आवरू केव्हातरी सारा पसारा

Submitted by बेफ़िकीर on 11 January, 2018 - 23:18

गझल - आवरू केव्हातरी सारा पसारा

मासळी बाजार मेंदूचा किनारा
आवरू केव्हातरी सारा पसारा

पावसाळी व्हायचे होतेस थोडे
कोणत्या मोराकडे नसतो पिसारा

मखमली होता तरीही बोचला तो
हा तुझ्या तिकडून आला काय वारा?

शेकडो सामील ह्या मोर्च्यात झाले
वेगळा प्रत्येकजण देतोय नारा

आमचा चांगुलपणा बंदिस्त आहे
इंग्रजांचा आजही आहे पहारा

मोकळे कोणासही होऊ न देती
पापण्यांवरती जरा डोळे उगारा

पाहवेना शांतता भवतालची ही
थोर नेत्यांचे इथे पुतळे उभारा

कारवाई नेमकी होणार केव्हा
वाचतो दररोज मी नुसता इशारा

काढ कर्जे, बार उडवू, देत हुंडे
शेवटी होतोच कोरा सातबारा

शोध घ्या, हुडका वगैरें म्हणत नाही
फक्त मी दिसलो कुठे तर हाक मारा

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त गजल!
शेवटचा शेर खूप-खूप आवडला!