अंजनेरी नाशिक

Submitted by सौमित्र साळुंके on 19 January, 2018 - 00:15

नाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या सेलबारी/डोलबारी, वणी, त्र्यंबक अश्या उपरांगा आहेत; पैकी त्र्यंबक रांग नाशिक शहराच्या पश्चिमेस पसरली आहे. या रांगेवर आहे अंजनेरी नावाचा डोंगर. या पर्वतावर माता अंजनीने मारुतीरायाला जन्म दिला अशी आख्यायिका आहे.

नाशिकहून त्र्यंबकेश्वरला राज्य परिवहनाच्या बसेस सतत असतात. त्याने अंजनेरी फाट्यावर उतरावं. या इथून काही अंतरापर्यंत सद्ध्या (जानेवारी २०१८) खडी रस्ता आहे मात्र त्याने चाकांना इजा होण्याची शक्यताच जास्त. आपण आपली अकरा नंबरची बस घेऊन निघायचं. फाट्याहून एक ठळक पायवाट आपल्याला अंजनेरी पायथ्याच्या वनखात्याच्या चौकीपर्यंत घेऊन जाते. इथे जरा झाडी आहे आणि काही स्टॉल्स. एखादं लिंबू सरबत अथवा चहा घ्यायचा आणि रजिस्टर मध्ये एन्ट्री करून पायऱ्यांनी गड चढाई चालू करायची. या डोंगरावर माकडं पुष्कळ. ती आजूबाजूला असताना खाण्यापिण्याच्या चिजा बाहेर काढायच्या नाहीत आणि यांच्याशी जास्त नजरानजर करायची नाही म्हणजे ती अंगलट येत नाहीत. हातात एखादी काठी नुसती असू द्यावी (वापरू नये).

चौकीपासून गडाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत पायऱ्यांची वाट आहे. बऱ्याचश्या उध्वस्त झालेल्या पायऱ्या सिमेंट काँक्रीटने बांधून काढल्या आहेत. पायऱ्यांच्या उंचीमुळे जरा दमछाक होऊ शकते. तासाभराच्या वाटचालीनंतर आपण दोन कड्यांच्यामध्ये येतो. इथे डाव्या बाजूला आहे पार्श्वनाथाचे लेणे. आमच्या जाण्यायेण्याच्या वेळी माकडांची (आया आणि त्यांना बिलगून बसलेली बाळे) अख्खी फौज इथे वस्तीला असल्याने त्यांना हाकलुन देणं उचित वाटलं नाही. मात्र ही लेणी आतून अतिशय सुंदर आहेत. कोरीव मुर्त्या आणि संस्कृत शिलालेख सुद्धा आतमध्ये आहे. पहाटेची वेळ लेण्यात जाण्यास उत्तम असावी .

यानंतर आपण गडाच्या पहिल्या टप्प्यावर येतो. इथे अंजनीमातेचे पाहिले मंदिर लागते. आईला वंदन करतानाची बाळ हनुमानाची लोभस मूर्ती इथे आहे. या मंदिरात सहा आठ जण राहू शकतील इतकी जागा आहे. आम्ही संध्याकाळी इथे पोहोचल्याने बालेकिल्ल्यावर पहाटे जायचं ठरवलं आणि मंदिराशेजारच्या जागेवर तंबू ठोकला. या मंदिराशेजारी पप्पू बदाबे याचा लहानसा स्टॉल आहे. पप्पू मोठा सरळ मनाचा मुलगा. रात्री खाली जाताना पाण्याच्या बाटल्या आणि हात पाय धुवायला एक ड्रम असं भरून गेला. रात्री चहा प्यावासा वाटलं तर दुध आणि इतर सामान सुद्धा ठेवून गेला. सकाळी सातला पुन्हा हजर. जेवणा-न्याहारीसाठी हि उत्तम जागा.

