'आप' तो ऐसे ना थे..!

Submitted by अँड. हरिदास on 5 January, 2018 - 07:09

untitled-6_1515117330.jpg
'आप' तो ऐसे ना थे..!

सत्ता नावाची गोष्टच अशी असते कि ती भल्याभल्याना कळसूत्री बाहुल्याप्रमाणे नाचवत राहते. सत्तेचा उपयोग नीती आणि विवेकाने केला तर तिच्यामुळे माणसातले माणूसपण फुलते. मात्र, हीच सत्ता डोक्यात शिरली कि ती माणसाच्या नैतिक अधःपतनालाही कारणीभूत ठरू शकते. कुणी सत्तेचा वापर जनहितासाठी करतो.. तर कुणी या सत्तेच्या भरवश्यावर आपला स्वार्थ साधून घेतो. सत्ता माणसाला घडवतेही आणि बिघडवतेही. हातात सत्ता असताना नीती नियम आणि तत्तवांचे पालन करून घडलेल्या व्यक्तीची इतिहास नोंद घेतो. तर सत्तेसाठी तत्व सोडून स्वार्थ जपणाऱ्या व्यक्तीला इतिहासही माफ करत नाही, हा सुद्धा एक इतिहास आहे. अर्थात वरील वाक्य फक्त वाचण्या- ऐकण्यासाठीच चांगली वाटतात. यावर जर प्रत्यक्ष अमल करायचा म्हटलं तर व्यवहारवादच आठवतो. राजकारणात तर नीतिमत्ता, आदर्शवाद हे शब्द अंधश्रद्धेसारखे झाले आहेत. तात्विक आदर्शाच्या गप्पा मारणाऱयांनी स्वतःवर वेळ आल्यावर आपल्याच आदर्शावर पाणी फिरवल्याचा एक नवा 'आदर्श' निर्माण केला आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजीरवाल यांनीही हा 'आदर्श' घेतल्याचे सध्याच्या घडामोडीवरून दिसत आहे. राजकारणातील अनैतिकतेवर प्रहार करत राजकारणात आलेल्या केजरीवालांनी राज्यसभेचे उमेदवार देताना आपल्याच नैतिक आदर्शावर 'झाडू' फिरवला असल्याने 'आप' तो ऐसे ना थे ! म्हणण्याची पाळी त्यांच्याच सहकाऱ्यांवर आली आहे.

समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलांतून अरविंद केजरीवाल नावारूपाला आले. लोकपालाची मागणी करता करता राजकारणातील अनैतिकतेची घाण साफ करण्यासाठी हातात झाडू घेऊन केजरीवालांनी आम आदमी पार्टीची स्थापना केली. राजकीय ढोंग, राजकीय अनैतिकता, प्रस्थापितांनी पायदळी तुडवलेली नीतिमूल्ये,भ्रष्टाचार वगैरेंबाबत सातत्याने आगपाखड करत अरविंद केजरीवाल यांनी प्रस्थापित पक्षांपेक्षा 'आप'ला पक्ष वेगळा असल्याचा भ्रम जनतेत निर्माण केला. स्वार्थाच्या राजकारणाला कंटाळलेल्या दिल्लीकरांनी ही नवीन पर्याय म्हणून आप ला आपले समजून दिल्लीची सत्ता दिली. मात्र त्यांचा भ्रमनिरास व्हायला जास्त वेळ लागला नाही. सत्तेवर येताच केजरीवालांनी त्यांच्या पक्षाची एक अनोखी आचारसंहिता निर्माण केली. मुख्यमंत्रीपदाला आवश्यक असणारी सुरक्षाव्यवस्था आणि बंगलाही नाकरला. पण ही नैतिकता फार काळ टिकली नाही. सत्तेची खुर्ची मिळताच आम आदमी पार्टीवर भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यहाराचे आरोप सुरु झाले. पक्षाला येणाऱ्या निधीपासून ते उमेदवारी देण्यासाठी आर्थिक गैरव्यहारापर्यंतचे आरोप वैक्तिकरित्या केजरीवाल यांच्यावर झाले. यातील अनेक आरोप त्यांच्या सहकार्यांनीच केले आहेत. मध्यंतरी केजरीवाल यांच्या अत्यंत विश्‍वासातील मंडळीनी 'आप' मध्ये 'पाप' सुरु असल्याचा आरोप करून पक्षाला सोडचिट्ठी दिली. आता राज्यसभेच्या उमेदवार यादीने पक्षातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आणला आहे.

