होस्टेल school ची माहिती हवी आहे

Submitted by राज1 on 22 February, 2018 - 00:44

पुण्या जवळच्या होस्टेल school ची माहिती हवी आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नमस्कार.
मी सध्या माबोवर नियमित नसले तरी हा धागा दिसल्यावर तुमचा जुना धागा होता मुलाबद्दल असं वाटलं आणि शोधून वाचला. आणि हा धागा त्याच प्रॉब्लेमचा भाग -२ असावा असा माझा समज झाला आहे. त्याअनुषंगाने मी हा प्रतिसाद लिहिते आहे.
मी स्पष्ट लिहितेय, गैरसमज करून घेऊ नका, पण त्या धाग्यावरून मुलाला थायरॉइड, डिस्लेक्सिया आणि एडीएचडी असावं असं डॉक म्हणले आहेत अशी माहिती कळली. मला कळतंय तुम्हाला पालक म्हणून त्याला संभाळणं हे प्रचंड आव्हानात्मक होत असणार. पण प्लीज हॉस्टेलचा पर्याय शक्य असेल तर नका अंमलात आणू. त्याला आधीच वैद्यकीय प्रॉब्लेम्स आहेत, ते हॉस्टेलमधे कोण संभाळेल? अशा मुलांना सतत आधाराचं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, ते हॉस्टेलमधे मिळेल याबाबत साशंकताच आहे.
हे सगळं मला बाहेर राहून सांगणं खूप सोपं आहे हे मलाही कळतं आहे. पण अगदीच राहावलं नाही म्हणून इथे लिहिलं. आवडलं नसेल तर दुर्लक्ष करा.
तुम्हाला आणि त्या लेकराला शुभेच्छा!

वरदा, हेच माझ्याही मनात आलेलं पण लिहलं नाही.
राजेंद्र, जर मुलासाठीच हॉस्टेल बघत असाल तर वरदा म्हण्तेय तो ही विचार करा.

ते हॉस्टेलमधे मिळेल याबाबत साशंकताच आहे.>>> वरदांशी अंशतः सहमत.तरीही पालक म्हणून जो काही त्रास अशाबाबतीत होतो,तो सहन करण्यापलीकडे असतो.(माफ करा,पण तुम्ही तुमच्या मुलाबाबत ही माहिती विचरीत आहात असे गृहित धरून बोलतेय)

पुण्याजवळ नित्यानंद म्हणून रिहॅबिलिटेशन सेंटर आहे.हे चांगले आहे असे रिव्हू आहे.तिथल्या किंवा अजून काही सेंटरमधील डॉ.शी बोलून / चौकशी करता येईल.३-४ दिवसात पुण्याजवळील सेंटर्सची नावे देऊ शकेन.

वरदा, स्मिता, देवकी प्रतिसादा बद्दल धन्यवाद
मुलाचा हट्टीपणा व आक्रस्ताळेपणा डॉक्टरांची treatment घेऊनही कमी होत नव्हता. होस्टेल मध्ये त्याला शिस्त लागेल असे वाटले म्हणून होस्टेल साठी विचारले.
वरदा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे होस्टेल मध्ये त्याच्या वैद्यकीय प्रॉब्लेम कडे कोणी लक्ष देणार नाही हे लक्षात आले नाही.
त्याचा हट्टीपणा, आक्रस्ताळेपणा व सारखे खा-खा (eating) करण्याच्या सवयी बद्दल कोण सल्ला देईल?
तो हुशार आहे पण अभ्यास करत नाही. परीक्षेत नुस्तेच प्रश्न (question)लिहून पेपर कोरा सोडून देतो. प्रश्नांची उत्तर येत असतात पण लिहित का नाही ते समजत नाही