मंदिरापुढे एका हलक्या चढणावर आहे सुंदर असे तळे; इंद्रकुंड. सांजेच्या वेळी तळ्याभोवती गाई-वासरे, शेळ्या आणि बगळे यांनी गर्दी केली होती. पार्श्वभूमीवर आभाळाचा केशरी रंग, दुग्धपान करणारी वासरे, बागडणाऱ्या शेळ्या आणि आभाळातली बलाकमाला... पुन्हा तंबूकडे पाय निघेना. आयुष्यातले शांत, प्रसन्न आणि अंतर्मुख करणारे निवांत क्षण मला या सह्याद्रीनेच बहाल केले आहेत आणि म्हणूनही सह्याद्रीचा मी आजन्म ऋणी राहीन.

मावळतीला असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या ब्रम्हगिरीला वंदन करून आम्ही निद्राधीन झालो.

पहाटे उठून बालेकिल्ल्याकडे निघालो. इथून पून्हा पायऱ्यांची वाट आहे. सर्वोच्च माथ्यावर अंजनीमतेचे दुसरे मंदिर आहे. इथे आईच्या मांडीवर बसलेले लुकलूकत्या डोळ्यांनी जगाकडे पाहणारे बालमारुती आपल्यावर अक्षरशः मोहिनी घालतात. मारुतीचं असं रूप बघून हसू येतं आणि घडविणाऱ्याचं कौतुक वाटतं. महाबली मारुती कधीतरी असे असतील या विचाराने गंमत वाटते.

मूर्ती पूर्वाभिमुख आहे आणि आम्ही आलो तेव्हा नुकताच सूर्योदय होत होता.

गडमाथासुद्दा मोठा आहे. मंदिराशेजारी एक बसकं दुकानवजा घर आहे. त्यांनी सांगितलं की सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे छत असं खालीच बांधावं लागतं. या इथून गडगडा, ब्रम्हगिरी, हरिहर आणि इतर दुर्ग दिसू शकतात; आम्हाला मात्र सकाळच्या वेळी ब्रम्हगिरी आणि गडगडा दिसू शकला.

बालेकिल्ल्याच्या साधारण पुर्व पायथ्याला सीता गुंफा आहे. आतमध्ये देवदेवतांची शिल्पे कोरलेली आहेत. या इथेच कुण्या बाबाचा आश्रम आहे, लहान सहान मंदिरे आहेत. (गडांवरच्या आश्रम प्रकारावर माझा वैयक्तिक आक्षेप आहे) मात्र इथे येणारी वाट आणि परिसर अत्यंत स्वच्छ आणि सुंदर आहे.

खालच्या मंदिरापाशी जाताना नाशिक भोसला मिलिटरी स्कुलची सातवी आठवीतल्या मुलांची टीमच भेटली. त्यांच्या ट्रेनर्स/मार्गदर्शकांसोबत भल्या सकाळी शिस्तीत वर चढून आलेली ही ऊर्जेची साखळी बघितली आणि (आजूबाजूला घडणाऱ्या बातम्या बघून-वाचून इतर वेळी चिंतातुर होणारं) मन देशाच्या भवितव्याबद्दल थोडं आश्वस्त झालं. इतरही काही लहान मुलंसुद्धा त्यांच्या आईबाबां, काका काकूंसोबत नाशिकहुन सकाळ सकाळीच गडावर पोहोचली होती. गंमत म्हणजे त्यांनी पतंग आणले होते. शाळेनंतर बहुधा प्रथमच मनमुराद पतंग उडवण्याचा (आणि तेही कुठे बघा!) आनंद घेतला आणि पप्पूच्या स्टॉलवर चहा पोहे घेऊन अंजनेरीचा निरोप घेतला.

नोंदी:
१. आम्ही पाहू शकलो नाही मात्र पार्श्वनाथाचे लेणें नक्की पाहावे;
२. माकडांच्या जवळ असताना खाद्यपदार्थ काढू नये;
३. पप्पू बदाबे भ्रमणध्वनी: 90 11 848220;
४. गडावर या दिवसात कडाक्याची थंडी पडू शकते; तेव्हा उबदार कपडे आणि मुक्काम असल्यास उबदार अंथरून पांघरूण आवश्यक;
५. मुख्य रस्त्यातून नाशिकला जाणारी वाहने आणि बसेस सहज मिळतात.

||जय हनुमान||

सौमित्र साळुंखे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults