दांडेली

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

२०१६.. दोन वर्षांपुर्वी मकर संक्रमणाच्या मुहुर्तावर मुंबईहून निघालो ते दांडेलीच्या ओढीने... मध्यरात्रीच्या सुमारास केपीला पुण्यातून उचलून बेळगावचा रस्ता धरला. गाडीत तिघे चक्रधर असले तरी चक्रधर स्वामींची जबाबदारी अस्मादिकांवरच होती. दिवसभर ऑफिस गाजवून नंतर रात्री ड्रायव्हिंग केल्यामुळे कोल्हापूर येईतो पापण्या जडावू लागल्या होत्या... चहाचा अनिवार्य ब्रेक घेऊन चक्रधर स्वामींची जबाबदारी विनय वर सोपवली आणि मागच्या सीटवर अनिरुद्ध शेजारीच हेडरेस्ट वर मान टाकली..

एव्हाना प्लेअरवर लागलेल्या गझलनी मनाचा ताबा घ्यायला सुरवात केलेली. हायवेवरचा गार वारा आणि कानात घुटमळणारे गुलजारचे शब्द!!! .. मन अलगद रातराणीच्या सुगंधा मागे तरंगत जाऊ लागले. अश्या निवांत क्षणी वृक्षराजीन डवरलेलं निबीड अरण्यं मनाला खुणावू लागलं.. कैलासपतीच्या अंगाभवती फेर धरलेली वेलबुट्टी बघताच मन त्यांत गुंतून पडलं. पहाटेच्या मंगल समई वृक्षवेलींचा अडथळा पार करत जमिनीशी सलगी करणारी कोवळी किरणे रोमांचीत करू लागली. झर्‍याच्या तालावरची पक्षांची भुपाळी वेड लावू लागली. मधेच त्यांच्या किलबिलाटाला pause लावणारा हुप्प्यांचा धीरगंभीर हुंकार... आणि अचानक पसरलेली शांतता.. अश्याच एका अनभिज्ञ क्षणी एखादं जंगली श्वापद हुल देऊन शेजारून निसटून गेलेलं.. त्या गुढरम्य वातावरणाने अंग शहारुन गेलेलं... जंगलातील ती निरामय शांतता मनात उतरत गेलेली आणि अश्या निवांत क्षणी वाटेत पसरलेल्या फांद्यानी वाट अडवून टोल मागावा... हो टोल!! शेवटी टोल नाक्याने त्या गुढरम्य स्वप्नाची तंद्री भंग पावली.

पहाटेच्या गार वार्‍यात अचानक Jungle Foxच्या टोळीच दर्शन झालं. गाडीला ब्रेक लागताच सावध झालेली ती टोळी नुकतीच केलेली शिकार तोंडात दाबून जंगलात पसार झाली. अंगमोडत गाडीतून पायउतार झालो. पहाटेच्या दवात न्हाहलेल्या गवताच्या कुंद दरवळाने शरिरातील सगळ्या संवेदना जागृत झाल्या. उगवतीला केशरी पडद्याच्या पार्श्वभुमीवर आळसावलेल्या डोंगरदर्‍यांची महिरप मोठी विलोभनीय दिसत होती. मधूनच एकाद पाखरू आकाशात भरारी घेऊन त्या अलौकीक सौर्दंयाला तीट लावण्याच कार्य पार पाडत होतं. त्या चैतन्यमय वातावरणाने रात्रीच्या प्रवासाचा शिणवटा कुठल्या कुठे निघून गेला होता.

काळू नदीचा वरदहस्त लाभलेलं दांडेली हे कर्नाटकच्या उत्तर सीमे वरील घनदाट अरणय! समुद्र सपाटी पासून ४७३ मिटर उंचीवर असलेल्या या सदाहरित जंगलात आढळणारा Black Panthers हे या जंगलाच प्रमुख आकर्षण!!! निसर्गाने दांडेलीवर जैवविविधतेची मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे. वृक्षवल्ली व्यतिरिक्त पक्षांच्या ३०० हून अधिक जातींची इथे नोंद झालेली आहे. नोव्हेंबरचा गारठा वाढू लागला की उत्तरे कडील पक्षी स्थलांतर करुन दक्षिण भारतात येतात. समुद्र सपाटी कडून येणार्‍या दमट वार्‍यांमुळे पश्चिमघाटातील हिवाळा उत्तरे पेक्षा सुसह्य असतो. त्यामुळे बहुतेक स्थलांतरीत पक्षी प्रजननासाठी पश्चिमघाटातील दांडेलीचा आश्रय निवडतात. हा काळ पक्षीप्रेमीं साठी मोठी पर्वणीच असते.

सकाळच्या दाट धुक्यातून वाट काढत दांडेलीतील टिंबर डेपो कडे निघालो. वाटेत एका बांधावर झुपकेदार रानकोंबडा (Junglefowl) दिसला. गाडी थांबवून कॅमेरा सेट करे पर्यंत तो ही झुडपात गुडूप झाला. एव्हाना सुर्य बराच वर आला होता. टिंबर डेपोच्या रस्त्याच्या दोन्ही कडेला ऐनाच्या झाडांनी कमानी उभारल्या होत्या. नऊ वाजत आले तरी गेट बंदच होते. चोर दिंडीतून आत शिरताच Indian giant squirrelने आमचे स्वागत केले. भिमाशंकरच्या डोंगर- दर्‍यात आढळणारा लाजरा-बुजरा 'शेकरु' आपल्या महाराष्ट्राचा राज्यप्राणी इथे मात्र बिनधास्त वावरत होता.

शेकरु

आमच्या आधीच एक ग्रुप इथे पक्षी निरिक्षणासाठी पोहचला होता. पक्षांपेक्षा त्यांचाच किलबिलाट जास्त होता.. म्हणुन आम्ही थोडं आडरानात शिरलो... दांडेलीच्या परिसरात रक्तरोहीडा आणि नवलीची बरिच झाडे आहेत. नव्वदच्या दशकात दांडेली हे रोहिडाच्या लाकडाचा लिलाव करणारं आशियातील अग्रेसर ठिकाण होतं. १९९५ नंतर Jungle lodgesच्या स्थापने नंतर इथला plywood factory बंद झाल्या. २००९ मधे वनखात्याने स्थानिकांच्या मदतीने 'Hornbills trail' आयोजीत करुन Hornbillच्या संवर्धनासाठी विशेष पाऊलं उचलून इथल्या पक्षांना अभयदान दिलं..

दांडेलीच्या या सरंक्षित परिसरात पक्षांप्रमाणेच प्राण्यांचा ही वावर वाढला आहे. टिंबर मार्टच्या पहिल्या फेरीत धनेश, कोतवाल, पावशा, भृंगराज, काळ्या डोक्याचा कुहुआ, तपकिरी डोक्याचा तांबट, लाल निखार, सुभग, तोईपोपट यांनी दर्शन देऊन आम्हाला उपकृत केलं.

भृंगराज (Racket Tailed Drongo)

मलबार धनेश (Malabar Pied Hornbill)

पावशा (Common Hawk Cuckoo)

काळ्या डोक्याचा कुहुआ (Black-Headed Cuckooshrike)

तपकिरी डोक्याचा तांबट (Brown Headed Barbet)

लाल निखार (Scarlet Minivet - Male)

सुभग (Common Iora)COMMON IORA)

कांस्य कोतवाल (Bronze Winged Drongo)

तोईपोपट (Plum Headed Parakeet - Male)

मलबारी कर्णा (Malabar Trogan)

सर्पगरुड (Sulawesi Serpent-Eagle)

सुर्य बराच वर आला होता. मुक्कामाच्या ठिकाणी परतत असताना आसमंतात सर्पगरुडाचा कॉल ऐकू येत होता. गाडी थांबवून कॉलच्या दिशेने कॅमेरे रोखले आणि त्या राजबिंड पक्षाचं रुप कॅमेर्‍यात कैद केलं. तिथून पुढे निघतो तर Malabar Troganची जोडी विनायकला दिसली... पण कॅमेर्‍या सरसावण्यापुर्वीच ते जंगलात पसार झाले. अश्या प्रकारे आमच्या पक्षी निरिक्षणाचा श्रीगणेशा तर उत्तम झाला होता..

मुक्कामाची सोय गणेशगुडीतील Old Magazine House मधे होती... OMHच तसं साधारण गेस्टहाऊस असल्याने इथे सामान्य पर्यटकांची गर्दी नसते.. पण या गेस्टहाऊने पक्ष्यांसाठी केलेली पाणपोईची सोय हा एक विलक्षण अनुभव आहे. हिरव्याकंच गर्द झाडीच्या समोर पक्षांसाठी ठराविक अंतरांवर मातीच्या भांड्यात पाणी ठेवलं होतं... आणि त्यांना त्यात जलक्रीडा करता यावी म्हणून त्या भांड्यां शेजारी झाडांच्या फांद्याची खास रचना केली होती. त्या जागे पासून दहा एक फुटां वर हिरवी जाळी बांधून पक्षी निरिक्षकांसाठी आडोसा तयार केला होता.