डॉक्टर काय म्हणतात? अशा अडचणींवरच्या ट्रीटमेन्ट्स दीर्घकालीन असतात, सतत करत राहाव्या लागतात आणि अतिशय हळूहळू बदल होतात एवढंच मला माहित आहे. जर डिस्लेक्सिया असेल तर लिखाण करणे हे त्याच्यासाठी कदाचित अवघड होत असेल
याची पूर्ण चिकित्सा आणि शंका निरसन फक्त आणि फक्त डॉक्टरच करू शकतात. इथे माबो वर आम्ही कितीही हितचिंतक असलो तरी वैद्यकीय तज्ज्ञ नाहीयोत

माझी भाची प्रचंड चंचल होती , तिला मुंबई मध्ये ऑक्युपेशन थेरपी दिली होती.
मी मुंबई चे डीटेल्स देऊ शकतो.
अजूनही तिला अभ्यासात रस नाही (७वि ) पण जिम्नॅस्टिक्स मध्ये प्रगती करत आहे

डॉक्टरांचे निदान काय आहे? एडिएचडी किंवा डिसलेक्सिया सांगिअतला आहे का? तसे काही सांगितले असेल तर मुलाला उलट तुमच्या मदतीची, पेशन्स ची गरज आहे. पालक म्हणून त्याचे प्रॉब्लेम्स तुम्हाला जास्त कळतील. तुम्ही त्याला जास्त समजून घेऊ शकाल. स्पष्ट सांगायचे तर होस्टेल ही एक पळवाट झाली. आपले पाल्य ही आपलीच जबाबदारी आहे शेवटी. " तुम्हे बोर्डिंग स्कूल मे भेज देता हूंं" म्हटले आणि होस्टेल ला पाठवले , तिथे त्याला निकुंब सर भेटले , पोरगा बिनबोभाट सुधारला असे सिनेमात होते, प्रत्यक्ष आयुष्यात होत नसते.. आपल्यालाच पेशन्स वाढवावा लागतो. मार्ग काढावा लागतो.
मुलाला आणि तुम्हाला शुभेच्छा!

राजेंद्र,
वरदा, मैत्रेयी, सायोशी सहमत!
मुलाला थायरॉइडचा त्रास असेल तर त्यामुळे चिडचिड, मूड स्विंग्जचा त्रास होवू शकतो. एडीएचडी असल्यास त्याची लक्षणे यात अजून भर घालणार. डिस्लेक्सिया असेल तर लेखन करणे कठीण जाते. तुमच्या मुलासाठी चांगला डॉक्टर शोधा जो थायरॉइड आणि एडीएचडीच्या ट्रिटमेंटमधे समन्वय साधेल . त्या जोडीला घरातल्यांनी त्याच्यासाठी थोडे ट्रेनिंग घेवून त्याला मदत करणे, या व्याधीसह जगायला शिकवणे करायला हवे.
http://www.mdamumbai.com/ हे महाराष्ट्र डिस्लेक्सिया फाउंडेशनचे संकेतस्थळ
http://morrisfoundation.in/ मॉरीस फाउंडेशन हे लर्निंग डिसऑर्डर या क्षेत्रात काम करते. या दोन्ही ठिकाणी संपर्क करुन मुलासाठी कशा प्रकारची मदत मिळेल ते पहा.
मुलाची वर्तन समस्या आणि अभ्यासाबाबच्या समस्या या त्याच्या व्याधींमुळे अहेत. हे सगळे एकामेकात गुंतलेले असल्याने तुम्हाला खूप पेशन्स ठेवून मुलाला मदत करावी लागेल हे लक्षात घ्या. योग्य औषधे आणि थेरपी यामुळे चांगला बदल नक्की घडून येइल. मात्र हे सातत्याने करावे लागते. व्याधीवर मात करत कसे जगायचे यासाठी मुलाला सतत मार्गदर्शन मिळायला हवे . त्याच्या शाळेकडून याबाबत सहकार्य मिळावे यासाठी देखील तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या मुलाला आणि तुम्हाला खूप शुभेच्छा!

