भिमाशंकर २०१८-०२-२७_२८

Submitted by Srd on 3 March, 2018 - 02:49

शिवरात्रीला थंडी संपते आणि पावसाळ्यापर्यंत डोंगर भटकंती थांबवता येत नाही अशावेळी काही मोजक्या जागाच उरतात. माथेरान,ढाकगाव,राजमाची आणि भिमाशंकर. १३ तारखेची महाशिवरात्र सरली आणि २७-२८ला भिमाशंकर जाण्याचं ठरलं. जरी दरवर्ष दोनवर्षास इकडे येणे झाले तरी प्रत्येकवेळी हुरहुर तेवढीच असते. नेहमी नेरळला आठ साडेआठला पोहोचणाय्रा लोकलनेच जातो पण यावेळी पावणेसातला जाणारी लोकल ठरवली. म्हणजे वर थोडा अधिक वेळ मिळेल हा हिशोब. नेरळ स्टेशनपासून कशेळेकडे जाणाय्रा नेहमीच्या सहा सिटर ओटोरिक्षा आज नव्हत्या. वॅन/टॅक्सीज होत्या. ज्याचा नंबर होता त्यात बसलो. तीन सिट्सवर चारजणांना बसवतात म्हणून अगोदरच आमच्या तिघांत चार धरायला सांगातल्या. "दहा शिटा आल्यावर सोडतो" - ड्राइवर. पावणेसाताचे साडेसात झाले तरी नऊ शिटाच झाल्या. पण चालक एकदम धीरगंभीरपणे दात कोरत गप्पा मारत होता. शेवटी आठला धाव्वी शिट आली. गाडी सुटली. आम्ही एक शिटचे जादा पैसे देणारच होतो तर आणखी एकाचे द्यायला हवे होते हा विचार गाडीतल्या खिडकीतून गार वारा खाताना आला. एकूण पहाटे चारला उठण्याचा वेळ नेरळ स्थानकी सत्कारणी लागला. टॅक्सी सवाआठला कशेळेला पोहोचलीही बारा मिनिटांत. उतरतानाच ठरवून टाकले की पुढच्या कशेळे ते खांडस जाणाय्रा रिक्षा/ टॅक्सीला अधिकचे पैसे द्यायचे पण इथे थांबायचे नाही.