मीरा सन्याल, कुमार विश्वास, आशुतोष किंवा आशिष खेतान ही कितीतरी सरस नावे असताना अरविंद केजरीवाल यांनी 'आप' ल्या पाठबळासाठी पक्षाचे नेते संजयसिंग, व्यावसायिक सुशील गुप्ता आणि सीए नारायणदास गुप्ता यांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला जातोय. अरविंद केजरीवाल यांच्या स्वभावात अनेक दोष असतील, पण त्यांना कोणीही विकत घेऊ शकत नाही, असा माझा विश्वास होता. आज मी संभ्रमात गेलोय. मी स्तब्ध झालोय आणि खजिलदेखील.. ही योगेंद्र यादव यांची प्रतिक्रिया आम आदमी पार्टीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. केवळ जनमताच्या आधारावर गोष्टी होऊ नयेत, ज्येष्ठांकडून तपासून घेतल्या जाव्यात तसेच राज्यांना अप्रत्यक्ष प्रतिनिधीत्व मिळाव इत्यादी उद्देशांनी भारतीय राज्यघटनेच्या रचनाकारांनी राज्यसभेची घडण केली. मात्र राजकीय पक्षांनी या सभागृहाचा वापर विस्थापित राजकारण्यांची सोय करण्यासाठी केला. पक्षाला ‘अर्थपूर्ण’ ताकद देऊ शकणाऱ्यांना राज्यसभा किंव्हा विधानपरिषदेवर पाठविण्याचे प्रकार राजकीय पक्षाकडून केले जातात. तसं पाहता हा प्रकार कितीही गंभीर असला तरी त्यावर फार काही चर्चा वैगरे केली जात नाही. सगळेच एका मळीचे मणी असल्याने ''तेरी भी चूप, मेरी भी चूप' याप्रमाणे हा कार्यक्रम चालतो. मात्र अरविंद केजीरवाल यांनी नेमकं अशाच राजकीय अनैतिकतेवर बोट ठेवून काहूर उठवलं होतं. आजही आपण इतरांपेक्षा वेगळं असल्याचा तोरा ते मिरवत असतात. मात्र त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असल्याचे या घटनांवरून समोर येते.

जनतेने मोठ्या अपेक्षेने सत्तेची सूत्रं आम आदमी पक्षाकडे सोपवली होती. त्या दृष्टीने सुरूवातीला या सरकारचा कारभार उत्तम राहिला. परंतु नंतर केजरीवाल आणि मंडळींच्या डोक्यात राजकारणाची हवा चांगलीच शिरली. त्यात केजरीवाल यांची महत्वाकांक्षा तर राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहचली. आम आदमी पार्टी च्या नेत्यांवर गंभीर आरोप होत असताना केजरीवाल यांनी त्यावर मौन पाळले. स्वतः केजरीवाल यांच्यावरही अनेक गंभीर आरोप झाले आहेत. गेल्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत आप ला याचा मोठा फटका बसला. तरीही केजरीवाल यांना यावर आत्मपरीक्षण करावे वाटले नाही. त्याऐवजी ते राष्ट्रीय नेता बनण्याचे स्वप्न पाहू लागले. अर्थातच राजकारणाचा आणि सत्तेचा हव्यास त्यांना लागला आहे. निवडणुकीच्या राजकारणात लांड्या लबाड्या करणे आवश्यक ठरते, असे म्हटले जाते. त्यामुळे केजरीवाल जे करत असतील त्याला ' राजकारण' हे गोंडस नाव देऊन त्याच ते समर्थन करतीलही. मात्र, नैतिकतेचा पाठ शिकविण्याचा (नैतिक)अधिकार त्यांच्याकडे असणार नाही, हे हि तितकेच खरे..!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात नैतिकता किंवा अनैतिकता याचा संबध काय आहे ? कोणाला राज्य सभेची उमेदवारी द्यायची यावर डिबेट होउ शकते. ज्यांना नाहि दिली ते नाराज होणे साहजिक आहे .
पण नैतिकतेचा पाठ शिकविण्याचा (नैतिक)अधिकार त्यांच्याकडे असणार नाही याचा काय संबध ??