राजेंद , ऑटिझम स्पेक्ट्रम विषयी माहिती आहे का? इथे लेख लिहिलेले आहेत आणि ऑटिझम च्या साईट वर भरपूर माहीती आहे. प्लिज बघाल का? थायरॉइड, डिस्लेक्सिया आणि एडीएचडी या टेस्टींग व्यतिरिक्त ऑटीझम विषयी डॉक शी बोलाल का?
माफ करा मी डॉक्टर नाही. तरीही तुम्हाला हा सल्ला एक कन्सर्निंग पालक म्हणुन कळकळीने देत आहे.
तुम्ही मुलगा बोबडे बोलतोय अजुन हे लिहिलय यावरून मला खुप कन्सर्न वाटला.

पालक म्हणून जो काही त्रास अशाबाबतीत होतो,तो सहन करण्यापलीकडे असतो. >> +१

अशा केसेसमधे नेहमी न/कळत त्रास देणार्यांनाच सहानुभूती असते त्रयस्थ व्यक्तींची आणि समाजाची. केअरगीवरचा आणि फायनांसरचा कोणी विचारच करत नाहीत. एका नॉर्मल व्यक्तीला वैयक्तिक निर्णय म्हणून आयुष्यभर हेच करायचं नसेल तर त्याला पर्याय का निर्माण करत नाहीत मग हेच त्रयस्थ आणि समाज?

अ‍ॅमी, त्रास होतो हे खरे पण ६वी -७वीतले मूल हे पालकांवरच अवलंबून असणार ना? पालकांबद्दल सहानुभूती आहेच पण य केसमधे होस्टेल हे उत्तर नाही. सामान्य होस्टेल या मुलाची गरज पूर्ण करु शकेल का? मुलाला जे वेगळे रिसोर्सेस गरजेचे आहेत ते तिथे उपलब्ध होणार आहेत का? होस्टेलला ठेवून शिस्त लागेल हा सरधोपट विचार झाला. पण मुळात प्रश्न शिस्त हा नाहीये . मुलाची वर्तन समस्या ही त्याच्या आजारामुळे आहे. सतत भूक, चिडचिड, मूड स्विंग्ज हे थायरॉइडच्या आजारात दिसून येते. होस्टेलला ठेवून यावर उपाय कसा होणार?

>> एका नॉर्मल व्यक्तीला वैयक्तिक निर्णय म्हणून आयुष्यभर हेच करायचं नसेल तर त्याला पर्याय का निर्माण करत नाहीत मग हेच त्रयस्थ आणि समाज?>> तुम्हाला काय अपेक्षित आहे? जसे जसे व्याधींबद्दल जागृती होते तसे आधाराचे जाळे तयार होते. पण किती झाले तरी आपल्या मुलासाठी आपणच पहिला आधार असणार ना?

राजेंद्र वर सगळे जण योग्य सल्ला देतच आहेत पण खरं कौतुक वाटलं ते वरदाच्या प्रसंगावधानचं , पाठीमागील पोस्ट लक्षात ठेऊन तिने योग्य वेळी योग्य सल्ला दिला.
वेल डन वरदा .

राजेंद्र, मी काल तुमचा ह्या आधीचा पण ह्याच्याशी रिलेटेड बीबी वाचला. त्यातही तुम्हांला कुणीतरी मी दिलेल्या मायबोलीच्या प्रोफाईलचा पत्ता दिलेला आहे. त्यांना काँटॅक्ट केला नसल्यास करुन बघा.
तसंच तो बीबी चाळल्यावर लक्षात आलं की तुम्ही मुलाला एक दोन डॉक्टर्सकडे नेऊन आणलं आहे पण त्यात सातत्य नाही. एक दोन व्हिजीट्स नंतर तुम्ही जाणं बंद केलंत. तर इतक्या लवकर गिव्हप करु नका. सतत न्याल तरच फरक पडेल, सुधारणा दिसेल आणि जी काय थेरपी डॉक्टर्स सुचवतील त्याचा उपयोग होईल.