कशेळे हे मुरबाड - कर्जत रोडवर जंक्शन. नेरळकडे जाणारा, जामरुग आणि खांडस - नांदगावकडे जाणारे असे आणखी तीन धरून पाच रस्ते आहेत. गुरुवारचा इथे शेतमाल बाजार भरतो. ( तसे आता या बाजारात पहिल्यासारखे स्वस्त काहीच मिळत नाही म्हणा) नेहमी गुरुवार -शुक्रवार अथवा बुधवार - गुरुवार असे दिवस ठरवतो कारण गुरुवारी वाहने भरपूर असतात. खांडसकडे जाणाय्रा रिक्षा नाक्याकडे गेलो तर तिकडे नेहमीच्या थ्रीसिटर नव्हत्याच. पंधरासोळा टॅक्सी/सुमो/ओम्नी उभ्या. गप्पा मारत बसणाय्रा ड्राइवरांशिवाय कोणीच नव्हते. नंबरवाल्या टॅक्सीत सामान टाकले, आमच्या नेरळच्या प्रवासातली एक बाईच पुन्हा बसलेली होती.
साडेआठ झालेले.
"कधी भरतात शिटा?" हे आम्ही निर्ढावलेल्या तयारीने चक्रधरास विचारते झालो कारण पूर्ण
टॅक्सीचेच २५० देण्याची मनोमन तयारी ठेवलेली होती. आता यावेळेस तिघे होते परंतू एकट्या प्रवाशास हौसेचे ट्रेकिंग म्हटल्यास २५० भारीच. मग मी थेट एसटीनेच २३०रुपयांत पाय न हालवता जाईन हा विचार केला.
" डाइरेक्ट जायचं का शिटा भरेपर्यंत थांबायचं?"
"किती वेळ लागेल भरायला?"
"दहा वाजतील."
आता हे उत्तर अगदी थंडपणे ऐकून घेतले.
"अगोदर काही गाड्या भरून गेल्या का?"
" नाही,माझीच पहिली गाडी."
"डाइरेक्टचे किती?"
"मला दोनशे द्या, लगेच निघू."
"आम्ही येतोच चहा वडा खाऊन, मग लगेच निघू."
"होहो, तेवढ्यात कुणी आल्या शिटा तर तुमचेच पैसे कमी होतील. या चा घेऊन."
बाजुच्याच टपरीवर समोसे वडे आणि भजी चापली. आल्यावर गाडीला त्याने चाबूक मारला. गाडी 'भरून' लगेच सुटल्याचा आनंद आमच्यापेक्षा ड्राइवरलाच अधिक झालेला हे सिटमागच्या दोन लाउडस्पिकरमधून गाणं धाणधाण आदळू लागल्याने जाणवले.
"पुर्वी थ्री सिटर रिक्षा या रुटला होत्या त्यात {५} शिटा लगेच भरायच्या पण आता या वॅन/ट्याक्सी घेतल्यात सर्वांनी. दहा शिटा लवकर भरत नाहीत. "
"गाड्यापण फार झाल्यात. आम्ही सर्व खांडस/नांदगावचे. इकडेच धंधा करतो. मी पहाटे तीनला ही गाडी नंबरला लावली ती आता नउला निघतेय."
गार वारा अधिकच गार वाटायला लागला. खांडस नाक्याला आल्यावर उतरताना " अजून शंभर रु दिलेत तर पार घाटाजवळ सोडतो."
"नको."
"मग बसा, थोडं पुढे माझ्या घराजवळ पंचायत विहिरीजवळ सोडतो."
घरापाशी पोहोचलो.
" आता ही गाडी जाणार नाही नंबराला, दुसरी लावली आहे. चा घेऊनच जा."
नाही म्हणवेना.

पडवीत बसून चा घेतला आणि गणपती घाटाकडे जाणारा रस्ता पकडला. अजून अडीच किमि जायचे होते आणि भिमाशंकरचा आडवा पर्वत एक करंगळी उंचावून ( पदरगडाचे टोक) बोलवत होता. अगदी घाटाच्या चढाला लागलो तेव्हा घड्याळाचे काटे साडेनऊ दाखवत होते. नेहमी दहा मिनिटांत शेअर रिक्षा सुटण्याचा अनुभव घेतला होता तरी यावेळी चाकाच्या गाडीची परीक्षा नापास झालो. वाढते ऊन पाहून आता पायगाडीचीही परीक्षा अवघड आहे हे लक्षात येण्यास वेळ लागला नाही.

एकमेकाच्या चालीचा अंदाज घेत चढू लागलो. गणपतीचं देऊळ गाठून थोडं थांबलो. इथून मात्र पुढच्या पदरगडास वळसा घालून झाडीत घुसेपर्यंत ऊन लागणार होते. छत्री आणलीच होती. टोपीपेक्षा बरी. पदरगडाच्या खालच्या डाविकडच्या विहिरीत भरपूर पाणी दिसले. याचे आश्चर्य वाटले. नंतरच्या झाडीत दिसणारे पक्षी फारसे दिसले नाहीत. पुढे शिडीघाटाकडून येणारी वाट मिळते तिथे ताक/चहा विकणाय्रांच्या झोपड्या असतात त्यात पावसाळ्यानंतर कुणी नसते. मग सुरू झाला जरा अवघड चढ. तो पार करेपर्यंत दीड वाजला कारण ऊन फारच लागत होतं. मग वर माथा गाठायला तीन झाले. एक कुंपण तिथल्या तळ्याकाठी/ सभोवती बांधून काही विकास करणार आहेत म्हणे.

