सणाचा ऋण

Submitted by onlynit26 on 19 January, 2018 - 05:18

आज दिलपो पोस्टमनाची आतूरतेनी वाट बघीत हूतो. एवढ्यात पोस्टमन येवक व्हयो हूतो. साडेतीन व्हाजान गेले हूते. आता काय वाट बघून उपयोग नाय हूतो. शेवटी दिलप्यान ढोरांची कानी उडवून पांदीक लागलो. गणपतीक ४दिवस ऱ्यवले हूते. तरी सागऱ्याची मनीआऑर्डर येवक नाय हूती. भाताक पण बरेच पैशे हाडून झाले हूते. बरा वर्सल पण दिलप्याचीच हूती. मागच्या पत्रात लवकर मनीऑर्डर करतय असा झिलान कळवलेल्यान आणि असा कसा केल्यान. ताच काय ता ध्यानात येयत नाय हुता. दिलप्यान एकदा झिलाचा कंपनीत फोन करूक बघल्यान पण काय बोलना झाला नाय. इचार करून करून डोक्याचो भूगो झालेलो.ह्या तंद्रीत पांदन कधी सोपली ता कळाकच नाय. बाळ्या बैलान जेवा फोवदारणीच्या कोपऱ्यातलो आवा चावल्यान तेवा दिलप्याक जाग इली. दांडको पाठीर मारीत सगळो राग बाळ्यार काढल्यान.नंतर तेकाच वायट वाटला. कुडनात गेल्यावर बाळ्याक जवळ घीतल्यान.सांचेक लांडो करपील कापून घालीन असा बोलान चाटाळल्यान (गोंजारणे) त्याबरोबर बाळ्या बैलाचा राग गेलो. दिलप्याक चाटूक लागलो. पण दिलपो मनातना लय काळजीत पडलो हूतो. बरीच कामा करूची हूती. घर झाडून झाला हूता, भूतूरच्या बाजूक गिलावो पण काढून झालो हूतो. कलर काढूचो हूतो, गणपती ठेवतत त्या मागच्या भीतीवर कमाळ काढूचा बाकी हूता, सगळो बाजारहाट बाकी हूतो. पयलीच उधारी असल्यामूळा काणेकारान पण हात वर केल्यान हूते. थोडक्यात सगळी कामा पैशामूळा अडली हूती. पपल्यान आणि पिंक्यान रतांबेचो बियो सोलूक घीतल्यानी तेवा दिलपो वैतागलो होतो पोरांवर.. "**खरडून मडा हलका होता काय रे" पण पोरा आयकनारी नाय हूती. बियो सोलून बाजारात इकनार होती, तेवढेच बाप्पाच्या तयारीला मदत. दिलप्याचा याक हूता मात्र , चिडलो तरी लगेच शांत व्हायचो. बायको पोरांवर लय माया हूती. हा हा म्हनताना तो पण दिवस गेलो.
दुसऱ्या दिवशी दिलपो जरा सकाळी बेगीनाच उठलो. मनीऑर्डच्या नादात काल ढोरांचा प्वाटाचो कपो काय वर येवक नाय हूता. मशेरी लावन चाय पिवक चुलीकडो इलो तेवा " साखर आजच्या पुरतीच हा..उद्या पासना चाय पण गावाची नाय." ह्या बायलेचा वाक्य कानावर पडल्याबरोबर दिलप्याक लयच शरम वाटाक लागली. पाठच्या पाठी फीरलो. पण बायल बिचारी चायचो कोप घेवन पाठी धावली. दिलपो ढोरांची कानी उडवताना पण थरथरत हूतो.शेतकरी असल्याची पयल्यांदाच लाज वाटत हूती.. बायलेन हाडलेलो चायचो कोप उभ्या उभ्याच तोंडाक लावल्यान. तो पण फुणफुणत. तेवा जर चाय पिल्यान नसती तर ती मावली तेच्या मागना माळावर पण जावक मागे हटली नसती. बायलेचो स्वभाव तेका म्हायत हूतो .आज ढोरांकाव दिलप्याचा दुख कळला हूता, शाण्यासारखे चरत हूते. इकडे दिलप्याच्या मनात वेगळेच इचार चल्ले हूते. बांधावर बसान कायतरी मनातल्या मनात मांडीत हूतो. शेवटी ढोरांची पोटा वर इली तशी घरच्या दिशेन निघालो. इचार करून करून भूक खयल्या खय गायब झाली हूती.
तरी बायलेन वाढल्यान म्हनान जेवलो. आणि ढक्यार कांबळ्याचो लटो टाकून लकाटलो. झोप काय येयना. मनात एक एक इचार फेरयो मारीत हूतो. तसोच लटो गुटाळून ठेवल्यान आणि वळय समोरच्या होवरेत गेलो. बायल हूंबऱ्याजवळ झोपलेली. तीका ओंडाळूनच गेलो. कबाट उघडून कायतरी रापत हूता. बायलेन कान लावल्यान. पण ती काय बोल्ली नाय. घोव काय करताहा तीका चांगला म्हायत हूता. रापान झाल्यावर सोमतो भायर इलो.शर्ट पँट चढून बायलेकडे पिशी मागल्यान. तेवाव बायल काय्येक बोल्ली नाय.गपचूप हातात ठेवल्यान. पोरानी सोललेल्यो रतांबाच्यो बियो पण पिशयेत घीतल्यान.
