महिला 'दिन' की 'दीन' ?

Submitted by अँड. हरिदास on 7 March, 2018 - 22:54

women111.jpg
महिला 'दिन' की 'दीन' ?

आज नेहमीप्रमाणे महिला दिन साजरा होत आहे. या निमित्ताने समाजातले महिलांचे स्थान आणि त्यांची अवस्था यावर चर्चा करण्यात येत आहे.. तशी ती नेहमी सुरूच असते. परंतु महिलादिनाच्या औचित्याने स्त्री शक्तीचा साक्षात्कार प्रकर्षाने होतो. तिच्या कामाची दखल घेतली जाते. आजची महिला किती सक्षम झाली यावर मोठा उहापोह केला जातो. पूर्वी स्त्रीचे कार्यक्षेत्र हे ‘चूल आणि मूल’ इतपत मर्यादित होते. परंतु भारतात सुधारणावादी विचारसरणींनी बाळसं धरल्यानंतर स्त्रीलाही स्वतंत्रपणे, निर्भयतेने जगता आले पाहिजे. यासाठी अनेक समाजसुधारकांनी जीवाचे रान केले. त्यांच्या मेहनतीमुळे आज स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहे. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभले आहेत. आणि त्यांना अधिक चमक तिने आपल्या कर्तृत्वाने दिली आहे. आपल्या बुद्धीला, आत्मसन्मानाला तिने नवीन दिशा दिली आहे. आजच्या जगात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्री नाही. प्रत्येक क्षेत्रात ती पुरुषांच्या पुढे आहे. एव्हडेच नाही तर धर्माच्या आणि परंपरेच्या बंधनातूनही स्त्री मुक्त होऊ लागली आहे. धर्माच्या नावावर मिळणाऱ्या धमक्या ती आता नुसती पचवू लागली नाही तर परंपरेची पुनर्माडणी करायलाही ती आता शिकली आहे. असं सगळं काही असताना समाजात स्त्रीकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टीकोन आजही निकोप नाही. भोवताली घडणाऱ्या घटनां बघितल्या तर स्त्रीसामर्थ्याचा हा गोडवा म्हणजे नाण्याची एक बाजू तर नाही ना? असा प्रश्न पडतो. कारण, आजच्या प्रगत महिलांच्या जीवनातली 'महिला' म्हणून होत असणारी घुसमट वाढताना दिसत आहे. आजही घराघरात स्त्री चा छळ केला जातो. हुंड्यासाठी तिला जाळून मारले जाते. महिला मुली रस्त्यावर सुरक्षित फिरू शकत नाही. स्त्रीला केवळ उपभोगाची वस्तू समजणारे महाभागही आपल्या समाजात वावरत आहेत. घरात, कामाच्या ठिकाणी महिलांना अनेक अत्याचारांना तोंड द्यावे लागते. बलात्कार, भ्रूणहत्याच्या घटना आणि अन्याय, अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांची संख्या बघितली तर स्त्री-मुक्ती आणि सक्षमीकरणाचा केवळ एक आभास तर निर्माण करण्यात आला नाही ना? अशी शंका आल्यावाचून राहत नाही.

