समय बडा बलवान!

Submitted by चिडकू on 4 November, 2017 - 06:10

मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असताना मानवाने बराच काळ हा आत्ता आणि आज जगण्यात घालवला. अन्न संकलक आणि शिकारी मानव समूहांचा बराच काळ हा खायचे काय हा प्रश्न सोडवण्यात जात होता. सर्व काही आज आणि आत्ता. पु लंच्या तुझे आहे तुझ्यापाशी मधला काकाजी म्हणतो तश्या दोनच वेळा. सकाळ झाली, दिसू लागले कि अन्न मिळवून जेवायची वेळ. रात्र झाली कि झोपायचं. कार्पे दिएम हे वेगळं सांगायची गरजच नव्हती.

हे मानवी समूह एका जागी स्थिर नसून अन्नाच्या उपलब्धतेच्या शोधात स्थलांतर करीत असत. अन्नासाठी चालू असलेल्या ह्या प्रवासात आलेल्या अनुभवांवरून त्यांना असे लक्षात आले कि अन्नाची उपलब्धता ऋतू चक्रावर अवलंबून आहे आणि ह्या ऋतुचक्राची एका ठराविक लयीत पुनरावृत्ती होते. हि बहुदा मानवाची पहिली जाणीव उद्याची. भविष्यकाळाची. त्या भविष्य काळातील जगण्याच्या सुरक्षिततेच्या खात्रीची.

हि उद्याची जाणीव जन्म देणार होती एका प्रश्नाला आणि त्याच्या उत्तराच्या शोधात माणूस जाणार होता खूप खूप लांब. साता समुद्रापार आणि त्याच्याही पुढे चंद्रावर आणि मंगळावरही. प्रश्न तसा फार सोपा. उद्या काय होणार?

उद्याच्या जन्माबरोबर जन्मले एक शास्त्र: कालमापन. हे कालमापनाचे शास्त्र पुढे जाऊन त्या उद्याचे असंख्य तुकडे करणार होते. हि आहे त्या प्रवासाची कहाणी.

भविष्यकाळची जाणीव झाल्यावर माणसाला ऋतू चक्राच्या लयीची जाणीव झाली. हळू हळू माणसाच्या असे लक्षात आले कि जर त्याने निसर्गामधल्या बदलांचे निरीक्षण केले तर काही प्रमाणात उद्याचे भाकीत केले जाऊ शकते. सुरुवातीला हा सगळा अंदाजपंचे बहात्तर कारभार होता. प्रत्येक समूहाचे वेगळे अनुभव आणि वेगळी अनुमाने. आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीवर आधारलेली. स्थलांतर करताना आजूबाजूची परिस्थिती तर सारखी बदलायची. उदाहरणार्थ जंगलमधल्या समूहाने आजूबाजूच्या झाडांवर आधारित काही अंदाज बांधले पण गवताळ कुरणांच्या प्रदेशात जाताच ते अंदाज निरुपयोगी होत. म्हणजे पळसाला पाने तीनच असा दाखल द्यावा तर साक्ष काढायला पळसच सापडला नाही तर काय फायदा?

मग झाला शोध कधीही न बदलणाऱ्या लयीचा. माणसाच्या लक्षात आले काही गोष्टी बदलत नाही. कुठेही गेले तर डोक्यावरचा आकाश कायम आहे. चंद्र सूर्य तारे कायम सोबतीला. त्यांच्या लयीत तालबद्धता आहे. समुहामधली जुनी जाणती म्हातारी माणसे सांगत असतात, लहानपणापासून पाहतोय चंद्र सूर्याची लय केंव्हा बदलत नाही. मग त्यावर आधारित अनुमाने केली जाऊ लागली. अश्याच लयीच्या शोधत पुढे माणसाने अणूच्या काळजाची धडधड, दुरच्या कुठल्याश्या बहुधा मेलेल्या ताऱ्याची गुणगुण, कुठल्याश्या स्फटिकाची थरथर असा कोणालाही सोडले नाही.

सूर्याचे दक्षिणोत्तर फिरणे आणि ऋतू चक्राची पुनरावृत्ती यांची सांगड घातली जाऊ लागली. आणि जन्म झाला सौर वर्षाचा. मग झाली सुरुवात सौर वर्षांवर आधारलेल्या स्थलांतराची. सूर्य किती उत्तरेला उगवतो आणि किती दक्षिणेला उगवतो ह्यावरून निर्णय घेतले जाऊ लागले उद्याच्या अन्नाच्या शोधात कुठे जायचे. हे सगळं करत असताना कुठे तरी असा वाटू लागला कि सूर्य कुठे असताना स्थलांतराला निघायचे म्हणजे वेळेत पोहोचू? नाहीतर आपण जाणार अन्नाच्या शोधात आणि मिळणार आंबट किंवा सडून गेलेली फळं.

ह्याच सुमारास काही लोकांनी सूर्य, चंद्र, आणि तारे निसर्गचक्राचा भविष्य जाणायला मदत करत आहे तर एखाद्या मानवाचे भविष्य देखील सांगू शकतात का ह्याची पडताळणी करायला सुरुवात केल्याची शक्यता आहे.

सूर्यावर केलेला अंदाज फारच ढोबळ असे. पण चंद्र त्या मानाने कमी वेळात चक्र पूर्ण करतो. पौर्णिमा अमावस्या पौर्णिमा हे चक्र सूर्याच्या फिरण्यापेक्षा जास्त वेगवान. आणि साधारण पणे ११ १२ पूर्ण चंद्र पहिले कि सूर्य फिरून पुन्हा त्याच जागी येतो. मग झाली सुरुवात पौर्णिमेवर किंवा अमावास्येवर आधारित प्रवासाच्या टप्प्यांची. हा झाला एक चांद्र मास.

अन्न संकलक आणि शिकारी समूहांचे अंदाज ह्या अनुमानावर भागत होते. पुढे झाली सुरुवात शेतीला. लोक एका जागी फार काळ स्थिर राहू लागले. सुरु झाली देवाण घेवाण. त्यातून आले वायदे. मला आत्ता दे मी तुला पुढच्या सुगीला देतो. पण नक्की केंव्हा. ११ चंद्र कि १२? कि सूर्य उत्तरेला गेल्यावर. मग लक्षात आले कि हे चंद्र सूर्याचे गणित तोकडे पडतंय. चंद्र कधी कमी कधी जास्त होतात. हे होता चांद्रमास आणि सौर वर्षातील फरकाने. प्रत्येक वर्षी काही दिवस कमी पडतात. किती दिवस? मग दिवसांचा हिशेब मांडू जाऊ लागला. चांद्रमासाचे तुकडे केले गेले. पूर्ण चंद्र, अर्धा चंद्र, अमावस्या, अर्धा चंद्र मग परत पूर्ण चंद्र. झाले ४ आठवडे. आठवड्यात साधारण पणे आले दिवस ७. आणि वर्षाचे गणिताची अचूकता वाढली.

जाता जाता अवांतर सांगायचं म्हणजे चंद्र, सूर्य आणि ताऱ्यांच्या स्थितीचा फक्त काळाच्या गणितासाठीच नव्हे तर दिशेच्या अंदाजासाठी पण वापर केला जात होता. पण आजचा विषय कालमापनाचा आहे. त्याबद्दल परत केंव्हा तरी.

शेतीचा शोध लागल्यापासून हे सगळे व्हायला काही हजार वर्षे तरी लागली. जगभरात सगळीकडे ह्या पद्धती रूरल्या. शेतीमुळे गावगाडा सुरु झाला. गावगाड्यामध्ये काही वस्तू जास्त तर काही वस्तू कमी पडू लागल्या. दुसऱ्या गावांबरोबर ह्या वस्तूंची देवाण घेवाण होऊ लागली. त्या बरोबर देवाण घेवाण झाली चालीरीती आणि पद्धतींची. अश्याच देवाणघेवाणीतुन ग्रीकांचे राशीचक्र भारतात आले आणि भारतातील शून्य गेला रोम ला. पण हे सगळं फार नंतर झालं. व्यापारासाठी होऊ लागलेल्या ह्या प्रवासाने वेळेचे महत्व अजून वाढले. २ माणसांनी भेटायचे ठरवले कि २ प्रश्नाशिवाय पुढे जाणे शक्यच नाही. कुठे आणि केंव्हा? कुठे तसा सोपा होता पण केंव्हा फार अवघड? दिवसाच्या प्रहारांनी हे काम सोपे केले. माणसे सांगू लागली सकाळी घरी येतो. अंघोळ करून तयार राहा. एकत्र निघु. शेजारच्या राज्यावर हल्ला करायचा आहे. पण इतका मोठ्या प्रमाणात सैन्य एकत्र आणायचा, त्यांच्या हालचाली करायच्या तर सगळ्यांनी वेळा पाळल्या पाहिजेत.

पण आता लोकं कशी असतात सगळ्यांनाच माहितीये. सकाळी येतो सांगून दुपार झाली तर येईना. कारण दुपार होत नाही तोपर्यंत सकाळच म्हणायची. ते काही जमेना. मग केले दिवसाचे भाग. आता किती भाग करायचे? भाग मोजायचे म्हणजे आल्या संख्या. संख्या म्हणजे मग गणित आलं. मग मोजण्याची त्या काळाची पद्धत म्हणजे सगळ्यात सोपी. मोजायचे हाताच्या बोटावर. बहुतेक सगळ्यांना २ हाताला मिळून १० बोटं. त्याकाळी सुमेर लोकांनी बोटं आणि त्यांची पेर वापरून ६० पर्यंत मोजायची होती. म्हणजे उजव्या हाताच्या अंगठ्याने उरलेल्या ४ बोटांची पेर मोजायची. एकदा मोजली कि झाले १२. हा होता एक डझन. आणि एकदा एक डझन झालेलं कि मग डाव्या हाताचे एक बोट मुडपायचे. असा करता करता पाची बोट मुडपली कि झाले ६०.

मग ठरले दिवसाचे करायचे १२ भाग. त्याला म्हणायचे तास. पण तासाचे ६० च भाग का करायचे. म्हणजे ६० ऐवजी १२ का नाही केले किंवा मिनिटाचे अजून ६० हिस्से का केले हे कसा आलं? मधली एककं काळाच्या ओघात निरुपयोगी ठरून नाहीशी झाली. अनेक पद्धतीमधल्या काही पद्धती प्रमाण मानल्या जातात आणि कायम राहतात. जसा किलोग्रॅम चा वापर वाढला आधोली आणि पायली औषधाला पण दिसत नाही. तसाच हे आहे.

पुढे अनेक संशोधकांनी कालमापनाच्या पद्धतींचे प्रमाणीकरण केले. काही दोष होते ते दूर केले. अनंत काळापर्यंत वापरता येतील अश्या पद्धती बनवल्या गेल्या. म्हणजे जसे माया लोकांचे कॅलेन्डर २०१२ ला संपत होते म्हणून २०१२ नंतर प्रलय होणार आहे असा प्रकार होऊ नये म्हणून कालमापन पद्धतींमध्ये सुधारणा केली गेली. बहुतेक लोकांनी आधीच गणित करून आपली पद्धत खूप मोठ्या काळाच्या गणितासाठी योग्य आहे याची खात्री करून घेतली. कालमापन साठी निरनिराळी यंत्रे विकसित करण्यात आली.

जगभरात अशा प्रकारे कालमापनाच्या अनेक पद्धती विकसित झाल्या. ह्या सर्व पद्धती उत्क्रांत होत राहिल्या. वेगवेगळ्या काळातील वेगवेगळ्या प्रदेशातील व्यक्तींनी यात भर घातली. हिणकस जाऊन जे काही उपयुक्त होते ते राहिले. ह्याचीच परिणीती म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडर. संगणकाच्या युगात ग्रेगोरियन कॅलेंडर ला तरी काही पर्याय नाही म्हणून सर्वत्र तीच पद्दत प्रमाण मानली जात आहे.

भूतकाळातील पद्धती मागे पडण्यामागे अनेक कारणे असतात. तो एक मानवी समाजाचा निर्णय असतो. काही एक विचार प्रवर्तक त्या निर्णयाला दिशा देतात. पण हि दिशा केंव्हाही प्रवाहाच्या फार विरुद्ध नसते. जेंव्हा एखादी प्राचीन पद्धत फार उत्तम आहे अशी चर्चा कानावर पडते तेंव्हा त्यामागे एक खंत जाणवते. एखाद्या प्रदेशातील भूतकाळातील व्यक्तींचे मानव संस्कृतीच्या भरभराटीमधील योगदान फार मोठे असते. पण वर्तमानात कुठे तरी तश्या प्रकारचे योगदान होत नसल्याने एक खंत जाणवत राहते. वास्तविक पाहता हि खंत हे ज्ञानजिज्ञासा जिवंत असण्याचे लक्षण आहे. ग्रीस, इजिप्त किंवा भारताने एके काळी फार मोठे योगदान दिले. आजही त्याप्रकारचे योगदान येत आहे. मानवी समाजाने उत्तमाचा नेहमी आदर केला आहे. मात्र भूतकाळातील योगदानाच्या उदो उदो पेक्षा वर्तमान आणि भविष्यकाळातील समस्यांच्या उत्तरांकरता नेहमीच जास्त आदर मिळत आलाय.

एक व्यक्ती म्हणून ह्या सर्व प्रवासाकडे पाहताना असा जाणवते कि आपण फारतर वेळेची किंमत समजावून घेऊ शकतो आणि आयुष्यातील मर्यादित वेळेचा उपयोग कसा करायचा ठरवू शकतो. माणसाच्या हातात लहानपण, दैनंदिन काम आणि झोप सोडली तर फार फार तर ५० - ६० हजार तास हातातअसतात. प्रत्येकाने हा वेळ कसा घालवायचं ते ठरवावे. तुम्हाला ज्या गोष्टी आनंद देतात त्या करणे केंव्हाही चांगले. आपल्यातील उत्तमाचा शोध घेता आला आणि काही एक नवीन आनंदाचे कारण सापडले तर तो वेळ सार्थकी लागला असा समजण्यास काही हरकत नसावी.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

थोडासा विस्कळित वाटला लेख. पण मध्यवर्ती कल्पना आणि तुमचे विचार भावले. अजून विस्ताराने लिहिणे जमत असेल तर नक्की लिहा.

धन्यवाद नानाकळा. मनात जसे विचार आहे तसे लिहायचा प्रयत्न केलाय. तुम्ही गोड मानून घेतला त्याबद्दल धन्यवाद. अधिक विस्ताराने लिहिल्यावर वाढणारा किचकटपणा टाळण्यासाठी संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय.

मला हा संक्षिप्त आढावा आवडला. अधिक खोलात शिरून लिहिला असतात तर रटाळ होण्याची शक्यता होती.

Short enough to keep the interest and long enough to cover the topic