"बाबानू वायच थांबा, पोस्टमनकाका येवकच झालेत" पोरीचा बोलना आयकल्या न आयकल्या करीत वाटेक लागलो आणि पेमल्या म्हातरेन हाक मारल्यान.." खय जातस रे?" दिलप्यान हू की चु केल्यान नाय. बोलान पण फायदो नाय हूतो. म्हातरेची कानपूर लायनीत बिघाडलेली आणि याक याक इचारून नजर लावायची. काळ्या दाताची म्हनान फेमस हूती. खरोखरच एक दात काळो हूतो. काम होयत की नाय ह्याबद्दल दिलप्याक शंका इली.पण थांबान चालनारा नाय हूता.चतुर्थी दोन दिवसार येवन टेपली हूती. दिलप्याच्या पायाची केला (पायाच्या दोन बोटातील मधला भाग) कुसली हूती. ग्रीस लावन शेवटचे तरयाचे चार कोपरे लावल्यान हूते आणि आता चलताना लयच दुखाक लागली हूती. अर्धे वाटेत ग्रामशेवक गावले म्हनान बरा झाला. तेका व्हया त्या ठीकानावर तो उतारलो. बाजरात फीर फीर फीरलो पण तेचा काम काय झाला नाय. अकेरीक रतांबाच्यो बियो घालून वस्तीच्या गाडयेन घराक इलो. बायलेची कुडी पण कोण गहाण ठेव तयार झालो नाय. कुडी खोटी हूती ता फक्त बायलेक म्हायत हूता.एक आशा हूती. ती पण मावाळली. दिलप्याची काळजी लयच वाढली. बायको पोरांका ती काळजी दिसा नये म्हनान आटोकाट प्रयत्न करीत हूतो.वरवर हसत हूतो. बाजारातसून हाडलेली भजी देवन रतांबाच्या बियाचे कीती पैशे इले ते पोरांका सांगल्यान,पोरा पण आपल्या मेन्हतीवर खूष झाली. राती काय दिलप्याच्या पोटात धड घास गेलो नाय . नीज पण येयना. बायलेक दुख कळत हूता तेच्या कपाळावर हात फीरवून तेका धीर देयत हूती. बाप्पा सगळा काय ठीक करतीत. तरी पण दिलप्याची काळजी कमी होयत नाय हूती. फाटफटी जरा डोळो लागलो. परत ढोरा सोडूक उठाकच व्हया हूता. बायलेच्या कानाचा आपरेशन झाला हूता त्यामुळा तेकाच जावक व्हया हूता..दोन तीन पावसान पण दडी मारल्यान हूती. आज ढोरांका देवळाकडच्या कुडनात घालून श्याम खोताकडे थोडे उसने पैशे मागणार हूतो. आज तर घरात चाय पण नाय हूती. देवाच्या पाया पडान देव्हाऱ्याच्या बाजूचे चार फुटाने तोंडात टाकून दिलपो भायर पडलो. रातीच्या जागरानामुळा डोळे कसकसत हूते. डोक्या पण जड हूता. ढोरांका कुडनात घालून उक्शेच्या सावलेत कांबळ्याच्या लट्यार लकाटलो. हा हा म्हनताना डोळो लागलो. ढोरा शाण्यासारखी चरत हूती. दिलपो असो कीती येळ झोपान ऱ्यवलो काय म्हायत जसा दिवस वर येवन न्हीबांरान तापलो.तशी तेका जाग इली. उठाक बघल्यान पण उठाक व्हयना भोवळ येवक लागली. उठाक बघल्यान थयच होलपाटलो. पोटात फुटान्याशिवाय कायच नाय हूता. मुक्या जनावरांका पण आपल्या मालकाक कायतरी झाला ह्या कळला. सनवारग्या गाय धावत जवळ इली, बाळो पण धावलो. ह्या तुमका अतिशोयोक्तीपणाचा वाटात पण मुक्या जनावरांचा माया हा तेवढी कोनाक नाया. दोघाव दिलप्याक चाटूक लागली. बाकीचीव ढोरा दिलप्या भोवती जमा झाली. आजूबाजूक चिटपाखरू नाय हूता. नाय म्हनाक पुढे गावात जाणारो रस्तो हूतो. कोण नसता थय देवच आसता. त्याच येळाक एक कार थयसून जायत हूती , तेच्यात मुंबयसून गणपतीक गावाक इलेले चार तरूण प्वार हूते. तेंका ढोरा दिलप्या भोवती फेर धरलेली दिसली. असा कधीतरीच बघूक मिळता, त्या पोरांका ढोरानी धरलेलो फेर भारी वाटलो. गाडी थांबून खाली उतारले. पण उतरान बघतत तर एक माणूस चक्कर येवन पडलेलो.