कोण्या एका निलीमाची गोष्ट

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आज निलीमाला अम्मळ उशीरानेच जाग आली. घड्याळाकडे पाहील तेंव्हा सकाळचे आठ वाजले होते. निलीमाला आश्चर्यच वाटल. आज कशी बर ईतकी झोप लागली आपल्याला. एरवी सकाळी ६ वाजता उठते मी पण आज जागच कशी बर आली नाही. आणि कसली ही विचीत्र झोप? अगदी सलग आणि शांत. पण का कोण जाणे आज अगदी उत्साही वाटतय. तस लवकर उठूनही फारसा फरक पडणार नव्हताच म्हणा. कारण तिची ब्रांच तशी घरा जवळच होती. अगदी हाकेच्या अंतरावरती. रीटायर्मेंट जवळ आली म्हणून वरिष्टांनी घराजवळची ब्रांच मुद्दाम दिलेली. आणी वेळही किती सोयीस्कर सकाळी १० ते संध्याकाळी ५. म्हणजे तसा बराच वेळ आहे की आपल्याला. एकाच माणसाच तर जेवण, त्याला कितीसा वेळ लागतो.

तशी निलीमा लहानपणापासून सोशिक आणि अगदी नाकासमोर चालणारी. आई-वडील, ती लहान असतानाच कूठल्यातरी अपघातात दगावलेले. तिला तसे ते फारसे आठवत ही नव्हते. पूढे तिचा कोणत्यातरी दूरच्या मावशीने साम्भाळ केला, म्हणून अनाथाश्रमात जाव लागल नाही इतकच. निलीमा वयात येताच मावशीनी तिच लग्न करून दिल. पण तिच्या नशीबात सुख सुख म्हणतात ते नव्हतच कधी. लग्नानंतर २ वर्षातच तिचा नवरा, दारू पिऊन पिऊन, लिवर खराब होऊन मेला. तेंव्हाही ती फारशी रडली नाही. मूल-बाळ नव्हतच आणि पून्हा लग्न करावस तिला वाटलच नाही. त्यामूळे तिच आपल अस कोणी नव्हत. नाही म्हणायला नोकरी होती बर्‍यापैकी. अगदी दोन वर्षापूर्वी 'व्ही आर एस' येऊन सुद्धा तिने ती स्वीकारली नव्हती. एकच वर्ष तर उरलय रिटायर्मेन्टला. आणि घरी बसून काय करायच हा प्रश्न आहेच. आणि श्रीक्रुष्ण सोसायटीमध्ये तिच स्वतःच अस घर होत. ईतकाच काय तो आधार.

कूकरच्या शिटीने तिची तंद्री भंगली. सकाळी मऊ भात आणि वरण खायची नेहेमीची सवय. पण आज का कोण जाणे भूकच नव्हती कशी. रात्री किती वाजता जेवलो हेही तिला आठवत नव्हत. नाहीतर दूपारी घरी येउन जेवू, उगाच डबा कशाला न्यायचा. तयारी करून ती पटकन घराबाहेर पडली. जिना उतरताना शेजारची सुमी तिला जवळ्जवळ आपटणारच होती. तिच लक्ष होत म्हणून बर. नाहीतर. कसल्या गडबडीत असतात ह्या पोरी कोण जाणे? निलीमा स्वतःशीच पूटपूटली.

रस्त्यावरही नेहेमीची वर्दळ नव्हती. आज कस अगदी उत्साही वाटतय. ब्रांचमध्येही निलीमाला फारश्या मैत्रीणी वगैरे नव्हत्याच. सगळ्या तरूण मूलीच. तिच्या बरोबरच्या अश्या कोणी नव्हत्या. आणि तिचा स्वभाव तसा फारसा कोणात मिसळण्याचा नव्हता. आपण बर की आपल काम बर असा. विचारात ती ब्रांचला कधी पोहोचली तिला कळलच नाही. दरवाज्यावरच्या सिक्युरीटीने तिला बघून न बघितल्या सारख केल. तिला रागच आला. नाहीतरी हे सिक्युरिटीवाले जरा आगाऊच असतात. आणि हवाय कशाला तो जूलूमाचा राम राम.

निलीमा आपल्या नेहेमीच्या जागेवर येऊन बसली. 'निलीमा देशमूख - ऑफीसर- डीपॉसीट्स' अशी पाटी होती टेबलावर ती तिने हलकीच पूसून घेतली. तिने पर्स बाजूला ठेवली आणि जरा हाश हूश करून टेबलावरचे अकाउंट ओपनींगचे फॉर्म चाळायला घेतले. काही फॉर्म मध्ये इन्ट्रोडक्शन नव्हते तर काही फॉर्म्स मध्ये नॉमीनेशन सुद्धा नव्हते. तिला त्या मनिषाचा रागच आला. मनिषा तिची असिष्टंट , नवीनच लागलेली. आज तिला झाडायचच म्हणून तिने पाहील तर मनिषा दिसली नाही. आजही दांडी मारलेली दिसतेय पोरीने. कठीणच आहे एकन्दरीत.