दुपार नंतर या पाणपोईवर विविध पक्षांची परेड सुरु होते... पोटभर जेवण झाल्याने अमंळ सुस्ती चढली होती. तेव्हढ्यात Blue Capped Rock Thrush हजेरी लावली. सगळे जण कॅमेरे सरसावून बसले.. आणि त्या नंतर काळोख होई पर्यंत अखंड क्लिकक्लिकाट सुरू राहिला. Blue Cappedच्या सलामी नंतर Asian Brown Flycatcherच्या जोडीचे आगमन झाले.. मागोमाग Tickell's Blue Flycatcher, Indian Paradise Flycatcher, Black Naped Monarch, Rusty Tailed Flycatcher, Oriental White Eye, Yellow Browed Bulbul, Oriental Magpie Robin, Verditer Flycatcher, Emerald Pigeon, Flame Throated Bulbul, White Rumped Munia, Puff Throated Babbler, Dark Fronted Babbler, Yellow Tit, White Bellied Blue Flycatcher, Orange Headed Thrush इत्यादी पक्षी या परेड मधे सामिल झाले.

निळ्या डोक्याचा कस्तूर (Blue Capped Rock Thrush)

तपकिरी लिटकुरी (Asian Brown Flycatcher)

तांबुस शेपटीचा माशीमार (Rusty Tailed Flycather)

चश्मेवाला (Oriental White Eye)

पिवळ्या भुवईचा बुलबुल (Yellow Browed Bulbul)

दयाळ (Oriental Magpie Robin)

निलीमा (Tickell's Blue Flycatcher)

स्वर्गीय नर्तक (Indian Paradise Flycatcher - Male)

स्वर्गीय नर्तक (Indian Paradise Flycatcher - Female)

नीलांग (Verditer Flycatcher)

पाचू कवडा (Emerald Dove)

लालकंठी बुलबुल (Flame Throated Bulbul)

नीलमणी (Black Naped Monarch - Male)

काळ्या डोक्याचा सातभाई (Dark Fronted Babbler)

ठिपकेवाला पहाडी सातभाई (Puff Throated Babbler)

पिवळा बल्गुली (Indian Yellow Tit)

पांढर्‍या पोटाचा निळा माशिमार (White Bellied Blue Flycatcher)

संध्याकाळी गारठा वाढू लागताच गेस्ट हाऊस तर्फे गरमागरम सुपची सोय करण्यात आली. सुप सोबत आजच्या दिवसा लेखाजोखा इतरां सोबत शेअर करण्यात आला.. बरेच दर्दी आणि हौशी पक्षी निरिक्षक दोन-तीन दिवसां पासून इथे मुक्कामी होते.. त्यांच्या कडून सकाळच्या सत्रा बद्दलची माहिती घेतली आणि सामिष भोजना वर ताव मारुन ढाराढूर झालो.

सकाळी लवकर जाग आली ती जंगलातील कॉलने.. बाहेर सर्वत्र धुक्याच साम्राज्य पसरलेलं होतं. मनाशी म्हणाले, हाय रे देवा.. हे धुकं असच राहिलं तर पहाटेची पक्षांची लगबग कॅमेर्‍यात टिपण मुश्किल होईल...

सातच्या सुमारास आमची टोळी गेस्टहाऊस पासून अर्धा किलोमिटर वरिल एका झाडापाशी येऊन पोहचली.. त्या झाडाला लहान पिवळसर फळांचा बहर आलेला होता.. आणि तो बहर आपआपल्या चोचीत टिपण्यासाठी वेगवेगळ्या पक्षां मधे स्पर्धा रंगली होती.

धुक्याचा पडदा विरळ होताच आम्हाला Asian Fairy Bluebirdने दर्शन दिले.. झाडाच्या वरच्या टप्प्यात Pompadour Green Pigeonची शाळा भरली होती. त्यांची शाळा सुटताच Common Hill Mynaने त्या fruiting treeचा ताबा घेतला. त्यांच्या मागोमाग Golden Oriole, White Cheeked Barbet, Malabar Barbet, Flame Throated Bulbul, Yellow Browed Bulbul, Orange Headed Thrush, Green Bee Eater या असामींनी तिथे हजेरी लावली.

नीलपरी (Asian Fairy Bluebird)

हळद्या, आम्रपक्षी (Golden Oriole)

हळद्या (Indian Golden Oriole - Female)

कुर्टुक (White Cheeked Barbet)

हरोळी (Pompadour Green Pigeon)

लालकंठी बुलबुल (Flame Throated Bulbul)

रानकस्तूर (Orange Headed Thrush)

पिवळ्या भुवईचा बुलबुल (Yellow Browed Bulbul)

मलबार तांबट (Malabar Barbet)

डोंगरी मैना (Common Hill Myna)

वेडा राघू (Green Bee Eater)

पांढरा शराटी (Black-headed ibis)