वरदा, तुम्ही माझ्या मुलाबद्दल पुर्वी लिहिलेल्या पोस्ट लक्षात ठेवून सल्ला दिला त्या बद्दल धन्यवाद.
मुलाला आम्ही दोन डॉक्टरांकडे नेलं हे आधी लिहिले आहेचं. पहिल्या डॉक्टरांनी त्याला ADHD आहे हे सांगितलं व त्या प्रमाणे TREATMENT चालू केली. मुलाशी थोडावेळ बोलून व आमच्याशी थोडावेळ बोलून ते ADHD साधी औषध देत होते.
मुलाचा आक्रस्ताळेपणा, हट्टीपणा बद्दल त्यांनी कधीच काही सल्ला दिला नाही, विशेष म्हणजे डिस्लेक्सिया बद्दल ते काहीच बोलले नाहीत.
तीन, चार वेळा आम्ही त्यांच्या कडे गेलो, त्यांनी दिलेली औषधे मुलगा नियमित घेत न्हवता व डॉक्टरांनी सांगितले कि त्याचा स्वभाव हट्टी असेल तर तो औषधांनी बारा होणार नाही. मुलगा औषध घेतच न्हवता म्हणून आम्ही त्या डॉक्टरांकडे जाणे बंद केलं.
दुसऱ्या डॉक्टरांनी मुलाला डिस्लेक्सिया असल्याचं सांगितल. ADHD बद्दल ते काहीच बोलले नाहीत. ADHD व डिस्लेक्सिया एकच आहेत किंवा नाही हे आम्हाला माहित नाही. Dyslexia साठी दोन तीन session (टेस्ट) झाल्या, टेस्ट झाल्यावर त्यांनी त्यांच्या रेपोर्ट मध्ये त्याला Remedial Coaching ची गरज असल्याचं सांगितल. Remedial Coaching साठी दुसऱ्या डॉक्टरांकडे जायला सांगितल पण त्यांनी सांगितलेल्या वेळी आम्हाला जायला जमत नसल्याने अजूनतरी आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही. या डॉक्टरांची TREATMENT या तीन ते चार SESSION एव्हढीच होती.
Remedial Coaching घेणारे पुण्यातील दुसरे कोणी डॉक्टर किंवा Councillor असतील तर PLEASE सांगा.
आत्ता आम्हाला दुसर्या कोणत्या डॉक्टरकडे जावे हे समजत नाही.

तुम्हाला चांगला (नीट डायग्नोस आणि आपल्याला सुटेबल असे क्युअर देणारा डॉक्टर नक्की सापडेल.) शुभेच्छा.
बिजल भट्ट म्हणून इंदिरा स्कूल च्या कॉन्सेलर आहेत.त्यांचे पर्सनल कन्सल्टन्सी पण असेल.फेसबुकवर शोधल्यास बियॉन्डॉक नामक कंपनीशी रिलेटेड प्रोफाईल मिळेल.
आमचा नुकताच एका डायरेक्ट स्वतःच्या मुलाशी डायरेक्ट संबंधित नसलेल्या गुंतागुंतीच्या मुद्द्याने यांच्याशी संपर्क आला आणि मुलांसाठी चांगल्या वाटल्या.