ज्या नैतिकतेच्या गप्पा मारून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.. त्या गप्पा ते यापुढे हि जरूर मारू शकतील मात्र जनतेच्या नजरेत त्याला नैतिक अधिष्ठान असणार नाही,

ज्या तिघांना आपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे ते भ्रष्ट आहेत, वा लायक नाहीत असे आहे का? तसे नसेल तर आपने त्यांना उमेदवारी देणे आपला भ्रष्ट ठरवत नाही. ज्यांना राज्यसभेची सीट हवी होती व मिळाली नाही ते नाराज होतील, पक्षाविरोधात बोलतील हे साहजिक आहे. पण त्यामुळे केजरीवाल का भ्रष्ट वा त्यांच्या मूळ मुल्यांना चाट देऊन टिपिकल राजकारणी झाले आहेत हा निश्कर्ष का?

आपवाल्याशी बोलल्यावर असे कळले की केजरीवाल ला राज्यसभेत अरुण जेटलीना काऊंटर करण्यासाठी अकाउंट फिल्ड मधला कोणीतरी जाणकार हवा होता.
आधी राजन यांना विचारण्यात आले मग नरिमन या अजून कोणीतरी होते पण ते काही जमले नाही म्हणून यांना उमेदवारी दिली . हे स्वतः सीए आहे. राहिली गोष्ट काँग्रेस मधून आलेल्या गुप्तांची तर माझे म्हणणे असे की दोन पक्षांना 900 -600 करोड वर्गणी मिळत आहे तर अश्या पक्षांना टक्कर देण्यासाठी किती दिवस लोकांकडून वर्गणी मागत फिरणार? थोडे रिऑस्टिक विचार करा..
दिल्लीत सरकार व्यवस्तीत चालू आहे ना. ? शिक्षण खात्यात उत्तम प्रगती केली ना? कितीतरी योजना काढल्या आहे. भाजप्यांचा आणि एलजी चा किती विरोध असला किती छळ केला तरी त्या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून कारभार चालू आहे.
मोदी तर अजून ही खोटं बोलत फिरत असतो काँग्रेस ने गुजरात मध्ये मदत केली नाही. तिथे तर सर्व निर्णय मुख्यमंत्री वर असतात तरी.. इथे तर सतत त्या एलजीच्या मागे फिरावे लागते.. दुसरा कोणी असता तर कधीच बंड पुकारले असते..

थोडे रिऑस्टिक विचार करा..<<
>वास्तविकता अशी आहे कि राजकारणात पैसे चालतो.. म्हणून देणग्या घ्याव्यात त्याला कुठे विरोध आहे. पैसेवाले सोबत हवे ते सुद्धा घ्या पण मग नैतिकतेच्या गप्पा नका मारू. लोकपाल आंदोलनात जी केजरीवाल यांची भूमिका होती ती फसवी होती, भ्रष्टचार विरोधी लढा हा फक्त राजकारणाची वाट मोकळी करण्यासाठी उभारण्यात आला होता. असं जाहीर केलं तर कुणाची काही हरकत राहणार नाही.

