मी त्या जातीचा आहे....

Submitted by बेफ़िकीर on 26 January, 2018 - 09:07

गझल - मी त्या जातीचा आहे....

विजयोत्सव ठेवत नाही, बसगाड्या जाळत नाही
मी त्या जातीचा आहे, जी मीही पाळत नाही

मी वर्तमान अभ्यासत वागावे कसे ठरवतो
इतिहासामध्ये त्याचे उत्तर धुंडाळत नाही

कोणाचा ना कोणाचा त्याला पाठिंबा मिळतो
तो त्याच्या अनुयायांना आता कुरवाळत नाही

नावाने हाका मारे, तो आडनाव वापरतो
मैत्री शरमेने मरते, पण तो ओशाळत नाही

सत्तर वर्षांचा माझा हा देश रखेली आहे
हाही सांभाळत नाही, तोही सांभाळत नाही

-'बेफिकीर'!
(२६.०१.२०१८)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर रचना ! सामाजिक संदर्भ भारीच !

पाळत नाही, कुरवाळत नाही अन सांभाळत नाही हे तिन्ही आवडले.

बेफीजी +१

मी त्या जातीचा आहे, जी मीही पाळत नाही
<<

कवी, लेखक यांनी पात्राच्या भूमीकेतून काही मांडलेच तर ते लेखक/कवीचे स्वतःचे मत नसते, हे ही कविता(‽) वाचून पुन्हा एकदा उमजले.
व्हिलनची भूमिका सादर करणारे प्रत्यक्ष आयुष्यात व्हिलन नसतात, तसेच उदात्त भावना लेखनातून व्यक्त करणारे लोकही प्रत्यक्षात संकुचित मनोवृत्तीचे असू शकतात, हे सत्यही, पुन्हा एकदा, आकळले. Happy

बाकी शब्दरचना चांगलिये.

देश रखेली वगैरे पोचट प्रतिमा देखिल मस्त खपून गेल्या आहेत. (कुणीच सांभाळत नाही तर ती रखेली कुणाची अन कशी हे मात्र माझ्या बत्थड डोक्यात शिरले नाही.)

>>>>देश रखेली वगैरे पोचट प्रतिमा देखिल मस्त खपून गेल्या आहेत. (कुणीच सांभाळत नाही तर ती रखेली कुणाची अन कशी हे मात्र माझ्या बत्थड डोक्यात शिरले नाही.)
Submitted by आ.रा.रा. on 27 January, 2018 - 22:08 <<<<

ट्रोलसम्राट,

अखेरीस तुमच्या ह्या अवतारात तुमची तुमच्या डोक्याबद्दल झालेली धारणा अचूक निघाली ह्याबद्दल अभिनंदन!

आशयबद्ध गझल.
सर्व शेर दणकून आवडलेत बेफी.

अ‍ॅडमीन,

एखाद्या धाग्यावर मी खेळीमेळीत दिलेले प्रतिसादसुद्धा अवांतर म्हणून उडवले जातात. तेही अशा रीतीने, की त्या प्रतिसादांवर आलेले टीकात्मक प्रतिसाद तसेच ठेवून फक्त माझे प्रतिसाद उडवले जातात. दिसायला असे दिसावे की मी काहीतरी भयंकर अस्वीकारार्ह लिहिलेले होते. मी खेळीमेळीत काय लिहिले होते हे दिसतच नाही.

माझ्या अनेक धाग्यांवर मात्र असे वादोत्पादक किंवा अवांतर प्रतिसाद येत राहतात. प्रतिसाद आलेच नाहीत तर मला काहीच प्रॉब्लेम नसतो. मात्र हे असे अवांतर प्रतिसाद माझ्या धाग्यावर येतात तेव्हा आपण त्यावर काहीही कारवाई करताना दिसत नाही.

आजवर मी आपल्याकडे एकही तक्रार केलेली नाही.

आपल्यामते नेमकी हीच माझी चूक आहे का?

की आपण नेमलेले आपले सहकारी जाणून बुजून ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात?

नियम सर्वांसाठी समान असावेत ही अपेक्षा व्यक्त करून थांबतो.

-'बेफिकीर'!

>>प्रतिसाद आलेच नाहीत तर मला काहीच प्रॉब्लेम नसतो.

अय्या खरंच की कॉय. इतकं समजूतदार पणे वागायला कसं बाई जमतं तुम्हाला देवच जाणे. कित्ती मोठ्ठं मन आहे हो तुमचं.