आज ब्रांच मध्ये फारशी गर्दी नव्हती. नाहीतरी महिन्याच्या मध्याला फारशी वर्दळ नसतेच. ब्रांचमधला स्टाफ घोळक्याघोळक्याने कसली तरी चर्चा करत होता. काय बोलताहेत कोण जाणे- राजकारण, सिनेमा, क्रिकेट का सा रे गा मा कोण जिन्कणार ह्यावर चर्चा. अचानक तिच लक्ष घड्याळाकडे गेल. दूपारचे १२-३० वाजलेले. चला आज लंच टाईमला कधी नव्हे ते घरी जाऊन येऊया. अस म्हणून ती जागेवरून उठली. का कोण जाणे आज कधी नाही तो तिला पेपर वाचावासा वाटला. खालच्या पेपर वाल्याकडे जाऊन ती पेपर चाळू लागली. उभ्या उभ्याच तिने मूख्य बातम्यांचे मथळे वाचून घेतले. आणि एका बातमीकडे तिची नजर खिळली.
' श्रीक्रुष्ण सोसायटीमध्ये रहाणार्‍या श्री. निलीमा देशमूख ह्यांची त्यांच्या रहात्या घरी गळा दाबून हत्या. '

समाप्त........

विषय: 
प्रकार: 

वा.. रहस्यकथा वाट्टं. लिहा पटापट पुढे.. वाचतेय.. Happy

ओ.के.. पण लिवणारा कामून संपला? अजून चांगल्या चांगल्या लिवायच्या नाईत?

सहीच लिहिलेस!! आवडले!!

पैली गोस्ट म्हनजी ही गोस्ट रहस्यकथा नाय कै फार तर गूढ कथा म्हनता येइल.

आनि दूसर म्हन्जी कथा सम्पली ते कल्ल नाय म्हून.

लिवनार्‍याच ते भल मोट्ट अपयश हाय म्हनून लिवनारा सम्पला.

केदार छान लिहीलीय. स्टाईल आणि कल्पना सही आहे. अजून थोडी वाढवली असती तरी चालली असती.
>> आणि लिहीणारा पण..
ही खरी गूढकथा दिसतेय. Happy

ही खरी गूढकथा दिसतेय????

खरी कथा आहे का काल्पनिक कथा आहे, तेच तर खर गूढ आहे.

धन्यवाद अनघा, शैला आणि संघमित्रा.

केदार, कथा चांगली जमली आहे, सस्पेंस टिकून आहे. पण 'गळा दाबून हत्या' असेल तर अजून थोडं explanation हवंय.. जसं की खूनाचा मोटीव्ह.. या ऐवजी तिने वैफल्यातून, एकटेपणामुळे आत्महत्या केली असती तर जास्त योग्य वाटलं असतं असं मला वाटतं.

सर्वप्रथम कथा वाचल्याबद्दल धन्यवाद पूनम.

आधीच्या comment मध्ये म्हटल्याप्रमाणे ही रहस्य कथा न म्हणता गूढ कथा म्हणता येइल. थोडक्यात सांगायच तर गूढ कथे मध्ये खूनाचा motive, method, खूनी कोण हे मुद्दे गौण असतात.

तरीही जर स्पष्टीकरण करायचे असेल तर असे करता येइल की 'निलीमा' ह्या पात्राचा स्वभाव एकलकोंडा आहे. तिने बरीच दुख्खे पचवलीयेत. त्यामूळे एकटेपणामूळे वैफल्यग्रस्थ होवून तिने आत्महत्या करणे (निदान ह्या कथेमध्ये तरी) अयोग्य वाटते.

तसे पाहीले तर तिच कोणीही नाही. पण तिची बरीच वर्षाची नोकरी आहे (त्यामूळे घरी रोकड असणे दागिने असणे - अगदी bank मध्ये locker असूनही शक्य आहे), स्वतःच्या नावावर जागा आहे, ती फारशी कोणाशी मिसळतही नाही. ही गोष्ट कोणा तिर्‍हाइताला तिचा खून करण्यासाठी प्रव्रुत्त करू शकते.

त्यामूळे आत्महत्ये-पेक्षा खून (निदान ह्या कथेत तरी) योग्य आहे अस वाटत.

तूम्हाला काय वाटत पूनम??

धन्यवाद स्वाती.

केदार, कथा चांगली जमलीय... पण अजुन वाढवली असतीस तर चालले असते!!
(हे आपले माझे मत!!)

वाचता वाचता सम्पली पण अस झाल.... जरा मोठी असती तर अजुन मजा आली असती. अर्थात ते आता माझ मत ...........

उभ्या उभ्याच तिने मूख्य बातम्यांचे मथळे वाचून घेतले. आणि एका बातमीकडे तिची नजर खिळली.
' श्रीक्रुष्ण सोसायटीमध्ये रहाणार्‍या श्री. निलीमा देशमूख ह्यांची त्यांच्या रहात्या घरी गळा दाबून हत्या. '
हे कस काय बुवा??? 'श्री.' च्या जागी 'श्रीमती' पाहिजे ना???