दिल्लीत सरकार व्यवस्तीत चालू आहे ना. ? शिक्षण खात्यात उत्तम प्रगती केली ना? कितीतरी योजना काढल्या आहे. भाजप्यांचा आणि एलजी चा किती विरोध असला किती छळ केला तरी त्या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून कारभार चालू आहे.<<
>> नाकावर टिचून म्हणजे काय ? समजाउपयोगी योजना राबविणे सरकारचे कामच असते. विरोध तर सर्वानाच होतो. बहुमत मिळाले म्हणजे अधिकारही मिळाले आहेत ते राबविणे याला नाकावर टिच्चून कसे म्हणता येईल ?

केजरीवाल का भ्रष्ट वा त्यांच्या मूळ मुल्यांना चाट देऊन टिपिकल राजकारणी झाले आहेत हा निश्कर्ष का?<<
>>केजरीवालांनी ज्या राजकीय मुद्द्यांना विरोध करून त्यात बदल करण्याची आस दाखवून सत्ता मिळवली तेच ते आज करताना दिसत आहे. अगदी टिपिकल राजकारण्यासारखे

केजरीवालांनी ज्या राजकीय मुद्द्यांना विरोध करून त्यात बदल करण्याची आस दाखवून सत्ता मिळवली तेच ते आज करताना दिसत आहे. अगदी टिपिकल राजकारण्यासारखे

----> साफ चुकीचे विधान आहे.

स्वतः केजरीवाल यांनीच राजकीय ढोंग, राजकीय अनैतिकता, प्रस्थापितांनी पायदळी तुडवलेली नीतिमूल्ये वगैरेंबाबत सातत्याने आगपाखड केली. राजकीय साधनशुचिता आणि स्वच्छतेचा आग्रह धरला होता. शुचितेचे राजकारण करताना स्वत:ला शुद्ध ठेवावे लागते. ज्या आंदोलनामुळे केजरीवाल देशव्यापी हिरो झाले, तो लोकपाल कायदा दिल्लीत राबविण्यात आला का सुद्धा प्रश्न यानिमित्ताने समोर येतो. लोकपाल आंदोलनातील चळवळीतील कार्यकर्ता म्हणून समोर आलेले केजरीवाल आणि आज सत्ताकारणात आकंठ बुडलेला मुरलेला पुढारी.. अशी दोन रूपे बघायला मिळत आहे. पर्यायी राजकारणाची आशा दाखवणाऱ्या केजरीवालांकडून हा झालेला भ्रमनिरास नाही तर काय आहे ? आपणास आठवते का, याच केजरीवालांनी देशातील सर्व नेते भ्रष्ट आहेत, यांना तिहार तुरुंगात डांबले पाहिजे अशा घोषणा केल्या होत्या..

वकीलसाहेब. नीट व्यवस्थित पुरावे देऊन बोला. व्हेग स्टेटमेंट करुन विनाकारण टिआरपी खाऊ नका.
तुम्ही केजरीवालांवर भ्रष्टाचारांचे गर्भित आरोप करत आहात. तुमच्याकडे पुरावा आहे का?
लोकपाल कायद्याबद्दल दिल्ली राज्याचे निर्णय कोण घेतं हे माहित आहे का? केवळ गर्भित आरोप करणारे वाक्य सोडून द्यायचे. आगापिछा काहीच माहित नाही. The Jan Lokpal has been cleared by the Assembly and is awaiting approval from the Centre. Once that is done with, things will definitely change for the better,” तुम्हीच सांगा, केंद्रसरकारने काय केले दिल्लीसरकारच्या पास केलेल्या बिलाचे?

सत्ताकारणात आकंठ बुडलेला असे शब्द वापरत आहात की यंव रे यंव. जसा काही भ्रष्टाचारात बुडालाय तो. काही म्हणजे काहीही चालू आहे वकीलसाहेब तुमचे.

आप च्या शिक्षण मंत्रीला हाॅवर्ड मध्ये भाषणासाठी बोलवले
भाजप्याच्या एकतरी शिक्षणमंत्रीला बोलवले का? येलेधारींची तर पात्रता नव्हतीच किमान जावडेकरला तरी विचारायचे Wink