ज्या क्षेत्रात पुरूषी मानसिकता कायम वलयात राहिली, अशा कुस्तीसारख्या रांगड्या खेळात ऑलम्पिक पदक जिंकणाऱ्या फोगाट भगिनींचा भीमपराक्रम दाखविणारा "दंगल" नावाचा चित्रपट मध्यंतरी प्रदर्शित झाला..लहान वयातच मुलांसोबत कुस्ती खेळत त्यांना अस्मान दाखविणाऱ्या गीता-बबिता या युथ आयकॉन म्हणून समोर आल्या. या चित्रपटातील 'म्हारी छोरीया छोरोसे कम है के?’ .. हा अमीर खानचा संवाद आजच्या मुलींच्या बदलत्या परिस्थितीचे नेमके चित्र उभे करतो. आज प्रत्येक क्षेत्रात मुलींनी बाजी मारली आहे. कोणत्याही परीक्षेचा निकाल तपासून पहा त्यात मुलींचा वरचस्मा ठळकपणे अधोरेखित होतो. नुसत्याच राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षातच नाही तर यूपीएससी एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षामधूनही मुलींनी आपले यश अधोरेखित केले आहे. मुलींमध्ये प्रचंड प्रतिभा आणि कार्यशक्ती असल्याचे वारंवार समोर येत असताना समाजाचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही बदलला नसल्याचे दुर्दैवाने अनेक घटनांमधून सातत्त्याने समोर येत राहते. गेल्या वर्षभरात अवैध गर्भपात आणि स्त्रीभ्रूण हत्येच्या विविध घटना समोर आल्या आहेत. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान म्हणून पावन झालेल्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात अवैध गर्भातच केंद्र सुरु असल्याचे उघड झाले होते. अर्थात, या घटनांचा आणि महिला दिनाचा परस्परांशी काहीही संबंध नाही. परंतु तरीही या वृत्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण स्त्री म्हणजे जननी; साक्षात देवीचे रूप, अशी शिकवण असणार्या आपल्या समाजाची मानसिकता अजूनही कर्मदरिद्रीच असल्याचे या घटना सिद्ध करतात. स्त्रीला कस्पटासमान वागणूक देऊन तिचा जगण्याचा हक्कच हिरावून घेण्याचा क्रूरपणा अजूनही आपल्या समाजातून गेला नाही. एकीकडे सावित्रीच्या लेकी सातासमुद्रापार आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवीत असताना 'वंशाचा दिवा म्हणजे मुलगा' या खूळचट धारणेपोटी हा संबंध स्त्रीवंशचं मुळापासून संपवायला निघालेल्या या समाजाला काय म्हणावे? आधुनिकतेच्या गप्पा मारणार्या या समाजात राजरोसपणे माणुसकीचा मुडदा पाडण्याचे धंदे करण्यात येत असतील तर हा समाज प्रगत झाला असे म्हणायचे तरी कसे ? अवैध गर्भपात असो कि गर्भ लिंग निदान.. दोन्हीही कायद्याने गंभीर गुन्हे...मात्र तरीही असे प्रकार केले जातात, हे वास्तव आहे. मुळात आजही मुलीचा जन्म अनेकांना नकोसा वाटतो. याला जितकी पुरुषप्रधान विचारसरणी कारणीभूत आहे तितकीच महिलांची खुळचट विचारसरणीही जबाबदार आहे. पहिली मुलगी झाली तर तिच्या जन्माचं मोठं स्वागत केलं जात मात्र दुसरी मुलगी नको म्हणून चोरून तपासण्या करणारेही या समाजात कमी नाही. हि वास्तविकता आहे. आज मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. 1000 मुलांमागे 700 ते 800 मुली हे प्रमाण आपल्या समाजाला भूषणावह आहे का? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. स्त्री-भ्रूण हत्येची प्रकरणे पाहिली तर आपल्या लक्षात येईल की, स्त्री-भ्रूण हत्या समाजाच्या सर्वच स्तरांवर होतेय. त्यामुळे आता या प्रश्नाच्या मुळाशी जायला हवं. वरवरच्या गोष्टी करण्यात फार काही हासील नाही. त्यामुळे हे सामाजिक व्यंग काढून टाकण्यासाठी ठोस कृती करायला हवी.

प्रत्येक समाजातील महिलेचा दर्जा हा त्या समाजाच्या प्रगतीचा टप्पा दर्शवितो. भारतीय संस्कृतीचा विचार करता इतर कोणत्याही संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृतीने प्रत्येक युगात स्त्रीला महतवाचे स्थान दिलेले आढळून येईल. पूर्वीपासून आतापर्यंत स्त्रीचे महत्व व स्थान लक्षात घेऊनच सर्वात आधी आपल्या मातेला नमस्कार करण्याची आपली परंपरा आणि संस्कृती आहे. तिचे स्थान उच्च आहे, म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये ‘मातृदेवो भव’ असे म्हटले आहे. पुरातन काळात अनेक रणरागिणींनी आपल्या पराक्रमानी इतिहासाची पाने रंगवली दिसून येतात. आजची स्त्रीही पुरुषांच्या तुलनेत कोठेही मागे नाही. प्रचंड आत्मविश्र्वास, चिकाटी, जिद्द आणि बुद्धिमत्तेच्या जीवावर स्त्रीने विविध क्षेत्रांमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, मात्र तरीही समाजाची पुरुषी मानसिकता अजून बदलायला तयार नाही. परंपरा आणि रूढींच्या जाचातून तिची सुटका अद्यापही झालेली नाही. एकीकडे मुलीचा जन्म नको, अशी मानसिकता समाजात असताना स्त्रीकडे केवळ एक उपभोगवस्तू म्हणून पाहण्याकडेही कल वाढत आहे. राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार दिवसाला पाच ते सात महिलांवर देशात बलात्कार होतात. हे सदृढ समाजाचे लक्षण कसे मानावे? एकतर्फी प्रेमातून आलेल्या नैराश्येतून अनेक तरुण मुलींवर हल्ले होतात, त्यांचा चेहरा विद्रुप केला जातो. हे रानटीपणाचे लक्षण नव्हे का? त्यामुळे प्रगतीच्या आणि आधुनिकतेच्या गप्पा मारत असताना आपण नेमके कुठे चाललो आहोत याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण जगभर स्त्री सामर्थ्याचा सोहळा साजरा केला जातोय.. हा करत असताना आपल्या समाजातील महिला 'दीन' तर झाली नाही ना याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीन म्हणायचे झाल्यास महिला दीन नाही समाज दीन म्हणायला हवे.
एखाद्या समाजात स्त्रियांना मिळणारया स्थानावर ठरते की तो समाज किती प्रगत आहे.
जर स्त्रियांना कुठलाही अन्याय, अत्याचार सहन करावा लागत असेल वा त्यांच्या वाट्याला कुठलीही असमानता येत असेल तर त्याची जबाबदारी स्त्री-पुरुष दोघांनी मिळून बनलेल्या समाजाची आहे.

