इसम

Submitted by बेफ़िकीर on 2 January, 2018 - 12:21

इसम लोकेश ढाब्याच्या मालकासमोर उभा होता. मालकाने इसमकडे बघितले. फारच गबाळा! मळकट शर्ट, मळखाऊ पँट आणि वाढलेली दाढी! इसमचे इम्प्रेशन बकवास होते. पण इसम म्हणत होता काम द्या. मालक म्हणाला....

"नांव काय तुझे?"

"इसम"

"काय?"

"इसम"

"इसम?"

"होय"

"काय अनुभव?"

"कसला? "

"अरे कामाचा काही अनुभव आहे का? "

"नाही "

"मग? "

"पण काम करेन "

मालकाने त्याला एका खुर्चीवर बसून राहायला सांगितले. वीस एक मिनिटांनी पुन्हा बोलावले. मालक म्हणाला.........

"ढाब्याच्या बाहेर हायवेवर एक खुर्ची घेऊन बसायचे. लांबून गाडी येताना दिसली की तिला हात करून आत बोलवायचे. एक गाडी आत आली तर तुला वीस रुपये. हा हायवे आहे. मिनिटाला वीस गाड्या जातात. भरपूर कमवशील. चालत असेल तर काम सुरू कर"

इसम हो म्हणाला. इसमने एक खुर्ची घेतली आणि बसला. दोनेक मिनिटांनी अनेक गाड्या येताना दिसल्या. इसम जिवाच्या आकांताने त्यांना íthe थांबा, इथे थांबा'अशा अर्थाचे हातवारे करू लागला. त्याला धक्काच बसला. चक्क दोन गाड्या थांबल्या. इसमने हिशोब केला. चाळीस रुपये झाले. इसमने खिशात हात घातला. दहा रुपये होते. त्याने ढाब्याबाहेरच्या टपरीवरून चुना तंबाखू विकत घेतले. पुन्हा हातवारे करू लागला.

इसमला मग एक शिट्टी देण्यात आली. तो ती शिट्टी वापरून हातवारेही करू लागला. आत आलेल्या गाड्यांना कुठे पार्क व्हायचे ते सांगूही लागला. हे काम त्याने स्वतःहून केले.

इसम शेवटी दमला. दिवसभरात सोळा गाड्या थांबल्या होत्या. तीनशे वीस रुपये म्हणजे खूप होते. इसम मनात खुष होता.

इसम आत आला. मालकाला म्हणाला........

"सोळा गाड्या, किती झाले?"

"कसल्या सोळा गाड्या?"

"म्हणजे? "

"बारा नेहमीच इथे येतात. चार तुझ्यामुळे आल्या. हे ऐंशी घे "

इसमने क्षणभर खंग्री नजरेने मालकाकडे पाहिले. ऐंशी घेतले, खिशात टाकले. चालत चालत निघून गेला. जाताना मालकाने दुसर्‍या दिवशी अकरा वाजता यायला सांगितले. इसमने ऐकल्या न ऐकल्यासारखे केले. कुठेतरी जेवण केले स्वस्तात! एका टपरीवजा हॉटेलच्या पायरीवर झोपला.

दुसर्‍या दिवशी इसम ढाब्यावर पोचला. मालकाला बरे वाटले. ऐंशी रुपये दिवसाला बरा इसम भेटला, मालक मनात म्हणाला.

इसम खुर्ची घेऊन ढाब्याबाहेर बसला. गाडी आली की इसम उठायचा आणि शिट्टी वाजवून 'पुढे जा'अशा अर्थी हातवारे करायचा. गाड्यांमधून बघणार्‍यांना हे नवीन होते. एका गाडीवानाने तर गाडी थांबवून विचारले की पुढे जायला का सांगतोस? त्यावर इसमने त्याच्याकडे बघत जोरात शिट्टी वाजवत पुढे जा अशा अर्थी हातवारे केले. दोन, चार गाड्या जरा स्लो झाल्या आणि इसमकडे बघत पुढे धावत निघाल्या. कोणास ठाऊक, कदाचित नेहमी थांबणार्‍याही काही गाड्या त्यात असतील. दोन वाजले तरी ढाब्यावर गाडी थांबली नाही. इकडे मालक विचलित!

साडे तीनला मालक सचिंत मुद्रेने बाहेर आला. पाहतो तर इसम गाड्यांना 'इथे थांबूच नका 'म्हणतोय. मालक धावला. त्याने इसमची गचांडी धरली. एक कानाखाली काढली. इसमने विचारले की का मारले. मालकाने शिव्या दिल्या आणि म्हणाला असे केल्यावर गाड्या कशा थांबतील. त्यावर इसम म्हणाला की नेहमीच्या ज्या आहेत त्या थांबतीलच की. पुढे म्हणाला की मला ऐंशी रुपये नकोच आहेत. नेहमीच्या गाड्या थांबल्या तर कामही कमी पडेल आतल्यांना. मालकाने धरून दोन फटके लावले. तसा इसमने एक दगड उचलला आणि मालकाच्या कानफडाखाली हाणला. मालक आरडाओरडा करत जमीनीवर पडलेला बघून भटारखान्यातून दोन चार पोरे धावत बाहेर येऊ लागली. ते पाहून इसम पळू लागला. इसम खूप जोरात पळू शकायचा. इसमला एक धावता ट्रक पकडता आला. ढाब्यावरच्या कोणीही पकडायच्या आधी इसम ट्रक धरून दूर निघून गेला.

ट्रकमध्ये असताना इसमला वाटले की आपण चांगले आहोत. त्याची दिशा ठरली. ट्रक आणि इसमची दिशा खूप वेगळी होती........