राजेन्द्र, एडिएचडीसाठी सातत्याने मुलासोबत , त्याच्या शाळेसोबत आणि डोक्टरांसोबत प्लान बनवून बिहेवियर थेरपी, औषधे , कौन्सेलिंग अशा अनेक लेवल्स वर काम करावे लागते. शक्य तेवढे या विषयावर वाचा, डॉक्टर्स, काउन्सिलर्स शोधा. त्याच्या शाळेशी बोला. तुम्हाला कदाचित मुलासाठी काही वर्षे तुमची लाइफ स्टाइल बदलावी लागेल, त्याला जास्त वेळ द्यावा लागेल. पण एक प्लीज प्लीज लक्षात घ्या, की ही एक डिसॅबिलिटी आहे, अशा स्पेक्ट्रम वर असलेल्या मुलाला त्याची वागणे कन्ट्रोल करता येत नाही पण ते त्याच्या हातात नाही, तो ते मुद्दाम करत नाही आहे. त्याला आता या परिस्थितीत आई वडील नाही समजून घेणार तर कोण घेणार? अशा वेळी त्याला समजून घेऊन सपोर्ट करण्याची गरज आहे. मुलगा हॉस्टेल वर ठेवले की, किंवा शिस्त लावली की सुधारेल हे असले समज डोक्यात घेऊ नका. मदतीची गरज असलेल्या मुलाला आपल्यापासून दूर करणे याच्यासारखे क्रूर दुसरे काही नाही.

मैत्रेयी +१

ADHD बद्दल ते काहीच बोलले नाहीत. ADHD व डिस्लेक्सिया एकच आहेत किंवा नाही हे आम्हाला माहित नाही. >>
राजेंद्र , हे दोन वेगवेगळे आजार आहेत.
ADHD बद्दल सोप्या भाषेत माहिती https://www.nimh.nih.gov/health/publications/attention-deficit-hyperacti...

डिस्लेक्सिया https://www.mayoclinic.org/diseases-conditions/dyslexia/symptoms-causes/...

मी या आधीच्या पोस्टमधे लिंक दिल्यात त्यांच्याशी संपर्क झाला का? सपोर्ट ग्रूप कडून डॉक्टर शोधणे आणि इतर गोष्टींसाठी खूप मदत होईल. मुलाला अशा प्रकारची समस्या असलेले तुम्ही एकटे नाही आहात. पालकांचा सपोर्ट ग्रूप जॉईन केला तर तुम्हाला आणि मुलालाही खूप आधार मिळेल.

पण एक प्लीज प्लीज लक्षात घ्या, की ही एक डिसॅबिलिटी आहे, अशा स्पेक्ट्रम वर असलेल्या मुलाला त्याची वागणे कन्ट्रोल करता येत नाही पण ते त्याच्या हातात नाही, तो ते मुद्दाम करत नाही आहे. त्याला आता या परिस्थितीत आई वडील नाही समजून घेणार तर कोण घेणार? अशा वेळी त्याला समजून घेऊन सपोर्ट करण्याची गरज आहे>>>>

सहमत. हे बोलणे जितके सोपे आहे तेवढेच त्या परिस्थितीत असलेल्या पालकांना अशा मुलांना झेलणे कठीण. तरीही डोके शांत ठेऊन मुलांना सपोर्ट करणे दीर्घकालीन दृष्टिकोनातून दोघांच्या गरजेचे आहे.

दुर्दैवी गोष्ट म्हणजे आपल्या समाजात अशा मुलांना केवळ अज्ञानापायी अर्धवट, बिघडलेला, मंद अशी लेबले फार चटकन लागतात. मूल या सगळ्याशी नीट डील करू शकत नाही. एक तर त्याला आपण वाईट आहोत असे वाटते, अन सेल्फ एस्टीम डाउन होतो किंवा मग ते बंडखोर तरी होते. दोन्ही केसेस अवघडच.
पालकांना अशा वेळी फार खंबीर रहावे लागते. लेबल लावणार्‍यांना आरसा दाखवावा लागतो.
पालकच जर डिनायल मधे गेले किंवा त्यांनाच जर न्यूनगंड आला तर त्या बिचार्‍या मुलाचे आणखी हाल होतात.

राजेंद्र, क्षमा करा, थोडं स्पष्ट लिहिते.
सर्वप्रथम आपलं मूल. त्याचं आरोग्य ही आपली जबाबदारी आहे हे लक्षात घ्या. त्याच्या परिस्थितीबद्दल तुम्ही किती माहिती करून घेतली आहात? डॉक्टरकडून आणि स्वतःहून?