कापशी घार (Black Shouldered Kite)

checkoutची वेळ झाली होती म्हणून जड अंतकरणाने तिथुन निघालो.. चारही बाजुने जंगलाने वेढलेलं गेस्ट हाऊस आणि त्याला झुळझुळ झर्‍याची साथ... तिथल्या वाढप्या पासुन सगळ्यांनाच असलेली निसर्गाची ओढ ही सगळी शिदोरी घेऊन आम्ही तिथून निघालो. आठवण म्हणुन OMHच्या गेटवर विनयचा फोटो काढत असताना काही फुटांवरुन झर्‍यावर पाणी पियायला आलेला Wild boar खुसपुस करत जंगलात पळून गेला. दांडेलीतील या सजिव सुष्टी मन अगदी तृप्त करुन टाकलं ती परत येण्याची ओढ लावूनच.

शब्दखुणा: 

ज ब र द स्त !!!!

इंद्रा, वेल्कम ब्याक Happy फोटो आणि लिखाण जबरदस्तच रे. नक्की कशाची तारीफ करू ठरवण कठीण जातंय. Happy

व्वा इंद्रा जबरी..
फोटु अन लिखाण भारी

जायला पाहिजे रे या ठिकाणी...

इंद्रधनुष्य... you made my day.. What a ecosystem man..!!!
किती सुन्दर आणि विवीधता आहे.... खुपच आवडल...
आणि उत्तम फोटोग्राफी... पक्षान्चे फोटो काढने खुप अवघड असते.. स्पेशली लहान ( चश्मेवाला, कस्तुर, ताम्बट ) ..
खुपच मस्त....

इंद्रा, वर्णन तर सुरेख आहेच, सोबत फोटोही अप्रतिम आहेत. बुलबुल पिवळे सुद्धा असतात हे माहीत नव्हते.

तुम्हा लोकांना कसे काय इतके पक्षी दिसतात देव जाणे.
केवळ सुदैव म्हणून यातले बरेचसे पक्षी व शेकरू हा प्राणी मी पाहिलाय. हे सगळे मला अकस्मात दिसले, पक्षी पाहायचा कुठलाही कार्यक्रम नसताना. जेव्हा मुद्दामहुन 'आज पक्षी पहायचेच' म्हणून ठरवलेय तेव्हा कावळे, बुलबुल व दयाळाशिवाय कुणीही माझ्या वाटेवर आले नाहीत.

इंद्रा मस्त लिहीले आहेस. एकदम दवणीय आहे पहिला पॅरा.

बाकी धमाल आली होती या ट्रिपला. परत एकदा जायला हवे. Happy

मी या ट्रिपचे टाकलेले फोटो इथे आहेत. https://www.maayboli.com/node/58710

तो कोतवाल Bronze Winged Drongo होता व Rusty Tailed Flycather चे नाव चुकले आहे ते दुरुस्त कर.

सगळ्यांचे धन्यवाद Happy

तो कोतवाल Bronze Winged Drongo होता व Rusty Tailed Flycather चे नाव चुकले आहे ते दुरुस्त कर>> बदल केला आहे... thanks

wow

शेकरु मी बंदिपूर अभयारण्यातुन जात असताना पाहिला होता.. Happy असलं आय अ‍ॅम सो लकी वाटल ना.. १५ लोकांच्या गोतावळ्यात फक्त मलाच दिसला/ली.

लाल निखार म्हणजे मी, शांकली आणि शशांक एकदा कात्रज घाटातुन जात होतो तेव्हा दिसलेलाच का? मला आठवत नाहीए पण शशांक यांना माहिती असेल.

काय एक एक मस्त मस्त पक्षी टिपलेयस.. निळ्या पिवळ्यांची किती ती व्हरायटी..
चष्मेवाला मीपन पाहिलाय.
आरण्यक ला निरुकडे जाताना वाटेत मला आणि शांकलीला कापशी घार दिसलेली. सोबत जिप होता पण गप्पा आणि ती दिसली या आनंदाच्या नादात गाडी थांबवून फोटो काढावा हे सुचलच नाही. तेपन असच खुरट्या गवताच्या माळरानावर असलेलं निष्पर्ण झाडं होत आणि निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर तीवर बसलेली ती घार असली सुंदर दिसत होती ना..
आरण्यक मधे दयाळ पन दिसलेला ना?
स्वर्गीय नर्तकाची साद ऐकु आलेली आम्हाला कात्रज घाटात फिरत असताना.

सातभाईंचेच किती ते प्रकार. मला आत्ताच पप्पा फोन करुन सांगतात कि अंगणात सातभाई आले आहेत आणि नुसता कल्ला चालु आहे त्यांचा.
सगळेच प्रचि मस्तय..छान सफर घडवलीस इंद्रा Happy

आता परत एकदा फिरावं लागेल झाडं पक्षी शोधत..

Pages