=========

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यावर इसम म्हणाला की नेहमीच्या ज्या आहेत त्या थांबतीलच की >> Lol

शेवट नाही समजला. काहीतरी अर्थ असावा. पण मला नाही कळला.

ट्रकमध्ये असताना इसमला वाटले की आपण चांगले आहोत. त्याची दिशा ठरली. ट्रक आणि इसमची दिशा खूप वेगळी होती.... >>>> हे नाही कळले म्हणजे शेवट नाही कळला, पण वाचताना मजा आली अन जितके कळले ते आवडले

आवडलं..
मी पण च्रप्स ने लिहिलंय तसाच अर्थ लावला..

बोधकथा? बोध काय घ्यायचा ?
इसमाच्या अगतिकतेचा धाब्यावाल्याने घेतलेला फायदा..... हे गैर असल्याची इसमाला झालेली जाणीव...... इसमाने त्याच्या परीने शिकवलेला धडा..... हिंसा.....अन्यायाला खळ्ळखट्याक उत्तर द्यायचे हा इसमाचा निश्चित झालेला मार्ग.......

नाही.इसम ला ठोकला नाही.त्याने ट्रक पकडल्याचा उल्लेख आहे.
ट्रक मध्ये स्मगलिंग चा माल होता. ईसम गुन्हेगारी मार्गाला लागला.

त्याची दिशा ठरली. ट्रक आणि इसमची दिशा खूप वेगळी होती >>> मग तो ट्रक मधुन उतरला आणी त्याच्या दिशेच्या दुसर्या ट्र्क मध्ये बसला.

किंवा 'ईसम पुढच्या ठिकाणी पण चांगला वागणार होता पण ट्रक मधल्या माणसांनी त्याच्याकडून गुन्हेगारी कामं एक्स्पेक्ट केली आणि नवीन ठिकाणी पण त्याचे मालकाबरोबर लोचे चालू राहिले.'

त्याची दिशा ठरली. ट्रक आणि इसमची दिशा खूप वेगळी होती >>> मग त्याने परत त्याची ठरलेली दिशा बदलली . मग त्याची दुसरी दिशा ठरली जी ट्रकचीच दिशा होती.

ट्रकमध्ये असताना इसमला वाटले की आपण चांगले आहोत. त्याची दिशा ठरली. ट्रक आणि इसमची दिशा खूप वेगळी होती > >> इसमने एक दगड उचलला आणि ट्रकच्या मालकाच्या कानफडाखाली हाणला. मग ट्रकने आपली दिशा बदलली.

असेहि असु शकते

बेफिंनी लोकांना विचार करण्याच्या कामास लावलं >> त्यांची दिशा आणी लोकांची दिशा खुप वेगळी आहे. Lol

इसम ला ठोकला नाही.त्याने ट्रक पकडल्याचा उल्लेख आहे.
ट्रक मध्ये स्मगलिंग चा माल होता. ईसम गुन्हेगारी मार्गाला लागला. >>>>>>> हेच जास्त संयुक्तीक वाटतेय !

आवडलं लेखनं !

ट्रकमध्ये असताना इसमला वाटले की आपण चांगले आहोत. त्याची दिशा ठरली. ट्रक आणि इसमची दिशा खूप वेगळी होती........ ----
असेही असू शकते की इसमला पहिल्यांदा काहीही कामाचा अनुभव नव्हता पण आता त्याला जाणवले की आपण काही काम करू शकतो, अगदीच बिनकामाचे नाही आहोत. शिवाय तो प्रामाणिक आणि चांगलेच काम करतोय , चालुगिरी नाही त्यामुळे जरी त्याच्याकडून गुन्हेगारी स्वरूपाचे काम कोणी अपेक्षिले तरी तो पुन्हा दुसरा ट्रक पकडू शकेलच.

मी असे वाचले.

त्याची दिशा ठरली. बेफी आणि वाचकांची दिशा खूप वेगळी होती.

त्याची दिशा ठरली. ट्रक आणि इसमची दिशा खूप वेगळी होती.......>>>> मला समजलेला अर्थ असा...

" इसमला वाटले की आपण चांगले आहोत. " हे वाक्य खूप सांगून जातं. मालक चांगला वागत/वाटत होता तो पर्यंत आपण त्याच्याशी चांगले वागलो. पण त्यानी लबाडी केल्यावर त्याला व्यवस्थित धडा शिकवला . हे स्वतःचं वागणं इसमाला आवडलं आणि त्याच्या आयुष्याची दिशा त्यानी ठरवली की जिथे जाऊ तिथे " भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथा देऊ काठी"
ट्रकला मात्र ड्रायव्हर देईल ती दिशा, योग्य-अयोग्य कुठलीही. बहुधा अयोग्यच! आत्ताच्या ड्रायव्हरनेदेखील असेच काहीतरी काम फुकटात करुन घेऊ म्हणून आत घेतले असेल. दोघंही एकाच दिशेनी प्रवास करत असले तरी त्यांच्या विचारांची दिशा/अंतिम ध्येय मात्र वेगळी /भिन्न आहे.

कोणीही पकडायच्या आधी इसम ट्रक धरून दूर निघून गेला.<<
>>शेवट या वाक्यात झाला असं म्हणता येईल..पण याठिकानीही लेखकाने संभ्रम निर्माण केला आहे "इसम दूर निघून गेला" अस म्हटलं असतं तर बोध झाला असता इसमाचा दुर्दैवी शेवट.. परंतु "इसम ट्रक धरून दूर निघून गेला" असं वाक्य आल्याने शुगोल म्हणतात तसा याचा अर्थ होऊ शकेल. बाकी डोक्याला झिनझिन्या आणल्या.. अतिसुंदर मांडणी..