आज सकाळीच मी एक बॉम्ब टाकलाय.
आमचा व्हॉटसपवर भलामोठा फॅमिलीग्रूप आहे. सकाळी उठल्यावर पाहिले तर त्यात काही महिलादिनाच्या शुभेच्छांचे मेसेज पडलेले. माझ्या एका मोठ्या चुलतभावाने तिथे फॅमिलीतील एकूण एक महिलांचे नाव घेत त्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मला खुदकन हसायला आहे. कारण ती व्यक्ती डोक्यात पुरुषी अहंकार भिनलेली आहे. मध्येच काही वाद होतात, त्याचे टाळके सणकते, तेव्हा त्याच्या वागण्याबोलण्यातून हे जाणवते. त्याची सक्खी बहिण, बायको आणि आईबद्दल नेहमी वाईट वाटते. चारचौघात अक्कल काढतो. अपमान करतो. पण ईतरवेळी पक्का गोडबोले. याची जास्त चीड येते.
मी विचार केला आज चांगली संधी आहे. तसेही एखाद दिवशी त्याला सुनवायचेच होते. फक्त वादाचा आणखी भडका नको म्हणून टाळायचो. पण मग आज त्याचा मेसेज कोट करत रिप्लाय दिलाय...
"दादा आजच्या दिवसापुरतेच नको रे.. हे प्रेम आणि आदर रोजच्या वागण्यातही दिसू दे Happy "

बघूया काय बोलतो..
उलट उत्तर दिले तर आज ग्रूपवर खराखुरा महिलादिन साजरा करूनच टाकतो.

दीन म्हणायचे झाल्यास महिला दीन नाही समाज दीन म्हणायला हवे.
>>हे मात्र खरं आहे. जे लोक घरी महिलांना सन्मानाने वागणूक देत नाहीत ते आजच्या महिला दिनाच्या कार्यक्रमात मिरवताना दिसून येतात. मागच्या वर्षी आमच्या कॉलेज मध्ये जे प्रमुख पाहुणे महिला दिनावर बोलण्यासाठी आले होते त्यांच्यावर नंतर त्यांच्याच सुनेने कौटुंबिक अत्याचाराची केस दाखल केल्याचे ऐकले होते. घरात काही आणि बाहेर काही वागणारे लोक आधी बदलले पाहिजे.

सत्य मांडणारा लेख पण महिला दिन साजरा करणे आणी त्यादिवशी महिलांच्या दुबळेपणावर चर्चा करणे म्हणजे महिला अजूनही असक्षम आहेत असेच दाखविणे आहे महिला दिनाप्रमाणे एकदा पुरुष दिनही साजरा करायला हवा

लेख आणि विचार आवडलेत...

<<राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार दिवसाला पाच ते सात महिलांवर देशात बलात्कार होतात. हे सदृढ समाजाचे लक्षण कसे मानावे?>>
------- काही तरी चुकत असावे, हा आकडा खुप मोठा आहे.

काही तरी चुकत असावे, हा आकडा खुप मोठा आहे.<<
>> एक दिवसाला म्हटलंय ना मग बरोबर असेल कदाचित करण अवहवाल फक्त नोंद झालेल्या प्रकारवरूनच बनतात

<<राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार दिवसाला पाच ते सात महिलांवर देशात बलात्कार होतात. हे सदृढ समाजाचे लक्षण कसे मानावे?>>
-------- २०१६ चे आकडे येथे बघायला मिळतील. बलात्काराच्या ३८,९४७ (पान क्र १३८), विनय भन्गाच्या ८४,७६४६ घटनान्ची नोन्द झाली आहे (पान क्र १४०). सर्वच प्रकरणान्ची नोन्द होत नाही, केल्या जात नाही. फार कमी घटनान्ची नोन्द होते, त्या पैकी फार फार कमी घटनात अपराध्याला शिक्षा मिळते. वरिल आकड्यान्ना किमान २० ने गुणायचे (ठोबळ आकडा ५ % घटनान्चीच नोन्द होते असे म्हणतात).

http://ncrb.gov.in/StatPublications/CII/CII2016/pdfs/NEWPDFs/Crime%20in%...