आंबेडकरवादी गझल

Submitted by बेफ़िकीर on 18 December, 2017 - 02:08

आंबेडकरवादी गझलवेध नावाच्या एका उपक्रमाची माहिती काल व्हॉट्स अ‍ॅपवर वाचली. त्यावर काही शंका विचारल्या की गझलेत आंबेडकरवाद वगैरे कधीपासून यायला लागले आहेत व का येत आहेत. त्यावर उत्तर मिळाले की जे गझलकार आंबेडकरवादी आहेत पण त्यांना गझलेच्या मुख्य प्रवाहात सादरीकरणाची संधी दिली जात नाही त्यांच्यासाठी हा उपक्रम आहे. ह्याशिवाय असेही सांगण्यात आले की शाहू - फुले - आंबेडकर ह्यांना मानणारे व सामाजिक आणि पुरोगामी गझल लिहिणारे ह्यातून एकत्र येतील.

मी शुभेच्छा देऊन मोकळा झालो.

आता ज्यांना गझलेच्या स्वरुपाची अजिबातच माहिती नाही त्यांच्यासाठी:

गझलेत दोन ओळींचा एक शेर होतो व असे किमान पाच शेर एका गझलेत असावेत असा संकेत आहे. ह्यातील प्रत्येक शेर आशयाने एकमेकांपासून संपूर्न स्वतंत्र असतो व एका शेरावर दुसरा शेर कधीही अवलंबून नसतो. आता ह्या वैशिष्ट्यामुळे एकाच गझलेत एक शेर राजकारणावर, एक प्रेमावर, एक जुन्या स्मृतीवर, एक अध्यात्मावर असे कोणत्याही विषयावरचे शेर एकत्र नांदू शकतात, नव्हे नांदतातच.

ह्याशिवाय, इतर काव्यप्रकारांच्या तुलनेत गझलेला (जरी विषयांची काहीच मर्यादा / बंधन नसले तरीही) एक विशिष्ट स्वभावप्रवृत्ती असते व ती शतकानुशतके जपली गेली आहे. ह्या स्वभावप्रवृत्तीत मनोव्यापार अतिशय महत्वाचे ठरतात. म्हणजे असे की एखादी कविता जशी निव्वळ निसर्गवर्णन करणारी असू शकते किंवा चळवळीला स्फुर्ती देणारी असू शकते तशी गझल निव्वळ वर्णनात्मक रचली जात नाही. गझलेचा शेर वाचून वाचकाला / रसिकाला स्वतःचे मन डचमळल्यासारखे, गलबलल्यासारखे वाटते कारण त्यात फार वैयक्तीक मनोव्यापारांवर (सहसा) भाष्य केले जाते. उदाहरणार्थ, एखादा ऋतू आल्यामुळे कवी फार प्रफुल्लीत झाला इथे कविता संपू शकते पण गझल तेवढेच लिहून थांबत नाही (थांबू नये) तर ती त्याचा कवीमनाला लागलेला एक हळवा करणारा अर्थही कथन करते. थोडक्यात, गझल ही मनाची बोली व मनोव्यापारांची बोली असते.

शतकानुशतके गझलेत अनेक मठ, मठाधिपती, कंपूशाही, स्पर्धा हे सगळे होत आलेले आहे. अनेक नवीन प्रवाह येऊन गेलेले आहेत, काही रुजले आहेत तर काही नाकारले गेले आहेत. परंतु (माझ्या अल्प अभ्यासानुसार) कोणत्याही एका पंथाची / धर्माची अशी गझल आजवर मुद्दामहून पुढे करण्यात आलेली नाही. हिंदी - उर्दू - मराठी असे मिश्र मुशायरे किंवा हिंदू - मुस्लिम मुशायरे होणे हे तर खरे तर दोन संस्कृतींचा मिलाफ घडवून आणणारे ठरले.

आज मराठीत गझलेला व्यासपीठ देणारी जी काही दहा - वीस मंडळे आहेत त्यांच्याबाबतचे माझे निरिक्षणही हेच आहे की तेथे जातपात, धर्म वगैरे बघून गझलकाराला स्थान दिले जात नाही तर निव्वळ गझलेच्या गुणवत्तेवर स्थान मिळते. गझलतंत्र ही एक अशी बाब आहे की सरावाने त्यावर हुकुमत आल्यावर कोणीही शब्दपेरणी करून 'तंत्रशुद्ध'गझल सादर करू शकतो. मात्र ती गझल आशयानुसार चांगली असेलच असे नाही. तर व्यासपिठावर गझल / गझलकार निवडताना अर्थातच आपापल्या संस्थेच्या प्रतिष्ठेसाठी उत्तम गझल / उत्तम गझलकारच निवडला जातो. कोण स्वखर्चाने सामान्य गझल पण विशिष्ट पंथियांची गझल घेऊन प्रतिष्ठा घालवणार?

