवढ्यात बसचा लाल डबा आली. दरवाज्याजवळ गर्दी झाली. माणसं उतरायच्या आधीच काई जण बसमध्ये चढायला लागली. तस कंडाक्तर खवळल “ये येडयानो थांबा की जरा समधी उतरू देत. बस काय पळून चाललीय व्हय.” तेवढ्यात लहान पोराला कडेवर घेतलेली एक बाई म्हणाली,” काय बाय येड्याची येडीच जत्रा दिसतीया. “ गण्याला पुन्हा राग आला. पण बोलणारी बाय माणूस काय करणार? सगळा गावाचा अपमान निमूटपणे गिळला. तेवढ्यात कंडकटर पुन्हा ओरडल, “येडी सोडून कुणी बी गाडीत बसू नका. “. अस म्हणून त्यांन बेल मारली. गाडी येड्याच्या दिशेने निघाली. कंडकटर तिकीट काढायला उठलं. तेवढ्यात एक म्हातार म्हणाल, “ दोन हाफ येड अन एक फुल येड. “ कंडकटर म्हणाल, “हाफ कोण फुल्ल कोण? “ त्या म्हाताऱ्यानं दोघांकड बोट दाखवलं अन म्हणाल,”हे दोन हाफ अन मी फुल”.
गण्यानं गप्प राहायचं का नाही ते म्हणाले, “ हे हाफ अन तुमी फुल्ल कस?” तस ते म्हातार खवळल. म्हणाल, आर पोरा ते साठीचे म्हणून हाफ येडे मी 55 चा म्हणून फुल्ल येड.” गण्याला हे ऐकून गम्मतच वाटली. ते इचार करू लागल, “ आयला काय तरी चुकतंय. वय वाढलं की फुल्ल येड पाहिजे हाफ कस काय? “ त्याच्या डोक्यात हे गणित काय बसना. त्यांन नाद सोडला अन सीटवर गपगुमान बसून राहील.
गाव आलं तस कंडकटर पुन्हा ओरडला, “ चला येडे पटापट उतरा. “ बसमधन एकेक येडेकरी उतरू लागलं. बस निघून गेली. गण्या इचार करू लागल. आपल्या गावचं नाव येड कुणी ठेवलं. खरच या गावात पूर्वी येडी रहात हुती काय?
त्यांन याचा पाठपुरावा करण्याचं ठरवलं.
गण्या आता मोठा झाला हुता. एकदा तो त्याच्या मित्राच्या गावी गेला हुता. त्याचा मित्र गण्याला म्हणाला,”गण्या लेका लगीन कवा करणार?” गण्या म्हणाला,”आमी येड्याच. आमाला कोण पोरगी देणार? “ त्याचा मित्र म्हणाला,” माझ्या वळखीचा पोरींचा एक बाप हाय. पोरगी बी शेवगेच्या शेंगेगत हाय. बघू या आपन प्रयत्न करून.”
दुसऱ्या दिवशी गण्या आपल्या मित्राबरोबर शेवग्याची शेंग बघायला गेलं. पोरीच्या बाच्या घरात प्रवेश केला. बाच्या मिशा आकडेबाज होत्या. धोतर कोट काळी टोपी घालून त्या पोरींचा बा आत बाहेर येरझाऱ्या घालत हुतं. शेवगा शेंग पाहताच गण्या खुश झाला. लाल साडी, गुलाबी लिपस्टिक, नाकात चमकी, केसाची फिल्मी स्टाइल सडपातळ, शरीराचा काही भाग मुद्दाम उघडा ठेवलेला. गण्या बघतच राहील.
पोरीच्या बान इचारल,” कुठल्या गावचं पाव्हन?” गण्याचा मित्र म्हणाला, “ येड्याच” ते ऐकताच शेवग्याची शेंग बाहेर आली अन म्हणाली,” ओ येडेकर एक मिनिटं थांबला ना तर माझा हिसका दाखवीन. निघायचं. मला नाही येड्यात नांदायच. कुठली येड्यातन येडी प्रजा येतीया काय माहीत”.
गण्याची पळता भुई थोडी झाली. आयला एक तर गावचं नाव बदलावं किंवा गाव सोडून दुसऱ्या गावात राह्याला जावं असा इचार गण्यानं केला. त्या नादातच ते पुन्हा गावात आलं.