मला अगोदर वाटले की वनखाते ही वाटच बंद करणार काय?
कुंपण

अंजनी फुले

कुंपणाभोवती वळसा घालून मैदानातून मुख्य पायय्रांपाशी आलो. हुश्श. पोहोचलो एकदा. प्रथम एक चहा मारून भराभर फोन करून टाकले. एकदा देवळाजवळ खाली गेलो की मोबाइल रेंज येण्याची ग्यारंटी नसते. सर्वात प्रथम आसरा शोधणे काम आले. वरती मुख्य रस्ता आणि बस स्टँड, पार्किंगपाशी गाववाल्यांनी काही लॅाज बांधली आहेत. त्यांचा अनुभव फारसा चांगला नाही. पाण्याची बोंबच. वरती बोअरला पाणी येतच नाही. कमळजा देवळामागे एक सुलभ हल्लीच बांधले आहे पण पाण्याअभावी कुलुप घातलेले. महाशिवरात्रीला ट्यांकरने आणले असेल पाणी. एसटी डेपोच्या पुढे एक किमिवर एमटिडिसीचे रिझॅाट आहे परंतू ते चालू असण्याचा भरवसा नसतो. सरळ पायय्रा उतरून देवळाकडे निघालो. दोन्ही बाजुंनी चहा वडाच्या टपय्रा होत्या त्या आता नाहीत. फक्त माळा,हार,फुले विकणारे आणि मोजकेच पेढेवाले आहेत. पायय्रांचा वरचा निम्मा भाग खेड तालुक्यात आणि। खालचा देवळासहचा भाग आंबेगाव तालुक्यात येतो. वनखात्याने कारवाई केलेली मागे त्यात वरचे चांगले क्षितिज हॅाटेलही उडाले. सर्जाही गेला एसटी डेपोत. आंबट फळे एक बाई विकत होती. ती घेतली.

आमटी फळे. ही तिथे विकायला होती. खूप आंबट पण चविष्ट. याचा वेल असतो आणि खूप लागतात असे त्या बाईने सांगितले. लगेच एक वाटा उचलला. गावरान मेव्याचे गिह्राइक कमी होत चालले आहे.

देवळापाशी उंची पाहिली -
देवळाजवळची उंची जिपिएस

देऊळ वरच्या रस्त्यापासून खोलात आहे. असं का याचं उत्तर लगेच मिळतं. इथे पाणी भरपूर आहे. पिण्याचे आणि वापरण्याचे वेगवेगळे नळ ठेवले आहेत. आज फारशी गर्दी नव्हती. देवळात जाण्याअगोदर "खोली"ची व्यवस्था लावणे अगत्याचे होते. साडेतीन वाजलेले. इथल्या राममंदिराच्या आवारात खोल्या आहेत. जरा बरी स्वच्छ व्यवस्था, टॅाइलेट्स(पाण्यासह) ,चार बेडस दाटीवाटीने,वेंटिलेशन नाही, अगदी मंदिराला चिकटून आहेत. त्याने खोलीचे आठशे रु सांगितले तिघांसाठी. एका ट्रेकरसाठीमात्र परवडण्यासारखं नाही. मागच्या बाजुस एक धर्मशाळा आहे, तिथे मी नेहमी राहतो शंभर रु देऊन तिथे रिकामी आहे का आणि आवडते का पाहा बोललो.
राममंदिराच्या मागची धर्मशाळा

एकाला रुम किंवा तिघांचे तिनशे रु. इकडे खोलीचे बार्गेन करण्याअगोदर १)पाणी आणि टॅाइलेट आहे का, २)बेडमध्ये ढेकुण फ्री मिळू शकतात ते पाहिले पाहिजे. तिर्थस्थानाच्या धर्मशाळांचे फोन नंबर असले तरी बुकिंग वगैरे नसते. गेल्यावर रिकामी असल्यास देतात. काही ठिकाणी एकट्या माणसास खोली न देण्याचा नियम असतो. गेटपाशी पोहोचलो. गेटाला कु लु प. शेजारी विचारलं, त्यांनी सांगितलं फोन लावा. फोन लागेना (बिएसएनेल). त्यांचं दुकान आहे तिथे विचारा. तिकडे गेलो. त्यांनी लगेच गेटची चावी दिली. हुश्श. खोलीत बेड वगैरे नाही पण म्याट असते. भरपूर जागा आणि काम होतं. टॅाइलेट आहेच. हातपाय धुवून प्रथम आणलेले डबे उघडले. अर्धा तास ताणून दिली आणि दर्शन. आज दशमीचा चंद्र देवळामागे संध्याकाळी दिसू लागला.