गाडयेतले सगळे जण तरूणच होते. एकान लगेच जावन गाडयेतसून पाणयाची बाटली हाडल्यान. त्वांडार पाणी मारल्याबरोबर दिलप्याक जरा तरतरी इली. थोडा पाणी पिल्यार सावारलो. ढोरा जागच्या जाग्यार उभी हूती. दिलप्यान देवाक मनातल्या मनात नमस्कार करून पोरांचे आभार मानल्यान. स्वताच उठलो तरी धडपडत हूतो. पडल्यामुळा डोक्याक पण खोख पडली हूती. चार जणांपैकी तीघजण गाडयेकडे थांबान. एक जण दिलप्याक घरा परयात सोडूक तयार झालो. दिलपो नको नको करी परयंत तेचा कांबळा घेवन तेच्या खांद्याक पकडल्यान. ढोरा पण शिकवल्यासारखी वाटेक लागली. घरा जवळ इलो तसो पांदीत ढोरांचो आवाज आयकान रोजच्यासारखी पोरा बाबांचा कांबळा घेवक पुढे धावली. पण समोरचा चित्र येगळाच हूता. एक गोरोसो पोरगो आपल्या बापाशीक धरून हानताहा म्हटल्यावर पोरा हलानगेली. खोखेतला रकात बघून आवशीक हाक मारल्यानी. दिलप्याची अशी हालत बायलेन कधी बघूक नाय हूती. जरा काय झाला तरी खाली वर व्हायची. पोरांकडे ढोरांका दायार बांधाचा काम दिल्यान आणि घोवाकडे.वळली. वांगडा इलेल्या पोरग्यान सगळी हकीकत तेच्या बायलेक सांगल्यान, "ढोरानी धरलेलो फेर बघून आम्ही उतारलव तर हे पडलेले दिसले, नायतर आम्ही थांबलव नसतव" अशे ते शुद्ध भाषेत बोल्ले.
"बाबा ना रातभर झोपाक नायत आणि काय खावक पण नाया" पपलो पटकन बोलान गेलो. एकंदरीत सगळी परीस्थिती बघून ह्या कुंटूंब अडचणीत हा त्या पोराक समाजला. आपण कायतरी मदत करू ह्या उद्धेशान तेना याक याक करुन सगळा इचारून घीतल्यान, दिलप्याची बायलेन पण भावनेच्या भरात सगळी हकीकत सांगल्यान. दिलप्यान बायलेक एक दोन येळा गप करूक बघल्यान पण त्या पोरग्यानच तीका सगळा सांगाक सांगल्यान. एकंदरीत सगळ्या सांगण्यावरना त्या पोराक ह्या कुटूंबाक पैशाची लयच निकड हा ह्या कळला. भायर पडताना मावलेच्या हातार पाचशेच्यो चार नोटो ठेवल्यान, दिलपो आणि ती मावली पोराच्या ह्या अवताराकडे बघीतच ऱ्यवले, नको म्हनाक पण त्वांड उघडना, जसो तो पोरगो खळ्यात गेलो तशी ती मावली ते पाठी धावली, तेना दिलेल्यो नोटो परत तेच्या खिशात कोंबूक लागली, तो काय घेवक तयार नाय हूतो आणि ही पण आयकत नाय हूती. शेवटी तेना ते पैसे उसने दिले असे समजा आणि मला गावतीत तशे परत करा ह्या वाक्यावर मावलीक थांबवल्यान. आपलो संपर्क नंबर एका कागदावर लिवन तिच्याकडे दिल्यान आणि वाटेक लागलो, दोन पोरा आणि घोव बायल तेच्या अशा वागण्यान गलबलली हूती. आई पावणादेवीचे आभार मानून पाठमोरो चलणाऱ्या त्या पोराक नजरेआड होयसर बघीत ऱ्यवली. दिलप्याकडे कामासाठी दिड दिवस ऱ्यवलो हूतो पण कंबार कसान दोघाव घोव बायल कामाक लागली. अकेरेक सागरो गणपती दिवशी सकाळी हजर झालो. पोराचो म्होरो शाफ उतारलो होतो ,आवस बापूस गणपतीची तयारी कशी करतले ह्या काळजीन काळवांडलो हूतो पण बघता तर सगळी तयारी झाली हूती. बापूस गणपती हानूची तयारी करीत हूतो.
ज्या ज्या येळाक मिया गावाक जातय तेवा माका दिलपो त्या अनोळखी पोरान दिलेलो नंबर लागलो काय इचारता. आणि माझा उत्तर नाय आसता.

 

नितीन राणे

सातरल ( कणकवली )

९००४६०२७६८.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Chhan