माय्बोलीवर लिहिताहात त्याअर्थी तुम्हाला इन्टरनेट वापरता येतं.

>>> ADHD व डिस्लेक्सिया एकच आहेत किंवा नाही हे आम्हाला माहित नाही.
अशी विधानं कशी करू शकता तुम्ही? गूगल करा ना! वर इतक्या जणांनी इतक्या प्रकारच्या माहितीचे दुवे दिले आहेत - पहा ना ते! त्यातूनच दिशा सापडेल!

तुम्हाला, घरच्यांना त्रास होतो हे मान्य आहे, पण मुलाला स्वतःलाही त्रास होत असेलच ना? त्याच्यासाठी जीव तुटत नाही तुमचा?

आणखी स्पष्ट लिहू? तुमच्याकडे वेळ कमी आहे. दिवसेंदिवस तो मोठा आणि दणकट होत जाईल आणि तुम्ही वयस्क आणि अशक्त. मग काय कराल?

नोटः मी फुकटचे सल्ले देत नाहीये. एका मनोरुग्ण व्यक्तीची केअरगिव्हर या नात्याने सांगते आहे.

त्यांनी दिलेली औषधे मुलगा नियमित घेत न्हवता व डॉक्टरांनी सांगितले कि त्याचा स्वभाव हट्टी असेल तर तो औषधांनी बारा होणार नाही. मुलगा औषध घेतच न्हवता म्हणून आम्ही त्या डॉक्टरांकडे जाणे बंद केलं.>>>
Remedial Coaching साठी दुसऱ्या डॉक्टरांकडे जायला सांगितल पण त्यांनी सांगितलेल्या वेळी आम्हाला जायला जमत नसल्याने अजूनतरी आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही. >>>
राजेंद्र, मुलाचे आरोग्य ही प्लीज तुमची highest priority ठेवा. मुलगा हट्टीपणामुळे औषध घेत नसेल तर त्यावर काही प्रयत्न न करता डॉक्टरांकडे जाणेच बंद करणे योग्य नाही. तसेच डॉक्टरांच्या वेळी जायला जमत नसेल तर थोडी तडजोड करून त्या वेळा जमवा. वेळच्या वेळी इलाज होणे योग्य आहे. त्यात प्लीज चालढकल करू नका.
वरती अनेकांनी उत्तम सल्ले दिले आहेत. तुम्हाला व तुमच्या मुलाला शुभेच्छा !

काळजीचे आणि योग्य ते सल्ले योग्य त्या व्यक्तींनी इथे दिले आहेतच. तेव्हा परत तेच लिहित नाही.

स्वाती_आंबोळे आणि चीकू या सदस्यांचे प्रतिसादांशी पूर्ण सहमत आहे.

राजेंद्र, स्पष्ट बोलतो, राग आला तरी चालेल. पुन्हा हे जजमेंटल नाही तर तुमच्याच वागण्यामुळे दिसले ते लिहित आहे. तुमच्याच कुटूंबातल्या एखाद्या थोरामोठ्याने केलेली कानउघाडणी समजून स्विकारावी ही विनंती.

तुम्ही मुलावर सूड उगवल्यासारखे होस्टेल ला पाठवण्याची तयारी करत आहात. 'आम्हाला नको ही रोजची कटकट' म्हणून मुलाला सरळ "टाकुन" देत आहात. मुलगा तुम्हाला जाणूनबुजून त्रास देतो आहे हे तुम्ही समजुत घालून घेतली आहे. ती आधी बदला. मुलाचा जस्ट आता जन्म झालाय. त्याला कळायला लागून फक्त ६-७ वर्ष झालीयेत. तो सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे.