पण असा घाट घालण्यात आला आहे.

आज नावारुपाला आलेल्या नावांमध्ये कित्येक गझलकार हे त्याच आंबेडकरी पंथाचे आहेत. असे असूनही हा वेगळा पंथ काढण्यामागे जी मानसिकता आहे ती अशी:

'आम्हाला वगळण्यात येते. आम्हाला गझलविश्वात योग्य स्थान मिळत नाही. आमचा समाज गझल लिहितो ह्या बाबीकडे मत्सराने पाहिले जाते'

वरीलपैकी शेवटची दोन वाक्ये फेसबूकवर तर पहिले वाक्य काल व्हॉट्स अ‍ॅपवर वाचले.

शाहू-फुले-आंबेडकरवादी कविता असा उपक्रम असणे समजता येते कारण कवितेला एकच विषयही असतो व अशा कविता जर चांगल्या रचल्या तर नक्कीच प्रबोधनात्मक व समाजसुधारणा करणार्‍या ठरतात. पण केवळ गझलतंत्र येते म्हणून गझलेचा मूळ स्वभाव पूर्णपणे दुर्लक्षून त्या गझलेला विशिष्ट 'वादी'बनवणे व त्यात आनंद मानणे हे नक्कीच 'जेथे जातपात नाही तेथे ती आणणे आहे'असे माझे मत आहे.

ह्याशिवाय, शाहू, फुले व आंबेडकरांना इतर कोणीच आपले किंवा मोठे मानत नाही हा समज पसरवण्यामागे काय भूमिका आहे त्याचाही अंदाज येतोच. टिळक-सावरकर-आगरकरवादी गझल असा प्रकार कधीही अस्तित्वात येणार नाही.

पुरोगामी ह्या शब्दाबद्दल थोडेसे:

पुरोगामी ह्या शब्दाचे महत्व सध्य अनन्यसाधारण झालेले आहे. पुरोगामी असणे म्हणजे योग्य आणि नसणे म्हणजे अयोग्य हे इतके नीट कोरले गेले आहे की हा शब्द वापरतानाही भीती वाटावी. वास्तविक पाहता बहुसंख्य माणसे ही पूर्णपणे पुरोगामी होऊ शकत नाहीत, इच्छा असली तरी! तरीही हे मान्य केले पाहिजे की पुरोगामी होणे हे केव्हाही उत्तम मानव होण्याचेच लक्षण आहे. पण गझल, जिच्यात मुळातच पारंपारिकता, रुढी, प्रथा, संस्कृती, इतिहास ह्यांचे लक्षावधी उल्लेख येतात व त्यातून तो काव्यप्रकार सजतो, त्यात पुरोगामित्व आणायचे झालेच तर ते एखाद्या विशिष्ट पंथाच्या लेबलाखाली कशाला? पुरोगामी गझल (!) कोणीही लिहू शकेल की? गझल हा काव्यप्रकार जर पुरोगामित्व रुजवण्यासाठी वापरण्याचा मानस असेल तर 'समाजसुधारक पुरोगामी गझलवेध'असे शीर्षक नाही का देता येणार? त्या शीर्षकाची सुरुवात आंबेडकरवादी ह्या शब्दाने करून कोणती भिंत आधी बांधली जाईल हे बघितले जात आहे?

विद्रोही कविता, विद्रोही साहित्य, इतर कित्येक चळवळींना स्फुर्ती आणि उपेक्षितांना वाचा देणारे साहित्य होऊन गेले आहे, होत राहील. त्या त्या साहित्याने त्याचे कार्यही केलेले आहेच. हा गझलेतून एक प्रवाह वेगळा काढून तो वाहता ठेवण्याचा मानससुद्धा कदाचित तेच कार्य पुढे करेल. पण हे करताना गझलेचा आत्मा (अमर्याद विषय आणि अंदाजे बयां) ह्यावरच घाव घातला जाईल हे कोण पाहणार? शिवाय, ह्या प्रवाहाची निर्मीतीही आम्हाला मुख्य प्रवाहातून वगळण्यात आले होते' ह्या काल्पनिक विधानावर आधारीत आहे. प्रत्यक्षात पुण्यासारख्या ठिकाणीही हे होताना दिसत नाही.

'भीम'ही रदीफ असलेली गझल एकाने त्वरीत सादर केली माझ्या मुद्यांच्या प्रतिवादार्थ! अर्थातच अशी गझल ही एखादी अस्सल गझल न ठरता भक्तीरसाने ओथंबलेली रचना ठरणार किंवा अन्यायी समाजावर शाब्दिक प्रहार करणारी स्फुर्तीदायक कविता ठरणार!

असो! 'बोलायची सोय नाही'ह्या सदरात आता आणखी एक बाब आली आहे. म्हणूनच मी शुभेच्छा देऊन मोकळा झालो.

========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users