येड्याचा बैल, येड्याचा पोरगा, येड्याची पोरगी, येडे सरपंच, येडे मास्तर, येड्याची सून अस समद्याचंच उल्लेख होऊ लागल्यानं सरपंचाने गावचं नाव बदलण्याची जणू शपथच घेतली. दुसऱ्या दिवशी तराळाने गावात दवंडी दिली. “ ऐका हो ऐका आपल्या गावचं येडे हे नाव बदलून घेण्याचं ठरलं आहे. त्याचा इचार इनीमय करण्यासाठी आज रातच्याला गावसभा आयोजित केली हाय. तवा समध्यांनी हजर रहावे हो…. “
गावचं नाव बदलतंय म्हणल्यावर गण्याला लई आनंद झाला. समध्याच्या आधी ते पहिल्या रांगत येऊन बसल. गावची पंच मंडळी आली. सरपंचाने गावसभेचा हेतू सांगितला. सरपंच म्हणाले,” मंडळी तुमाला माहिती हाय आपल्या गावचं नाव लई वर्षांपासून येडे आहे. पूर्वी काय तक्रार न्हवती कारण समधीच येडी हुती. आता काळ बदललाय. चार बुक शिकलेल्या पोरा पोरींचा जमाना हाय. गावाच्या नावातन आपली बदनामी हुतीय. तवा गावचं नाव बदलण्यासाठी शासनाकडे मागणी करावी लागलं. “
इतका वेळ शांत पणान ऐकणार बबन्या न्हावी उभं राहिलं अन म्हणाल” सरपंच म्हणत्यात ते खरं हाय. आपल्या शेजारच्या गावचं नाव न्हावी हुतं. समधी म्हणायची न्हवीकर आला. पोरीबाळीना कुठं दिलंय अस इचारल तर न्हाविला म्हणून सांगायची लाज वाटायची. त्या गावानं पण नाव बदलून नागेश्वर करून घेतलं. तवा आपण बी नाव बदलू या.”
सरपंच म्हणाल आर नाव सुचवा. तवा गण्या उभं राहिलं अन म्हणाल,” आपण येडे हे नाव बदलून लावण्यनगर अस नाव ठेऊ या.म्हणजे आपल्या गावाकडं पाहण्याची समध्यांची नजर चांगली राहील. पोरींचा बाप सांगल पोरीला लावण्यनगरात दिली. पोराचा बाप सांगल सून लावण्यनगराची केली. समधीकडे लौकिक वाढलं.”
उपसरपंच म्हणाल, “आर तुझं खर हाय पण लावण्यनगर म्हटल्यावर लोकांच्या डोळ्यासमोर काय चित्र असेल. आपल्या गावात निम्म्यापेक्षा जास्त म्हातारी. लावण्य म्हटलं तर एकेकाची थोबाड बघण्यासारखी. म्हणे लावण्यनगर. गावात एक तर लावण्यवती हाय का?”
सरपंच म्हणाले बायांना काय वाटतंय? त्यावर गोदाबाई म्हणाली,” येडे हे नाव तस योग्यच आहे. त्यातन तुमाला बदलायचं असलं तर रामनगर ठेवा. निदान बापय गडी तरी गावाच्या नावानं सुधारतील. गावात काय बी इपरित घडणार नाय. नाव बदललं की दारूबंदीची मोहीम फत्ते हुईल.”
पंच मंडळींनी सरपंचाला बाजूला घेतलं. सरपंच येड का खूळ आपली रातीची समधीच पंचायत हुईल. रामनगरचा इचार नका करू असे विनवणीच्या सुरात सांगितलं. सरपंचाला देखील ते पटलं. नाव बद्दलण्यावर काही एकमत होईना. शेवटी सरपंच म्हणाल,” जाऊ द्या येड तर येड. कोणीतरी म्हटलंय की नावात काय हाय. तवा गावचं नाव येड हेच योग्य हाय. आपल्या पूर्वजांनी कायतरी इचार केला असलंच की? त्यांना काय वाटल. त्यांच्या भावना का म्हणून दुखवायच्या? तवा नाव बदलण्याचा इचार काढून टाकू या.”
गावसभा संपली. समधी माणस आपापल्या घरला जाऊ लागली. गण्या मात्र एकटाच बराच वेळ विचार करत बसला होता. इचारात मग्न असतानाच त्याला कुणाची तरी चाहूल लागली. त्याची शेवग्याची शेंग त्याच्याकडे येत हुती. ती म्हणाली,” ओ येडेकर, रागावला काय? मला माफ करा. माझी चूक झाली. येडेकर असला म्हणून काय झालं. गावाच्या नावात काय बी नसत. आपण कुठं जन्मायच हे आपल्या हातात असत होय? परमेश्वर गाठी बांधतो ती मन जुळतात म्हणून. गावाच्या नावाचा तो देखील इचार करत नाय. आता मी बी येडी तुमी बी येडे. आपण दोघे आजपसन येडेकर.”
प्रदीप जोशी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शेवग्याच्या शेंगेला 2 ऑपशन दिले असतील, येड नाहीतर न्हावी. तिने हे सेलेक्त केले असेल.
येड लागलं र येड लागलं र...