तेव्हा तेव्हा तो असल्याचा येतो प्रत्यय

Submitted by सुप्रिया जाधव. on 3 January, 2018 - 04:01

त्याच्या जेव्हा अस्तित्वावर घेते संशय
तेव्हा तेव्हा तो असल्याचा येतो प्रत्यय

ऱात्ररात्रभर आठवणींच्या सरीत भिजते
सकाळ होता वास्तव देते चटका निर्दय

विरक्त झालो, विभक्त होता आले नाही
सहवासाचे की सवयीचे म्हणायचे भय ?

कसणाऱ्याला महत्व द्यावे की जमिनीला ?
वृत्ताहुन जळजळीत शेरामधला आशय

मळभ दाटता सर्वांगाची होते तगमग
निर्लज्जागत आळस देते विसरुन मी वय

औषध नसते स्वभावास हे पटते आहे
पाहुन माझ्या प्रगतीमधला माझा व्यत्यय

दरवेश्यागत दारोदारी भटकत फिरते
उरला नाही मलाच माझ्या मनात आश्रय

माझ्याभवती रिंगण त्याच्या अस्तित्वाचे
ज्याच्याभवती आहे त्याचे स्वतःचे वलय

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख गजल!
आशय,व्यत्यय...शेर खूप आवडले!