मान्य आहे की त्याच्या वागण्यामुळे तुम्ही बेजार आहात - तुमची मानसिक परिस्थिती तुम्हीच समजू शकता, पण आम्हाला डॉक्टरकडे जायला वेळ नाही, औषधे मुलगा घेत नाही म्हणून ट्रीटमेंट बंद, आपल्याच मुलाच्या आजाराबद्दल थोडाफारही अभ्यास नाही, तातडीची युद्ध पातळीवरची हालचाल नाही, हे सगळेही दिसत आहेच. तिथे तुम्ही कमी पडत आहात, टाळत आहात हे लक्षात येत आहे.

असा मुलगा का जन्माला आला याबद्दल तुम्ही देवाला दोष देत अस्णार. मला दिसले ते असे की तुम्हाला मुलाच्या वागण्याचा स्वतःच्या पर्सनल लाइफवर होणारा परिणाम नकोसा झालाय. तुमचे लाइफ डिस्टर्ब झालेले नको. तुम्हाला ही मुलाची एक्स्ट्रा फूटेज खाणारी जबाबदारी नकोय. हा अतिअ‍ॅक्टीव असल्यामुळेच तुम्हाला नकोसा झालाय असे काही नाही, कदाचित हा २४ तास बेडरिडन असता तरी तुमचे हेच विचार राहिले असते.

कदाचित हा त्याचा दोन चार वर्षांचा त्रासदायक काळ असू शकेल. काही हार्मोनल इशूज असतील, योग्य वेळेवर योग्य उपचार केलेत तर प्रश्न फार लवकर व कायमचा निकाली निघूही शकेल. अशा कोणत्याही शक्यतांचा विचार न करता किंवा तुम्हाला सुचत नसेल तर इथे विचारायला तुम्ही तयार नाही. तुम्हाला मुलाला बोर्डिंग स्कुल मध्ये टाकायचे आहे या निर्णयावर मात्र स्वत्:चे स्वतःच येता आले आहे.

लक्षात ठेवा, ह्युमन बिहेवीयर हे मेंदुतल्या रसायनांमुळे प्रभावित होते. स्वतःची मूळ स्वयंभू इच्छा हा फार छोटासा भाग असतो. हे तुम्ही सर्वात आधी समजून घ्या. चांगले डॉक्टर शोधा. सुदैवाने इथल्या अनेक लोकांनी तुम्हाला अनेक चांगले सल्ले दिलेत. तुम्ही सकारात्मक राहणार असाल तर याच्याही शंभरपट मदत मिळेलही असा मला पूर्ण विश्वास आहे.

त्या ऑटिझम वर लिहिणार्‍या ताईंच्या हिंमतीची दाद द्यावी वाटते ते ह्यामुळेच. असे दुर्दम्य इच्छाशक्ती जागृत करुन समस्येशी दोन हात करणारे लाखो पालक जगात आहेत. खचून जाऊ नका. वाळूत तोंड खुपसल्याने परिस्थिती बदलणार नाहीच. परिस्थितीचा सामोरे जाऊन सामना करा.

वर लिहिलेल्या कडूजार शब्दांबद्दल मनापासून माफी मागतो. तुमच्या मुलाची तब्येत लवकर सुधारो आणि तुमचे सर्वांचे आयुष्य मानसिक शारिरिक आरोग्य सर्वथैव खूप खूप उत्तम होवो व तसेच कायम राहो अशी मनापासून प्रार्थना करतो.

---अ‍ॅमी---
त्रयस्थ आणि समाज मदत करु शकतो. समाज त्यासाठीच असतो. पण समाज नकारात्मक निराश व्यक्तींना मदत करण्यासाठी फार काही करु शकत नाही. इथेच बघा. अनेकांनी वेगवेगळे महत्त्वपूर्ण दुवे आणि माहिती दिली आहे. ही मदतच नव्हे काय? तुमची समाज आणि त्रयस्थांकडून नेमकी कोणत्या व्यवस्थेची अपेक्षा आहे?