*ही कुणाच्या वाहवाची लेखणी मौताज नाही* - तरही

Submitted by सुप्रिया जाधव. on 15 February, 2018 - 15:34

तरहीच्या ओळीसाठी बेफिजींचे आभार मानून...

ऐकुनी मिळतात टाळ्या तो गझलचा बाज नाही
*ही कुणाच्या वाहवाची लेखणी मौताज नाही*

गाठण्यासाठी किनारा त्यागले अस्तित्व माझे
पोचल्यावरती म्हणाला ओळखीची गाज नाही

चंद्रकोरीला नि त्याला निरखल्यावर वाटते की ;
काल जो अस्तास गेला तो उगवला आज नाही

तो युगांपासून आला गाजवत वक्तृत्व त्याचे
मी युगांपासून माझा ऐकला आवाज नाही

मोजल्यावरती खरी समजेल शेती वाचलेली
वाचल्याने सातबारा यायचा अंदाज नाही

राखण्या स्वर्गात जागा पोचला आधी असावा
ह्या विचाराने मिलिंदावर 'प्रिया' नाराज नाही

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतीम !!
तो युगांपासून आला गाजवत वक्तृत्व त्याचे
मी युगांपासून माझा ऐकला आवाज नाही

मोजल्यावरती खरी समजेल शेती वाचलेली
वाचल्याने सातबारा यायचा अंदाज नाही ............... व्वा !

गाठण्यासाठी किनारा त्यागले अस्तित्व माझे
पोचल्यावरती म्हणाला ओळखीची गाज नाही >>> व्वाए

तो युगांपासून आला गाजवत वक्तृत्व त्याचे
मी युगांपासून माझा ऐकला आवाज नाही>> क्या बात

मोजल्यावरती खरी समजेल शेती वाचलेली
वाचल्याने सातबारा यायचा अंदाज नाही >>>> नाही कळला.

राखण्या स्वर्गात जागा पोचला आधी असावा
ह्या विचाराने मिलिंदावर 'प्रिया' नाराज नाही >>> रिलेट झाला लगेच Sad