द्वादशीचा चंद्र, भिमाशंकर

रात्री छान गारवा झाला,मस्त झोप काढून चारलाच उठलो॥ देऊळ साडेचारलाच उघडतं. गार पाण्याची आंघोळ आणि सातला कोपय्रावर चा.
आठला बॅगा आवरून वर रस्त्याकडेच्या एका हॅाटेलात नाश्ता केला. एक फेरी एसटी डेपोकडे टाकली. अगदी छान कॅान्क्रीट टाकलं आहे, बसायला व्यवस्था आहे. सुलभ टॅाइलेट आहे. पार्किंगही इथेच आहे॥ डेपोचे रूप खरोखरच पालटलं आहे.

एसटी डेपोतले वेळापत्रक

शिवाजीनगर स्टँडवरून बस सुटतात. बसेसची संख्या पाहता एका दिवसात आरामात पाहता येईल. वाचलेला / दमलेले नसल्याचा वेळ हा साक्षी विनायक किंवा हनुमानतळे जाण्यासाठी उपयोगात आणता येईल.

डोलीतून जाणारी भक्त.

आता मात्र निघायला हवे होते. नऊ झालेले. खाली लवकर निघावेसे वाटत नव्हते परंतू शेअर टॅक्सीचा कालचा अनुभव गाठीशी होता. त्यात बराच वेळ जाणार किंवा द्या पैसे डाइरेक्टचे. काल वरती येताना कॅम्रा बाहेर काढलाच नव्हता तो काढला आणि व्हिडिओ,फोटो काढले.

पक्षांचे आवाजव्हिडिओ३,फाइल साइज ५एमबी

रमतगमत खाली खांडस गावात तीनला पोहोचलो. टॅक्सीच्या शिटा भरून चारवाजता कशेळे. इथे मात्र घाईघाइत चा घेतला कारण रिक्षा लगेच सुटलीच. वेळ वाया न जाता मुंबई लोकल मिळाली. एक उन्हाळी ट्रेक पुन्हा मे महिन्यात करायचा हे ठरवून टाकले.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त वर्णन लिहिलेत हो. मी अजून कधीच भीमाशंकरला गेले नाहीय.

ती आमटी फळे म्हणजे नेरला/नेरडा. याच्या वेली असतात, पानांची मागची बाजू चांदीसारखी चमकते लांबून. माझ्या गावी चिक्कार आहेत, मी वेलीवरून थेट तोंडात टाकते. फोटोतली कच्ची आहेत म्हणून आंबट. पिकली की केशरी होतात व खूप गोड लागतात.

प्रवास वर्णन आवडले. रिक्षाच्या किंमती, प्रवासाला लागणारा वेळ हे ही सांगितल्याने ज्यांना कोणाला खांडस मार्गे भिमाशंकरला जायचेय, त्यांना उपयोगी पडेल.
शेकरु दिसली होती का?

मागच्या वर्षी मेमध्ये गेलो तेव्हा शेकरू बसडेपोच्या पुढच्या सिद्धगडकडच्या झाडीत होती. खांडस वाट - देऊळ भागात नव्हती. यावेळी ती कुठेच नव्हती,घरेसुद्धा नव्हती.
हल्ली माथेरानला फार वाढली आहेत.

शेकरू सिद्धगड आहुपे या भागात हि भरपूर आहेत पण गर्दिच्या ठिकाणी नाहिच दिसत.